रात्री साडे अकराची ठाण्याहून कल्याण स्लो लोकल मध्ये बसलो. संपूर्ण डब्यात फक्त पाच जण होते. दोघे एकदम पुढच्या टोकाला एकजण डब्याच्या मधल्या भागात, मी डब्याच्या मागच्या भागात आणि माझ्या समोर एकजण दरवाजा जवळ ऊभा होता. पुढे बसलेले दोघे जण मोबाईल मध्ये काहीतरी बघण्यात दंग होते तर मध्ये बसलेला खिडकीला डोकं टेकून गाढ झोपला होता.
दरवाजाजवळ उभा असणारा साधारण तीस बत्तीस वर्षाचा तरुण होता. उंची साडेपाच फूट, गोरा रंग आणि धडधाकट शरीरयष्टी पण त्याच्या हालचाली जरा विचित्र वाटत होत्या. नाही म्हटलं तरी गाडी रिकामी हव्या तेवढ्या विंडो सीट असूनही दरवाजाजवळ तो कशासाठी उभा होता ते कळवा स्टेशन गेल्यावर सुद्धा कळेनासे झाले, बाहेर गडद अंधार आणि बोचरी हवा. लोकल ने वेग पकडला त्याने कोणाला तरी फोन केला तो रागारागात बोलत होता, गाडीच्या आवजामुळे त्याचे बोलणे स्पष्ट ऐकु येत नव्हते पण गाडी मुंब्रा स्टेशन मध्ये थांबल्यावर तुला एकटीला राहायचे असेल तर सांग एकदाचे एवढे शब्द कानावर पडले आणि त्याने फोन कट केला. गाडीने मुंब्रा स्टेशन सोडले आणि वेग घ्यायला लागली. मुंब्रा खाडी पुल जवळ येऊ लागला तसा फोन वर बोलता बोलता रागाने लाल झालेला तो तरुण दरवाजा कडे सरसावला , त्याच्या हालचाली मी बघतोय आता पुढल्या क्षणात तो धावत्या लोकल मधुन मुंब्रा खाडी पुलावरून उडी मारणार म्हणून माझ्या छातीत धस्स झाले पण त्याच क्षणात त्याच्या मोबाईलची रींग वाजली. त्याने दरवाजा बाहेर काढलेला एक पाय झटकन आत ओढला.
खिशातला मोबाईल काढून त्याचा डिस्प्ले पाहिला फोन उचलू का नको अशा कात्रीत तो सापडला आहे असं त्याच्याकडे बघताना वाटलं. त्याची आत्महत्या मोबाईलच्या रिंग मुळे त्या क्षणापुरती रेंगाळली. पंधरा सेकंद फोन ची रिंग वाजल्यावर डिस्प्ले वर स्लाईड करून त्याने फोन उचलला त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. त्याच्या ओठातून शब्द फुटत नव्हते. काही मिनिटांपुर्वी मोबाईल वर बोलताना रागाने लालबुंद झालेला चेहरा मोबाईलवर पलीकडचे शब्द ऐकताना अत्यंत केविलवाणा झाला होता. तेवढ्यात दिवा स्टेशन आले गाडी थांबत असताना त्याने डोळे पुसले होते. हॅलो हॅलो अग आवाज येत नाही मी उतरल्यावर फोन करतो सांगून त्याने गाडी थांबायच्या आत फोन कट केला.
तो सावरतोय असं वाटले , एकदा वाटलं उठून त्याच्याजवळ जावं आणि बोलण्याचा प्रयत्न करावा पण आता तो थोडा रिलॅक्स झाल्यासारखा दिसत होता म्हणून जे घडतंय ते बघत राहावे असं वाटून निमूटपणे बसून राहिलो.
लोकलने दिवा स्टेशन सोडले आणि पुन्हा एकदा वेग घेऊ लागली. पुन्हा त्या तरुणाच्या मोबाईलची रिंग वाजली , पुन्हा एकदा तो फोनच्या डिस्प्ले कडे बघून फोन उचलू का नको अशा कात्रीत सापडल्या सारखा दिसला. त्याने फोन उचलला, हळू हळू त्याचा चेहरा रागाने लाल व्हायला लागला मोबाईल वर बोलताना त्याचा आवाज चढु लागला.
माझ्या छातीत पुन्हा धडधड वाढायला लागली, मोबाईल वर बोलता बोलताच जर याने रागाच्या भरात आत्महत्या केली तर आपण त्याला थांबवू शकलो नाही, त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करू शकलो नाही या विचारांनी बेचैनी वाढायला लागली. कोपर स्टेशन आले आणि गेले त्याचे मोबाईल वर बोलणे आणि ऐकणे सुरूच होते. लोकल कोपर स्टेशन मध्ये असेपर्यंत तो फक्त लालबुंद होउन ऐकत होता.
कोपर स्टेशन गेल्यावर काही सेकंद तो बोलला आणि पुन्हा त्याने रागाने मोबाईल कट केला. लोकलने वेग पकडला जसा लोकल वेग पकडू लागली तसं आता हा पुन्हा धावत्या लोकल मधुन उडी तर नाही न मारणार या विचारांनी माझी बेचैनी वाढू लागली. पण लगेचच डोंबिवली स्टेशन जवळ आल्यामुळे लोकलचा वेग मंदावू लागला.
समोरच्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे भाव त्रासिक पणा स्पष्ट पणे जाणवत होता. त्याच्या बॉडी लँग्वेज मधील नकारात्मकाता आणि काय करू न काय नको अशी अवस्था खरतर बघवत नव्हती.
आपण कोण याचे? आपल्याला काय पडलंय ? काही ना करेना तो ? कोणाशी बोलतो तो ? दोनवेळा कोणा कोणाचे फोन आले त्याला? पलीकडून बोलणाऱ्या हया कोणीतरी दोघी जणी असाव्यात एवढं तरी नक्की होते.
लोकल ने डोंबिवली स्टेशन सोडलं आणि ठाकुर्ली स्टेशन कडे निघाली, ठाकुर्ली गेले आणि तो तरूण दरवाजातून डब्याच्या मधल्या भागात असणाऱ्या सीट वर बसला त्याच्या डाव्या बाजूला झोपलेला व्यक्ती जाग येऊन आळोखे पिळोखे द्यायला लागला. कल्याण गाडी असल्याने नेमका ठाकुर्ली गेल्यावरच तो बरोबर अलार्म लागल्यासारखा जागा झाला होता.
तो तरुण सीट खाली शुन्य नजरेने बघत होता. लोकल हळू हळु कल्याण स्टेशनच्या एक नंबर प्लॅटफॉर्म मध्ये जाऊ लागली. डब्याच्या पुढल्या भागातले दोघे जण उतरण्यासाठी उठले, झोपलेला व्यक्ती पण उतरण्याची तयारी करू लागला. त्याने तरुणाकडे एक कटाक्ष टाकला आणि दरवाजाच्या दिशेने वळला.
तो तरूण त्याच्याच तंद्रीत होता, कल्याण आलंय आता ऊठुन उतरायला पाहिजे याचे त्याला भानच नसल्यासारखा तो बसून होता. त्याच्या खांद्यावर थाप मारून मित्रा कल्याण आलेय उतरायचे नाही का असं बोलावंसं वाटलं. त्याच्या दिशेन पुढे जाणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. तीन चार रिंग नंतर तो भानावर आला. त्याने डिस्प्ले वर नंबर बघितला आणि बाहेर नजर फिरवली कल्याण जंक्शनचे बोर्ड त्याने बहुधा हेरले आणि त्याने फोन उचलला.
हॅलो आई, अग मला झोप लागली गाडीत कल्याणला आलो थांब आता याच गाडीने परत माघारी फिरतो.
त्याला डोंबिवलीला उतरायचे होते की ठाकुर्लीला ? तो तर झोपलाच नव्हता कायमचं झोपायच्या विचारात होता.
कोणाला बोलला असेल तुला एकटीला राहायचे आहे का ? पुन्हा त्याच लोकलने तो माघारी जात असताना पुन्हा त्याला फोन आला आणि पुन्हा त्याने विचार बदलला आणि धावत्या लोकल मधुन उडी घेतली तर.
धावत्या लोकल मधुन उडी घ्यायचा विचार रोज किती जणांच्या मनात येत असावा?? किती जण खरोखरच उडी घेत सुद्धा असतील? कोणी एवढं टोकाला खरचं जाऊ शकतं का? धावत्या लोकल मधूनच नाही पण कोणी कोणासाठी तर कोणी कोणामुळे आत्महत्या करतात हे किती दुर्दैवी आणि समजण्या पलीकडे आहे.
नात्यांचा गुंता वाढतो , ताण असह्य होतो, भावनांचा उद्रेक होतो आणि होत्याचं नव्हतं होउन जातं.
रात्रीचे बारा वाजून गेेले होते , शेअर रिक्षात बसल्यावर कल्याणला आलेल्या त्या लोकलचा हॉर्न वाजून ती मुंबईच्या दिशेने माघारी निघालेली दिसली. तो तरुण सुद्धा त्याच्या घरी माघारी सुखरूप जावा असे मनोमन वाटत होते कारण त्याने त्याच लोकलने माघारी फिरतो असं सांगितलं होते. आपण त्याच्याशी दोन शब्द बोलायला पाहिजे होते का आपण चुकलो का याची चुटपुट सुद्धा तेवढीच लागली होती.
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B.E.(mech), DME, DIM,
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply