नवीन लेखन...

देवळं आणि देव : तेंव्हा अन् आता

आमच्या कोकणात देव आणि देवस्की हा श्रद्धा आणि भितीचा विषय आहे. देवावर प्रचंड श्रद्धा आणि तेवढीच त्याची भितीही आहे. प्रत्येक गावातील देवळांने, त्या गांवातील माणसांना, त्यांच्यात कितीही मतभेद असले तरी, एकत्र बांधून ठेवलंय हे माझ्यासारख्या शहरी माणसाला वाटतं. गांवात शाळा, रस्ते, प्यायला पाणी नसताना, आमच्या गांवातील फाटके लोक अक्षरक्ष: लाखोंनी रुपये खर्च करून गांवातली देवळं उभी करत असताना मी त्यांना हसायचो, त्यांना इथे बसून मुर्ख म्हणायचो. पण नंतर थोडा विचार केल्यावर लक्षात येऊ लागलं, की मीच मुर्ख असून गाववाल्यांचं बरोबर आहे. संपूर्ण गावाला एकत्रीत बांधून ठेवणारी आणि तसं न राहील्यास काहीतरी वाईट घडतं याची भिती निर्माण करणारी, देव आणि देऊळ ही एकमेंव शक्ती आहे आणि त्या भितीयुक्त आदरातूनच देवळं बांधणं होत असावं. हा आदर केवढा असावा, तर मी पूर्वी सिंधुदुर्गातील सार्वजनिक जीवनात काम करत असताना, आमच्याकडे मदत मागायला येणाऱी दहातली आठ माणसं देवळासाठी पैसे मागायला यायची. कौतुक याचं, की ही माणसं स्वत: फाटकी असायची व तशांच फाटक्या खिशातले स्वत:चे पैसे खर्च करून, ते देवळासाठी पैसे जमा करत असायचे. शाळा घे, वाचनालय घे, रस्ता करूया का, तर नाही, आमका देऊळच बांधूचा आसा, हाच एक हेका..! सत्तेसारखंच श्रद्धेपुढेही शहाणपण नसतं, हेच खरं..!

गांवाला आणि गांववाल्याना घट्ट बांधून ठेवणारी आमच्या कोकणातली देवळं, आपल्या प्राचिन वास्तुकलेची उत्तम उदाहरणं आहेत. मी फारसा देवळात जात नसल्याने, फार काही देवळं पाहिलेली नाहीत, पण ज्या देवळांत मुद्दामहून जाणं झालंय, ती मात्र अशीच होती. गुढ, गंभिर, काळोखी तरीही शांतं, पवित्र..! माझं काही देवाशी भांडण वैगेरे नाही, पण देवळात जाणं टाळण्याचं महत्वाचं कारण, पायतले बुट काढणं आणि ते पुन्हा बांधणं नकोसं वाटतं हे आहे. तरी कधी देवळात गेलोच, तर त्या देवळाच्या पुरातन अंतरंगाच्या बाहेरून आलेल्या अंदाजामुळेच. काहीशा एकांतात, एकोशी असलेली, प्राचिन वास्तुकलेची नमुना असलेला, काळोखी, गुढगर्भी देवळं मला अतोनात आवडतात. या देवळातल्या देवांच देवपण जागृत असायचं आणि माणसंही अशा देवळातल्या देवांना घाबरून असायची. कोकणातली किंवा कुठलीही अशी देवालयं मला खुप आकर्षित करायची.

