नवीन लेखन...

कोंकणातील मंदिरे काल, आज आणि उद्या

कोकणात आढळणाऱ्या मंदिरांमध्ये मुख्यतः ग्रामदेवतेचे मंदिर महत्वाचे असते. त्याव्यतिरिक्त काही खाजगी मंदिरे सुद्धा आहेत.  आज नोकरी व्यवसायाची साधने बदलल्यामुळे कोंकणातील बहुसंख्य लोक शहराकडे स्थायिक झाले आहेत. पण आपल्या गावाकडील ग्रामदेवतेचे मंदिर हा त्यांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. कोकणातील मंदिरांमध्ये साजरे होणारे सण उत्सव, जत्रा यांच्या प्रथा-रूढी आणि परंपरांमुळे समाजातील एकोपा आणि बांधिलकी टिकून राहण्यास मदत होते.


कोकणाला निसर्ग सौंदर्याचा अमूल्य वरदहस्त लाभलेला आहे. त्याचबरोबर प्राचीन ऐतिहासिक वारसाही प्राप्त झाला आहे. कोकणातील कातळशिल्पांच्या अभ्यासामुळे येथील प्राचीन संस्कृतीचे अस्तित्व पाषाणयुगापर्यंत जाण्याची शक्यता दिसून येते. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर असलेला सागरकिनारा संपूर्ण कोकण व्यापतो. येथील सागरी दळणवळणाच्या व व्यापाराच्या निमित्ताने जगातील अनेक देशांशी कोकणचा संबंध आला. इथे नांदलेल्या प्राचीन काळातील चालुक्य, मौर्य, सातवाहन, कलचुरी, शिलाहार, देवगिरीचे यादव यांच्यानंतर चौदाव्या शतकातील बहामनी, आदिलशाही, निजामशाही, मोगल, मराठेशाही, पोर्तुगीज, फ्रेंच, युरोपियन, डच, इत्यादीच्या राजवटींमध्ये बांधण्यात आलेली अनेक वारसास्थळे कोकणच्या देवभूमीत आपले अस्तित्व राखून आहेत. त्यामुळे कोकणातील प्राचीन ऐतिहासिक स्थळांच्या स्थापत्यामध्ये एतद्देशीय तसेच परदेशी स्थापत्यशैलीच्या प्रभावाचे अंश दिसून येतात.

कोकणामध्ये असलेल्या किल्ले, लेणी, गुंफा, मशीद, दर्गे, सिनेगॉग, चर्च इत्यादी वारशाच्या रूपातून त्या त्या काळातील, धर्माची आणि संस्कृतीची झलक आपण पाहू शकतो. ह्या सर्व वास्तूंपैकी कोकणातील मंदिरांची येथील स्थानिक मूळ संस्कृतीशी अविभाज्य नाळ जुळलेली आहे. कोकणातील मंदिरे, येथील वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या काळात आघात झेलून, प्रसंगी विध्वंस होऊन पुन्हा नव्याने निर्माण होऊनही गतकाळातील सांस्कृतिक बदलांची साक्ष देतात. इतर वारसास्थळांपेक्षा मंदिरांचा संबंध थेट स्थानिकांच्या दैनंदिन धार्मिक परंपरेशी व  आचरणाशी निगडित असल्याने ही मंदिरे समाज जीवनाशी एकरूप झालेली आहेत.

कोकणातील मंदिरामध्ये खूप वैविध्य आढळते तसेच इथली मंदिरे अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ठाणे जिल्ह्यातील हजार वर्षांपूर्वीचे शिलाहारकालीन आम्रनाथ (अंबरनाथ), लोणाड, कौपिनेश्वर, रत्नागिरीतील संगमेश्वर येथील कर्णेश्वर, रायगड जिल्ह्यातील कनकेश्वर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर इत्यादी प्राचीन मंदिरे आहेत. तर कुलाबा किल्ल्यातील गणेश मंदिर, सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवाजी महाराजांचे शिव राजेश्वर मंदिर, विजयदुर्गचे रामेश्वर मंदिर, चौलचे रामेश्वर मंदिर, पालीचे बल्लाळेश्वर मंदिर अशी मंदिरे मध्ययुगातील आठवणी सांगतात. ही मंदिरे आणि त्यांच्या परिसरातील दीपमाळा, त्रिपुरे, पुष्करणी, जलकुंड ह्या सगळ्यामध्ये प्रत्येकाची एकमेवाद्वितीय खासियत आहे. कोकणातील मंदिरांमध्ये असणारी काष्ठ शिल्पे तर अतिशय मनमोहक आणि कलाकुसरीचे लोलकच आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील माणगाव येथील यक्षिणीची काष्ठशिल्पे देखणी आणि विस्मयकारक आहेत. रत्नागिरीतील गोलप गावातील सत्येश्वर मंदिर आणि गुहागरमधील नरवण गावातील व्याघ्राम्बरी मंदिरासाठी लाकूड कामात खिळा न वापरता निव्वळ खाचांच्या साहाय्याने खांब व छताची जोडणी केलेली आहे. कोकणातील मंदिरांमध्ये प्रामुख्याने आकर्षक कौलारू छत, गोलाकार घुमट अथवा कधी कधी दोहोंचा संगम असे प्रकार आहेत. विजयदुर्गच्या रामेश्वर मंदिराच्या भिंतीवर रामायणातील प्रसंग असलेली मराठा शैलीतील चित्रे आहेत. चिपळूणमधील शिरंबे गावी असलेले मल्लिकार्जुन मंदिराच्या चारही बाजूला पाण्याचा हौद असून मध्यभागी मंदिर आहे. अलिबागमधील कनकेश्वर मंदिराच्या कळसावरील माणसाच्या शिल्पाच्या पायातील दगडी वाळा आणि तेथे असलेली वसई मोहिमेतील पोर्तुगीज घंटा, आकेरीच्या रामेश्वर मंदिरातील दगडी पलंग, तिथले वर्तुळाकार कलाकुसरीचे काळ्या पाषाणातील खांब, अशा अनेक अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गोष्टी कोकणात आहेत. कोकणातील मंदिरांची अशी असंख्य वैशिष्ट्ये आहेत.

कोकणात आढळणाऱ्या मंदिरांमध्ये मुख्यतः ग्रामदेवतेचे मंदिर महत्वाचे असते. त्याव्यतिरिक्त काही खाजगी मंदिरे सुद्धा आहेत.  आज नोकरी व्यवसायाची साधने बदलल्यामुळे कोंकणातील बहुसंख्य लोक शहराकडे स्थायिक झाले आहेत. पण आपल्या गावाकडील ग्रामदेवतेचे मंदिर हा त्यांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. कोकणातील मंदिरांमध्ये साजरे होणारे सण उत्सव, जत्रा यांच्या प्रथा-रूढी आणि परंपरांमुळे समाजातील एकोपा आणि बांधिलकी टिकून राहण्यास मदत होते. ह्या मंदिरांच्या देखभाल दुरुस्ती आणि जतन-संवर्धनाच्या बाबतीत मात्र शासनस्तरावर उदासीनता आहे. दुसऱ्या बाजूला सामान्य ग्रामस्थ आपल्या गावामधील मंदिरांच्या पुरातत्वीय मूल्याच्या बाबत कमालीचे अनभिज्ञ असतात. त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांच्या करावयाच्या संवर्धनाबाबत अनास्था आहे. मंदिरांच्या इतिहासातील अनमोल दायित्वाची महती त्यांना अपवादानेच ठाऊक असते. कोकणातील मंदिरे प्राचीन व मध्ययुगीन काळातील असल्यामुळे आजपर्यंत त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे झेलले आहेत. मंदिरांच्या बांधकामात वापरले गेलेले लाकूड, चुना, दगडांची कालपरत्वे झालेली झीज तसेच वातावरणाचे रासायनिक परिणाम या सर्वामुळे त्यांची योग्य वेळी शास्त्रीय पद्धतीने पुरातत्वीय संकेतानुसार दुरुस्ती – जतन करणे अपरिहार्य आहे. परंतु शासनाकडून सर्वच मंदिरे अधिसूचित झालेली नसल्याने त्यांची दुरुस्ती शासन किंवा सामान्य ग्रामस्थांकडून होत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमेश्वर येथे असलेले कर्णेश्वर मंदिर आणि त्याच परिसरातील असंख्य पाषाणी मंदिरे होय. शासनाकडे तुटपुंजा निधी आणि अपुरे मनुष्यबळ ही यामागची महत्त्वाची कारणे आहेत.

