नवीन लेखन...

तीन शतकांपूर्वीची पत्रं

दोन शतकांपूर्वीपर्यंतच्या काळात पत्र ही स्वतंत्र लिफाफ्यात ठेवून बंद करण्याची पद्धत नव्हती. त्या काळी ही पत्र विविध प्रकारे दुमडून, त्यांच्या विविध बाजू एकमेकांत अडकवून, या पत्रांना स्वतःलाच लिफाफ्यासारखं स्वरूप दिलं जायचं. यासाठी खाचा, छिद्र अशा विविध प्रकारांचाही उपयोग केला जायचा. एकदा हव्या तशा घड्या घातल्या की त्यानंतर बाहेरची बाजू चिकटवण्यासाठी गरजेनुसार गोंदाचा वापर केला जायचा. आवश्यक असल्यास हा लिफाफा सीलबंदही केला जायचा. नेदरलँड्‌समधील हेग इथल्या डच पोस्टल म्यूझियममध्ये अशा बंद पत्रांची एक जुनी पेटी आहे. सतराव्या शतकातील या पेटीत, न पोचवली गेलेली अशी तीन हजारांहून अधिक पत्रं आहेत. विविध युरोपीय भाषांतील ही पत्रं काही अज्ञात कारणास्तव संबंधितांकडे पोचवली गेली नाहीत. या पत्रांपैकी ५७७ पत्रं ही दुमडून बंद केलेली पत्रं आहेत.

या विविध पत्रांतील मजकूर तसंच पत्रांचं स्वरूप, पत्रांच्या घड्यांची पद्धत, या सर्वच गोष्टी इतिहासकारांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. कारण हा सतराव्या शतकातला काळ युरोपातला अस्थिरतेचा काळ होता. या पत्रांतून त्याकाळच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला जाणार आहे. परंतु अडचण ही आहे की, काही शतकांपूर्वीची ही जूनी पत्रं उघडण्याच्या दृष्टीनं अत्यंत नाजूक अवस्थेत आहेत. त्यांचा कागद ठिसूळ झाला आहे. या अडचणीवर आता मार्ग निघाला आहे. संशोधक अशी पत्रं न उघडता वाचू शकले आहेत. मॅसेच्यूसेट्स तंत्रज्ञान संस्थेतील संशोधकांनी इंग्लंडमधील आणि नेदरलँड्समधील संशोधकांच्या सहकार्यानं अशी पत्रं, आभासी पद्धतीनं उघडण्याचं तंत्र विकसित केलं आहे. यासाठी त्यांनी मदत घेतली आहे ती, क्ष-किरणांची आणि संगणकाची!

लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातील, दांतांवर संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेत विकसित केल्या गेलेल्या, उपकरणानं – स्कॅनरनं – यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण उपकरण क्ष-किरणांद्वारे दातातील खनिजांचं मापन करू शकतं. याचाच वापर या संशोधकांनी ही पत्र उघडण्यास केला. या उपकरणाद्वारे त्यांनी बंद तसंच उघडता आलेल्या, अशा सर्वच प्रकारच्या पत्रांच्या, द्विमितीय व त्रिमितीय प्रतिमा मिळवल्या. त्यानंतर त्यातील शाईचा थर, तसंच कागदाचे थर, इत्यादींचा व्यवस्थित अभ्यास करून ही पत्र कशी दुमडली असावी, हे स्पष्ट करणारी संगणकीय आज्ञावली तयार केली. यावरून या पत्राचा प्रत्येक (कागदाचा) थर त्यांना वेगळा करता आला व त्यावरील मजकूर संगणकाच्या पडद्यावरून वाचणं, शक्य झालं. ही पत्र बंद करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घड्यांचा वापर केल्याचं या संशोधकांना आढळलं. यातील काही प्रकार हे अधिक गुंतागुंतीचे होते, तर काही प्रकार हे कमी गुंतागुंतीचे होते. अधिक गुंतागुंतीच्या घड्या असणाऱ्या पत्रांत अर्थातच अधिक गुप्तता अपेक्षित असावी.

आतापर्यंत एक किंवा दोन घड्या घातलेल्या पत्रांतील मजकूर क्ष-किरणांचा वापर करून वाचणं, संशोधकांना शक्य झालं होतं. परंतु हे वाचन थेट – घड्या न उलगडता केलेलं – वाचन होतं. परंतु, अनेक घड्या घातलेली अशी गुंतागुंतीची पत्रं उघडणं, हे संशोधकांना जमलं नव्हतं. अशी न वाचली गेलेली, अनेक घड्या घालून बंद केलेली, शेकडो पत्रं आज युरोपमध्ये उपलब्ध आहेत. हेग येथील म्यूझियममधील पत्र वाचण्यासाठी वापरलेल्या तंत्राद्वारे आता अशी पत्रं वाचणं, हे इतिहासकारांना शक्य होणार आहे. मध्ययुगीन काळातील लेखनपद्धती, ऐतिहासिक घटना इत्यादींवर त्यामुळे मोठा प्रकाश पडणार आहे.

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: Unlocking History Research Group, Museum voor Communicatie, The Hague

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..