नवीन लेखन...

तेलंग मेमोरिअल हॉस्टेल

एस.एस.सी.ला मला चांगले मार्क मिळाले म्हणून माझ्या वडिलांनी माझं एलफिन्स्टन कॉलेजात नाव घातलं. त्याकाळी मेरिटलिस्टमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्तर पंच्याहत्तर टक्के मार्क मिळत. माझी मेरिट लिस्ट तीन मार्कानी हुकली होती. बहुतेक सर्व स्कॉलर्स एलफिन्स्टन कॉलेजात नाव नोंदवत. मला स्वतःला एलफिन्स्टन कॉलेजात नाव नोंदवण्यात फारसा इंटरेस्ट वाटत नव्हता. याला कारणं दोन होती. एकतर शाळेतील माझ्या वर्गातील बहुतेक विद्यार्थ्यांनी त्याकाळी नव्यानेच सुरु झालेल्या सायनच्या एस.आय.इ.एस. कॉलेजात प्रवेश घेतला होता. साहजिकच मलाही एस.आय.इ.एस.ला किंवा फारतर रुईयाला जायचं होतं आणि दुसरं कारण म्हणजे एलफिन्स्टन कॉलेजचा फॉर्म आणायला गेलो असताना तिथलं हायफाय इंग्रजी वातावरण पाहून मी हबकूनच गेलो होतो. आम्ही मराठी शाळेतली मुलं, या अनोळख्या वातावरणात आपला निभाव कसा लागणार याबाबत मी दबकूनच गेलो होतो. पण माझे वडील ठाम राहिले. त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजातच माझं नाव घातलं. मला आठवतं, मी दोन दिवस फुगून बसलो होतो. पण माझी काही डाळ शिजली नाही. कॉलेज सुरु झाल्यावर मी निमुटपणे एलफिन्स्टनला जाऊ लागलो.

कॉलेज सुरु झाल्यावर मला परळहून रोज फाऊंटनला जाणं येणं दगदगीचं होतंय हे घरच्यांच्या लक्षात आलं. मुख्य म्हणजे चाळीतल्या एका खोलीत माझा अभ्यास कसा होणार याचीही घरच्यांना काळजी वाटत होती. मी इंजिनिअर व्हावं अशी घरच्यांची खूप इच्छा होती. मीही पुढे कोणती करिअर करायची याबाबत फारसा विचार केला नव्हता. त्याकाळी हुषार विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोनच पर्यायांबाबत विचार करीत. मेडिकलचा कोर्स खूपच मोठा असल्याने इंजिनिअर होण्यास माझी काहीच हरकत नव्हती. पुढे कॉलेजात चांगले मार्क मिळावेत म्हणून मी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहावं असा विचार सुरु झाला. कॉलेजमधले माझे काही नवे मित्र हॉस्टेलमध्ये राहात असत. त्यांच्याबरोबर मीही हॉस्टेलमध्ये राहू का? असा विषय मी घरी काढला. हॉस्टेलमध्ये राहायचं तर आणखी खर्च होणार होता. परंतु वडिलांनी तत्काळ या प्रस्तावाला संमती दिली. मी एलफिन्स्टनच्या तेलंग मेमोरिअल हॉस्टेलमध्ये राहू लागलो.

आमचं हॉस्टेल कॉलेजपासून दूर होतं. कॉलेज फाऊंटनला जहांगीर आर्ट गॅलरीसमोर, तर हॉस्टेल चर्चगेटला सी रोडवर. सुरुवातीला मला डबलरुम मिळाली होती. म्हणजे दोन विद्यार्थी एका खोलीत. माझे इतर सर्व मित्र मात्र सिंगल रुममध्येच राहात असत. माझा रुम पार्टनर कोणीतरी वरच्या वर्गातला मुलगा होता. माझं त्याच्याबरोबर कधीचं जुळलं नाही. मी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या माझ्या वर्गातल्या मित्रांबरोबरच दिवसभर राही. मलाही स्वतंत्र सिंगल रुम मिळाली. खऱ्या अर्थानं माझं हॉस्टेललाईफ सुरु झालं.

