नवीन लेखन...

ठाण्यातील नाट्यसंस्था – मित्रसहयोग

ठाण्याच्या घंटाळी, लालबाग गणेशोत्सवात एकत्र येणाऱ्या काही तरुणांचा संच काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न पाहत होता. या स्वप्नाचे फूल वास्तवात उमलले ते ‘मित्र सहकार’ या संस्थेच्या माध्यमातून. फक्त नऊ तरुणांनी एकत्र येऊन 1959 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर ही संस्था स्थापन केली. सुरुवातीला बुद्धिबळ, कॅरम, ब्रिज या खेळांमध्ये भाग घ्यायचा. त्याच्या स्पर्धा भरवायच्या, असं चाललं होतं. त्या जोडीला वेगवेगळ्या नाटकांचं वाचन करून त्यावर चर्चा केली जायची. त्यामुळे पहिली चार-पाच वर्षे एखाददुसरं नाटक सादर करण्यापलीकडे ‘मित्र सहकार’ची मजल गेली नाही.

1965 साली पहिल्यांदा राज्य नाट्य महोत्सवात भाग घेण्यात आला, तेव्हाच ‘मित्र सहकार’ नावाला हरकत आल्याने ‘मित्रसहयोग’ असं नामकरण झालं. तेव्हा कदाचित कुणाला वाटलंही नसेल की, हे नाव पुढची 50 वर्षे ठाण्याच्या नाट्यचळवळीतील अपरिहार्य नाव बनून राहणार आहे. 1967 साली अशोक साठे दिग्दर्शित ‘वेगळं व्हायचंय मला’ हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सादर करून ‘मित्रसहयोग’ने पहिल्यांदा राज्य नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि हा विजयरथ चौखूर उधळला. या प्रयोगात पुष्पा देशपांडे, विश्वास देशमुख, अशोक साठे, प्रभाकर साठे, श्रीहरी जोशी आदींनी भूमिका केल्या होत्या. त्यानंतर राज्य नाट्यस्पर्धेत ‘सापळा’, ‘असा मी काय गुन्हा केला’, ‘चक्रावर्त’, ‘ललित नभी मेघ चार’, ‘जेव्हा देवाचा खून होतो’, ‘तो राजहंस एक’, ‘अपूर्णांक’, ‘चिमणीचं घर होतं मेणाचं’, ‘श्रीशिल्लक’, ‘बास्टर्ड्स’, ‘असंच एक गाव’, ‘सहस्र वर्षांचे साचले हे काळे’, ‘छेद’, ‘लढाई’, ‘शर्यत’, ‘काय हवं असतं आपल्याला?’, ‘प्रदक्षिणा’, ‘आणि त्यानंतर’ ही नाटके सादर करून सातत्याने 40 वर्षे राज्य नाट्यस्पर्धेत मित्रसहयोगने ठाण्याचा झेंडा फडकत ठेवला. एकांकिका स्पर्धांमध्येही मित्रसहयोगची कामगिरी लक्षणीय आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ‘सांगाती’, ‘घन तम शुक्र’, ‘चोर आले पाहिजेत’, ‘अबोल झाली सतार’, ‘थडगी’, ‘काळोख’, ‘डग’, ‘खलित्यांची लढाई’, ‘वेणी संहार’, ‘भारतीय समाचार दर्शन’, ‘सामना’, ‘राजा आणिक राणी’, ‘रिव्हेंज’, ‘लिफ्ट’, ‘परिसस्पर्श’, ‘मुखवटा’ या एकांकिकांचे सादरीकरण करून जाणकारांची दाद आणि भरभरून पारितोषिके मिळवली. नाट्यदर्पणच्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या उपक्रमात ‘मित्रसहयोग’ची एकांकिका सातत्याने चार वर्षे अंतिम फेरीत दाखल होत हाती. या एकांकिकांचे पुस्तकही निघाले आहे.

‘मित्रसहयोग’च्या आजवरच्या वाटचालीतले महत्त्वाचे टप्पे म्हणजे ‘अपूर्णांक’ या रजन ताम्हाणे दिग्दर्शित नाटकाला चिंतामणराव कोल्हटकर स्पर्धा, पार्श्वनाथ आळतेकर स्पर्धा आणि राज्य नाट्यस्पर्धा ठाणे केंद्र या तिन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता. अभिनयासाठी रजन ताम्हाणे आणि प्रतिभा कुलकर्णी यांना प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळाली होती. मात्र चोख सादरीकरण असूनही या नाटकाला राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत एकही पारितोषिक मिळू शकले नाही, असं की? तर ‘परीक्षक इच्छा बलियसी!’ अशोक साठेंच्या विक्रमी प्रकाशयोजनेमुळे (नाटकाच्या प्रकाशयोजनेत 42 का 52 स्पॉट्स वापरले होते) आजही नाट्यरसिकांच्या स्मरणात राहिलेलं ‘चक्रावर्त’ या नाटकाला अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य अशी सर्व पारितोषिके मिळूनही नाटक नंबरात आले नाही. ‘मित्रसहयोग’च्या माध्यमातून आपली रंग-कारकीर्द सुरू करणारे आणि नंतर नावारूपास आलेल्या कलाकारांची यादी मोठी आहे. उल्लेख करायचा झाला तर अशोक साठे, रजन ताम्हाणे, प्रबोध कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, शिरीष लाटकर, पराग बेडेकर, पल्लवी वाघ, अभिजित चव्हाण, गजेंद्र अहिरे यांचा करता येईल. वसंत कामत, नंदकुमार नाईक, अशोक बागवे, श्रीहरी जोशी, श्याम फडके, शिरीष हिंगणे, ॲ‍ड. संजय बोरकर आणि हर्षदा बोरकर हे ‘मित्रसहयोग’चे हक्काचे नाटककार होते.

नाटकावर मनापासून प्रेम करणारे रंगकर्मी मित्रसहयोगकडे काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आकर्षित होत गेले. त्यामुळे आरंभी मधुकर ताम्हाणे, उषा गुप्ते, प्रतिभा कुलकर्णी, अरविंद सुळे, लीना फडणीस, शैला नानिवडेकर, नाना खळे, विजय चौबळ, विजय कुलकर्णी, श्रीकांत साखरदांडे, शशी काळे, मकरंद घारपुरे, मीना पेडलीकर, अभया पंदारीकर, यांनी सुरू केलेली ही रंगयात्रा नंतरच्या काळात ॲ‍ड. संजय बोरकर, नितीन पटवर्धन, महेश बोरकर, हर्षदा बोरकर, धनंजय कुलकर्णी, योगेश कुलकर्णी, अशोक कार्लेकर, कै. एकनाथ शिंदे, विनोद कुलकर्णी, योगेश केळकर, रवी करमरकर, संजय लक्ष्मण बोरकर, ज्योत्स्ना कारखानीस, वृषाली कारखानीस, मिनल काशीकर, विठोबा महाडिक, शिरीष हिंगणे अशा अनेकांनी अव्याहत सुरू ठेवली.

‘मित्रसहयोग’च्या वाटचालीतील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे विनायक दिवेकरांच्या पुढाकाराने दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ठाण्याच्या महापालिकेच्या शाळा नं. 2 (दगडी शाळा) मध्ये नियमित एकांकिका सादर करण्यात आल्या. गेली 55 वर्षे सातत्याने रंगभूमीवर कार्यरत असलेली ‘मित्रसहयोग’ ही नाट्यसंस्था केवळ ठाण्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या रंग परंपरेचा एक अभिमानबिंदू ठरली आहे.

साभार: ठाणे रंगयात्रा २०१६ मासिक.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..