देसाईआजोबांनी जोऱ्यात फोन आपटला . रागानी ते अगदी हिरवे पिवळे पडले होते , टकलाला घाम आला होता , त्यांनी हाताशीच असलेल्या टॉवेलनी टकालाचा घाम पुसल्यावर टकलाला आधीच्या पेक्षा जास्त केस चिकटलेले वाटले तेंव्हा लक्षात आले कि तो त्यांच्या मनीचा बसायचा टॉवेल होता . “ह्या!! काहीही कुठेही फेकतात लेकाचे , एकालाही शिस्त नाही ” ते मोठ्यांदाच खेकसले . सकाळपासून त्यांचं काहीच काम झालं नव्हतं , डोकं उठलं होतं फक्त .
एरवी एव्हाना त्यांची आन्हिकं उरकून बाजारात एक फेरी झालेली असायची . नाक्यावर उभं राहून बाजूच्या दळवींकडून सगळ्या शत्रूंचे समाचार मिळालेले असायचे. Ha दळवी , बाजूच्या सोसायटीचं सेक्रेटरी होता आणि एक महा भोचक माणूस होता , सगळीकडची माहिती ठेवायचा . त्याला नेमकी किल्ली कशी द्यायची हे देसाई आजोबांना माहित होते . अगदी हव्याहव्याशा चमचमीत बातम्या दळवी सहज द्यायचा , त्या , आजोबा, अगदी वाकडं तोंड करून ऐकायचे . ‘दळवी’हा आजोबांचा करमणुकीचा स्रोत होता. पण ‘हे’ ते दळवीला कळू देत नसत . तेव्हढ्यासाठीच ते लगबगीने आवरून बरोब्बर सकाळी 9 ला बाहेर पडायचे कारण त्याचवेळी दळव्या नातीला क्लासला सोडायला यायचा आणि अलगद आजोबांच्या हाती लागायचा . खरं तर याच बातम्यांसाठी म्हातारा जगत होता . म्हणजे वयाला 84 वर्ष झाल्यावर , बायकोच्या मागे , मुले नातवंडे settel झाल्यावर , जगण्यासाठी त्यांना दुसरी काय प्रेरणा होती?
आज सकाळी चहा झाल्यावर देसाई आजोबा फिरून आले दुसरा चहा घेतला आणि आता अंघोळीला जाणार इतक्यात त्यांचा फोन खणखणला !! अनोळखी नंबर दिसला . कपाळावर आठ्या आणत त्यांनी तो उचलला .
कोणीतरी दबक्या आणि धीरगंभीर आवाजात बोललं , ” देसाईंचा नंबर का ? ”
आजोबांनी उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न केला , ” तुम्ही कोण ? ” ,
” नाही पेपरमध्ये बातमी वाचली . वाईट झालं हो ”
इतकावेळ साधारण वैतागलेला त्यांचा मूड एकदम कुतूहल मिश्रित औत्सुक्याचा झाला . काय वाईट झालं बरं ? अरे वाचला कि मी पेपर!! 5 रुपये मोजून घेतलेला पेपर पूर्ण वाचून ( म्हणजेच चावून) झालाच पाहिजे असा त्यांचं दंडक होता . आपण कशी वाचली नाही हि दुःखद बातमी? ? आणि माझा काय संबंध तिच्याशी ?
आजोबांनी विचारले , ” म्हणजे? ” “अं ……..आपण ? ” , पलीकडचा आवाज बोलला .
आता का फुटेज खातोय हा माणूस ? आपल्या खेकसण्याला अमंळ संयमाची झालर देत देसाई वदले ,
” अहो काs य वाचलंत तुम्ही ? ”
” अहो ‘सकाळ ‘मध्ये देसाई आजोबा गेल्याची बातमी कळली , म्हणून फोन केला होता ” .
आजोबांना एकदम 100 वोल्ट्स चा झटका बसला !! रागाने डोळे लालबुंद झाले आणि घसा कोरडा पडला,
” कुठले देसाईई ई ? ”
” अं ते DP रोड ला संजेश्वर मध्ये राहतात चौथ्या मजल्यावर….. ,
म्हणजे मी ? ???
