MENU
नवीन लेखन...

ठाण्यातील स्त्रियांच्या चळवळी

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला नितल वढावकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.


भारतीय इतिहासाची पानं चाळताना महिलाकर्तृत्वाच्या नोंदी पुढे जाणाऱ्या स्त्री योगदानाच्या परंपरेत ठाणेकर महिलांनी अतिशय महत्त्वाचे स्थान संपादन केले आहे.

१९४२ चा काळ. ‘स्वतंत्र भारत’ हा एकच ध्यास. वैयक्तिक सहभागाने झपाटून उठलेल्या ठाणेकर महिला जागोजागी हरताळ, मोर्चे, सभा, मिरवणुका, प्रभातफेऱ्यांमध्ये भाग घेत. बुलेटिन्स वाटणे, रात्री भिंतींवर बुलेटिन्स चिकटवणे, शाळांवर पिकेटिंग करणे, भूमिगतांना साहाय्य करणे, पोलिसांवर लक्ष ठेवून आंदोलकांना सूचना देण्यासारख्या जोखमीच्या कामात या ठाणेकर महिलांनी स्वतःला झोकून दिले होते.

यशोदाबाई कोतवाल, सुशीलाबाई नाडकर्णी यांच्याबरोबर कित्येक महिलांनी चौकाचौकातून विदेशी मालाची होळी करण्यास सुरुवात केली. घरोघरी फिरून ह्या मुली परदेशी माल गोळा करून होळीत टाकत असत. १५ ऑगस्टला कलेक्टर ऑफिसवर तिरंग फडकवायचाच या निश्चयाने कुमुद गुप्ते, नलिनी प्रधान, सुमन नाडकर्णी व भानु नाडकर्णी ह्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या काही मैत्रिणींनी पोलिसांच्या लाठीमाराला न जुमानत, हातात तिरंगा घेऊन कलेक्टर ऑफिस गाठले. त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.

सिंधुताई ताम्हणे, तारा रणदिवे, प्रेमा नाडकर्णी, सुमन प्रधान, प्रभा नाडकर्णी, प्रमिला पितळे, कुमुद हेगडे, जिजा महाजन, कावेरीताई पाटील, इंदिरा पाटणकर, चंपूताई मोकल, मालू कामत, कुसुम सातघरे, रतन पै, सरोजिनी ताम्हणे, लहानुमती धराधर, पार्वतीबाई कर्णिक, गंगाबाई मुळे, सरस्वतीबाई ओवळेकर, सुशीला ताम्हणे, यांच्याबरोबर अनेक मुलींनी वेगवेगळे धाडसी व कार्यशिल उपक्रम हाती घेतले होते.

मोर्चे, सत्याग्रहांमधील सहभागामुळे झालेला दोन महिन्यांचा कारावास संपवून. कावेरीताई पाटील आपल्या गरोदर अवस्थेची पर्वा न करता तहसीलदार कचेरीवर तिरंगा फडकवण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांना बारा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. ह्या शिक्षेदरम्यान येरवडा तुरुंगात त्यांनी मुलाला जन्म दिला. पुढचे पाच महिने आपल्या तान्या बाळासोबत त्या कारागृहात होत्या. कारागृहात जन्मलेल्या ह्या बाळाचे, सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांनी बारसे करून ‘भारत’ नाव ठेवले. सिंधुताई ताम्हणे, तारा रणदिवेंबरोबर अनेकजणींनी तुरुंगात बाळाचे संगोपन केले. याच दरम्यान यमुताई साने यांना अटक झाली. आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला घेऊन त्या तुरुंगात गेल्या. तुरुंगात अनेकवेळा जवळ कोणतेच साधन नसताना, मासिकपाळीसारख्या समस्येला सामोरे जावे लागे. ह्या महिलांमध्ये कितीतरी ऋतुमती होत्या, पण ध्येयासमोर सगळेच तुच्छ!

बेचाळीसच्या आंदोलनात कुसुम हेगडे यांना महत्त्वाचे सामान कार्यकर्त्यांपर्यंत मध्यरात्री पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली. खारीगावाला कळवे पुलाजवळ त्यांना विशिष्ट पोशाख केलेली एक व्यक्ती भेटणार होती. त्या व्यक्तीला खूण म्हणून कुसुमताईंनी पांढरी साडी व हिरवा ब्लाऊज असा पोशाख केला होता. पुलाजवळ दोघे भेटले. ओळख पटली. नेत्रसंकेत झाले. त्या व्यक्तीच्या पाठीमागे कुसुमताई चालू लागल्या. खारीगावाजवळ एका गोठ्यात गवताच्या गंजीमागे लपलेले तरुण पुढे आले व त्यांनी ते सामान ताब्यात घेतले.

१९४२ मध्ये ठाणे जेलमध्ये महिलांच्या एका बरॅक मध्ये १७ महिला असताना त्याच बॅरॅक मध्ये आणखी १३ महिलांना ठेवण्यात आले. जागा पुरेना तेव्हा बाजूलाच रिकामी असलेली बॅरॅक उघडून तेथे काही महिलांची सोय करावी असे ह्या महिलांनी सुचवले तेव्हा “तुम्हाला सुखाने राहायचे असेल तर माफी मागा व घरी परत जा” जेलरच्या ह्या उत्तराने पेटून उठलेल्या महिलांनी सत्याग्रह सरू केला. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत त्या बॅरॅकच्या दाराशी बसून राहिल्या. त्यांना घाबरवण्यासाठी बंदूकधारी पोलिसांनी त्यांना गराडा घातला. जेलरने गोळीबार करण्याची धमकी दिली पण ह्या रणरागिणींवर कशाचाच परिणाम झाला नाही. शेवटी त्यांच्या निर्धारामुळे जेलर नमला व महिलांना त्यांच्या इच्छित बॅरॅक्स मिळाल्या.

ह्या तरुण मुलींबरोबर असंख्य शाळकरी मुली, बंदिवान सत्याग्रहींना संदेश देणे, डबे पोहोचविणे, भूमिगतांचे निरोप देणे, गावठी हातबॉम्ब, पिस्तुले वगैरे नेण्या आणण्याचे काम करीत होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये सहभागी होत होत्या. बी. जे. हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, मो. ह. विद्यालयाचे विद्यार्थी शाळा सोडून आंदोलनात उतरले होते. ब्रिटिशांच्या निषेधार्थ शाळांमधून बैठा संप केला जात होता. सरकारी मुलींच्या हायस्कूलमध्ये युद्धनिधीच्या मदतीसाठी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कित्येक वयस्कर महिलांनी कार्यकर्त्यांना घरात आश्रय देऊन, वेळेला त्यांच्याकडील साहित्य, लोणच्याच्या बरण्या, देवघर अशा ठिकाणी लपवून ठेवून पोलिसांपासून त्यांची अनेक वेळा सुटका केली होती. तुरुंगाची भीती संपुष्टात आली होती. एकदा शिक्षा भोगून आलेल्या महिला पुन्हा-पुन्हा सत्याग्रहात भाग घेत होत्या. हाल-अपेष्टा, लाठीमार, अत्याचार सहन करत कारागृहात जाऊन आलेल्या ह्या महिला, स्वातंत्र्य मिळताच समाजकार्यात गुंतून गेल्या.

लोकसंख्येची समस्या सोडवणे महत्त्वाचे होते. त्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण बसवण्याचे शिक्षण, सिव्हिल हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरांच्या मदतीने समाजवादी महिला सभेच्या भगिनींनी, सरलाताई कुळकर्णी व नलिनी ताम्हणे ह्यांच्या नेतृत्वाखाली घेतले. तो काळ होता १९४७-४८ चा. त्यावेळी मंगला सामंत, सुनंदा कुलकर्णी, विभावरी गांगल, पद्मा गोडबोले, शीला हजारे, सुषमा धरणे, रजनी दुर्वे, तारा महाजन, कुमुद नाचणे, यमुताई साने, इंदिराबाई प्रधान, लीला मुळगावकर, कुडाळकर यांच्याबरोबर अनेक महिलांनी पुढाकार घेतला होता. १९५४-५५ साली रक्तपुरवठ्याअभावी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण दगावले. त्यावेळी ह्याच ‘समाजवादी महिला समितीच्या महिलांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मदतीने स्वतःच रक्तदान करून रक्तपेढीची स्थापना केली. स्वातंत्र्यसैनिक सरलाताई कुळकर्णी ह्या पहिला रक्तदात्या होत्या.

कोपरी येथे असलेल्या महारोग्यांच्या वस्तीत होळी, दिवाळी, संक्रातसारख्या सणांच्या दिवशी, समाजवादी महिला सभेच्या कार्यकर्त्या गोडाधोडाचे पदार्थ घेऊन जायच्या. समाजाने आपल्याला वाळीत टाकले आहे अशी जाणीव त्या महारोग्यांना होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर त्या रात्री वस्तीला राहायच्या, त्यांच्याबरोबर जेवायच्या.

ठाण्यापासून जवळच तडीपार लोकांची वस्ती होती. गुन्हेगारी वृत्तीचे, खुनी, दरोडेखोर लोक तिथे राहायचे. त्यांच्या बायकांना काही शिकवून स्वतःच्या पायांवर उभे करण्यासाठी दारूच्या भठ्या लागलेल्या परिसरात, शिलाई मशिन घेऊन त्या स्त्रियांना त्यांच्या वस्तीत जाऊन मार्गदर्शन करताना; गुंडानी चाबकाने फोडून काढण्याच्या दिलेल्या धमकीला धुडकवण्याचे धैर्य दाखवले.

ठाण्याच्या १२ नंबरच्या शाळेत ६० आदिवासी मुलांसाठी सरला कुळकर्णी, यमुताई साने, मंगला सामंत, रजनी दुर्वे इ. महिलांनी शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरात अक्षरश: नैसर्गिक विधीनंतरच्या स्वच्छतेपासून एकूणच स्वच्छतेचे व घास तोंडात व्यवस्थित घेण्याचेही शिक्षण मुलांना दिले. जव्हार, पालघर येथील आदिवासी पाड्यात वस्तीला राहून, तेथील वंजारी, माथाडी, लोकांमध्ये जागृती करणाच्या प्रयत्नाबरोबर त्यांच्या समस्यांसाठी कोर्टात दाद मागून, त्यानी यशस्वीपणे खटला. जिंकला. वंजारी स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव देऊन पोलीस चौकीवर त्यांचा मोर्चा नेला.

१९७८-७९ साली तळोजाला किरवली डोंगरावर विमान अपघात झाल्याचे कळताच, सुनंदा कुलकर्णीच्या मागोमाग त्यांच्या सगळ्या सख्यांनी धाव घेऊन अपघातग्रस्तांना सगळ्याच प्रकारची मदत करत, कलेवरे उचलून खाली आणण्यापर्यंत कामे केली होती.

धो धो पावसात खाडीचे पाणी रुळांमध्ये शिरले असताना मुंब्राजवळ ट्रेन अपघात झाला. अर्धी ट्रेन पाण्यामध्ये होती. डब्यात पाणी शिरले होते. आत अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी तेथपर्यंत पोहोचण्यास मार्ग नव्हता. तेव्हा सरला कुळकर्णी कचरा वाहून नेणाऱ्या गाडीवरून घटनास्थळी पोहचल्या व त्यांनी मदतकार्य सुरू केले. मनोरजवळील मासवण गावात नदीचे नेहमी पाणी शिरे. त्यावेळी ह्या महिलांनी श्रमदान करून मोठा बांध घालून पाणी अडवून गावाची समस्या कायमची सोडवली.

