नवीन लेखन...

ठाण्याच्या अभिनेत्री

सर्वसाधारणपणे कोणत्याही शहरातील, गावातील हौशी नाट्यसंस्थांना नेहमी सतावणारा प्रश्न म्हणजे नाटकात भूमिका करायला महिला कलाकार कुठून आणायचे? त्यामुळे अनेकदा हौशी स्तरावर नाटकाची निवड करताना एकच स्त्री पात्र असलेल्या नाटकाला प्राधान्य दिले जाते. पण ज्या शहराच्या कणाकणात नाट्य भिनलेलं आहे, त्या ठाण्याच्या हौशी नाट्यमंडळींना या प्रश्नाने फारसे सतावलेले दिसत नाही. त्यामुळेच ठाण्याच्या नाट्यवर्तुळात घडलेल्या आणि स्पर्धांमध्ये, व्यावसायिक रंगमंचावर आपली छाप पाडणाऱ्या महिला रंगकर्मींचीदेखील एक परंपरा इथे पाहायला मिळते. या परंपरेचा आढावा घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

व्यावसायिक रंगमंचावर आपल्या नैसर्गिक अभिनयाने विविधरंगी भूमिकांचे इंद्रधनुष्य खुलवणारी ठाणेकर अभिनेत्री म्हणजे सुहास जोशी. पुण्यात जन्मलेल्या आणि फर्ग्युसनमध्ये शिकलेल्या सुहासताई सुभाष जोशींबरोबर प्रेमविवाह करून ठाण्यात आल्या त्या 1972 मध्ये. त्याआधी दिल्लीच्या एन.एस.डी. मध्ये त्यांनी अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करताना राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे प्रमुख अल्काझी, जर्मन दिग्दर्शक फिट्झ बेनेविट्झ अशा दिग्गजांच्या हाताखाली अभिनयाचे धडे गिरवले. त्याही आधी पुण्यात 1963 साली त्यांनी ‘गांधर्व महाविद्यालय’ची ‘संगीत विशारद’ ही पदवी मिळवली होती. नंतर महाविद्यालयात नाटकात काम करणाऱ्या सुहासताईंची व्यावसायिक अभिनेत्री म्हणून खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली ती 1972 साली भालचंद्र पेंढारकरांच्या ललित कलादर्शमधून ‘रक्त नको मज प्रेम हवे’ या नाटकातून. त्यानंतर मग ‘ही श्रींची इच्छा’, ‘आनंदी गोपाळ’, ‘बॅरिस्टर’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘पंखांना ओढ पावलांची’, ‘वर्षाव’, ‘कन्यादान’, ‘सख्खे शेजारी’, ‘अग्निपंख’, ‘आत्मकथा’, ‘घरोघरी’, ‘सावधान शुभमंगल’ अशी सुहासताईंची रंगयात्रा अद्याप सुरू आहे. व्यावसायिक रंगमंचावर होणाऱ्या वेगवेगळ्या ‘प्रयोगां’मध्ये आवर्जून सहभागी होणाऱ्या सुहासताईंनी आपल्या येऊरच्या घराच्या अंगणात खुल्या रंगमंचाचा एक आगळा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. निसर्गरम्य येऊरला घराच्या आवारात त्यांनी एक स्टेजसारखा चौथरा उभा केला होता आणि या खुल्या मुक्त रंगमंचावर संगीतापासून ते नाट्याविष्कारापर्यंत अनेक कलाविष्कार सादर केले गेले. या उपक्रमातील पहिले नाटक आविष्कारचे होते. ठाण्यात राहतात ‘मग मुंबईत तालमींना आणि प्रयोगाला कसे येता येईल?’ म्हणून काही वेळा सुहासताईंना भूमिका गमवाव्या लागल्या, पण त्यांचे ठाण्यावरील प्रेम कमी झाले नाही. ठाणेकरांनाही ‘आपल्या’ सुहास जोशींचा तितकाच अभिमान वाटतो.

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच रंगमंचावर पदार्पण केलेल्या आणि आज वयाच्या सत्तरीतही अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या ठाण्यातील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे गीता सोमण. नाट्यकलोपासक मंडळींच्या ‘संगीत शारदा’मधून शारदेची मैत्रीण म्हणून गीताताईंनी चेहऱ्याला जो रंग लावला, तो आजतागायत उतरलेला नाही. व्यावसायिक रंगमंचावर ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘एकच प्याला’, ‘बेबंदशाही’, ‘मत्स्यगंधा’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘दुर्वांची जुडी’ अशा नाटकांमधून गीताताईंनी भूमिका केल्या आहेत. यानिमित्ताने त्यांना नयना आपटे, ललिता केंकरे, रजनी जोशी, जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार, कान्होपात्रा, मधुवंती दांडेकर, पं. राम मराठे, छोटा गंधर्व, सूर्यकांत, राजा गोसावी, रामदास कामत, दाजी भाटवडेकर, नारायण बोडस, शरद तळवलकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आवडीच्याच क्षेत्रात काम करायचं म्हणून त्यांनी 31 वर्षे शाळेत संगीताची शिक्षिका म्हणून नोकरी केली आहे. 1995 मध्ये त्यांना उत्कृष्ट शिक्षिकेचा ‘महापौर पुरस्कार’ मिळाला आहे. नाट्य परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष राजाराम शिंदे यांच्या प्रोत्साहनामुळे त्या नाट्यपरिषदेचे काम करू लागल्या. नाटकावरची निष्ठा आणि सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे यशस्वी करण्याची तळमळ यामुळे त्यांनी नाट्य परिषदेमध्ये सहकार्यवाह, कोषाध्यक्ष ही पदे भूषवली आहेत. ठाणे महानगरपालिकेकडून ‘ठाणे गौरव’ सन्मानाने गौरवलेल्या गीताताईंना नाट्य परिषदेचा मंगला पर्वते पुरस्कृत, पुण्याच्या बालगंधर्व समितीतर्फे संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकारांना देण्यात येणारा पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या स्पर्धेत आपल्या समर्थ अभिनयाने नऊवेळा पारितोषिक मिळवणारी ठाण्यातील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे प्रतिभा कुलकर्णी. परिवहन मंडळाची नाट्यस्पर्धा, राज्य नाट्यस्पर्धा, आळतेकर स्पर्धा, कामगार कल्याण मंडळाची नाट्यस्पर्धा यांमधून प्रतिभाताईंनी ‘घेतलं शिंगावर’, ‘रत्नदीप’, ‘जो तो पथ चुकलेला’, ‘गहिरे रंग’, ‘अधांतर’, ‘वर्तुळाचे दुसरे टोक’, ‘अपूर्णांक’, ‘श्रीशिल्लक’, ‘तो राजहंस एक’, ‘राजा आणिक राणी’, ‘बास्टर्ड्स’, ‘जेव्हा देवाचा खून होतो’, ‘सौदामिनी’, ‘ललित नभी मेघ चार’ या नाटकांमधून आपले अभिनय कौशल्य सादर केले.

मित्रसहयोगच्या नाट्यवर्तुळात आपली रंगकारकीर्द सुरू करणाऱ्या प्रतिभाताईंनी व्यावसायिक रंगमंचावर नाट्यसंपदाच्या ‘तो मी नव्हेच’, ‘तुला हवंय् तरी काय?’, ‘या चांगल्या घरात असं झालंच कसं?’, कलावैभवच्या ‘महासागर’, ‘सावित्री’, सुयोगच्या ‘लेकुरे उदंड झाली’, ‘सारंगा तेरी यादमें’, आरती थिएटर्सच्या ‘संतोषी माता’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. तसेच ‘चार दिवस सासूचे’, ‘गावकुसाबाहेरचे गाव’, ‘क्राइम डायरी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

ठाण्याच्या हौशी नाट्यसंस्थांमधून रंगभूमीवर पदार्पण करून व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरावलेलं नाव म्हणजे वैजयंती चिटणीस. 70च्या दशकात सलग दोन वर्षे मुंबई परिसरातील बहुतेक नाट्यस्पर्धांमध्ये वैयक्तिक अभिनयासाठी पारितोषिक पटकावण्याचा विक्रम वैजयंतीताईंच्या नावावर जमा आहे. ठाण्यातील आदर्श मित्रमंडळाने राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या केशवराव मेरे दिग्दर्शित ‘आंटी’ या नाटकातील प्रमुख भूमिकेसाठी त्यांना अभिनयाचे रौप्यपदक मिळाले होते. पुढे हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर ‘आशू’ या अभिनेत्रीला घेऊन सादर करण्यात आले. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरील ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘आता कसं वाटतंय’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘घर तिघांचं हवं’, ‘नटसम्राट’ या यशस्वी नाटकांमध्ये वैजयंतीताईंनी अभिनयाचे रंग भरले. राजा गोसावी, मोहन जोशी, संजय नार्वेकर, अतुल परचुरे, रिमा, डॉ. काशिनाथ घाणेकर, अरविंद देशपांडे, भक्ती बर्वे या नामवंत कलाकारांसोबत रंगभूमीवर, तर रमेश भाटकर, प्रिया तेंडुलकर, निळू फुले, अशोक सराफ, वर्षा उसगावकर, निशिगंधा वाड, निवेदिता जोशी यांच्यासोबत रूपेरी पडद्यावर त्यांनी आपले अभिनय कौशल्य प्रकट केले आहे. ‘अवंतिका’, ‘या सुखांनो या’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ या मालिकांमधून वैजयंतीताई घराघरांत पोहोचल्या.

गिरगाव-दादरमध्ये बालपण गेलेल्या मीना गुर्जर लग्नानंतर ठाण्यात आल्या. तेव्हा म्हणजे 1968 साली त्यांना ठाण्याचं वातावरण फारच शांत निवांत वाटलं. लग्नापूर्वी कामगार कल्याण केंद्रापासून ते आकाशवाणीपर्यंत विविध आघाड्यांवर अभिनयापासून ते लेखनापर्यंत सगळ्या कामगिरी बजावणाऱ्या मीनाताईंना ठाण्यातलं कलावर्तुळ खुलं झालं ते ‘मनसुबा’तल्या लीलाताई जोशींच्या ‘सखी शेजारणी’ मंडळामुळे. या मंडळामार्फत ठाण्यातील सगळ्या महिला मंडळांसाठी कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, उत्स्फूर्त आविष्कार स्पर्धा घेतल्या जात असत. लीलाताई जोशी, पुष्पा जोशी, आशा मंडपे, छाया वाड, सुहास जोशी आणि अन्य काहीजणींचा आयोजनात सहभाग असे. पुढे 1976-77 साली श्याम फडके यांनी ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाचा हॉल, संग्रहालयाच्या सुट्टीच्या दिवशी – सोमवारी ठाण्यातील हौशी कलाकारांसाठी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ‘पूर्णांक’, ‘नाट्याभिमानी’, ‘मित्रसहयोग’, ‘कलासरगम’ अशा अनेक संस्थांना नाटक सादर करण्यासाठी हक्काचा रंगमंच मिळाला. त्यात ठाण्यातील अनेक महिला मंडळेही सामील झाली. यातूनच मीनाताई ‘कलासरगम’, ‘मित्रसहयोग’ या नाट्यसंस्थांशी जोडल्या गेल्या. इंडो सोव्हिएत स्पर्धेसाठी सुभाष सोनवणे लिखित आणि दिलीप पातकर दिग्दर्शित ‘खोल खोल पाणी’ या एकांकिकेसाठी मीनाताई आणि विलास जोशी यांना अभिनयाचं पारितोषिक मिळालं. त्यानंतर स्पर्धेच्या नाटकांसाठी निधी जमवण्यासाठी कलासरगमतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘झोपा आता गुपचूप’ (दिग्दर्शक विजय जोशी), ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकांमधून मीनाताईंनी भूमिका केल्या. त्यानंतर कलासरगमतर्फे राज्य नाट्यस्पर्धेसाठी मोहन राकेश यांच्या हिंदी नाटकाचा मानसी कणेकर यांनी केलेला अनुवाद ‘क्षणतरंग’, अनिल बर्वे लिखित ‘अनंगदेही’, मित्रसहयोगच्या ‘बास्टर्ड्स’ या नाटकातून त्यांनी भूमिका केल्या. ‘बास्टर्ड्स’ हे नाटक ठाणे केंद्रातून अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. तसेच कॅफे आणि नोसिल या कंपन्यांतर्फे मीनाताईंनी राज्य नाट्यस्पर्धेमध्ये ‘अंधारयात्रा’, ‘सहज जिंकी मना’, ‘झोपा आता गुपचूप’ या नाटकांमधून भूमिका केल्या. कलासरगमतर्फे सादर केलेल्या ‘अज्जात मज्जात ऑटोच्या राज्यात’, ‘भ भ भूताची भंबेरी भम’ या बालनाट्यांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. नरेंद्र बेडेकर दिग्दर्शित ‘भ भ भूताची भंबेरी भम’ या नाटकाने रौप्यमहोत्सव साजरा केला. या नाटकात मीनाताईंबरोबर त्यांचा मुलगा युवराजही काम करत असे. या सगळ्या नाट्यप्रवासात मीनाताईंना प्रफुल्ल आठवले, प्रसन्न कारखानीस, विजय आणि प्रतिभा कुलकर्णी, सुभाष जोशी, वासंती वर्तक अशा सहकलाकारांची साथ मिळाली.

लग्नानंतर ठाणेकर झालेली आणखी एक अभिनेत्री म्हणजे कांचन गुप्ते. नाटकाचा वारसा त्यांना आई-वडिलांकडून मिळाला. 1971 साली त्यांनी ‘पद्मश्री धुंडिराज’ या व्यावसायिक नाटकातून कारकीर्द सुरू केली. मात्र त्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना 23 वर्षे रंगभूमीपासून दूर राहावे लागले. 1994 साली चंद्रलेखा निर्मित ‘मी माझ्या मुलांचा’ या नाटकातून त्यांनी पुनरागमन केलं. त्यानंतर ‘मिश्किली’, ‘शुभ बोले तो नारायण’, ‘तुम्हीच चुकलात’, ‘सुपरहिट नं. 1’, ‘जन्मदाता’, ‘कॅरी ऑन काका’, असा त्यांचा नाट्यप्रवास सुरू आहे. ‘मना सज्जना’, ‘वादळवाट’, ‘एक मोहोर अबोल’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘जावई विकत घेणे आहे’ या मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे.

‘ठाणे गौरव’नृत्यालंकार डॉ. सौ. मंजिरी देव मूळच्या उत्तम अभिनेत्री आहेत. मूळच्या कोल्हापूरच्या मंजिरी देव, श्रीराम देवांशी विवाह (हा विवाह नाटकामुळेच जुळला) झाल्यानंतर ठाण्याला आल्या. त्यांचा नाट्यप्रवास सुरू झाला तो नाट्याभिमानीच्या ‘काका किशाचा’ नाटकातील लिली लवंगे या भूमिकेमुळे. या नाटकाचे दिग्दर्शन, नाटकाचे लेखक श्याम फडके यांनीच केले होते. त्यानंतर नाट्याभिमानीच्या नाटकांमधून राज्य नाट्यस्पर्धेत ‘सुराविण तार सोनियाची’ ‘पत्यात पत्ता’, तर एस. एस. केळकर कंपनीतर्फे ‘बेईमान’ या नाटकातून त्यांनी भूमिका केल्या. ‘बेईमान’मधील भूमिकेसाठी त्यांना अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. तसेच हौशी रंगमंचावर ‘करायला गेलो एक’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘बायको उडाली भुर्रर्र’, ‘खरी माती खोटा कुंभार’ यातून भूमिका केल्यानंतर त्यांनी विद्याधर गोखलेंच्या रंगशारदा निर्मित ‘सुवर्णतुला’, नाट्यसंपदाचे ‘गारंबीचा बापू’, कलावैभवचे ‘कधीतरी कोठेतरी’, ‘कर्ता करविता’, ‘इकडे व्हिलन तिकडे मिलन’, ‘शहाणीला भेटला दीडशहाणा’ (वि. र. गोडेंबरोबर द्विपात्री), सन्मित्रकार स. पां. जोशींचे ‘मायबाप – महात्मा फुले’ या व्यावसायिक नाटकांमधून भूमिका केल्या. 1985 नंतर मात्र आपल्या नृत्यसाधनेत रमून गेल्यामुळे त्या रंगभूमीवर अभावानेच दिसल्या.

ठाण्यातील बॅडमिंटनपटू अनंत भागवत यांच्याशी अनगावच्या नंदा लेलेचा विवाह झाला आणि ठाणेकरांना माधुरी भागवत ही गुणी अभिनेत्री मिळाली. 1972 साली बेलापूर येथे अनंत भागवतांचे वास्तव्य असताना, त्यांच्यासह ‘दिवा जळू दे सारी रात’ या नाटकातून माधुरीने रंगभूमीवर पदार्पण केलं. ठाण्याला आल्यानंतर ‘पूर्णांक’ संस्थेच्या माध्यमातून त्यांची रंगयात्रा सुरू झाली. ठाण्यातील बुजुर्ग रंगकर्मी भालचंद्र रणदिवे यांच्यामुळे माधुरीला मुलुंडच्या एस. एच. केळकर कंपनीच्या नाटकांमध्ये भूमिका करण्याची संधी मिळाली आणि पुढची सात वर्षे कामगार कल्याण आणि राज्य नाट्यस्पर्धेमध्ये त्यांनी विविध भूमिका बजावल्या. त्यांचे अभिनयगुण पाहून व्यावसायिकवर काम करण्याची संधी त्यांच्याकडे चालत आली. ठाण्यातील सुशील थिएटर्स निर्मित आणि ठाण्यातील ज्येष्ठ दिग्दर्शक केशवराव मोरे दिग्दर्शित ‘झाला महार पंढरीनाथ’ या नाटकात 1981 साली आयत्यावेळी काम करण्याबाबत विचारणा झाली आणि फक्त एक दिवसाच्या तयारीवर त्यांनी ही भूमिका सफाईदारपणे वठवली. त्यानंतर कलावैभवच्या ‘पतिव्रता’, ‘महासागर’, ‘पर्याय’ या नाटकांमध्ये बदली भूमिका करण्याची संधी त्यांना मिळाली. 1984 साली कलावैभवच्या ‘मुक्त’ या नाटकात त्यांना नवी कोरी भूमिका मिळाली आणि व्यावसायिक रंगभूमीवरचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. गंगाराम गवाणकर लिखित ‘वाटेला सोबत हवी’ आणि ‘एक दिवस सुनेचा’, वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’, पु. ल. देशपांडे लिखित ‘ती फुलराणी’, स. पां. जोशी लिखित ‘सिंहगर्जना’, व. पु. काळे लिखित ‘पार्टनर’, माधव चिरमुले लिखित ‘जन्मगाठ’, गजेंद्र अहिरे लिखित ‘आईचं घर उन्हाचं’, नीलकांती पाटेकर लिखित ‘मंत्रमुग्ध’, वसंत कानेटकर लिखित ‘तू तर चाफेकळी’, पु. ल. देशपांडे लिखित ‘असा मी असामी’, रामविजय परब लिखित ‘आदरणीय बाबा’, प्रल्हाद जाधव लिखित ‘तुमची मुलगी मजेत आहे’, आनंद म्हसवेकर लिखित ‘ग्रॅण्डफादर’ असा 2006पर्यंत माधुरी भागवतांचा रंगप्रवास सुरू होता. या प्रवासातच ‘पार्टनर’, ‘ऊन पाऊस’, ‘कथा गंगेच्या धारा’, ‘बंदिनी’, ‘जीवनसंध्या’, ‘दिवसेंदिवस’, ‘वादळवाट’, ‘मानिनी’ इ. मालिका ‘बनगरवाडी’, ‘कमाल माझ्या बायकोची’, ‘लेकरू’, ‘बेभान’, ‘सखी माझी’, ‘रिस्क’ (हिंदी) असे चित्रपट त्यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘एकच प्याला’, ‘बेबंदशाही’, ‘लग्नाची बेडी’, ‘सौभद्र’, ‘संगीत महिला मंडळ’ (या पुरुषपात्र विरहित नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले) या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. राज्य नाट्यस्पर्धेतील अभिनयाच्या रौप्यपदकाने गौरवलेल्या माधुरी भागवत आजही अभिमानानं सांगतात की, ‘माझ्यातल्या कलावतीला ठाण्यानं घडवलं.’

शालेय जीवनापासून नाटकांमध्ये हौसेनं भाग घेणारी आणि राज्य नाट्यस्पर्धेत आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणारी ठाणेकर अभिनेत्री म्हणजे अंजली आमडेकर. पूर्वाश्रमीची अंजली फडके. आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन जीवनात अनेक अभिनय स्पर्धांमध्ये भाग घेऊन, पारितोषिके मिळवणाऱ्या अंजलीने राज्य नाट्यस्पर्धेत सर्वात प्रथम भाग घेतला तो 1992-93 मध्ये नाट्यछंदीच्या ‘थिएटर’ या नाटकातून आणि आपल्या पहिल्याच नाटकात उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळवून अंजलीने आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर ‘दर्शन दिग्दर्शन’, ‘अंतहीन रात्र’, ‘सावल्या हरवलेल्या बाहुल्या’, ‘असा हा खेळ’ या नाटकांमधून कधी प्राथमिक फेरीत तर कधी अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळवून अंजलीने रौप्यपदकांची लयलूट केली. त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर ‘पुण्यप्रभाव’, ‘कान्होपात्रा’, ‘अनादि मी अनंत मी’, ‘आई परत येतेय’, ‘सुनमूख’, ‘ज्ञानोबा माझा’ अशा विविध नाटकांमधून अंजलीने भूमिका केल्या. गेली 20 वर्षे आकाशवाणीच्या वृत्तविभागात वृत्तनिवेदनाचे काम करणारी अंजली आजही संधी मिळेल तेव्हा रंगभूमीवर आवर्जून हजेरी लावते.

लहानपणापासून हौशी नाटकांमध्ये अभिनय करणारी आणि नाट्यवेड भिनल्यावर लेखिका-दिग्दर्शिका म्हणून पारितोषिके मिळवणारी बहुपैलू रंगकर्मी म्हणजे सौ. हर्षदा संजय बोरकर (पूर्वाश्रमीची वैशाली नारायण आंबीकर) हर्षदाने रंगभूमीवर जाणत्या वयात पाऊल टाकलं ते नाट्यछंदी संस्थेच्या शशी जुवेकर दिग्दर्शित ‘ही का ती? ती का ही?’ या नाटकातून. त्यानंतर मित्रसहयोगच्या रंगपरिवाराशी तिचे नाते जुळले आणि राज्य नाट्यस्पर्धेत ‘परिसस्पर्श’ या नाटकात दिग्दर्शक अॅड. संजय बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षदाने समंजसपणे भूमिका सादर केली. ‘मन वढाळ वढाळ’ या एकांकिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळालेला आहे. 1991 साली तिने विनायक दिवेकरांच्या दिग्दर्शनाखाली ‘ओळख’ या एकांकिकेत यतिन ठाकूरबरोबर प्रमुख भूमिका केली होती. सध्या हर्षदा ही रत्नाकर मतकरींच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘वंचितांचा रंगमंच’ या उपक्रमामध्ये पहिल्या दिवसापासून सहभागी होऊन गरीब वस्त्यांमधील मुलांना रंगभूमीची ओळख करून देण्याचे आणि त्यांच्या नाट्यगुणांना वाव देण्याचे महत्त्वाचे काम करत आहे.