” हॅलो कोण हरामखोर बोलतोय ? कोण म्हणतं देसाई आजोबा मेला ?हा मी स्वतः बोलतोय तुझ्याशी !! ” हे काय भलतंच ? एव्हाना पलीकडे
फोन बंद झाल्याचा आवाज आला . या बातमीवर पुरेसा राग , चीड व्यक्त करण्याआधीच दुसरा फोन , मग तिसरा , चौथा असे करत अखंड फोन येतच राहिले . सगळे तसेच, त्यांच्या मृत्यूबद्दल त्यांचंच सांत्वन करणारे!! आणि देसाई आजोबांचा रागाचापारा वरच चढत राहिला . शेवटी त्यांना धाप लागली . आणि एकदम पायातली शक्ती गळल्या सारखी वाटली , मी खरंच मेलो का काय अशी बारीक शंका देखील त्यांच्या मनात येऊन गेली , तेंव्हाच त्यांनी घाम पुसण्यासाठी टॉवेल उचलला होता . 2-4 शिव्या हासडल्यानंतर जरासे बरे वाटले आणि एकदम त्यांच्या लक्षात आले की काही तरी मिस्टेक आहे. कोणीतरी चुकून भलते डिटेल्स बातमीत टाकले आहेत. कोणी देखील एक काम धड करत नाहीत . एकालाही शिस्त नाही . परंतु पुनः पुन्हा तसेच फोन आल्यावर त्यांना वाटून गेले , मुद्दाम तर नाही ना केला हा खोडसाळपणा कोणी ?
आता आजोबांचे विचार तीव्र गतीने चालू लागले . त्यांची अंघोळ अगदी यंत्रवत पार पडली , डोक्याला सतत ‘” कोण तो शिंचा ?” हा प्रश्न कुरतडत होता . छोट्या छोट्या गोष्टींवरून स्वतःचा ego issue करून समोरच्याला उगाच त्रास द्यायचा त्यांना छंद लागला होता . मुळात ऐंशीपार आलेला म्हातारा असले उद्योग करत असेल असे कोणाच्या लक्षातच यायचे नाही किंवा त्यांच्या वयाला बघून लोक सोडून देत असावेत. गेल्या 8-10 दिवसातले आपलं सगळे , वाद- विवाद , भांडणं , टोमणे , कुचाळक्या त्यांनी आठवून बघितल्या . त्यांची बुद्धी तल्लख होती , हात पाय चांगले चालत होते , थोडक्यात म्हातारा टकाटक होता . स्मरणशक्ती चांगली होती त्यामुळे त्यातले कोणी अशी हिम्मत करतील अशी शक्यता कमी होती . परवा कॉर्पोरेशनचे पाणी येणार नाही हा निरोप त्यांनी बिल्डिंग मध्ये इतरांना दिला तेंव्हा मुद्दाम त्या चोलकरला दिला नव्हता. ‘उगाच नवी गाडी बरोबर माझ्या घरासमोर लावतोस काय ? ‘ आणि चोलकराची पंचाईत झाली तेंव्हा मुद्दाम , ” अहो विसरलोच परवा निरोप द्यायला तुम्हाला , तरी आठवत होतो कोण राहिलय ? ” हे आणखी वरून !! त्यावर तेच दिलगिरीने म्हणाले , “असू द्याहो काका , तरी तुम्ही खूप करता ! ” त्यांनी काही हा सूड उगवला नव्हता. 4 दिवसांपूर्वी वाण्याशीही भांडण झाले होते , पण हा उद्योग त्याचा नाही . सोसायटीच्या कचरे वाल्याशी वाद झाला होता , पण तो रोज झाडू मारत नसे सोसायटीचं आवार तर अगदी गलिच्छ होते , वाळलेल्या फांद्या , तुटलेले कंपाऊंड , उखडलेल्या फरश्या , अगदी जुनाट झाली होती सोयायटी . त्यामुळे काकांनी स्वतःचा veto वापरून त्याचा पगार वाढवला नव्हता . Chairman होते न ते ! म्हणून तो कामात आणखी कामचुकार पणा करत होता , पण हा तर वर्षानुवर्षांचा वाद होता . आजची बातमी काही या वादातून आली नव्हती . मग गुन्हेगार कोण ? हा प्रश्न जास्तच चावायला लागला , आणि त्या अनोळखी माणसाचा राग यायला लागला . त्यासाठी मुळात ती बातमी बघणे आवश्यक होते नेमकी काय बातमी आलीये , ते बघण्यासाठी पेपर मिळवणे आवश्यक होते . पण पेपरमधल्या बाकी बातम्या मटा मध्ये वाचून झाल्यामुळे त्याच दिवसाच्या दुसऱ्या वर्तमान पत्रावर खर्च करणे त्यांच्या चिक्कूपणाला न पटणारे होते . दळव्याची वेळ एव्हाना चुकली होती त्यामुळे त्याच्याकडून उद्यापर्यंत काही कळण्याची शक्यता नव्हती .
बाहेर जाऊन काहीतरी सुचेल म्हणून ते तयार होऊन बाहेर जायला निघाले . हाफ पॅन्ट , tee शर्ट आणि floaters घालून , त्यांनी टोपी चढवली आणि बाहेरचे दार उघडले. बाहेर पडताना एकाच वेळी एका झटक्यात उजवा हात मागे करून दार बंद करणे , वळणे आणि पहिली पायरी उतरणे या सगळ्या क्रिया करणे या वयातही करणे त्यांना जमत होते . परंतु दार उघडल्याबरोबर या क्रिया करता करता अचानक त्यांना करकचून ब्रेक लागला !! अल्मोस्ट धडपडलेच ते . दारात एक मोठ्ठा कुत्रा , त्यांचीच वाट बघत असल्यासारखा बसला होता . बाप रे ! भितीने गाळणच उडाली देसाई आजोबांची ची ! होता गावठीच . पण डोळे असे तीक्ष्ण, कि लचकाच तोडेल एकदम !! देसाई आजोबा तत्क्षणी फ्रीझ झाले . त्याच्या डोळ्यात बघण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते . ते टुणकन उडी मारून , पटदिशी घरात घुसले आणि चटदिशी त्यांनी दाराला कडी घातली .कोणी बघत नव्हते म्हणून ठीक , नाहीतर भलतीच नाचक्की व्हायची !! आत आल्यावरही दबक्या पावलांनी आवाज न करता ते सोफ्यावर स्थिरावले . अजूनही दार फोडून तो मेला कुत्तरडा आत येईल का काय अशी शंका त्यांना येत होती !! त्यांनी दीर्घ श्वसनाचा एक फोल प्रयत्न केला . बाप रे , जेमतेम आत आलो मी , नाहीतर नरड्याचा घोटच घेतला असता मेल्यानी . या विचारांनी ते पुन्हा दचकले . हळूच उठून eye hole मधून बाहेर बघू लागले . कुत्रा अजूनही दाराकडे लपलपत्या जिभेने बघत होता . त्याच्या गळ्यात पट्टा होता आणि तो समोरच्या फ्लॅट च्या कडीला डकवलेला होता . इथं तर कोणीच राहत नाही . मग ह्याला कोण इथं बांधून गेलं ?
आपल्या बाबतीत काहीतरी विचित्र घटना उलट्या क्रमाने तर होत नाहीयेत ? आधी मरणाची बातमी , मग मरण …..असं काहीतरी ? त्यांना वाटले . आपल्या बरोबर आपला नातूही राहतो हे त्यांना थोड्य वेळाने त्यांना आठवले . त्यांनी स्वतःला थोडं शांत केले , आता भीतीची जागा पुन्हा एकदा तीव्र संतापाने घेतली होती . नातवाच्या मदतीने कुत्र्याला हाकलता येईल अश्या विचाराने त्यांनी नातवाच्या खोलीच्या दारावर टकटक केले. आतून नेहमीप्रमाणे काहीच प्रतिसाद न आल्यामुळे त्यांनी दार जरा ढकलले , आत जोऱ्यात ढ ण ढ ण काहीतरी ‘कोलावेरी कोलावेरी ‘ गाणे सुरु होते , आजोबांचे प्रपौत्र कानात noise cancellation headphones घालून आपल्याच तंद्रीत हातवारे करत मान डोलावत होते . आधी कर्कश्श आवाजात गाणे लावून मग noise cancellation च्या मदतीने भलतेच काहीतरी ऐकत हातवारे करण्याचा चक्रमपणा त्याच्यात कुठून आला हा एक अगदी गतिमंद (म्हणजे मराठीत no brainer) प्रश्न होता . इकडून काही मदतीची अपेक्षा नव्हती . दार पुन्हाबंद करून देसाई गॅलरीत आले आणि बेचैनपणे आसमंत धुंडाळल्यावर सहजच त्यांची नजर खाली सोसायटीच्या आवारात गेली . आवारात ठिकठिकाणी 2-2 , 3-3 च्या टोळक्याने बरीच मंडळी खाली जमली होती . आयला नेन्याचा नंबर लागला वाटतं , त्यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली . पण हि सगळी मंडळी गंभीर किंवा दुखी न दिसता किंचित हास्य विनोदात डुबल्यासारखी का वाटतायत मला ? तेव्हढ्यात 80 वर्षाचा नेन्या कोपऱ्यात बसलेला त्यांना दिसला . माझ्या नकळत काही रिडेव्हलोपमेंट करायच्या मिटिंगा घेत आहेत का काय ? मी जिवंत असेपर्यंत redevelopment होऊ देणार नाही असा विडा त्यांनी मागेच उचलला होता आणि तेव्हढ्यासाठीच सोसायटीच्या working committee चे chairman पद सोडायला ते तयार नव्हते . इतक्यात त्यांना सकाळचे फोन आठवले . तो कुत्रा , नातवाचे कर्कश्श कर्दनकाळ संगीतमर्दन या सगळ्यात एकदम काही सेकंद सकाळच्या , आपल्या मृत्यूच्या बातमीचा आजोबांना अंमळ विसर पडला होता . आता खाली बघितल्यावर , हे लोक आपल्यालाच खांद्यावर उचलायला आलेत का काय ? ह्या विचाराने आजोबा दचकले . हा विचार फार disturbing होता . हा आजचा सकाळापासूनचा तिसरा शॉक होता ! छे छे ! देसाईंचं आता काही खरं नव्हतं . प्रचंड चीड, मानसिक गोंधळ , शंका , प्रश्न आणि भीती अशा भावनांनी त्यांच्या मनात गर्दी केली . कोणीतरी मुद्दाम ही खोडी काढली आहे , नक्कीच !! दैनिक सकाळ मध्ये आलेली ही बातमी कोणी दिली असेल बरं? आजोबा आठवू लागले. या प्रश्नाचं उत्तर जरा कठीणही होतं कारण आजकाल देसाई आजोबा जरा देसाई कमी आणि कसाई जास्त वाटत होते . त्यांनी खूप शत्रू जमवले होते . आत्ता खाली जाऊन सोक्षमोक्ष लावून येतो या विचारा पाठोपाठच दारातल्या राक्षसाचा चेहरा त्यांच्या मनचक्षूसमोर तरळला आणि ते तिथेच पुन्हा पंक्चर झाले . अख्ख्या आयुष्यात त्यांची कध्धी कध्धी अशी अवस्था झाली नव्हती . आणि याच गोष्टीचा त्यांना माज चढला होता.
देसाईंचा सगळा वेळ दिवसभर घरात बसवत नाही आणि बाहेर जात येत नाही अश्या अर्धवट अवस्थेत गेला . अधून मधून बातमी वाचून फोन येतच राहिले …… कोणीतरी मुद्दाम ही खोडी काढली आहे याची आता खात्री झाली . त्यांनी Redevelopment हा उगाचच एक सेन्सिटिव्ह issue करून ठेवला होता . बिल्डिंग मध्ये गडकरी नावाच्या माणसाचा एक फ्लॅट होता . हा एक मुंबईकर businessman होता . तो फ्लॅट त्याने भाड्याने दिला होता . तो दिसला कि देसाई आजोबांना पोटशूळ उठत असे . का? तर ‘हा लेकाचा पैसे कमावतोय !! ‘ त्याला भाडेकरू मिळू नये म्हणून त्यांनी सोसायटीत खूप नवे नियम आणले – जसे ऑफिस ला जागा भाड्यानी देता येणार नाही . भाडेकरूची गाडी कंपाऊंड च्या आत पार्क करायला परवानगी नाही ! येव्हढच काय एका वर्षी तर पाण्याची खूप टंचाई होती तेंव्हा त्यांनी त्या मेम्बरला चक्क नोटिस पाठवली , या वर्षी आधीच पाणी कमी पडतंय त्यामुळे जागा भाड्यानी द्यायची नाही !! आपण किती डोक्यालिटीने अडवणूक करू शकतो यावर मित्रांमधे त्यांचा विजयध्वज फडकत असायचा . त्यांनी सोसायटी मीटिंग मध्ये त्या मेंबर ने redevelopment चा विषय काढल्यावर त्याचा उपमर्द करून वर , मी मेल्यावर करा redevelopment , ” असे म्हणत शिवाय chirman पदाचा राजीनामाच देतो असे म्हणत त्याच्या एका NOC वर सही करण्यास चक्क नकार दिला होता !! हा शुद्ध नासकेपणा होता . असे वागणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने , चालू खेळ थांबवून “मला बॅटिंग दिली नाही , आता माझी बॅट घेऊन मी घरी जाणार , ” असा रंगाचा बेरंग करण्यासारखे होते . खरे तर संजेश्वरच्या 4-5 मेंबर्स ना redevelopment हवी होती पण देसाई आजोबांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ते तोंड उघडत नव्हते . गडकरी कोणाला रिडेव्हलोपमेंट ची जबरदस्ती करत नव्हता .केवळ कोणाकोणाला रिडेव्हलपमेन्ट हवी आहे , या प्रश्नावर इतके पिसाळायचे काय कारण असावे , हे गडकरीच्या आकलन शक्तीच्या बाहेर होते . या गोष्टीने चिडून जाऊन गडकरीने शेवटी तडकाफडकी फ्लॅट विकायचा निर्णय घेतला . हा फ्लॅट ठेवण्यात काहीच इकॉनॉमिक सेन्स नव्हता. या गडकरीनेच तर आपल्या मरणाची बातमी दिली नसेल ? फारच अडवले का आपण त्याला ? तो तर फक्त कोणा कोणाला redevelopment ला जायचंय एव्हढंच विचारत होता. स्वतःच्याच विचारांनी ते confuse झाले . पण पुन्हा , “ह्यां ! एव्हढ्यातेव्हढ्यानी घाबरत नाही हा देसाई “, अश्या बाण्याने आपला खोडसाळपणा देसाई आजोबांनी सुरूच ठेवला . दुसऱ्यादिवशी सकाळी ते बाहेर पडले , दार उघडतानाच पुन्हा कुत्रा आठवला, क्षणभर त्यांचं काळीज धडधडलं , पण बाहेर कोणीच नव्हतं . अचानक कुत्रा कुठून आला, आणि लगेच दुसऱ्या दिवशी गायब कुठे झाला या वर शोधकार्य करायला हवे होते.
कालचा पेपर कुठे मिळतो का याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण तो व्यर्थच झाला. कुत्र्याविषयीही काही खात्रीशीर माहिती मिळाली नाही . सोसायटीतल्या कोणीच कुत्र्याला बघितले नव्हते . पुढे बरेच दिवस हे दोन्ही प्रश्न अनुत्तरीतच राहिले. आज सचिन भलताच खुश होता !! कधी एकदा दीपाताई घरी येतात आणि देसाई आजोबांची इत्थंभूत चुरचुरीत माहिती देतात असे त्याला झाले होते . त्याची भन्नाट आयडिया कल्पनेच्या पलीकडे यशस्वी झाली होती . स्वतःवर तो अगदी फिदा झाला होता .
सचिन एक तरुण इस्टेट एजन्ट होता . शिक्षण साधारण असले तरी , हार्ड वर्किंग होता . छोटे मोठे जोड धंदे करत जम बसवत होता . एका ठिकाणी अकाउंट्स लिहिण्याचे काम करता करता , आजूबाजूच्या घरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार आणि मुख्यत्वे rent agreements तो करीत असे. संजेश्वर सारख्याच आजूबाजूच्या बहुतेक बिल्डींग्स जुनाट झाल्या होत्या . 30-35 वर्षं जुन्या बिल्डींग्स अगदी redevelopment करायच्या लायकीच्या होत्या . तश्या बऱ्याच गेल्याही होत्या . बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट झाले कि बिल्डिंग खाली करावी लागायची . तसे झाले कि सचिनला ला खूप business मिळायचा . 24 पैकी निदान 10 -15 जण तरी दुसरा भाड्याचा फ्लॅट बघण्यासाठी त्याला commission द्यायचे . तिथल्या तिथेच , ओळखी ओळखीतून त्याचे काम व्हायचे कारण तो स्वतःही बाजूच्याच गल्लीत श्रीराम apartments मध्ये राहत होता . मागे संजेश्वर मधला एक फ्लॅट रिकामा असताना , तिथल्या chairman च्या आडमुठेपणामुळे त्याला rent चे डील गमवावे लागले होते . संजेश्वर च्या बाजूची नीलम सोसायटी व त्याला पलीकडून लागून असलेली त्याची श्रीराम अपार्टमेंट्स redevelopement ला जाऊ इच्छित होत्या . समजा संजेश्वर ने त्यांच्या बरोबर हात मिळवणी केली असती तर cluster डेव्हलपमेंट मध्ये सगळ्यांचाच जास्त फायदा होता . पण संजेश्वर चा chairman सगळ्यांना redevelopment चे धोके सांगत फिरायचा . कुठले कुठले फसलेले agreements दाखवायचा . त्त्याने रिडेव्हलपमेंट विरोधात अशी आघाडी उघडली होती कि आसमंतातल्या सगळ्या सोसायट्या रिडेव्हलपमेंट नकोच म्हणू लागल्या होत्या . त्यामुळे त्यालाही हवी असलेली redevelopment होऊ शकत नव्हती . गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळीही देसाई आजोबा सचिनला नडले होते . त्या भागात आजूबाजूला प्रत्येक बिल्डींग मध्ये एखाद दुसऱ्या एखाद दुसऱ्या माणसाला देसाई आजोबांचा प्रसाद मिळाला होता .
प्रत्येक वेळी त्यांच्या वृद्ध वयाकडे बघून सचिन नेहमी त्यांना सोडून देत असे पण त्यांनी गडकरींना त्रास दिला तेंव्हा पासून त्याचे डोके सटकले होते. गडकरी त्याचे फार special client होते . ते मुंबईत होते त्यामुळे त्यांची इकडची रिपेअर ची किंवा इतर काही किरकोळ कामे सचिन करवी करायचे व ते करण्याचे भरपूर पैसे , न मागता द्यायचे . शिवाय ते सचिनशी खूप मान देऊन बोलत असत . तसे ते सगळ्यांशीच फार अदबीने आदराने बोलत असत. त्यांचा tenant हि अगदी खुश असत असे . थोडक्यात गडकरी अगदी दिलदार gentleman होते .