कळवा गावामधील पाणी आणि विजेची समस्या सोडवण्याबरोबर कावेरीताई पाटील यांनी, कळवा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. बदलापूरजवळील पिंपरोळी ह्या आदिवासी भागात माध्यमिक शाळा काढली. समर्थ वसतिगृह बांधून तेथे ४० आदिवासी विद्यार्थिनींच्या राहण्याची सोय केली. कळवा येथील मुकंद आर्यन कंपनीच्या व्यवस्थापनाने दत्ता सामंत कामगार संघटनेबरोबरचा तंटा विकोपास गेल्याने, कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कावेरीताईंनी ‘मुकंद एम्प्लाइज युनियनची’ स्थापना करून कुशलतेने यशस्वी समेट घडवून आणला. ह्या युनियनचे त्यांनी सातत्याने बारा वर्षे नेतृत्व केले.

महागाई विरोधी आंदोलने छेडताना लाठीमार, पकडले जाण्याची तमा न बाळगता, कलेक्टर ऑफिसवर विधान सभेवर मोर्चे काढून मंत्र्यांना, पुढाऱ्यांना घेराव घालणे, बलात्काराची बातमी कळताच धावत जाऊन आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणे, दारू पिऊन घरात मारहाण करणाऱ्या पुरुषांना सतत समजावून वेळेला धाक दाखवून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणणे, निधी गोळा करून सामूहिक समाजातील दुर्बल व दुर्लक्षित घटकांची लग्ने लावून देणे, पुराचे पाणी शिरल्यास व कमरेच्यावर पाणी असताना घराघरात शिरून लहान मुले, महिलांची सुटका करणे, कामगार सदनमध्ये गहिणी वर्ग घेऊन महिलांना घरच्या घरीच स्टोव्हचे वॉशर बसवणे, फ्यूज बसवणे, कागदाची फुले उदबत्त्या, लेदरवर्कसारख्या गोष्टी शिकवून स्वयंसिद्ध व्हायला मदत करणे, बालवाड्या काढणे तसेच सामाजिक बहिष्कार उठवण्यासारखी अनेक कार्ये; ह्या महिला उत्स्फूर्तपणे करत होत्या.

ठाण्यात महिलांचा पहिला कोचिंग क्लास सुरू करून लीलाताई जोशींनी प्रौढ कुमारिका, परित्यक्ता, विधवा महिलांची समजत घालून, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

त्यांच्याबरोबर अनेक मुलींना फीची कुठलीही अट न घालता मार्गदर्शन केलं. ‘सखी शेजारणी महिला मंडळाच्या’ माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास व सभाधीटपणा निर्माण केला. सन १९५४-५५ साली मंडळाच्या स्त्रियांनी मासुदा तलाव स्वच्छ केला. त्या वेळी इतर महिला हे काम करणाऱ्या महिलांना सकाळपासून खाद्यपदार्थ, चहापाणी पुरवून आपला खारीचा वाटा उचलत होत्या. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी पोळीभाजी केंद्र, कल्याणी योजना, बालसंगोपन केंद्र, बालवाड्या इ. उपक्रम सुरू केले.

१९४४-४५ साली ठाण्यात ‘ठाणे शहर महिला मंडळ’ ‘मातृवात्सल्य महिला मंडळ’ सी.के.पी. महिला मंडळ, नौपाडा, हिंदू महिला मंडळ, जिजामाता मंडळ, इ. मंडळांच्या माध्यामातून अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम तर राबवले जायचेच त्याखेरीज शहरात जेव्हा एखादी मोठी समस्या उभी राहत असे तेव्हा ह्या महिला एकजुटीने धावून जात असत.

१९६० साली ठाणे शहर महिला मंडळाच्या ६० महिलांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान केले होते. इंदुताई गुप्ते, शकुंतलाबाई परांजपे, शालिनी भोईर, यशोदाबाई कोतवाल, विमलाबाई दिघे इ. महिला १९४९-५० सालापासून हरिजन वस्तीत जाऊन संक्रांतीचा हळदी-कुंकू समारंभ साजरा करीत. हरिजन महिलांना स्पर्श करणाऱ्या, त्यांना तिळगूळ देणाऱ्या ह्या महिलांचे, हरिजन महिलांकडून आनंदाने स्वागत होत असे. गरजू महिलांना स्वतःच्या पायांवर उभे करण्याच्या दृष्टीने मंडळाच्या महिलांनी इंग्रजीचे वर्ग सुरू केले. निधी गोळा करून शिवण मशिन्स विकत घेतल्या, मशिन ठेवायला जागा नसतानासुद्धा शक्य होईल तिथे मशिन ठेवून स्त्रियांना- मुलींना शिवण शिकवून शिवणाच्या परीक्षेला बसवलं, त्यामुळे अनेक जणींना शिवणकामाचा डिप्लोमा मिळाला व त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला.

अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शारदा साठे, सुलक्षणा महाजन, मेघना मेहेंदळे इ. नेतृत्वाखाली तळागाळातल्या बायकांसह सरकार दरबारी मोर्चे नेले जायचे. धरणे धरले जायचे. झोपडपट्टीची सुधारणा, प्रौढसाक्षरता वर्ग, कुटुंबनियोजन, आदिवासी विकासकार्य, बालशिक्षण वर्ग, श्रमदान शिबिरे, महिला मंडळ, सहकारी सोसायटी, आरोग्य केंद्रासारख्या कित्येक क्षेत्रात महिला लक्षणीय काम करत होत्या.

उमा निळकंठ व्यायाम शाळा, आर्य क्रीडा मंडळ, येथे मुलींच्या हुतूतू, लंगडी, खो खो इत्यादी खेळांच्या स्पर्धा होत असत आणि त्यास महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असे.

१९४८-४९ च्या दरम्यान ठाण्यात नाट्यसंस्कृती आकार घेऊ लागली होती. हौशी कलाकारांची छोटी मंडळे तयार होत होती. त्यातूनच मित्रनाट्य मंडळ, नाट्याभिमानी, आदर्श मित्रमंडळ, कलायतन, कलासरगम, मित्रसहयोग, नाट्यमन्वंतर, अक्षय, पूर्णांक, बिल्वपत्र इ. संस्थांच्या माध्यमातून नाटके, एकांकिका, बालनाट्यांमधून अनेक मुली व महिलांनी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले.

यांच्यातील अनेकजणींनी राज्यनाट्य स्पर्धा, महाराष्ट्र नाट्य महोत्सव, कामगार नाट्यस्पर्धा, कै. पार्श्वनाथ आळतेकर स्पर्धा, विलेपार्ले गुजराथी मंडळ, आकार संस्था यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांची पारितोषिके मिळवली आहेत. विषयाचा आवाका खूप मोठा असल्याने सगळे उल्लेख करता येऊ शकले नाहीत.

मराठी साहित्यात कथा, कविता, ललित साहित्य, वाङ्मयीन संशोधनाद्वारे पुष्पलता कढे, पुष्पा मेढेकर, मेघना साने, डॉ. अनुपमा उजगरे, प्रज्ञा दया पवार, छाया वाड, डॉ. शुभा चिटणीस, सुनंदा भोसेकर, राणी दुर्वे, रेचल गडकर, आशा मंडपे, नयना आचार्य इ. ठाणेकर महिलांनी मोलाची भर घातली आहे.

पृष्ठमर्यादेमुळे अनेक कर्तबगार महिलांचा नामनिर्देशही करणे शक्य झाले नाही, याची नम्र जाणीव आहे.

— नितल वढावकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..