जवळपास प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवतेचे मंदिर असतेच. त्याव्यतिरिक्त इतरही मंदिरे असतात. अलिबागसारख्या ठिकाणी मध्ययुगीन काळात उभारलेली कित्येक सुंदर, मनोहारी स्थापत्य असणारी आणि वेगवेगळ्या देवतांची मंदिरे आहेत. पण सुयोग्य काळजी अभावी, जमिनीच्या व मालकीच्या वादांमुळे किंवा क्वचित निधीच्या अनुपलब्धतेमुळे त्यांची अपरिमित हानी होत आहे. हा सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीला हस्तांतरित होण्यापूर्वीच नष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.कोंकणातील मंदिरांचा हा ठेवा सुरक्षित कसा करावा हा मोठा यक्ष प्रश्न आहे. गावातील किंवा शहरातील नागरिक यांना आपले मंदिर दुरुस्त करावे, छान दिसावे असे वाटत असते.त्यांना त्याचा जीर्णोद्धार करणे हा पर्याय आवडतो. परंतु जीर्णोद्धार करताना ते मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त करून त्याजागी आधुनिक तंत्रज्ञानाने काँक्रिट-विटांच्या साहाय्याने भव्य आणि देखणे (त्यांच्या दृष्टीने) उभारणे हाच पर्याय प्राधान्याने निवडला जातो. समाजाच्या अशा अनाठायी हव्यासापोटी बरीच मंदिरे केंव्हाच मातीमोल झाली आहेत. असे करताना मंदिरातील शिलालेख, तक्तपोशी, खांब, वीरगळ, सतीशिळा किंवा तत्सम महत्त्वाचे ऐतिहासिक अवशेष एकतर नष्ट झालेत किंवा त्यांची तस्करी झाली आहे. अनेकदा हे पुरातत्वीय घटक भिंतीत चिणले जातात, त्यांच्यावर गिलावा दिला जातो किंवा उलट सुलट जागा बदलून लावले जातात. अशाने त्यांचे संदर्भ तर बदलतातच पण संशोधकांना व इतिहास अभ्यासकांना विभ्रमित करतात. जुने मंदिर आहे तसेच आणि ज्या साहित्याचा वापर करून बांधले होते तशाच साहित्याचा वापर करून मंदिराच्या मूळ स्वरूपाला अजिबात धक्का न लावता संवर्धन करू शकतो हे लोकांना पटवून दिले पाहिजे.

चुकीच्या पद्धतीने संवर्धन अथवा जीर्णोद्धार झाल्याची अनेक उदाहरणे  सिंधुदुर्ग येथील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर आपले मूळ स्वरूप हरवून नव्याने ग्रॅनाईट च्या आच्छादनाखाली अदृश्य झाले आहे. त्या मंदिराच्या ऐतिहासिक प्रवेश द्वाराजवळ असलेला नगारखाना नष्ट होऊन तिथे आर सी सी प्रवेशद्वार व कमान उभी राहिली आहे. अलिबागच्या भीमेश्वर देवळाला तिथल्या पायरीमध्ये चिणलेल्या शिलालेखामुळे विशेष महत्व आहे. तो शिलालेख चांगल्या ठिकाणी स्थापण्याऐवजी आहे तिथेच ठेवून दिल्याने कुणाच्या दृष्टीसही पडत नाही. ह्या मंदिराचेही नुकतेच नूतनीकरण झाले. त्यावेळी मंदिराच्या भिंतींमध्ये असलेल्या देवळ्या नव्या गिलाव्याखाली  विटांनी बंद केल्या गेल्या आहेत. कोंकणातील मंदिरांना ग्लेझ्ड फरशा बसवून त्यांचे विद्रुपीकरण सर्रास होत आहे. जुन्या काळात उभारलेली चुना आणि रेतीच्या मिश्रणाद्वारे केलेले बांधकाम आणि गिलावा ह्यावर आधुनिक सिमेंट सारख्या साहित्याने संवर्धन केल्यास काही काळाने जुन्या चुन्याच्या मिश्रणासह बाहेरील सिमेंट निखळते आणि अपरिमित नुकसान होते. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. लोकांना जुन्या स्थापत्याचे महत्व उमगले पाहिजे.

कोंकणात देवस्थानांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच परदेशी नागरिकांचे धार्मिक पर्यटन होत असते. कोंकणच्या विकासाला आणि स्वयंपूर्णतेला चालना देणारी हि बाब आहे. परंतु प्राचीन मंदिरांचा मूळ जुना बाज उरला नाही तर ह्या पर्यटनातील महत्वाचे आकर्षण लोप पावेल आणि हे पर्यटन फक्त स्थानिक पातळीवर राहील ही भीती आहे. म्हणून ह्या सर्वाचा विचार करून कोंकणातील लोकांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराची दिशा बदलायला हवी. ह्याबाबत स्थानिकांच्या अडचणी समजून घेत असताना, जुनी बांधकामे जीर्ण झाली आहेत, कारागीर मिळत नाहीत, त्या काळातील बांधकाम साहित्य उपलब्ध होत नाही, त्यामुळे अशी कामे खर्चिक होतात, योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अशी अनेक कारणे ह्यानिमित्ताने समोर आली. पण हे खरे नाही. ह्यावर अनेक उपाय किंवा तोडगे काढता येतील. आजही जुन्या बांधकामांचे पुरातत्वीय शास्त्रानुसार दुरुस्ती करणारे कित्येक वास्तुशास्त्रज्ञ मुंबईत आणि पुण्यात कार्यरत आहेत. दगडी बांधकाम करणारे कारागीर सातारा, कर्नाटक, राजस्थान, केरळ राज्यातून येऊन इथे कामे करतात. हल्ली जुने वाडे दुरुस्त करून त्यांच्या माध्यमातून लग्न, वाढदिवस, कार्यशाळा, इत्यादी उपक्रमांसाठी भाडे तत्वावर देऊन उत्पन्न घेतले जाते. ते वाडे सुद्धा उत्तम प्रकारे दुरुस्त्या करून जतन होताना दिसतात. कोंकणातील मंदिरांचा जीर्णोद्धार करताना घाई न करता योग्य आढावा घेतल्यास वाजवी दरात उत्कृष्ट कारागीर, साहित्य तसेच मार्गदर्शन मिळू शकते. त्यासाठी इच्छा आणि समाजमन तयार व्हायला हवे.

