नवीन लेखन...

“थंडी .. मुंबईची ”

प्रिय थंडी …….
काय गं ss आलीस का एकदाची ?
वाटच बघत होतो तुझी केव्हापासून ….
तुझा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो ….
त्यासाठी वाट मात्र खूप बघायला लावतेस तू ….
नेहमीचंच झालंय आता हे तुझं ….
पण काही हरकत नाही….
अखेर आली आहेस ना ss ….
आता मात्र प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त तुझ्यासोबतच घालवायचाय….
गार फरशी , गरम कपडे, क्वचित पडणारं धुकं .. सगळं अनुभवायचंय ….
तुझ्या थंडगार स्पर्शाने शांत आणि गाढ झोपायचंय ….
खास ठेवणीतून काढलेल्या गोधडीत अगदी गुरफटून….
तू अशी जवळी रहा फक्त.. सतत ..
मध्येच कधीतरी दुपारच्या वेळेस जरा फेरफटका मारायला म्हणून जातेस ..
आणि संध्याकाळी यायला थोडा जरी उशीर केलास तरी जीव घाबरा होतो….
आताशा तुझी सवय व्हायला लागलीये..
तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण हा आनंददायीच असतो….
पण त्याच वेळेस मनात सतत एक भीती असते….
जशी आलीस तशीच पटकन निघून जाशील अचानक ..
काहीच न सांगता ..
तुझ्या असण्याची सवय लावून ….
मनातल्या आठवणींना ‘गोठवून’ ….
आम्ही आहोत तुझे जबरदस्त बारमाही ‘फॅन’.. .
पण जाशील आम्हाला त्या चोवीस तास भिरभिरणाऱ्या ‘पंख्यांच्या’ हवाली करून ..
मग मात्र दिवस ढकलणं कठीण होऊन बसेल ..
जाऊ दे ss
उगीच त्या दिवसाचा विचार करून आजच्या आनंदावर विरजण कशाला?..
तू जाण्याच्या नुसत्या विचारांनी सुद्धा घामटं फुटलं बघ ..
तुझे ‘गुलाबी’ गाल ‘लालबुंद’ करण्यासाठी ,
तुला पिटाळण्यासाठी, आमच्यापासून दुरावण्यासाठी ,
तापलेला आणि टपलेला आहेच तो नकोसा जीवघेणा उकाडा ….
त्याला असं सहजासहजी जिंकू देऊ नकोस ..
तुझ्यावरच्या मायेच्या ओलाव्याचं इतक्यात बाष्प होऊ देऊ नकोस ….
पण आमच्या मुंबईपेक्षा पुणे-नाशिक वर तुझं जरा जास्तच प्रेम ….
मुंबई-पुणे-नाशिक हा ‘गोल्डन ट्रँगल’ ..
तुझ्या अश्या वागण्यामुळे आता ‘प्रेमाचा त्रिकोण’ झालाय ……..
त्यांच्या सोबत तू जास्त दिवस रमतेस ….
हां ss .. पण कधीकधी त्यांना रौद्र रूप सुद्धा दाखवतेस ..
कधी बोचणारं तर कधी हुडहुडी भरवणारं ..
आम्हाला मात्र त्यामानाने कमी सहवास देतेस ….
पण जो सहवास लाभतो तो आल्हाददायकच असतो हेही तितकंच खरं ..
म्हणूनच तुझ्या या माफक प्रेमात सुद्धा आम्ही खूप समाधानी आहोत ..
आम्हाला पूर्ण कल्पना आहे की जावं तर तुला लागणारंच आहे….
पण आता आल्यासरशी अजून थोडे दिवस राहून जा !!….
अर्थात आम्ही फक्त आग्रह करू शकतो ….
निर्णय तुलाच घ्यायचाय ..
पण गेलीस तरी पुन्हा वाट बघू ….
तितक्याच आत्मियतेने ..
आणि आलीस की पुन्हा नव्याने स्वागत करू ….
तितक्याच आपुलकीने , भरल्या मनाने , भरल्या डोळ्यांनी ….
हवाबदलाचे परिणाम असतील तर अगदी “भरल्या नाकाने” सुद्धा ….
पण तू नक्की ये ..
प्रिय थंडी ….
इथे वर्षभर असतेच सतत घामाची आणि पावसाची धार …
सहन करतो सारं कारण असतो तुझ्या रम्य आठवणींचा आधार ..
म्हणूनच …………….
वर्षातून किमान एकदा तरी तुझी आमच्यावर अशीच कृपादृष्टी असुदे !!
लोभ आहेच तो अजून वृद्धिंगत होऊ दे !!
हीच तुला कळकळीची विनंती..
समस्त मुंबईकरांकडून..

©️ क्षितिज दाते , ठाणे

आवडल्यास text शेअर/फॉरवर्ड करायला माझी काहीच हरकत नाही …

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..