नवीन लेखन...

ठाण्यातील बालरंगभूमी

ठाण्यात होणाऱ्या 96 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्तानं ठाण्यातील बालरंगभूमीचा आढावा घेण्याचा प्रयत्न मी करीत आहे. यात जर कुणाचे नाव किंवा उल्लेख अनवधानानं राहून गेल्यास क्षमस्व. गेल्या दशकभराच्या वाटचालीत बालनाट्याचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलत गेलेलं आहे. बाल विकासासंबंधी भौतिक, मानसिक, सामाजिक, शैक्षणिक अगदी कौटुंबिक संदर्भ सुद्धा बदलत आहे हे त्याचं मुख्य कारण. बालकांचे अर्थपूर्ण सहेतुक मनोरंजन करणे हे बालनाट्याचे मूळ प्रयोजन. ज्या नाटकांमुळे मुलांना हर्ष, चीड, खेद, दुःख या भावना स्पर्श करून जातात ते खरे बालरंगभूमीचे नाटक. आणि त्यातून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा हा बालनाट्याचा मूळ उद्देश असं मला वाटतं. जरी ठाण्यातील बालरंगभूमीचा आढावा घ्यावयाचा असला तरी ज्यांनी सुरवातीपासून या बालरंगभूमीवर विविध प्रयोग केले, तिला संपन्न करतानाच्या वाटचालीत मोलाचं योगदान दिलं आणि ही चळवळ सुरू केली त्यांना ओझरती का होईना पण सलामी दिल्याशिवाय पुढे जाणे योग्य वाटणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांनी बालनाट्य लिखाणावरही भर दिला त्यांचाही उल्लेख व्हायलाच हवा.

बालनाट्य चळवळीला सशक्त दिशा देण्याचा ज्यांनी उत्तम प्रयत्न केला त्यात सई परांजपे, नटश्रेष्ठ मामा पेंडसे, रत्नाकर आणि प्रतिभा मतकरी, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, नरेंद्र बल्लाळ, माधव साखरदांडे, सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे, विद्याताई पटवर्धन, पुरुषोत्तम दारव्हेकर, दिनकर देशपांडे, जयंत तारे, प्र. के. अत्रे, सुधाताई करमरकर, श्रीधर राजगुरु, अतुल पेठे, वंदना विटणकर इ. अनेक नावांचा उल्लेख हा व्हायलाच हवा.

त्याचप्रमाणे अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्यांनी लेखनाच्या माध्यमातून बालरंगभूमीसाठी योगदान दिलं, तिची पाळंमुळं रोवण्यात हातभार लावला, विविध प्रयोगशील लेखन केलं, त्यात लीलाताई भागवत, अ. वि. गोखले, ना. ग. गोरे, मालती दांडेकर, कुमुदिनी रांगणेकर, वसंत बापट, द. ग. नेर्लेकर, अ. वि. शाळीग्राम, योगेश्वर अभ्यंकर, नानासाहेब गोखले, साने गुरुजी, दत्ता टोळ, शाम फडके, भालचंद्र भिडे इ. मान्यवरांनी लिखाणाच्या माध्यमातून बालरंगभूमीला दिशा दिली.
त्यानंतर पुणे, औरंगाबाद, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, अकोला, डोंबिवली, कल्याण इ. शहरांमधून व्यापक प्रयत्न होत आहेतच. आणि बालरंगभूमीची चळवळ अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न सर्व आपआपल्या परीने करीत आहेत. कांचन सोनटक्के यांनी कर्णबधीर मुलांच्या माध्यमातून बालरंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलं आहे. या सर्वांचे स्मरण करून ठाण्यातील बालरंगभूमीचा थोडक्यात आढावा पुढे घेण्याचा प्रयत्न.


नवल रंगभूमी

नरेंद्र बल्लाळ यांनी 1966 साली विलेपार्ले येथे सचिन शंकर यांच्या हस्ते नवल रंगभूमी या संस्थेची स्थापना केली. मंगळावर स्वारी, राजाला फुटले पंख इ. नाटके या संस्थेने केली. नंतर बल्लाळ ठाण्यात आले आणि मुंबईची धुरा अशोक पावसकरांनी सांभाळली. ठाण्यात बल्लाळांनी वेगळ्या संस्थेची स्थापना केली. त्यांनी लिहिलेली ‘चंद्र हवा चंद्र हवा’, ‘डॉ. आळशी आणि बोलणारा कुत्रा’, ‘एक होता जोकर’ या नाटकांचे प्रयोग मग मित्रसहयोग संस्था आणि पुण्यात राजगुरूंनी केले. ठाण्यात बालरंगभूमीसाठी नरेंद्र बल्लाळ यांचे नाव वरच्या क्रमांकाचे व खूप मोठे आहे.


कलारंजन

मुलांना कलेचं मुलभूत शिक्षण मिळावं, त्याचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडावे, बालनाट्य विषयक विविध संकल्पनांचे मार्गदर्शन त्यांना मिळावे म्हणून 10 मार्च 1984 साली ठाण्यात स्थापन झालेल्या ‘कलारंजन’ या संस्थेचे कार्य खूप मोलाचे आहे. कविवर्य पी. सावळाराम, कै. अरविंद देशपांडे, लीलाताई जोशी, नरेंद्र बल्लाळ, ग. स. फाटक, गुरुवर्य स. वि. कुलकर्णी, रा. शं. साठे, सतीश प्रधान, सुधीर फडके या मंडळींचे पाठबळ या संस्थेला मिळाले. संस्थेतर्फे ठाण्यात बालनाट्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. कमलाकर सोनटक्के, सुहासताई जोशी, सुधा करमरकर, सखाराम भावे, सुलभा देशपांडे, अशोक चिटणीस, मोहन पाठक, ज्योतीराम कदम, प्र. ग. वैद्य, आनंद केदार, शिरीष पितळे, प्रवीण दवणे, मंजिरी देव इ. मान्यवरांचे मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले. ठाणे महापालिकेच्या वतीनं त्या वेळी मुलांसाठी विनामूल्य बालनाट्य प्रशिक्षण शिबिरही घेण्यात आलं. आर्थिकदृष्ट्या असमर्थ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अपंग व आदिवासी मुलांसाठी संस्थेद्वारे विविध उपक्रम राबवण्यात आले. या चळवळीला हातभार लावण्यासाठी श्रीसमर्थ सेवक मंडळानं शाळेचा हॉल विनामूल्य दिला. संस्थेतल्या निवडक मुलांना आकाशवाणीवर ‘बालदरबार’मध्ये संधी दिली आणि त्यांनी 12 एकांकिका व 3-4 संपूर्ण बालनाट्ये सादर केली. ‘जंतर मंतर पोरं बिलंदर’ या प्रवीण दवणे लिखित धुरंधर पोरांच्या बिलंदर बालनाट्याचा रौप्य महोत्सवी प्रयोगही झाला. कलारंजनचे अध्यक्ष सुधाकर मोहोड आणि सेक्रेटरी अंजली मोहोड यांचं उचित मार्गदर्शन संस्थेला लाभलं आणि त्यांच्या संपन्न नेतृत्वाखाली ही संस्था बहरली. आनंद दिघे साहेबांचं मार्गदर्शन आणि पाठिंबा संस्थेला सतत मिळाला. संस्थेने असंख्य कलाकार घडवले आणि ठाणे नगरीच्या सांस्कृतिक वाटचालीत मोलाचं कार्य केलं.


बालरंगायन

गुजराती, बंगाली, मराठी, मल्याळम् अशा विविध भाषा बोलणाऱ्या मुलांना एकत्रित आणून ही तारेवरची कसरत लिलया पेलण्याचं काम 1969 साली लक्ष्मीनिवास नं. 2, घंटाळी, ठाणे इथे रहायला गेलेल्या श्री. प्र. ग. वैद्य या डॉ. बेडेकर विद्यामंदिर मधील आदर्श सरांनी केले. श्याम फडके यांच्या ‘एक होतं भांडणपूर’ या बालनाट्यानं या संस्थेच्या कार्याला सुरुवात झाली.

27 मार्च 1971 साली आकाशवाणी कलावंत बाळ कुडतरकर यांच्या हस्ते बालरंगायनची स्थापना ठाण्यात झाली. संस्थेच्या स्थापनेनंतर श्याम फडके लिखित व दिग्दर्शित ‘हिमगौरी आणि सात बुटके’, ‘फजिती रे फजिती’, ‘निलमपरी’ इ. अनेक नाटकांचे प्रयोग झाले. व त्यानंतर 1974 साली त्यावेळचे मुंबई विद्यापीठाचे प्रौढ शिक्षणाधिकारी, नाटककार, चित्रपट गीतकार श्री. मुरलीधर गोडे यांनी संस्थेसाठी मोलाची कामगिरी केली. त्यांनी ‘गाणारी मैना’, ‘बेटावरचे बहाद्दर’ ही व इतर नाटके दिग्दर्शित केली. श्री. खरे यांनी ‘वीरसिंह’ हे बालनाट्य रंगभूमीवर आणले. या संस्थांना अत्यल्प दरात आनंदी साऊंडचे देसाई बंधु, शिरीष पितळे, विद्या प्रसारक मंडळ ही मंडळी मदत करत असत. मराठी व्यापार संघटनेचे तेव्हाचे अध्यक्ष बाळ ढवळे, शीला मराठे, अ. कृ. खरे, अ. वि. सहस्रबुद्धे या सर्व मंडळींनी मोलाचा हातभार लावला.
ठाण्यात श्री. शशिकांत कोनकर व आशाताई कोनकर यांनीही शाम फडके यांच्या मदतीने काही बालनाट्ये गाजवली. त्यात शशिकांत कोनकर लिखित ‘नारदाची चुगली बग्याची बागुली’ हे बालनाट्य विनायक दिवेकर यांनी दिग्दर्शित केलं होतं. तसेच त्यांचे ‘विनविनची गोष्ट’ हे नाटक सौ. आशा कोनकर यांनी बसवलं होतं. तसेच श्याम फडके यांच्या ‘बंडुच्या मुंजीचा फोटो’ हे ही नाटक आशाताईंनी बसवलं होतं. या नाटकाला दिग्दर्शन व लेखनाची बक्षिसे मिळाली होती. शशिकांत कोनकर यांचं ‘अर्धी थाप’ हे ही नाटक करण्यात आलं. तसंच ‘गणपतीला दुर्वा प्रिय का?’ हे कोनकरांचं नाटक आशाताईंनी दिग्दर्शित केलं होतं. ‘उंदीरमामा’ या नाटकासाठी नरेंद्र बल्लाळ यांच्या हस्ते कोनकर दाम्पत्याला पारितोषिक मिळालं होतं.


चिल्ड्रन थिएटर्स

चिल्ड्रन थिएटर या संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष श्री. राजु तुलालवार हे बालनाट्य चळवळ सातत्याने राबवत आहेत. बालरंगभूमीला व्यावसायिक स्तरावर नेवून ठेवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. अनेक मुलांना त्यांच्या संस्थेने व्यावसायिक बालरंगभूमीच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. बालनाट्यांना इंग्रजीमधून सादर करण्याचा उपक्रमही मध्यंतरी त्यांनी हाती घेतला व संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक बालनाट्य ते करीत आहेत.


दृष्टी कम्युनिकेशन

या संस्थेच्या माध्यमातून श्री. व सौ. प्रबोध कुलकर्णी ठाण्यात प्रायोगिक बालरंगभूमीच्या माध्यमातून विविध प्रयोग करीत आहेत. स्वत उत्तम व्यावसायिक नट असलेले प्रबोध कुलकर्णी अनेक मुलांना या माध्यमातून घडवित आहेत व बालरंगभूमीसाठी योगदान देत आहेत.


माता अनुसया प्रॉडक्शन

या संस्थेच्या माध्यमातून प्रविणकुमार भारदे हे अभिनव उपक्रम बालरंगभूमीशी संबंधित राबवित आहेत. त्यांनीही बालरंगभूमीला व्यावसायिक बालरंगभूमीचा दर्जा देण्याचे मोलाचे काम केले आहे.


वेध ॲ‍क्टिंग ॲ‍कॅडमी

या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 4-5 वर्षांपासून श्री. संकेत ओक व सहकारी बालरंगभूमीसाठी आखीव रेखीव काम करीत आहेत. अनेक मुलांना त्यातून व्यासपीठ उपलब्ध होत आहे.


अभिनय कट्टा

अभिनय कट्टा या संस्थेच्या माध्यमातून विविध बाल कलाकारांना सादरीकरणासाठी एक हक्काचे व्यासपीठ किरण नाकती यांनी उपलब्ध करून दिले आहे. या कट्ट्यावर सातत्याने विविध उपक्रम आयोजित केले जातात व क्षेत्राशी संबंधित विविध मान्यवर सातत्याने कट्ट्यावर भेट देत असल्याने मुलांना जाणकार मंडळींचे मार्गदर्शन मिळते.


‘प्रारंभ’ कला ॲ‍कॅडमी

प्रारंभ या संस्थेच्या माध्यमातून 2002 पासून डॉ. अरुंधती भालेराव व सहकारी वार्षिक वर्ग, मुलांसाठी अभिनय व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, उपचारात्मक नाट्यकार्यशाळा, व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पपेट मेकिंग, कॅलिग्राफी, कार्टून, शिल्पकला, हस्तकला, नाट्य इ. विविध विषय वार्षिक वर्गांच्या माध्यमातून हाताळत आहेत. गेल्या चार वर्षांपासून नाट्यमहोत्सवाबरोबरच बालमहोत्सवाचे फार मोठ्या प्रमाणात गडकरी रंगायतन येथे आयोजन करण्यात येते. अत्यंत कमी शूल्क आकारून मुलांना जादूचे प्रयोग, पपेट शो, बालनाट्ये, खाऊवाटप, गरीब विद्यार्थ्यांचा सत्कार, एकपात्री अशा अभिनव उपक्रमांचे महोत्सव आयोजन होते. 14 वर्षात अनेक विषय बालनाट्यातून यशस्वीरीत्या हाताळले आहेत.
प्रा. मंदार टिल्लु व बाळकृष्ण ओडेकर हे देखील गेल्या अनेक वर्षांपासून बालरंगभूमीशी संबंधित उपक्रम सातत्याने हाताळत आहेत. विविध जुनी बालनाट्ये पुनरुज्जीवित करून त्यांनी व्यावसायिक बालरंगभूमीवर यशस्वी प्रयोग केले आहेत.


वंचितांची रंगभूमी

रत्नाकर मतकरी यांनी मागील 2-3 वर्षांपासून गरीब वस्तीतील मुलांसाठी ‘वंचितांची रंगभूमी’ हा अभिनव उपक्रम समता प्रसारक संस्था यांच्याबरोबर सुरू केला आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील मुलांपर्यंत देखील बालनाट्याबद्दल जागृकता निर्माण झाली आहे. त्याचे अनेक प्रयोग सातत्याने ठाण्यात होत आहेत.


ज्ञानदीप कलामंच

राजेश राणे या नाट्यवेड्या युवकाने, समानधर्मी मित्र मैत्रिणींना घेऊन 1998 मध्ये ज्ञानदीप कलामंच ही संस्था स्थापन केली. लहान मुलांसाठी नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून, या मुलांच्या नाट्यगुणांचे दर्शन घडवणारी रंगतदार बालनाट्ये सादर करण्याचे काम ज्ञानदीप कलामंच करत आहे. या वर्षीच्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘डराव डराव’ या संस्थेच्या नाटकाने प्रथम पारितोषिक मिळवले आहे.


या व्यतिरिक्त मध्यंतरी क्रांति सरवणकर, कै. स्मिता तळवलकर यांचे अस्मिता चित्र तसेच प्रमोद व मधुराणी प्रभुलकर यांच्या बालनाट्य कार्यशाळा या माध्यमातून ठाण्यातील बालरंगभूमी सतत कार्यरत व क्रियाशील आहे.

थोडक्यात, व्यक्तिमत्त्व विकासासाठी बालनाट्याचा साधन म्हणून उपयोग करून मनोरंजनाबरोबरच संस्कार करण्याचे कार्य ठाणे शहरातील मंडळी करीत आहेत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे व भविष्यातही बालरंगभूमीला उज्ज्वल भविष्य आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही ही खात्री आहे!

— डॉ. अरुंधती भालेराव.

9821108156

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..