नवीन लेखन...

ठाण्याची नाटकमंडळी

जुन्या काळात नाट्यसंस्थांना ‘नाटक मंडळी’ असेच म्हटले जाई. म्हणजे ‘गंधर्व नाटक मंडळी’, ‘शाहूनगरीवासी नाटक मंडळी’, ‘राजाराम नाटक मंडळी’, असे. त्या काळात नाट्यसंस्था म्हणजे एक कुटुंबच असे. ज्या शहरात नाट्यप्रयोग करायचे तिथे एखाद्या चाळीत, वाड्यात खोल्या भाड्या घेऊन मंडळी उतरायची. नाटक कंपनीच्या त्या ताफ्यात स्वयंपाक करण्यापासून ते डोअरकीपिंग करण्यापर्यंत सगळी कामे करायला माणसे असत. मुख्य नटांचा पगार ठरलेला असे. तो शक्यतो वेळच्या वेळी केला जाई. नटांची तालीम घ्यायला तालीम मास्तर (आजचे दिग्दर्शक हो!) असायचे. मग हेच मास्तर नटांच्या मुलांना गणित वगैरे शिकवायचे. एखाद्या मोठ्या कुटुंबासारखी मंडळी एकत्र राहायची, जेवायची (आणि भांडायची सुद्धा). हा काळ बघता बघता मागे सरला आणि नव्या धर्तीच्या नाट्यसंस्था उदयास आल्या. पूर्वीच्या काळात नाटक कंपनीचे मालक स्वत नाटककार, नट, गायक असायचे. बदलत्या काळाबरोबर नाटकाकडे व्यवसाय म्हणून व्यावहारिक दृष्टीने बघणारे निर्माते आले. पण या बेभरवशाच्या क्षेत्रात ज्यांचे नाटकावर खरे प्रेम होते, तेच टिकले. नाट्यनिर्मात्यांच्या या दालनात काही ठाणेकरांनी महत्त्वाची भर घातली आहे. त्यातल्या काही निर्मात्यांचा हा अल्प परिचय.


रमाकांत राक्षे हे ठाण्यातील पहिले नाट्यनिर्माते म्हणून ओळखले जातात. तसा त्यांचा नाटकाशी असलेला संबंध फार घनिष्ठ होता असे आढळत नाही. व्यवसायाने वेगळ्याच क्षेत्रात असलेले म्हणजे पेट्रोल, डिझेल असा ऑइलचा व्यवसाय. त्यांचेच एक अतिशय जवळचे आप्त रमेश मोरे हे नाटकांचे प्रयोग कॉण्ट्रक्ट पद्धतीने लावत असत. त्यांच्यामुळे राक्षेंचा नाटकाशी संबंध येऊ लागला. आपणच नाटक काढून त्याचे प्रयोग लावले तर? असा विचार त्यातून राक्षेंच्या मनात आला आणि तो प्रत्यक्षात उतरला तो श्याम फडके लिखित ‘बायको उडाली भुर्रर्रऽऽ’ या नाटकाद्वारे. हे नाटक रंगमंचावर आले तेव्हा सन होते 1972. राम मुंगी यांचे या नाटकाला दिग्दर्शन लाभले.

या नाटकाला रसिकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. ठाण्यातील नाट्यनिर्मात्याकडे स्वतच्या कंपनीची ‘पहिली बस’ हा मान राक्षेंकडे जातो. त्यांच्या कंपनीचे नाव होते ‘अमेय’. बसवर हेच नाव विराजमान झाले. आपले एखादे ऐतिहासिक नाटक असावे या ईर्षेने शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ कादंबरीवर आधारित ‘मृत्युंजय’ या नाटकाला जन्म दिला. मोहन वाघ त्यांच्या स्वतच्या ‘चंद्रलेखा’ संस्थेच्या नाटकांसाठीच नेपथ्य व प्रकाशयोजनेचे काम पाहत. ‘मृत्युंजय’साठी त्यांनी ही बाजू सांभाळली. हा एकमेव अपवाद मोहन वाघ यांनी राक्षे यांच्यासाठी केला होता. संगीतासाठी वसंत देसाईंना पाचारण करण्यात आले. राम मुंगी हे दिग्दर्शक, तर कलावंत होते राम बापट, बाळ धुरी, श्रीकांत मोघे आणि ऐंशी वर्षे वय असलेले परशुराम सावंत तसेच उषा सरपोतदार.

‘मृत्युंजय’च्या यशाने अनेक कलावंत, नाटककार रमाकांत राक्षे यांना भेटू लागले. त्यात एक होते यशवंत दत्त. त्यावेळी ते मोठे नाव असलेले कलावंत होते. त्यांनी ‘अभिनय सम्राट’ हे नाटक करण्याचा सल्ला दिला. स्वत त्यात भूमिका स्वीकारली. खूप अपेक्षा असलेले हे नाटक ‘नटसम्राट’ची बरोबर करील असे वाटले. प्रत्यक्षात दोनच प्रयोगात ते विसावले. मोठे नुकसान झाले.


सुरुवातीच्या काळात अनंत लोणे हे वरळीच्या बीडीडी चाळीत राहत. तिथे होणाऱ्या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत. कामगार चळवळीशीही त्यांचा संबंध आला. त्यांच्यातील काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन ‘नंदादीप कला निकेतन’ या संस्थेची स्थापना केली आणि पहिले नाटक व्यावसायिक स्वरूपात रंगभूमीवर आणले. ‘शिवरायाचे आठवावे रूप’ हे ते नाटक. याचे दिग्दर्शक होते कुमार साहू. 70 कलाकारांचा संच यात होता. परंतु आपसातल्या कलहातून अनंत लोणे या संस्थेपासून वेगळे झाले. त्याच काळात ते मराठा मंडळात असल्याने शिवाजी मंदिरशी सतत संपर्क होता. त्या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणून स्वतची नाट्यसंस्था काढून नाटकांची निर्मिती करावी, हा विचार प्रबळ झाला.

‘दत्तात्रय प्रॉडक्शन, मुंबई’ ही संस्था त्यांनी स्थापन केली. ते साल होते 1975. पहिले व्यावसायिक नाटक ‘सुखाचा शोध’ त्यांनी रंगमंचावर आणले. हिराकांत कलगुटकर हे नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक. कलाकार होते दत्ता भट, अनुपमा. पुढच्या वर्षी मामा पेडणेकरांच्या सोबतीने ‘जय देवी संतोषीमाता’ हे नाटक आणले. पुढे त्यानंतर बबन प्रभूंचे ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ केले. त्याचे दिग्दर्शन आत्माराम भेंडे यांनी केले. भेंडेंनीच दिग्दर्शन केलेले ‘पळा, पळा कोण पुढे पळे’ हे नाटक आले. यात भक्ती बर्वे आणि दिलीप प्रभावळकर, माधव वाटवे, शशिकांत राजाध्यक्ष हे कलाकार होते. दत्ता केशव लिखित ‘बायका त्या बायकाच’ आले. आत्माराम भेंडे हे दिग्दर्शक आणि कलाकार अशा दुहेरी भूमिकेत होते. शिवाय लता अरुण, मधू कडू, आनंदा नांदोस्कर हे कलाकार होते.

त्यानंतर राम नगरकर, मधू कांबीकर यांना घेऊन आत्माराम सावंतांचे ‘मुजरा घ्या सरकार’ रंगभूमीवर आणले. रत्नाकर मतकरींचे ‘वटवट सावित्री’ आणले. या नाटकाचे दिग्दर्शन प्रकाश बुद्धिसागर यांनी केले. नीना कुलकर्णी, उदय म्हैसकर, दिलीप प्रभावळकर आणि अलका कुबल हे कलाकार या नाटकात होते. या नाटकाला नाट्यदर्पणचा पुरस्कार मिळाला. व्यावसायिक नाट्यस्पर्धेचे पारितोषिक मिळालेले ‘डबल गेम’ हे नाटक या संस्थेचे. त्यानंतर विजय तेंडुलकरांचे ‘एक हट्टी मुलगी’ आणि शेखर ताम्हाणे यांचे ‘तो एक क्षण’ ही नाटके रंगभूमीवर आणली. शेवटचे नाटक तेही सहनिर्माता म्हणून केले ते ‘पुल, फुलराणी आणि मी.’ यात भक्ती बर्वे होत्या.


80च्या दशकात व्यावसायिक नाटकांची परिस्थिती काहीशी डगमगती असताना ठाण्याच्या एका अमराठी निर्मात्याने सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरची आशयसंपन्न नाटके धाडसाने रंगभूमीवर आणली. तो निर्माता म्हणजे ‘अजय शर्मा’. ठाण्याच्या पेट्रोल पंपाजवळ शर्मांची डेअरी होती. पण ती निव्वळ दुधाचे विक्रीकेंद्र नव्हती. महाविद्यालयीन तरुणांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत, ठाणेकरांसाठी जणू ते सांस्कृतिक केंद्र होते. त्या डेअरीवरच्या गप्पांतूनच शर्मांना नाट्यनिर्मितीची प्रेरणा मिळाली. दीनानाथ रेडकर लिखित ‘सौदा’ या नाटकाची त्यांनी निर्मिती केली. हा एक इमोशनल फॅमिली ड्रामा होता. पण या नाटकाच्या अनुभवावरून शहाणे होऊन शर्मांनी भविष्यात आपल्या ‘अमर’ नाट्यसंस्थेद्वारे नाट्यनिर्मिती करताना नेहमी सशक्त कथानकाला प्राधान्य दिले.

‘जन्मगाठ’ (1989), ‘डॉ. हुद्दार’ (1990), ‘घर जपायला हवं’ (1991), ‘रण दोघांचे’ अशा दर्जेदार नाटकांची निर्मिती शर्मा यांनी ‘अमर’ नाट्यसंस्थेद्वारे केली. यातील ‘जन्मगाठ’ नाटकातून सुकन्या कुलकर्णीने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. ठाण्याच्या प्रा. विजय जोशींनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात विनय आपटे, लालन सारंग यांच्याबरोबर ठाण्यातले उदय सबनीस, शशी जोशी, माधुरी भागवत हे कलाकार होते. पुढे याच नाटकावर ‘काकस्पर्श’ हा चित्रपट बनला. ‘डॉ. हुद्दार’मध्ये डॉ. श्रीराम लागू, मंगेश कुलकर्णी असे कलाकार होते, तर ‘रण दोघांचे’ मध्ये निळू फुले आणि अविनाश नारकर यांची जुगलबंदी प्रेक्षकांना खिळवून ठेवायची. नाट्यनिर्मितीबरोबर ‘आम्ही शाळेत जाणार नाही’ या बालनाट्याची चित्रफीत, 1971 मधील भारतीय सैन्याच्या विजयावरील माहितीपट यांची निर्मिती करणारे अजय शर्मा आता बंगलोरला स्थायिक झाल्याने ठाण्याच्या नाट्यवर्तुळापासून लांब गेले आहेत.


ठाण्यात नाट्यनिर्माता म्हणून रमाकांत राक्षे आणि अनंत लोणे यांचा आदर्श दत्ता घोसाळकरांच्या नजरेसमोर होता. आपणही त्यांच्यासारखा नाट्यनिर्माता व्हायचे, हा विचार त्यांच्यामुळेच मनात बळावला. तसा नाट्यचळवळीशी संबंध होताच. राज्य नाट्यस्पर्धेत बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम पाहिले होते. परंतु यात विनायक दिवेकर यांचे मार्गदर्शन अधिक मोलाचे ठरले. ते स्वत उत्तम दिग्दर्शक. राज्य नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने नाट्यक्षेत्रात पदार्पण केले.

‘श्रीदत्तविजय’ हे संस्थेचे नामकरण झाले. दत्तावरील श्रद्धा आहे हे त्यामागचे कारण. त्यांच्यावर श्रद्धा ठेवूनच 1991 साली पहिले नाटक केले. ‘आईचं घर उन्हाचं’ हे गजेंद्र अहिरे लिखित नाटक रंगभूमीवर आले. अहिरे यांचे ते पहिलेच नाटक. तसे दिग्दर्शक, नेपथ्य, कलावंत म्हणूनदेखील सगळ्यांचे हे पहिलेच नाटक. यातला महत्त्वाचा भाग म्हणजे बहुतेक जण हे ठाण्यातले होते. या नाटकाने आत्मविश्वास दिला. त्यामुळे उभारी मिळाली. ‘घर श्रीमंतांचे’, ‘काशीचक्र’, ‘ती आई होती म्हणून’, ‘होय, पुन्हा कदाचित’, ‘यदा कदाचित’, ‘कधी घरी कधी शेजारी’, ‘देहभान’, ‘लाली लीला’, ‘वंदे मातरम्’, ‘तुझ्याविना’, ‘तनमन’, ‘एक फूल बाकी डाउटफूल’, ‘आम्ही निमित्तमात्र’, ‘किमयागार’, अशी एकापेक्षा एक सरस नाटकांची निर्मिती आणि ‘मला तुमची म्हणा’ हा लावणीचा प्रयोग दत्ता घोसाळकरांनी निर्मित केला. ‘भीम बाणा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग केला. त्यात 100 कलावंतांचा संच होता.

नाट्यक्षेत्रात मानाची समजली जाणारी पारितोषिके म्हणजे, पं. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, कलादर्पण, नाट्यदर्पण, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक स्पर्धा अशी अनेक पारितोषिके श्रीदत्तविजयच्या शिरपेचात गुंफली गेली आहेत.

श्रीदत्तविजयने नेहमीच आपल्या नाटकांतून नवोदित कलावंतांना प्राधान्य दिले. नाटक, सिनेमा, टीव्ही अशा विविध स्तरांवर वावरणारे आजचे अनेक नामवंत कलाकार हे श्रीदत्तविजयचे कलाकार आहेत. त्यांची संख्या सुमारे 150च्या आसपास येईल. संस्थेने केवळ नफा मिळवला असे नाही तर सामाजिक भान जोपासले आहे. मुख्यमंत्री निधी, मनोरुग्णालय, सैनिक यांच्या साहाय्यता निधीला भरघोस मदत करण्याचा उदारपणाही दाखवला.

कुमार सोहोनी, विजय जोशी, अभिजीत पानसे, मिलिंद पेडणेकर, देवेंद्र पेम, मंगेश कदम, संतोष पवार, प्रशांत विचारे, विजय पाटकर यांसारख्या नामवंत दिग्दर्शकांसोबत संस्थेने नाट्यनिर्मिती केली. आजमितीस संस्थेच्या नावावर केलेल्या नाटकांच्या प्रयोगांची संख्या आहे 6000. ठाण्यातील रमाकांत राक्षे यांनी पहिली व्यावसायिक नाटकासाठी बस घेतली होती. त्यानंतर अशी बस घेणारे ठाण्यातील दत्ता घोसाळकर हे दुसरे नाट्यनिर्माता आहेत.


सुरेश भोसले यांचा नाटक या विषयाशी संबंध आला तो गडकरी रंगायतनशी संबंध आल्यानंतर. ‘बुकिंग’ हा नाट्य व्यवसायातला महत्त्वाचा शब्द. तिथून सुरुवात झाली. ते साल होते 1987. गडकरी रंगायतनच्या बुकिंग ऑफिसात बसणे सुरू झाले, पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून. परंतु ही जागा नाट्यक्षेत्रातील सगळ्या चढ-उताराची, हर्ष-खेदाची नस दाखवणारी जागा. त्यामुळे साहजिकच अनेकांशी संबंध प्रस्थापित होऊ लागला. शिवाय दत्ता घोसाळकर हे नातेवाईक. नाट्यनिर्माता म्हणून त्यांचा या क्षेत्रात चांगला जम बसलेला. त्यामुळे आपणही असे काही या क्षेत्रात करावे, असा विचार मनाशी रुजू लागला. त्याचदरम्यान संतोष पवार यांची भेट झाली. ‘यदा कदाचित’ या नाटकाची संहिता त्यांनी आणली होती. हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणावे ही त्यांची इच्छा होती. संहिता चांगली होती, शिवाय खर्चाच्या दृष्टीने पेलवणारी होती. त्यामुळे दत्ता घोसाळकर यांच्याशी चर्चा करून हे नाटक 1998ला रंगभूमीवर आणले. परंतु पहिल्या दहा प्रयोगांतच त्याच्या विरोधात निदर्शने होऊ लागली. त्यामुळे अडचणीत सापडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. नाटकात हिंदू देव-देवतांची विटंबना होत आहे, असा तो आक्षेप होता. परंतु जाणकार मंडळी पुढे आली. स्व. आनंद दिघेसाहेब पाठीशी उभे राहिले. त्यानंतर ते नाटक सुसाट वेगाने निघाले. नाहीतर गावी जाऊन शेती करायची असा विचार पक्का झाला होता. या नाटकाच्या निमित्ताने या क्षेत्रात घोसाळकरांबरोबर सुरेश भोसले हे स्थिरावले. ‘यदा कदाचित’ हे नाटक यशस्वी झाले. म्हणून त्याचा ‘भाग दोन’ही काढला.

एक दिवस मच्छिंद्र कांबळी यांनी सल्ला दिला, ‘स्वतची नवीन संस्था काढ. नाट्य परिषदेचा सभासद करून घेतो.’ त्यावेळी कांबळी हे नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांचा सल्ला शिरोधारी ठेवला. ‘श्रीगणेश’ ही स्वतची संस्था 2002 साली स्थापन केली. तसे करण्यात आणखी एक स्वार्थ होता. त्याकाळी थिएटरच्या तारखा मिळणे फार अवघड असायचे. दोन संस्था असतील तर तेवढ्याच तारखा अधिक मिळतील, हे गणित मनाशी होते. ‘श्रीगणेश’ या संस्थेमार्फत मग ‘आमची ज्येष्ठ कन्या’, ‘बापाचा माल’, ‘नाय नो नेव्हर’ अशी नाटके रंगमंचावर आली.

‘नाटक निवडताना त्याची संहिता प्रेक्षकांना भावणारी आहे ना, त्यांची आवड काय, याचा विचार करावा लागतोच. तसेच कलावंत हा महत्त्वाचा घटक आहे. नाटक आणि कलावंत ताकदीचे असतील तर कुठलाही मीडिया त्यावर आक्रमण करू शकत नाही, हे जरी खरे असले तरी, शेवटी नशीब नावाची गोष्ट असते. नाटक आणि निर्माता यांचे गुण जुळावे लागतात. ते जुळले तर सोने नाहीतर माती…’ असे विचार सुरेश भोसले व्यक्त करतात. आता त्यांचे नवीन नाटक येत आहे, ते म्हणजे ‘नवरा माझा – दुसऱ्याचा.’


नाटकाच्या वितरणाचे काम करता करता निर्मितीच्या क्षेत्रात डोकावून पाहणारा नाट्यप्रेमी म्हणजे ठाण्याचा जयवंत साटम. 1990 मध्ये आपल्या ‘विरंगुळा’ संस्थेद्वारे जयवंत साटम यांनी जयवंत दळवींचे ‘सभ्य गृहस्थ हो’ हे नाटक रंगमंचावर आणले. भगवान बाविस्कर, शशी जोशी, रागिणी सामंत, लतिका शिंदे या संचात या नाटकाचे व्यावसायिक रंगभूमीवर दीडशेहून अधिक प्रयोग झाले.


दीपक नलावडे यांचा जन्म 30 ऑगस्ट 1957चा. त्यांचे मूळ गाव सोलापूर जिह्यातील बार्शी. पण नंतर ते ठाण्यात आले. त्यालाही आता सुमारे 40 वर्षे झालीत.

सुरुवातीला काही काळ सिनेमा प्रतिनिधी म्हणून दीपक नलावडे यांनी महेश कोठारे, डॉ. जब्बार पटेल यांच्यासोबत काम केले. सिनेमा ज्या गावी, ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असेल तिथे दररोजच्या उत्पन्नाची देखरेख करून ती माहिती निर्मात्याला कळविणे असे या कामाचे स्वरूप होते. सिनेमाच्या थिएटरमधील मुक्कामाइतकाच मुक्काम या प्रतिनिधीने करावा, ही यातली महत्त्वाची अट. ते काम काही काळ दीपक नलावडे यांनी केले. पुढे ते शासकीय नोकरीत स्थिरावले.

ठाण्यात नाट्यनिर्माता शांताराम शिंदे यांच्याशी त्यांचा परिचय झाला. तो पुढे घनिष्ठ झाला. त्यावेळी त्यांच्या ‘रज्जू’ या नाटकाची जुळवाजुळव आणि नंतर प्रयोग सुरू झाले. या सगळ्या प्रवासाचे अनुभव नलावडे यांच्यासाठी मार्गदर्शक ठरले. तसे प्रेरकही. शांताराम शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय झाला. नंतर 2001 साली ‘दिशा थिएटर्स’ या नाट्यसंस्थेची त्यांनी स्थापना केली. मोहन जोशी, सुधीर जोशी, आनंद अभ्यंकर, चेतन दळवी यांसारख्या नामांकित कलावंतांना घेऊन पहिले नाटक रंगभूमीवर आणले. त्याचे नाव ‘सासू पाहून लग्न’असे होते. महाराष्ट्रभर या नाटकाला चांगला प्रतिसाद लाभला.

‘दिशा थिएटर्स’ हेच नाव का, असे विचारले तर त्याचे उत्तर मिळते, ‘जगण्याला एक नवी दिशा मिळाली, त्या दिशेने प्रवास सुरू आहे, म्हणून दिशा हे नाव!’

‘प्रिय पपा’ या प्रा. प्रवीण दवणे लिखित नाटकाची निर्मिती ही संस्थेची दुसरी नाट्यनिर्मिती. सुधीर जोशी, आनंद अभ्यंकर हे कलावंत त्यात होते. त्यानंतर ‘आयला मज्जाय’ हे संतोष पवार यांचे नाटक, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ हे विजू माने दिग्दर्शित नाटक त्यांनी रंगभूमीवर आणले. आता ‘टॉस’ हे नवे कोरे नाटक काहीसे वेगळे, प्रेक्षकांवर सोपवलेले, दोन शेवट असलेले नाटक!

पहिल्या नाटकाच्यावेळी शांताराम शिंदे यांच्या संस्थेमुळे कुठली अडचण भासली नाही. सगळी मदत मिळाली. संदीप विचारे सोबतीला व मदतीसाठी होते. त्यामुळे त्यावेळी फार काही पाहावे लागले नाही. परंतु पुढे नाटकाची संहिता, प्रेक्षकांची आवड हे स्वत एक प्रेक्षकाच्या भूमिकेतून नलावडे यांनी तपासून पाहिले. नाटक हे कुटुंबातील सगळ्यांना एकत्रित बसून पाहता आले पाहिजे, असे कौटुंबिक असावे, यावर नेहमी भर दिला गेला.

काहीतरी चांगले पाहिले हा अनुभव आनंददायी असतो, तो प्रेक्षकांना मिळाला पाहिजे, याचे भान त्यांनी ठेवले. नाटक ही कला आहे. निर्माता, कलाकार सर्वस्व ओतून ती प्रेक्षकांपर्यंत पोचती करण्याची धडपड करतात. तेव्हा तिला प्रेक्षकांनी साथ द्यावी अशी ते अपेक्षा व्यक्त करतात. ‘नाटक हे एक कुटुंब असते, निर्मितीपासून ते सादरीकरणापर्यंत आम्ही सगळेजण असतो ते एका कुटुंबातले. त्यामुळे पैशापेक्षा कला-पोच केल्याचा आनंद मिळतो. नाटकासाठी अलीकडे कलाकारांच्या तारखा मिळणे अवघड झाले आहे हे खरे. परंतु नाटकाच्या प्रयोगासाठी टीव्ही आणि सिनेमावाले सहकार्य करतात, ही बाब समाधानाची आहे,’ असे ते सांगतात. आपण या क्षेत्रात राहणे का पसंत करतो, या प्रश्नावर त्यांचे उत्तर आहे, ‘आनंद देणारे, परिचय वाढवणारे, संबंध निर्माण करणारे हे एकमेव क्षेत्र आहे.’ मात्र शासनाने उदार होताना 100 प्रयोगांची अट रद्द करावी व 10 प्रयोगांची अट ठेवावी, असे ते आग्रहाने नमूद करतात. नलावडे यांनी 2009 साली ‘रात्र’ या सिनेमाचीदेखील निर्मिती केली होती.


आपल्या ‘कलाभारती’ या संस्थेतर्फे नाविन्यपूर्ण नाटकांची आणि कार्यक्रमांची निर्मिती करणारे ठाणेकर निर्माते म्हणजे सुरेंद्र दातार. व. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’ या लोकप्रिय कादंबरीला रंगमंचावर आणण्याचे स्वप्न दातारांनी पूर्ण केले. दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित या ‘नाट्य कादंबरी’त प्रमोद पवार, क्षमा राज, प्रकाश खानविलकर, स्वत व. पु. काळे यांच्याबरोबर ठाण्यातले शशी जोशी, माधुरी भागवत, ज्योत्स्ना कारखानीस हे कलाकारही होते.


2002पासून नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रात धडपडणारा ठाणेकर म्हणजे संदीप विचारे. आपल्या उर्विजा थिएटर्स या संस्थेच्या माध्यमातून संदीपने ‘जाणून बुजून’, ‘पती सगळे उचापती’, ‘तीन जीव सदाशिव’, ‘लगे रहो राजाभाई’, ‘बायांनो नवरे सांभाळा’, ‘तुम्हीच माझे बाजीराव’ या नाटकांची निर्मिती केली आहे.

ठाण्याच्या नाट्यसंमेलनाची घोषणा झाली आणि दुर्दैवाने त्याच सुमारास नाट्यनिर्माते अशोक पोहेकर यांनी जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली. ‘यदा यदाही अधर्मस्य’, ‘स्माईल प्लीज’, ‘सेम टू सेम’ अशा मोजक्या पण दर्जेदार नाटकांची निर्मिती त्यांनी केली होती. ठाणेकर निर्मात्यांच्या यादीत अपरिहार्यपणे येणारे नाव म्हणजे निर्मल नाट्यसंस्थेचे शांताराम शिंदे. कायम सामाजिक बांधिलकी जोपासत शिंदे यांनी नाट्यनिर्मिती केली.


व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या दर्जेदार नाट्यनिर्मितीने चर्चेत असलेले आणि तीनच वर्षांपूर्वी ठाण्यात आलेले नाट्यनिर्माते म्हणजे दिनू पेडणेकर. 2001 साली ‘अनामिका साईसाक्षी’ या आपल्या नाट्यसंस्थेतर्फे प्रदीप दळवी लिखित ‘23 जून’ हे याच नावाच्या कादंबरीवरील नाटक रंगमंचावर आणून पेडणेकरांनी आपला नाट्यप्रवास सुरू केला. नंतर 2004 साली ‘कळा ज्या लागल्या जीवा’ हे सुबोध भावे, शृजा प्रभुदेसाईचं नाटक पेडणेकरांनी रंगभूमीवर आणलं. बेस्टच्या बसेसवर जाहिरात करणारं पहिलं मराठी नाटक म्हणूनही ‘कला’ ओळखलं जातं. यानंतर पेडणेकरांनी आपल्या ‘अनामिका साईसाक्षी’तर्फे प्रायोगिक रंगभूमीवर गाजलेल्या ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘फायनल ड्राफ्ट’ आणि ‘खेळ मांडियेला’ या नाटकांची निर्मिती केली. त्यानंतर 2009 साली ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’, 2011 साली ‘लव्ह बर्ड्स’, ‘बॅरिस्टर’ (सहयोग अमृता प्रॉडक्शन्स), 2014 साली ‘छापा काटा’, ‘लव्ह बर्ड्स’ (दोन्हीसाठी सहयोग ‘रसिका’ संस्था) अशी पेडणेकरांची नाट्यदौड सुरू आहे. म. टा. सन्मान, झी गौरव, संस्कृती कलादर्पण, अ. भा. मराठी नाट्य परिषद, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धेत पेडणेकरांच्या अनेक नाटकांनी पारितोषिके मिळवली आहेत.

— चांगदेव काळे.

9869207403

साभार: ठाणे रंगयात्रा २०१६.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..