जन्म: २७ ऑक्टोबर १९२०
मृत्यू: ९ नोव्हेंबर २००५
के. आर. नारायणन यांना केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अनेक मानसन्मान मिळाले. साहित्यातही त्यांची विशेष रुची होती. शालेय स्तरापासूनच त्यांनी विशेष श्रेणी मिळवली होती. परिवारातील बंधूत त्यांचा चौथा क्रमांक होता.
भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन. त्यांचे नाव कोचेरिल रामन नारायणन असे होते. त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९२० रोजी झाल्याची कागदोपत्री नोंद आहे. केरळ राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण अशी ओळख असलेल्या व त्रावणकोर गावापासून काही अंतरावर असलेल्या पेरुमथॉनम येथे त्यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झोपडीत झाल्याची नोंद आहे. हे गाव कोट्टायम गावालगत आहे. शासकीय कागदपत्रावर असलेल्या नोंदीतदेखील त्यांची हीच जन्मतारीख असल्याच्या नोंदी आजदेखील आढळतात. मात्र त्यांच्या जन्मतारखेबाबत काहीसा घोळ असल्याचेही सांगितले जाते. ज्यावेळी के. आर. नारायणन यांना त्यांचे काका त्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशासाठी घेऊन गेले त्यावेळी त्यांनी प्रवेशावेळी भराव्या लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांत अंदाजे त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९२० रोजी झाल्याची नोंद केल्याचेही सांगण्यात येते. भारतीय प्रजासत्ताकाचे ते पहिलेच दलित राष्ट्रपती व या प्रकारचे सर्वोच्च पद भूषवणारे पहिलेच मल्याळी व्यक्ती होत. १४ जुलै १९९७ साली झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी भारताचे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचा एकतर्फी पराभव केला होता. या निवडणुकीत नारायणन यांना तब्बल ९५ टक्के मते प्राप्त झाली होती. नारायणन यांच्या वडिलांचे नाव कोच्चेरिल रामन वेद्यार असे होते. आयुर्वेदात त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या परिवाराचा पारंपरिक उद्योग नारळ तोडणीचा होता उझावूर हे गाव आजही के. आर. नारायणन यांच्या नावाने ओळखले जाते.
Leave a Reply