हा चित्रपट आला , चांगलं परीक्षण वाचलं आणि तो गेलासुद्धा ! नुकताच तो घरबसल्या बघायला मिळाला. लॉक डाउन बाबा की जय !
सगळीच नाती सुरुवातीला जुळताना /जुळविताना हवीहवीशी, नवलाईची असतात. कालांतराने अतिपरिचयात त्यांच्यावर शेवाळं साचतं. दोन्ही बाजू एकमेकांना गृहीत तरी धरायला लागतात किंवा ते टिकविण्याचा एकतर्फी प्रयत्न तरी पाहायला मिळतो.
असेच एक आदिम नाते – पती पत्नीमधील ! तेथे वरील सगळं पाहायला मिळतं.
“बस इतनी सी बात ? ” अशी या चित्रपटाची टॅग लाईन आहे. (पत्नीला) गृहीत धरण्याचा नादात तिला भर पार्टीत सर्वांसमक्ष “थप्पड” मारली- बस , “इतनी ” सी बात? आणि पूर्ण चित्रपटभर पत्नी चक्क त्या “बात ” का “बतंगड ” करते म्हणजे काय? पार घटस्फोटापर्यंत तिची मजल जाते. त्याआधी ही अपमानास्पद वागणूक नाकारून ती माहेरी जाते.
गम्मत म्हणजे ती या प्रकरणात ओव्हर रिऍक्ट करतेय असं सर्वांचं मत – सासू, आई , वकिलीणबाई आणि अगदी तिची कामवाली ! सगळे तिला समजावून दमतात. त्यांत काय एवढं , बाईच्या जातीला वगैरे वगैरे ! ती ठाम – दरम्यान प्रेग्नन्सी नामक आकर्षक वळण येतं , पण तेही ती ठामपणे नाकारते. विभक्त होऊ आणि होणाऱ्या बाळावर मायेची पाखरं घालू , पण आता एका छताखाली नाही !!
तिचा हा ठामपणा तिच्या नवऱ्याला वेडगळपणा वाटत असतो. (रागाच्या भरात ) एक दिली थप्पड तर त्याचं एवढं काय भांडवल आणि घर मोडण्याइतपत टोकाची भूमिका? हे असं असतंच .
फक्त तिला हे मान्य नाही.
आता हळूहळू आसपासच्या शेवाळलेल्या नात्यांवर ही तुरटी फिरायला लागते.
सासू मुलाबरोबर राहात असते – नवऱ्यापासून विभक्त होऊन !
आई लग्नापासून गायन -वादन (स्वेच्छेने ) विसरून गेली असते.
भावाच्या होऊ घातलेल्या पत्नीला, तो लग्नाआधीच दमदाटी करीत असतो.
शेजारीण विधवा, मुलीसह एकटी राहात असते.
वकिलीणबाईंना (सुरुवातीला केसमध्ये दम नाही असं वाटत असतं पण कालांतराने ) साक्षात्कार होतो की अरे , माझाही आवाज ” माझा ” नाही. सगळं माझ्यावतीने कोणीतरी ठरवतंय.
मोलकरीणीच्या नशिबी ” उठता लाथ , बसता बुक्की ” हे भागधेय असतं.
आणि नायिकेचं काय ?
विवाहापासून समजूतदारपणे (?)- तिने घर, त्याने ऑफिस अशी वाटणी स्वीकारलेली ! विनातक्रार !!
रोज पहाटे सहाला गजर लावून उठणे , स्वतःचे आवरत, आवडीची गाणी ऐकत माफक बागकाम , शेजारणीला हाय -हॅलो ! नवऱ्याला गुड -मॉर्निंग म्हणत गरमागरम बेड टी, सासूचं दैनंदिन शुगर लेव्हल तपासणं, घाईघाईत डबा आणि कारपर्यंत नवऱ्याच्या दिमतीला -हवं नको ते बघणं ! तो गेल्यावर मुलीची डान्स प्रॅक्टिस ! सगळं रुटीन सेट -थप्पड मिळेपर्यंत !!
आसपासच्या सगळ्याजणी तिच्या लढ्यातून आपापल्या नात्यांकडे (पतीशी असलेल्या) बघायला लागतात. तुरटी नाती “नितळ ” करायला सुरुवात करते.
वकिली डावपेचांनी विचलित न होता ती स्वसम्मानासाठी झगडते आणि जिंकते.
शेवटी (कां होईना ) इतकी “प्रचंड “किंमत चुकविल्यावर पतीला माफी मागावीशी वाटते. सासू कबूल करते – ” माझ्या अप ब्रिन्ग गिंग मध्ये काहीतरी चुकलं ! तसं तुझ्या आईचेही चुकलेच जेव्हा तिने एवढ्या तेवढ्यावरून घर मोडून माहेरी येऊ नकोस असे तुला बजावले तेव्हा ! ” मोलकरीण चक्क नवऱ्याला थोबाडते. वकिलीणबाई घर सोडतात , भाऊ (होणाऱ्या )वहिनीची माफी मागतो, सासूबाई सासरेबुवांबरोबर राहू लागतात , वडील आईला हार्मोनियम आणून देतात आणि तिचे विसरलेले हास्य कृतकृत्यतेने पाहतात.
एक थप्पड किती घरं ( आणि नातीही ) सावरते. गम्मत म्हणजे नायिका आपल्या पतीला आणि इतर नातेवाईकांना एक सोप्पा प्रश्न विचारते – ” तुम्हांला कोणालाही या कृत्याबद्दल खटकलं नाही , साधा निषेध करावासा वाटला नाही, याला खडसावून विचारावंस वाटलं नाही?”
सगळे निःशब्द असले तरी माझ्या गालावर ही चपराक बसली.
लहानपणी भुसावळला आसपास शेजारी आणि क्वचित नातेवाईकांमध्ये हे प्रकरण मी पाहिल्याचं (आणि विसरून गेल्याचं ) खाडकन आठवलं. नातेवाईक स्त्रिया आसवं लपवत माझी नजर कां चुकवायच्या हे कळलं . गल्लीतल्या टेलरने फक्त आपली बायको परपुरुषाशी बोलते या वहिमावर तिला जाळून मारल्याचे नजरेसमोर आलं.
असं का ? मला वाटतं शाळेपासून आजतागायत “स्त्री सम्मान ” हा विषय आम्हांला कधी अभ्यासक्रमात नव्हताच. अगदी नुकत्याच (गाजावाजा करून सुरु केलेल्या ) मूल्य शिक्षणात असलेल्या दहा तत्वांमध्येही हे मूलभूत मूल्य नाही. जोतिबा फुले / न्या.रानडे अशी केस स्टडी वाली जोडपी परीक्षेत जरूर होती पण घरातील आणि समाजातील स्त्रियांचा सम्मान करायचा असतो हे आम्ही ऑप्शनलाच टाकलंय.
“इतनी ” सी बात समजावून घ्यायला शेवटी २०२० साल उजाडलं. बरी असते अशी तुरटी (आणि थप्पडही) अधून -मधून !!
Leave a Reply