ठाण्याच्या नाट्यवर्तुळात व्यावसायिक स्तरावर एकपात्री कार्यक्रम सादर करणाऱ्या पहिल्या महिला कलाकार म्हणजे मेघना साने. 1991 साली अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘एकच प्याला’ या नाटकातून मेघनाताईंची अभिनेत्री म्हणून वाटचाल सुरू झाली. त्यानंतर नाट्यसंपदाच्या ‘तो मी नव्हेच’ मधील सुनंदा दातार या भूमिकेतून व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण केले. सुयोगचे ‘लेकुरे उदंड झाली’, गणरंगचे ‘लव्हबर्डस्’, रंजन कला मंदिरचे ‘क्रॉस रोडस्’ (हे इंग्रजी नाटक असून दिग्दर्शन प्रमोद पवार आणि सहकलाकार स्मिता जयकर, अतुल कुलकर्णी) या नाटकांमधून विविध भूमिका साकार केल्या. 1997 साली आचार्य अत्रे जन्मशताब्दी वर्षात नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेने सादर केलेल्या ‘लग्नाची बेडी’ मध्ये रश्मीची प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. 1991 साली अमेरिकेतील राँचेस्टर महाराष्ट्र मंडळात मेघना साने यांनी पहिल्यांदा एकपात्री कार्यक्रम सादर केला. त्यानंतर ‘कोवळी उन्हे’ या एकपात्री सादरीकरणाचे सातत्याने प्रयोग सुरू झाले. महाराष्ट्रातील विविध गावांबरोबरच गुजरात, गोवा, दिल्ली तसेच अमेरिका, लंडन, इस्रायल येथे हा एकपात्री सादर करण्यात आला आहे. 2014 पासून हा कार्यक्रम गडकरी रंगायतन, दीनानाथ नाट्यगृह, यशवंत नाट्यमंदिर, कालिदास नाट्यगृह येथे सादर होत आहे. त्यामुळे स्वलिखित व्यावसायिक एकपात्री कार्यक्रम नाट्यगृहांमध्ये सादर करणाऱ्या ठाण्यातल्या पहिल्या महिला कलाकार म्हणून मेघना साने यांची नोंद ठाण्याच्या इतिहासात झाली आहे.

आजच्या काळातही संगीत रंगभूमी जतन करण्याचे काम करणाऱ्या विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेऊन संगीत नाटकांमध्ये सुरेल भूमिका करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे गौरी फडके आणि अमृता मंदार दीक्षित. गौरी फडके या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची मध्यमा ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. सौ. विद्या ओक आणि सौ. शुभदा दादरकर यांच्याकडे त्या गायनाचे शिक्षण घेत आहेत. विद्याधर गोखले प्रतिष्ठानच्या ‘संगीत मदनाची मंजिरी’ या नाटकात त्या लीलाधर ऊर्फ लीलावतीची भूमिका करतात. कविवर्य कुसुमाग्रजांच्या ‘वैष्णव’ कादंबरीवरील दूरदर्शन मालिकेसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. ‘हे मन माझे’ या कार्यक्रमात त्या वेशभूषेसह अभिनय सादरीकरण करतात. अमृता दीक्षित यांनी ‘संगीत विशारद’ आणि ‘संगीत अलंकार’ या पदव्या प्राप्त केल्या आहेत. कोल्हापूरचे श्यामराव सुतार, डॉ. वरदा गोडबोले आणि सौ. शुभदा दादरकरांकडे त्यांनी गाण्याची तालीम घेतली आहे. दादर-माटुंगा कल्चरल सेंटरची नाट्यसंगीताची शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. ‘संगीत मदनाची मंजिरी’ या नाटकात त्या सध्या मध्यवर्ती भूमिका करतात. विविध मंचीय कार्यक्रमांमधून त्या गानकौशल्याचे दर्शन घडवतात.

राज्य नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी ठाण्यातील अभिनेत्री म्हणजे कल्याणी जोशी. सं. विद्याहरण, कान्होपात्रा, तो मी नव्हेच या नाटकांमधून कल्याणीने भूमिका केल्या आहेत. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या कल्याणीने भूमिका केल्या आहेत. शास्त्राrय संगीताचे शिक्षण घेतलेल्या कल्याणीने डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार मिळवला आहे.