संजेश्वर सोसायटीची मीटिंग , संध्याकाळी आवारातच उभ्या उभ्या होत असे . मीटिंग घेण्याचा हा प्रकारही देसाईंनीच सुरु केला होता . कशाला उगाच कोणाच्या घरी मिटींग बोलावून खुर्च्या झिजवायच्या ? शिवाय उभ्या उभ्या कंटाळून , मीटिंगा लवकर संपत असत . अश्या प्रकारे कोणालाही देसाईंच्या कुठल्याही निर्णयावर उगाच वाद / खल / उहापोह करायला कमी संधी मिळत असे . शिवाय उगाच चहा पानाचा खर्चही वाचत असे . तर त्या दिवशी सचिनला , काही रीपेयर्स करण्यासाठी गडकरींनी मुद्दाम बोलावून घेतले होते. मीटिंग सुरु होती म्हणून तो बाजूलाच थांबला होता . मीटिंग मध्ये झालेला एकूण प्रकार त्याने स्वतःच बघितला होता . ती नौटंकी बघितल्यावर तर त्याचे डोकेच सटकले . देसाईंचा काहीतरी उपाय करायलाच पाहिजे , त्याने मनोमन ठरवले .
गडकरींनी ठरवल्याप्रमाणे 2-3 महिन्यात त्यांचा फ्लॅट विकल्या गेला . सचिनलाही भरगोस कमिशन मिळाले . सोसायटी ट्रान्सफर च्या सगळ्या procedures पार पडल्या . आता देसाई गडकरींचे काहीच वाकडे करू शकत नव्हते . त्यांचा वचपा काढण्यासाठी , सचिन काहीतरी वेगळ्या क्लुप्तिच्या शोधात होता .
पूर्वीच्या काळी अनेक जोडधंदे करताना त्याने सकाळ पेपर ची agency घेतली होती . सकाळच्या छोट्या जाहिराती घेण्याचे काम तो आपल्या ऑफिस मध्ये करीत असे. आजकाल बरेच काम online झाले तरी सकाळची हि सुविधा चालू होती . सकाळच्या लोकांशी सचिनचे संबंधही चांगले होते . झाले. त्याने एक दिवस ‘ती’ बातमी पेपरला दिली . आणि दीपाताईला खास लक्ष ठेवण्यास सांगितले . सचिन लहान असताना त्याला सांभाळायला दीपाताई यायच्या . त्या त्याच्या कुटुंबाला खूप जवळच्या होत्या . काही दिवसांपासून दीपाताई देसाई आजोबांकडे स्वैपाकाचे काम करीत होत्या . त्यांच्या खवचटपणाचा त्रास त्यांनाही बरेचदा झाला होता . त्यांनी अगदी मनापासून या कामात सहभाग दिला . त्या दिवशी देसाई आजोबांना पहिला फोन आला तेंव्हापासून कुत्रा प्रकरणापर्यंत त्या आजोबांकडेच स्वैयंपाक करत होत्या . आजोबांचे फोनवरचे बोलणे व वैताग बघून मनोमन खुश होत होत्या . पुढे त्याचे सखोल वर्णन त्यांनी सचिनला ऐकवले !! दोघांची हसून हसून मुरकुंडी वळली .
मात्र कुत्र्याची काय भानगड झाली ते सचिनलाही माहित नव्हते . पण दीपाताई नी माहिती पुरवली कारण आजोबांच्या नातवाने त्यांना कुत्र्यासाठी 2 भाकरी करण्यास सांगितले होते . नातवाची मैत्रीण एक दिवस बाहेरगावी गेल्यामुळे तिने तो कुत्रा एक दिवस सांभाळण्यासाठी त्याला दिला होता . योगायोगाने बातमी व कुत्रा एकाच दिवशी आले . म्हणजे अगदी पूरी कायनात ……….देसाईंच्या विरुद्ध एकवटली होती .
त्या दिवशी सचिनच्या घरात अचानक शीरा का बनवला गेला हे बाकीच्यांना कळलेच नाही !!
अश्या प्रकारे ठकास महाठक भेटला !!
रीटा खांडेकर
17.12.2023
Leave a Reply