आजचं जग स्मार्ट समजलं जातं. या जगात ज्याला त्याला स्मार्ट व्हायचं असतं.मुलगा किंवा मुलींनी जन्म घेतानाच स्मार्ट निपजावं असं केवळ अँजेलिना ज्योली किंवा ऐश्वर्या रॉय-बच्चन यानांच नव्हे तर बहुतेक सर्वच मात्यापित्यांना वाटतं.लेकराचं पहिलं रडणं ,पहिली शीसुध्दा त्यांना स्मार्टच हवी असते.आजच्या जगाला स्मार्टनेसच्या या अशा-फोबियानं झपाटून टाकलंय.म्हणजेच असं की ओबामा यांनी विजयानंतर जे अश्रू ढाळले ते कसे स्मार्ट होते, याचं चर्वित- चर्वण बरचं दिवस चाललं होतं.आजचा मानव जेव्हा डायनोसॉरचे सिनेमे काढतो तेव्हा ते डायनोसार ही स्मार्टच दाखवतो.गेल्याच आठवडयात एका डायन म्हणजे भूतनीवरचा सिनेमा आला.त्यातल्या सर्व डायना या स्मार्टच निघाल्या.
अशा या स्मार्ट जगात दरक्षणी काहीतरी स्मार्ट स्मार्ट घडतच असतं.यातूनच एका स्मार्ट ट्रेनिंग कोर्सचा जन्म,स्मार्टांचं व्हॅटिकन किंवा तिरुपती किंवा पंढरी समजल्या जाणाऱ्या अमेरिकत झालाय.हा स्मार्ट ट्रेनिंग कम गायडन्स कम कोर्स,हा हाऊ टू मेक लफडं टू सेव्ह युवर मॅरेज,अशा स्वरुपाचा आहे.
अभ्यासक्रमाच्या टेक्स्टबूकची प्रस्तावना अशी सांगते की,लग्नाच्या गमती-जमतीची,मोगऱ्या-गुलाब-चमेलीची वर्ष सरली की आधी झेंडूची मग धोतऱ्याची आणि नंतर कॅक्टसची वर्षं सुरु होतात.काट्यांचा काटोरा होतो.उठता बसता काटे,यहाँ रुते वहाँ रुते! जाए तो जाए कहाँ.अशी ही स्थिती. ही वर्षं आपल्या आयुष्यातून कायमची उडन-छू व्हावीत असच सौभ्यागवती पत्नीजी आणि श्री पतीदेव यांना वाटत राहतं.पण पाऊल मागे घेण्याची हिम्मत आतापावेतोच्या प्रवासात बऱ्याच अंशी फुस्सझाली असते.पुढचं पाऊल टाकण्यासाठी लागणारं धैर्यही गळून पडलं असतं.संसारातली फ्रुटी बेचव होते.पेप्सी खारट होते.थम्स अप ,डाऊन होते.मिरांड्याल कार्ल्याची चव येते.अशावेळी रडत-कुथत बसण्यापेक्षा गुपचूप मसाला मारके दूध प्यायला मिळालं तर ..असं श्री आणि सौ या दोघांनाही वाटू लागतं.अशा नयना दगाबाज करु इच्छिणाऱ्या श्री आणि सौंसाठी स्मार्ट ट्रेनिंग सुरु झालय.थोडक्यात काय,श्रीला आणि सौला लफडयाची दिशा पूर्वेला की दक्षिणेला कशी मिळू शकते,याचे 111 हमखास स्मार्ट उपाय या प्रशिक्षणात दिले जातात.हे प्रशिक्षण घेतलेल्या श्री आणि सौंना लपून छपून लफडं करण्याचं,ते दडवण्याचं आणि मस्त मजेत जगण्याचं आणि एकमेकांना फसवताना ते तसं वाटू द्यायचं नाही, याचं सूक्ष्म प्रशिक्षण सहजतेनं दिलं जातं. हे प्रशिक्षण ऑनलाइन म्हणजे सूपर स्मार्टली दिलं जातं.
हा अभ्यासक्रम सुरु करणाऱ्या गुरुजींचा असा आत्मविश्वास आहे की हे शास्त्रशुध्द लफड्याचं प्रशिक्षण घेतलेल्या श्री आणि सौ यांना मजा मजा करण्याचा किंगफिशर आनंद मिळून त्यांच्या जीवनात पुन्हा गुलाबाचे,चमेलिचे आणि मोगऱ्याचे दिवस धुंद होऊ शकतात.हे असं धुंद होणं एका लग्नाची दुसरी(च)किंवा भलतीच गोष्ट होण्यापासून वाचवू शकतं. एका लग्नाची गोष्ट एकच राहू शकते.आणि साठा उत्तराची कहाणी सुफळ होऊ शकते.याचा अर्थ असा की गडे,तू तुझं आइसफ्रुट मजेत चाखत राहा नि बाबा तू तुझी आइसक्रम झोकात टेस्ट करत राहा.आणि म्हणत राहा,
मैने भी इक बनाई है दुनिया,यहा से दूर/
ऐसा भी इक जहान है,जिसका खुदा हूं मै//..
या स्मार्ट ट्रेनिंग कोर्सने रटाळ आणि सुस्त आणि शुष्क आयुष्याला प्रशस्त हिरवळ दाखवणारा मार्ग दाखवलाय.(असं स्मार्ट मत नोंदवून ,तेरे नैना दगाबाज रे असं मस्त गुणगुणूया की..)
— सुरेश वांदिले
Leave a Reply