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांकडून राज्य नाट्यस्पर्धा आणि तिथून व्यावसायिक नाटके असा प्रवास करणारी ठाण्याची अभिनेत्री म्हणजे पौर्णिमा अहिरे-केंडे. ‘सुयोग्य असा मी अशी मी’, ‘यदाकदाचित’, ‘श्यामची मम्मी’, ‘जाऊबाई जोरात’, ‘वन टू का फोर’, ‘नारी झाल्या भारी’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘सुसाट’ इ. व्यावसायिक नाटकांमधून कधी विनोदी व्यक्तिरेखा साकारून तर कधी साहाय्यक भूमिकेत पौर्णिमाने आपली छाप पाडली आहे. विविध मराठी चित्रपट आणि मालिकांमधून चमकणाऱ्या पौर्णिमाने अभिनयासाठी पारितोषिकेही मिळवली आहेत.

महाविद्यालयीन रंगमंचावरून व्यावसायिकवर चमकलेली ठाण्याची अभिनेत्री म्हणजे समीरा गुजर-जोशी. ठाण्याच्या शांताराम शिंदेंनी निर्मलतर्फे पुरुषोत्तम बेर्डेंच्याच मार्गदर्शनाखाली ‘टूरटूर’चे पुनरूज्जीवन केले तेव्हा समीराला त्यातील एकमेव स्त्री व्यक्तिरेखा सादर करण्याची संधी मिळाली. त्यानंतर वसंत कानेटकरांच्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ मध्ये तिने भूमिका केली. ‘आभाळमाया’सारख्या पहिल्या मेगा मराठी मालिकेतून ती घराघरांत पोहोचली. आज ही गुणी अभिनेत्री प्रामुख्याने विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, निवेदन करताना दिसते.

ठाण्याची नाट्यपंढरी असलेल्या मो. ह. विद्यालयात शिकलेली आणि महाविद्यालयीन काळापासून रंगभूमीवर सहजतेने वावरणारी ठाण्याची बहुपैलू अभिनेत्री म्हणजे संपदा जोगळेकर-कुलकर्णी. राज्य नाट्यस्पर्धेतील ‘इमला’ असो किंवा व्यावसायिकवरील ‘ऑल द बेस्ट’ आपल्या नैसर्गिक अभिनयाने व्यक्तिरेखा जिवंत करणे ही संपदाची खासियत. ‘आईचं घर उन्हाचं’, ‘सोबत संगत’, ‘किमयागार’ अशा मोजक्या नाटकांमध्ये संपदाच्या अप्रतिम अभिनयाचे दर्शन घडले आहे.

प्रामुख्याने व्यावसायिक रंगमंचावर अभिनय करणारी ठाणेकर अभिनेत्री म्हणजे ‘संजिवनी समेळ’. ‘पंप मारो पंप’, ‘मी कुमारी अरुणा’, ‘मन उधाण वाऱ्याचे’,‘सन्यस्त ज्वालामुखी’, ‘ज्ञानोबा माझा’, ‘केशव मनोहर लेले’ या मराठी नाटकांप्रमाणेच ‘भले पधारे यमराज’ या गुजराती नाटकातूनही त्यांनी अभिनय केला आहे.

आज दूरदर्शन आणि सिनेमाच्या माध्यमातून घरघरांतील आबालवृद्धांना मनमोकळं हसायला लावणारी मरठी कॉमेडी क्वीन ‘विशाखा सुभेदार’ ही मूळची ठाणातल्या कळव्याची. ठाण्यातल्या शशी जोशी स्मृती अभिनय स्पर्धेत कारुण्यपूर्ण अदाकारी उत्कटपणे सादर करा अभिनयाचे प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या विशाखाची रंगयात्रा सुरू झाली ती ठाण्याच्याच शांताराम शिंदे यांच्या ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ या नाटकातून. ‘एक डाव भटाचा’ मधील तिच्या चौफेर फटकेबाजीने ती प्रेक्षकांच्या नजरेत भरली आणि मराठी रंगभूमीला एक जोरदार हास्य अभिनेत्री गवसली.

झी मराठी जेव्हा अल्फा मराठी होती तेव्हा भरणाऱ्या अल्फा एकांकिका स्पर्धेत ठाणे केंद्रावर चमकदार चेहरा म्हणून निवडलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. ‘फेअरी टेल’, ‘कौन संग बांधे डोर’, ‘बाजीराव मस्तानी’ या एकांकिकांमधून अभिनयाची छाप पाडल्याने प्रियासाठी मालिकांचे दरवाजे उघडले गेले आणि मराठीबरोबर हिंदी मालिकांमध्येही प्रियाने आपल्या अभिनय कौशल्याचे दर्शन घडवले.

ठाण्याच्या हौशी नाट्यवर्तुळात व्यावसायिक रंगमंचावर पोहोचलेल्या अभिनेत्रींच्या यादीत ज्योत्स्ना कारखानीस (पार्टनर) आणि रागिणी सामंत (सही रे सही, सभ्य गृहस्थ हो) यांची नावे घ्यायलाच हवीत. विविध एकांकिका स्पर्धांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध करून व्यावसायिक रंगमंच, दूरदर्शनवर झळकणारी आणखी एक अभिनेत्री म्हणजे पल्लवी वाघ- केळकर.

विनोद आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका सहजतेने करणारी सुप्रिया पाठारेदेखील ठाण्याचीच.

वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पाऊल ठेवणारी ठाण्यातली वेदश्री आगाशे म्हणजे ठाण्याच्या रंगपरंपरेचा पुढचा प्रवाहच म्हणायला हवा. स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी जीवनावर आधारित असलेल्या ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या नाटकातून वेदश्रीचा नाट्यप्रवास सुरू झाला. नंतर 2009 साली कै. मामासाहेब देशपांडे लिखित आणि अशोक समेळ दिग्दर्शित ‘ज्ञानोबा माझा’ या नाटकात वेदश्रीने संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारली. या नाटकाचे शंभर प्रयोग झाले. आषाढी वारीच्या वेळी आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी उठण्याच्या आदल्या दिवशी या नाटकाचा प्रयोग इंद्रायणी काठी करण्याचे भाग्य वेदश्रीला लाभले आहे.

ठाण्यातल्या अभिनेत्रींच्या वर्तुळात आपल्या आगळ्यावेगळ्या कार्याने उठून दिसणारं नाव म्हणजे डॉ. अरुंधती भालेराव. 14 वर्षांपूर्वी विवाहानंतर अरुंधती ठाण्यात आली. नागपूर विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळवणाऱ्या अरुंधतीने औरंगाबाद विद्यापीठातून बॅचलर ऑफ ड्रमॅटिक्स आणि मास्टर्स ऑफ ड्रमॅटिक्स या पदव्या संपादन केल्या आहेत. बालरंगभूमीवर सखोल संशोधन करून, आपला प्रबंध सादर करून तिने डॉक्टरेट मिळवली आहे. ठाण्यात प्रारंभ अकादमी स्थापन करून या अकादमीमार्फत लहान मुलांसाठी नाट्य प्रशिक्षण वर्ग चालवण्याबरोबर महिलांसाठी कथाकथन, निवेदन, अभिनय याचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करून घरात अडकून पडलेल्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम डॉ. अरुंधती भालेराव मनापासून करत आहेत.

आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून ते व्यावसायिक रंगमंचावरील भूमिकांपर्यंत आपल्या प्रत्ययकारी अभिनयाचं लक्षणीय दर्शन घडवणारी ठाण्याची अभिनेत्री म्हणजे स्निग्धा गाडगीळ-सबनीस. सवाई अभिनेत्री म्हणून गौरवलेली स्निग्धा बालरंगभूमीपासून ते दूरचित्रवाणी मालिकांपर्यंत आपला कलाविष्कार सादर करत असते.

नाट्य कलावंत नसूनही या स्मरणिकेत आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो ‘मनाली कुलकर्णी’ या प्रेरणादायी मुलीचा. निसर्गाने लादलेलं अधुरेपण दूर सारून 15 व्या वर्षी राष्ट्रपती पदकाची मानकरी ठरलेली मनाली ठा.म.पा.च्या जिद्द शाळेची विद्यार्थिनी आहे. ‘बेस्ट क्रिएटिव्ह चाइल्ड’ म्हणून डॉ. अब्दुल कलामांच्या हस्ते तिचा गौरव झालेला आहे. अवघ्या 24व्या वर्षी 51 पुरस्कारांनी गौरवलेली मनाली म्हणजे महाराष्ट्रासाठी एक आदर्शच आहे.

ठाण्याच्या अभिनेत्रींची यादी बरीच मोठी आहे. एकांकिका स्पर्धेतून सुरुवात करून व्यावसायिक रंगमंच गाजवणाऱ्या कविता लाडपासून ते पूर्वा गोखलेपर्यंत. एकाच लेखात सगळ्या ठाणेकर अभिनेत्रींचा आढावा घेणे शक्य नाही. त्यामुळे सध्या इथेच विराम द्यावा, हे इष्ट. मात्र ठाणेकर अभिनेत्रींची ही रंगयात्रा अधिकाधिक बहरत, फुलत जाईल यात शंका नाही.

(साभार – ठाणे रंगयात्रा २०१६)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..