नवीन लेखन...

तेरी मेरी ‘कहानी’ है…

गेल्या रविवारी रात्री टीव्ही वर ‘इंडियन आयडाॅल’ कार्यक्रम पाहत होतो. प्यारेलाल सपत्नीक आलेले होते. त्यांची एकाहून एक सरस गाणी नवे गायक गात होते.
काही वेळाने व्हिलचेअरवरुन एका व्यक्तीला स्टेजवर आणले गेले. ते होते ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद. सहस्त्र चंद्रदर्शन करण्याच्या वयामध्ये आपल्या एकमेव चांदणीसह (नातीसह) त्यांनी संवाद साधला. परिस्थितीने गलितगात्र असताना देखील स्वाभिमानाने नेहा कक्करने देऊ केलेली पाच लाख रुपयांची मदत नाकारली. जेव्हा तिने एका ‘नाती कडून ही भेट’ समजा, असे विनवल्यावर मदत स्वीकारली. ‘एक प्यार का नगमा है…’ ह्या गाण्यामध्ये त्यांनी त्यांचाही आवाज मिसळला. ते जे काही बोलले, ते ऐकून अनेकांना अश्रू अनावर झाले…
सिकंदराबाद मधील एका खेड्यात संतोषजींचा १९३९ साली जन्म झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला आले. त्यांची सिने कारकिर्द सुरु झाली ती १९७० सालातील मनोज कुमारच्या ‘पूरब और पश्र्चिम’ पासून.
१९७० ते १९९४ या दोन तपामध्ये त्यांनी २६ चित्रपटांसाठी १०९ गीतं लिहिली. मनोज कुमारच्या ‘शोर’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ या चित्रपटांसाठी अप्रतिम गीतं लिहिली. त्यातील ‘मैं ना भुलूंगा..’ या गीतासाठी त्यांना फिल्म फेअरचं पहिलं अॅवाॅर्ड मिळालं.
दुसऱ्या अॅवाॅर्डसाठी त्यांना आठ वर्षे थांबावं लागलं. राज कपूर निर्मित ‘प्रेमरोग’ चित्रपटातील ‘मुहब्बत है क्या चीज…’ या गीतासाठी संतोषजींचा पुन्हा एकदा फिल्म फेअरने सन्मान झाला.
‘प्यासा सावन’ मधील ‘मेघा रे, मेघा रे…’, ‘संगीत’ मधील ‘जो गीत नहीं जन्मा, वो गीत बनायेंगे…’ अशी अवीट गोडीची गाणी कधी तरी आपण विसरु शकू का?
त्या दिवशी संतोषजींनी आपली खंत बोलून दाखवली. देवाला नवस केल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. तो सरकारी नोकरीत लागला. मात्र शासकीय सेवेत त्याच्यावर वरिष्ठांनी घोटाळ्याचे आरोप करुन त्याला आत्महत्येस भाग पाडलं. त्याने पत्नी व मुलीसह रेल्वेरुळावर आत्महत्या केली, सुदैवाने मुलगी वाचली. जी आज त्यांचा एकमेव आधार आहे.
संतोषजींची कारकिर्द पाहून त्यांना पद्मश्री द्यावी असं सरकारला कधी वाटलं नाही, कारण ते ‘हांजी हांजी’ करणाऱ्यातले नव्हते. इथं सैफ अली सारख्या नगण्य व्यक्तीला वशिल्याने पद्मश्री दिली जाते. त्या पुरस्काराचा खरं तर, तो अपमान आहे.
संतोषजींचं उर्वरित आयुष्य चांगलं जावो, ही सदिच्छा! मात्र या मायानगरीमध्ये एकदा का तुमचं वय झालं की, कढीपत्याप्रमाणे तुम्हाला बाजूला काढलं जातं. ए. के. हंगल यांची देखील परिस्थिती हलाखीची होती, तेव्हा प्रियांका चोप्राने त्यांना दोन लाखांची मदत केली होती.
महाराष्ट्र राज्यच्या मराठी चित्रपट महोत्सवात एकदा मी मास्टर भगवान यांना असेच व्हिलचेअरवरुन आणलेले पाहिले होते. एकेकाळी वैभवात राहिलेल्या त्या कलाकाराची ती अवस्था बघवत नव्हती.
‘बैजू बावरा’ मधील भारत भूषण यांनी एक काळ गाजवला होता. वृद्धापकाळात ते काम मिळविण्यासाठी स्टुडिओतून चकरा मारत राहिले. त्यांना काम तर मिळाले नाहीत, परंतु कित्येकांनी त्यांना ओळखले देखील नाही.
जाॅय मुखर्जी या अभिनेत्याने सत्तरच्या दशकात अनेक सिल्व्हर ज्युबिली चित्रपट दिले. काही वर्षांपूर्वी ते लोखंडवाला काॅम्प्लेक्सच्या कट्यावर एकटेच बसलेले एका चित्रपट रसिकाने लिहिलेले वाचले. वाईट वाटलं. या ज्येष्ठ कलाकारांकडून ऐकण्यासारखं खूप असतं, मात्र आजकाल वेळ कुणाकडे आहे?
सिनेकलाकारांचा, तंत्रज्ञांचा वृद्धापकाळ हा एकाकीपणाचा असतो. त्यांनी ज्यांच्यासोबत काम केलेले असते, ती माणसं हळूहळू कमी होत जातात. तंत्रज्ञान बदलल्यामुळे नवीन पिढी त्यांना स्वीकारत नाही. जनरेशन गॅपमुळे कुणाशी संवाद रहात नाही. गप्प बसून उदासपणा येतो. जगाचं ‘रहाटगाडगं’ मात्र चालूच रहातं….

– सुरेश नावडकर

२४-२-२१

मोबाईल ९७३००३४२८४

या रचनेचे सर्वाधिकार रचयिता  – सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..