सकाळी उठून ब्रेकफास्ट उरकून धावतपळत प्रॅक्टिकल्सना जाणं, त्यानंतर मध्ये हॉस्टेलवर परत येऊन जेवण करुन पुन्हा कॉलेजात लेक्चर्संना जाणं असा आमचा दिनक्रम असे. आमच्या हॉस्टेलमध्ये तीन मेस होत्या. एक महाराष्ट्रीयन पद्धतीची मेस, दुसरी गुजराथी पद्धतीची मेस आणि तिसरी नॉनव्हेज पद्धतीची मेस असा तिथला कारभार होता. घरी मी पूर्णतः शाकाहारी असल्याने नॉनव्हेज मेसबाबत विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. पर्याय गुजराथी मेस किंवा महाराष्ट्रीयन मेस यातूनच निवडायचा होता. गुजराथी मेसमधला महाराज जास्त पोळ्या खाल्ल्या की दम मारतो म्हणून महाराष्ट्रीय मेसच बरी असा सल्ला माझ्या मित्रांनी मला दिला आणि मी तीच मेस जॉईन केली! या मेसचा कारभार आम्ही मुलंच सांभाळत असू. माझ्याकडे मेनूसेक्रेटरीचं पद सोपविण्यात आलं होतं. मी संपूर्ण आठवडयाचा मेनू मेसच्या नोटीसबोर्डावर लावत असे. या माझ्या जबाबदारीने माझं पुढे फार मोठं नुकसान केलं. अर्थात त्या वयात आपण काय करतो आहोत याचं गांभीर्य ध्यानात न आल्याने मी ती चूक करुन बसलो. आम्हाला कॉलेजात ट्रिग्नॉमेट्री विषय शिकवायला एक पारशी प्राध्यापक होते. त्यांचे उच्चार मला कधीच समजले नाहीत. आधीच ट्रिग्नॉमेट्री हा विषय तसा क्लिष्ट वर्गात काय शिकवताहेत हे ध्यानातच येत नसल्याने मी चक्क ट्रिग्नॉमेट्रीच्या पिरिअडला हॉस्टेलचा आठवडाभराचा मेनू तयार करीत असे! याचा व्हायचा तो परिणाम झालाचं. मला ट्रोग्नॉमेट्रीत युनिव्हर्सिटीच्या फायनलमध्ये खूपच कमी मार्क पडले. माझा इंजिनिअरिंगचा प्रवेश देखील हुकला! अर्थात या सर्व पुढच्या गोष्टी. खुद्द हॉस्टेलमध्ये राहात असताना मी तिथलं लाईफ अगदी मस्तपैकी एन्जॉय करीत होतो.

हॉस्टेलमध्ये आमचा मराठी शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप जमला होता. यात मालवणहून आलेला परुळेकर, सांगलीहून आलेला पंडितराव, अलिबागहून आलेला कान्हा देशमुख, बेळगावहून आलेला कुलकर्णी, पेण की तिथूनच कुठूनतरी आलेला खाडिलकर यांचा समावेश होता. याशिवाय जपे, भालेराव आणि डोंगरे असेही आणखी तीन मित्र होते. आम्ही सर्व जण दिवसभर एकत्रच राहत असू. याला मुख्य कारण म्हणजे आम्हाला सर्वांनाच इंग्रजी बोलण्याची सवय नव्हती आणि कॉलेज तर पूर्णतः ऑग्लाळलेलं! केवळ कॉलेजच नव्हे तर हॉस्टेलही! आमच्या हॉस्टेलवर बहुसंख्य विद्यार्थी साऊथ आफ्रिकेतून आलेले असत. साऊथ आफ्रिकेतल्या सुखवस्तू भारतीयांची मुलं कॉलेज शिक्षणासाठी भारतात येत. त्यांना ओव्हरसीज स्टुडंटस म्हंटलं जाई. या ओव्हरसीज स्टुडंटसचा हॉस्टेलवर दिवसभर दंगा चाले. नुसता टॉवेल गुंडाळून अथवा एखादी छोटीशी चड्डी घालून उघडंनागडं हिंडणं हा या ओव्हरसीज स्टुडंटसचा खाक्या ! सतत लेंग्यात वावरणाऱ्या आम्हा महाराष्ट्रीय मुलांचे या परदेशी मंडळींबरोबर कधीच सूर जुळले नाहीत. आम्ही आमच्या वेगळ्या ग्रुपमध्ये राहूनच हॉस्टेलचे दिवस काढले. सिगरेट म्हणजे फॅग, टॅक्सी म्हणजे कॅब असले इंग्रजी शब्द आम्ही या मंडळींकडूनच शिकलो.

या इंग्रजी शब्दांवरुन एक गंमत आठवली. आम्ही एकदा कॉलेजातून हॉस्टेलवर परतत होतो. परतत असताना आमच्या कॉलेजचं कॅन्टीन आणि हॉस्टेलचं कॅन्टीन यावर गप्पा चालल्या होत्या. आमच्यातला एक जण कॉलेजातल्या कॅन्टीनपेक्षा हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये चांगलं ‘स्टफ’ मिळतं, असं एक वाक्य बोलून गेला आणि आम्ही सर्वच एकदम गप्प झालो! त्या मुलाला काय झालं काहीच कळेना. त्याने लगेचच विचारलं- “काय रे शब्द बरोबर वापरला ना?” त्याने शब्द बरोबर वापरला होता, परंतु कालपरवा गावाहून आलेला तो मुलगा हॉस्टेलवर येताच ‘स्टफ’ सारखे शब्द वापरु लागला हे उमगून आम्ही हबकलो होतो!

हॉस्टेलवरच्या दोनएक वर्षांच्या काळात आमच्या सर्वांचंच अस्सल मराठीपण गळून पडलं. नव्या जगाला, नव्या वातावरणाला सामोरं जायला आम्ही सिद्ध झालो. आमच्यातला आत्मविश्वास द्विगुणीत झाला.

-सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..