आता मात्र हे चित्र झपाट्यानं पालटू लागलंय. देखण्या परंतू जुन्या झालेल्या देवळांच्या जिर्णोद्धाराची स्पर्धा जिकडे तिकडे सुरू झाली. लाकडी, दगडी बांधणीची देखणी, महिरपीदार कौलारू देवळं जमिनदोस्त करून, सिमेंट-कांन्क्रिट, स्लॅब आणि मार्बल, ग्रानाईटची चकाचक देवळं बांधण्याचा प्रकार सर्रास सुरू झालाय सर्वीकडे. देवळाच्या मुळ स्वरुपाला धक्का न लावताही जिर्णोद्धार करता येतो, पण शहरी बेगडी चकचकीतपणाचं आकर्षणच एवढं आहे, की तसा विचारही कुणाला नको वाटत असावा. मला तर अशी आधुनिक परंतू देवपण हरवलेली देवळं, भारलेल्या देवालयांपेक्षा तो देवांचा रुक्ष फ्लॅटच जास्त वाटतो. आपण फ्लॅटात गेलो, देवाला फ्लॅट का नाही, या श्रद्धेतून हे होत असावं, माहित नाही. जुन्या देवळांच्या मातीच्या जमिनिवर पाय रोवून उभं राहाता यायचं आणि मनोभावे लोटांगण घालून एकाच वेळी देवाचे चरण आणि मातीला अलिंगनही देता यायचं. आता मात्र गुळगुळीत लादीवरून पाय घसरून जबरदस्तीचं लोटांगण घडू नये याकडेच देवापेक्षा जास्त लक्ष ठेवावं लागतं..

एकेकाळी मुंबईत सताड उघड्या दरवाजांच्या बैठ्या चाळीत एकमेकांच्या गळ्यात गळा घालून राहाणारी, सर्व धर्म-पंथं-जातीची माणसं, बंद दरवाजांच्या वन बिएचके आणि त्यापेक्षा मोठ्या फ्लॅटात आली आणि अचानक माणूसकी हरवल्यासारखी एकमेकांपासून अलिप्त वागू लागली. तसंच देवांचंही झालंय की काय अशी शंका मनात येते. फ्लॅटातल्या माणसाची माणूसकी हरवत चाललीय, तर सिमेंट-ग्रामाईटच्या देवळातल्या देवाची देवसकी..!

पूर्वी गावाच्या काय नि शहराच्या काय, वस्तीबाहेर सीमेवर, दूर, गर्द झाडीत, एकांतात देवालयं असायची. आता देवालयं पूर्वी होती तिथचं आहेत, वसती मात्र वाढत वाढत, देवळं पार करून, त्यांच्याही पलिकडे पोहोचलीय. देवळं आता भर वस्तीत, मध्यावर आलीत. मुंबईत तर नविन काॅलनी बांधताना, तित मध्यावर देऊळ बांधून त्याची जाहीरातही केली जाते आणि प्रत्यक्ष देवाचा शेजार म्हटल्यावर, अशा काॅलमीतली घर पटापट विकलीही जातात. हे असं झालं आणि देवाची देवसकी जाऊन, तो माणसाळलाय.

जनावर काय नि देव काय, एकदा का माणसाळला, की मग तो पार ‘पाळीव’ होऊन त्याची सवय होते. आणि एकदा का सवय झाली, की मग त्याच्याबद्दलची भिती वाटेनाशी होते. देवाचं तेच झालंय. भिती नाहीशी झाली, आणि मग बरे कमी आणि वाईट जास्त असे सर्व व्यवहार देवाच्या साक्षीनेच केले जातात. क्वचितप्रसंगी अशा व्यवहारात देवाला भागिदार म्हणूनही घेतलं जाऊ लागलं. माणसाच्या माणूसकी प्रमाणे देवाची देवसकी गेल्यामुळे, देव भागीदार म्हणून खुशही होत असावा, हे त्याला भागिदार म्हणून घेतलेल्यांच्या होणाऱ्या उत्तरोत्तर प्रगतीवरून दिसतं, कारण त्या प्रगतीत भागिदार म्हणून देवाचा वाटाही वाढता असतो.

माणूसकीशुन्य झालेल्या माणसातील माणूसकीही कधीतरी जागी होते, तशीच देवातली देवसकीही शाबूत असेल आणि ती कधीतरी जागी होईल याची वाट पाहात शांतं बसायचं. नाहीतरी कुणीतरी अवतार येईल आणि आपल्याला तारील याची वाट पाहाण्याची आपल्याला पिढ्यान पिढ्यांची सवय आहेच.

— नितीन साळुंखे
9321811091

(देवळांचे फोटो प्रातिनिधीक असून नेटवरून घेतलेले आहेत. त्यांचा लेखात उल्लेख केलेल्या देवळांशी काही संबंध नाही.)

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..