अगदी नुकतंच पुण्यातील भाऊ रंगारी यांचा इसवी सन 1882 मध्ये बांधलेला वाडा वास्तुशास्त्रज्ञ श्रीमती अर्चना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी 100 वर्षे टिकेल अशा पद्धतीने दुरुस्त झाला आहे. आता ही वास्तु अभ्यासकांना आणि इतिहास प्रेमी पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहे. पुण्यातील अठराव्या शतकातील विठ्ठलवाडी विठ्ठल मंदिर सुद्धा अशाच पद्धतीने दुरुस्त केले आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रातील तज्ञ, कारागीर आणि बांधकाम साहित्य आजही उपलब्ध आहे. ह्यातील आर्थिक बाजूचा विचार केल्यास आर. सी. सी. च्या आधुनिक पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या मंदिरांचा खर्च हा जुन्या पद्धतीच्या साहित्याने करावयाच्या खर्चा इतकाच असतो. पण आपण नीट अभ्यास न केल्यामुळे कोंकणातील लोकांना ते लक्षात येत नाही. शिवाय विशिष्ट तंत्राने दुरुस्त केलेली वास्तूसुद्धा भविष्यातील अनेक पिढ्या शाबूत राहण्यायोग्य होते. तिचे प्राचीनत्व आणि ऐतिहासिक सौंदर्य सगळ्यांना भुरळ पाडू शकते. हे लक्षात घ्यायला हवे. अनेक समाजसेवी संस्था, उद्योग त्यांच्या सी. एस. आर. निधीतून अशा कामाला आर्थिक पाठबळ देऊ शकतात. त्याची चाचपणी केली पाहिजे.

कोंकणातील मंदिरे ह्या देवभूमीच्या अलौकिक परंपरागत संस्कृतीचा आरसा आहे. त्यांच्या माध्यमातून कोकणच्या धार्मिक रूढी परंपरा पिढ्यान्पिढ्या संक्रमित होत आल्या आहेत. त्यांचे मूळ प्राचीन व तत्कालीन स्वरूप हा त्यांचा आत्मा आहे. म्हणून मंदिरांचे सुयोग्य शास्त्रीय पद्धतीने जतन व्हायला हवे. इथली काष्ठशिल्पे, भित्ती चित्रे, स्थापत्यातील विस्मयकारक प्रयोग, मंदिरांशी निगडित ऐतिहासिक घटना हे सारे अद्वितीय आहे. ही मंदिरे जुनी आणि काहीशी जीर्ण झालेली असल्यामुळे त्यांना योग्य प्रक्रियेच्या साहाय्याने सुदृढ केले व जपले पाहिजे. परंतु त्यासाठी सरसकट आधुनिक प्रकारच्या सिमेंट आणि स्टील चा वापर करून जीर्णोद्धार करण्याची जी अहमहमिका सुरु आहे त्यात हा वारसा दुर्मिळ होऊन एके दिवशी अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत कोकणातील ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन यांनी डोळसपणे जीर्णोद्धाराचे काम करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, कारागीर, तज्ज्ञ इत्यादी आजही उपलब्ध आहे. जुन्या तत्कालीन साहित्याचा वापर करून आणि जे आहे त्याचे योग्य संवर्धन करुवून घेणे यासाठी लागणारा आर्थिक निधी, आधुनिक तंत्राने अपेक्षित खर्चाइतकाच समसमान असतो.  यावर साकल्याने गंभीरपणे विचार व कृती होणे आज काळाची गरज आहे. अन्यथा कोकणवासीयांच्या मूळ संस्कृतीची ही तीर्थक्षेत्रे आधुनिक बांधकामांच्या गर्दीत धुळीस मिळतील. कोकणचे देवभूमी म्हणून असलेले बिरुद लयास जाईल. मंदिरांच्या आधुनिक जीर्णोद्धाराचे फॅड वेळीच सावध होऊन सोडायला हवे. काँक्रिट आणि टाईल्स च्या वापरातून वाढीस लागलेल्या नव्या जीर्णोद्धार संस्कृतीला आपण हद्दपार करायला हवे. म्हणून आपण आपापल्या गावातील मंदिरांचे मूळ स्वरूपातील स्थापत्य राखण्यासाठी आपापल्या परीने जनजागृती करण्याचा संकल्प करूया.

–प्रवीण कदम

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..