आमचं सू सेंटर हे छोटं गाव, आयोवा राज्याच्या अगदी वायव्य (north west) कोपर्यात येतं. तिथून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर साउथ डकोटा राज्याची हद्द सुरू होते. थोडं वेगळ्या दिशेने उत्तरेला गेलं की मिनेसोटा राज्याची हद्द सुरू होते आणि नैऋत्य दिशेला (southwest) गेलं की तासा दीड तासानी नेब्रास्का राज्याचा काही भाग लागतो. ही सगळी राज्यं तशी भरपूर मोठी आहेत आणि सारीच शेती प्रधान! बहुतेक वस्ती ही छोट्या गावांतून किंवा अगदी छोट्या गावकुसांतून! सू सेंटरहून सव्वा तासाच्या अंतरावर साउथ डकोटा राज्यातलं सू फॉल्स (Sioux Falls) नावाचं दीड दोन लाख लोकवस्तीचं मोठं शहर आहे. साउथ डकोटा, आयोवा, मिनेसोटा आणि नेब्रास्का या चारही राज्यांच्या सीमेलगतचं असं हे सर्वात मोठं शहर. त्यामुळे दोन तीन तासांच्या अंतरावरूनही लोकं ड्राइव्ह करून सू फॉल्सला शॉपिंग करायला येतात.
या सू फॉल्समधे नऊ दहा वर्षांपूर्वी बर्यापैकी भारतीय वस्ती होती. साधारणपणे पन्नास सत्तर भारतीय कुटुंबे असावीत. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या वगैरे निमित्ताने या भारतीय मंडळींनी एकत्र यावं, यात काही नवल नव्हतं. आसपासच्या छोटया गावांत, चुकून माकून येऊन एकाकी पडलेल्या आमच्यासारख्या थोडयाफार भारतीयांना तर असे पन्नास शंभर भारतीय चेहरे एकत्र पाहूनच भरून यायचं. हळू हळू थोडयाफार ओळखी होऊ लागल्या होत्या. त्यातूनच सू फॉल्समधेच राहणारं गुर्जर नावाचं एक महाराष्ट्रीयन मुंबईकर कुटुंब आमच्या चांगलं ओळखीचं झालं होतं. एकमेकांकडे जाणं येणं सुरू झालं होतं.
अशाच एका भेटीमधे थॅंक्सगिव्हींगच्या सेलचा विषय निघाला होता. आम्ही आमची उत्सुकता दर्शवली आणि गुर्जरांनी आम्हाला आदल्या दिवशीच त्यांच्याकडे येऊन राहायचा प्रस्ताव दिला. पहाटे सहा वाजता, दुकाने उघडण्याच्या आधी, आमच्या सू सेंटरहून नोव्हेंबरच्या कडक थंडीमधे दीड तास ड्राईव्ह करून येण्याच्या कल्पनेने आम्ही आधीच गारठलेले होतो. त्यामुळे आदल्या रात्रीच सू फॉल्सला येऊन गुर्जरांच्या घरी मुक्काम ठोकायचा, ही कल्पना फारच भन्नाट होती. श्रीयुत गुर्जरांना स्वत:ला, पहाटे उठून थंडीत कुडकुडत शॉपिंगला जायचा उत्साह नव्हता. पण सौ. अनुपमा गुर्जर आणि त्यांची अकरा बारा वर्षाची मुलगी रश्मी मात्र एका पायावर तयार होत्या. त्यामुळे रात्रीचा मुक्काम आणि अनुपमाचे अनुभवी मार्गदर्शन अशा दोन्ही गोष्टींचा लाभ अचानक पदरात पडला. आंधळ्याने एकाही डोळ्याची अपेक्षा केली नव्हती आणि देवाने अचानक दोन्ही डोळे दिले होते.
आम्ही थॅंक्सगिव्हींगच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता गुर्जरांच्या घरी पोहोचलो. थोडं फ्रेश होऊन स्थिरस्थावर होताच अनुपमाने वर्तमानपत्रांचा गठ्ठा पुढयात टाकला. नशीब आम्ही DVD – VCR player घ्यायचं आधीच ठरवलं होतं. नाहीतर वर्तमानपत्रांमधल्या त्या जाहिराती आणि विविध स्टोअर्सचे fliers पाहून आम्ही चक्रावूनच गेलो असतो.
– डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply