२०१५ हे वर्ष मला बरेच काही द्यायचे असे ठरवून उजाडले. ‘ठाणे नगर विकास मंच’ ही संस्था दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांना ‘ठाणे नगररत्न’ पुरस्काराने सन्मानित करते. ठाणे शहराचे माजी उपमहापौर आणि ठाणे नगर विकास मंचचे अध्यक्ष माननीय श्री. सुभाष काळे यांनी फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले.
“अनिरुद्धजी, कलाक्षेत्रातील या वर्षीच्या ठाणे नगररत्न पुरस्कारासाठी आमच्या कमिटीने तुमचे नाव निश्चित केले आहे. गडकरी रंगायतनमध्ये एका मोठ्या समारंभात हे पुरस्कार दिले जातात. तेव्हा आपण या समारंभात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहाल याचे संमतीपत्र सही करून द्या. सुभाषजी म्हणाले. मी त्यांच्याकडे पहातच राहिलो. “संमतीपत्र सही करून देता ना?” सुभाषजींच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मला दिल्ली आणि मुंबईत मिळाले होते. माझ्या ठाणे शहरात मिळणारा हा मोठा पुरस्कार होता.
“माझ्या ठाणेकर रसिकांसमोर आपण मला पुरस्कार देणार आहात. आपले आभार कसे मानू? यासाठी कोणत्याही पत्रावर सही करून देण्याची माझी तयारी आहे.” मी आनंदाने म्हणालो. “पण माझे खरे काम तर पुढेच आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तुमचा गाण्याचा कार्यक्रम करावा आणि त्यात तुम्हाला पुरस्कार द्यावा अशी माझी इच्छा आहे.” सुभाषजी म्हणाले. हा माणूस एका मागोमाग एक सुखद धक्के देत होता. तेही अगदी शांतपणे.
“तुम्ही खरे बोलत आहात की माझी गंमत करता आहात?” मी विचारले. “अहो गंमत कशी करेल? खरंच विचारतो आहे.” ते शांतपणे म्हणाले.
“सुभाषजी, मला एक हजार जाहीर कार्यक्रम पूर्ण करायचे आहेत. ९८० पर्यंत मी पोहोचलो आहे. पुरस्काराइतकाच मला पुढील प्रत्येक कार्यक्रम महत्त्वाचा आहे.” मी उत्तरलो.
“तर मग या तुमच्या वाटचालीतील पुढचा कार्यक्रम ठाणे नगर विकास मंचसाठी असेल. लवकरच वर्तमानपत्रात या पुरस्कारांची घोषणा होईल.’ सुभाषजी म्हणाले. एका दिवसात या माणसाने मला बरेच काही दिले होते. कार्यक्रमांसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच एक ‘ट्रिगर’ दिला होता. उत्साह वाढवला होता आणि पुरस्कार देऊन माझा आत्मविश्वास उंचावला होता. या काळात मला त्याची अत्यंत गरज होती. कधी कधी कलाकार एकदम हळवा होऊन जातो. कलाक्षेत्रात वाटचाल करताना एकदम त्याची शक्ती संपून जाते. या वेळी ‘तू पुढे चल. आमचा तुला पाठिंबा आहे. आम्ही तुझ्या कलेवर मनापासून प्रेम करतो.’ अशा शब्दांची त्याला फार आवश्यकता असते. माझे काहीचे असेच झाले होते. या वेळी सुभाष काळे आणि ठाणे नगर विकास मंचने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीच विसरू शकणार नाही.
लवकरच हे पुरस्कार वर्तमानपत्रात जाहीर झाले. मग काय, माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. २२ फेब्रुवारी २०१५ रोजी ‘ठाणे नगररत्न पुरस्कार वितरण सोहळा’ गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला. डॉ. मुरलीधर गोडे, डॉ. मंजूषा गोखले. श्रीधर नेवाळकर आणि नीता देवळालकर हे इतर क्षेत्रातील पुरस्काराचे मानकरी होते. ‘फर्माईश’ या माझ्या हिंदी – मराठी गीत – गझलच्या कार्यक्रमाने पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली. नंतर माझ्या गाण्याच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी छोटी फिल्म दाखवण्यात आली. याचे संकलन नरेन्द्र बेडेकर यांनी केले होते. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांना या समारंभासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते कलाक्षेत्रासाठीचा २०१५ सालचा ‘ठाणे नगररत्न पुरस्कार’ मला देण्यात आला. त्यांच्यासारख्या महान गायकाच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याचे महत्त्व माझ्यासाठी अनेक पटींनी वाढले. यानंतर अजित कडकडे यांनी गाणे सादर केलेच, पण एक छोटे भाषण देखील केले. ‘अनिरुद्ध, आता तू गाण्याचे विविध प्रकार उत्तम तऱ्हेने गाऊ शकतोस. तेव्हा एका गायन प्रकारात अडकून न राहता विविध स्टाईलची गाणी गा.’ असा संदेश त्यांनी दिला. माझी गाण्याची कारकीर्द त्यांनी जवळून पाहिली होती. त्यांचा तो अधिकार होता. या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठाणेकर रसिकांनी माझे कौतुक केले.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply