तेजोनिधीच्या आगमनाने, सारे जागे झाले चराचर,
सोनेरी लख्ख प्रकाशाने,
उजळत जसे धरणीचे अंतर,—
अंधाराच्या सीमा ओलांडत ,
रविराजाचे पहा येणे,
उजेडाच्या सहस्रहस्ते,
पृथेला हळुवार कुरवाळणे,–!!!
झाडां-झाडांमधून तेज,
खाली सृष्टीपर्यंत पोहोचे,
अजूनही आहे निसर्गच श्रेष्ठ,
मित्राचे त्या मूक सांगणे,–!!!
किमया आपली न्यारी करे, अव्याहत ते चक्र चालते, ब्रम्हांडातील सारे खेळ हे,
पृथ्वीवर सर्व देत दाखले,–!!!
सूर्यकिरणांची तिरीप,
कणाकणांपाशी पोहोचे,
जिवंत ठेवण्या सृष्टीला,
दिनकर हा सदैव विराजे,–!!!
सृजनाचे सारे काम हे,
अविश्रांत ते करत राहणे,
सुट्टी रजा नच कधीच, कर्तव्यपरायणता निभावणे ,–!!!
असंख्य दूत किरणांचे,
धावधावुनी सेवा -कर्ते ,
भेदाभेद अमंगळ ते,
निसर्ग शिकवे परहस्ते,–!!!
*समानतेचे देत धडे,
निमूट आपुले काम करणे,
स्वतः जळून,- झिजून,
दुनिया सारी उजळून टाकणे*,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply