“ते ची प्रिया” या ललिता ताम्हाणे लिखित आत्मचरित्राच्या माध्यमातून अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचा नवीन प्रवास तसंच त्यांनी कला क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दलचा अगदी हळूवारपणे ठाव घेण्यात आलेला आहे. या पुस्तकाचा वेध घेऊन त्यांच्या स्मृतींना वाहिलेली मन:पूर्वक शब्दांजली.
१९ सप्टेंबर २००२ हा दिवस मराठी व हिंदी मनोरंजन विश्वाला तसंच वाङमय वर्तुळाला देखील चटका लावून गेला कारण याच दिवशी एका गुणी कलाकाराला रसिकजन कायमचे मुकले, ते नाव होतं अभिनेत्री प्रिया तेंडुलकरांचं! कर्करोगासारख्या असाध्य आजारानं त्यांना ग्रासलं आणि आयुष्यातून अचानकपणे झालेली त्यांची एक्झिट ही कायमची चटका लावणारी ठरली. १९ सप्टेंबर २०१२ हा प्रिया तेंडुलकरांचा दहावा स्मृती दिन याच दिवशी, ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीदादा जुकर यांच्या हस्ते “ते ची प्रिया” – एक जीवनप्रवास या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं; डिंपल पब्लिकेशन्स द्वारे प्रकाशित १७६ पानी असलेलं पुस्तक म्हणजे प्रिया तेंडुलकरांचा बालपणापासूनचा, त्यानंतर त्यांच्या तरुणपणातील व्यक्तीमत्वाचा, महाविद्यालयीन देशातील, साहित्यिक, मॉडेल, फॅशन डिझायनर, अभिनेत्री म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे माणूस त्यांची प्रतिमा याविषयीचा समग्र आढावा लेखिकेनं या आत्मचरित्राच्या माध्यमातून मांडलेला दिसतो; पुस्तकाच्या मुखपृष्ठावर राजू आसगावकर यांनी प्रिया तेंडुलकरचं काढलेलं लोभस आणि बोलकं छायाचित्र वाचकांचं लक्ष वेधून घेतं; या छायाचित्राची “ब्लॅक अॅण्ड व्हाईट” रंगात मांडणी पुस्तकाच्या मलपृष्ठांमधल्या छायाचित्रांशी अगदी सुसंगत अशीच आहे.
“मनातलं…” ह्या ललिता ताम्हाणेंच्या मनोगतामध्ये त्या सांगतात, “मी प्रियावर पुस्तक लिहावं, हे खरं तर एक विचित्र योगायोग आहे;” ललिता ताम्हाणे स्वत: एक पत्रकार आणि लेखिका म्हणून सर्वांना परिचयाच्या असल्या तरी प्रिया तेंडुलकरांच्या अगदी जवळच्या स्नेही आणि मैत्रीण सुद्धा; या मनोगतातून यापुढे असंही सांगतात की “स्मिता पाटील”, “नूतन” यांच्याप्रमाणेच इतर कोणत्याही जिवलग व्यक्तीबद्दल लिहिण्याची दुर्दैवी वेळ माझ्यावर इथून पुढे न येवो ही प्रार्थना” पण म्हणतात ना नियतीला काहीतरी वेगळच मंजुर असतं आणि “निर्मितीची प्रक्रिया सुरु होये”, त्यापुढे असंही सांगतात की “मी प्रियावर पुस्तक लिहितेय खरी, पण कुठेतरी प्रियाचंही या सगळ्यावर अगदी बारीक लक्ष असणार कदाचित, मी तिच्यावर पुस्तक लिहावं, ही प्रियाची इच्छा असणार,” असं त्या मनोभावे नमूद करतात.
या पुस्तकाच्या निमित्ताने प्रिया तेंडुलकरांचा अभिनेत्री म्हणून मॉडेलिंग पासून सुरु झालेला कलेचा प्रवास, त्यांनी विविध भाषिक चित्रपटातून अभिनेत्री म्हणून साकारलेल्या व्यक्तिरेखा, त्यानंतर दूरदर्शन वर “रजनी” सारखी मेगा मालिका, त्यामुळे प्रिया तेंडुलकरांना मिळालेली लोकप्रियता, मराठी तसंच हिंदी रुपेरी पडद्यावर असलेलं त्यांचं स्थान हे सर्व छायाचित्रांसकट आपल्यापुढे मांडलेली दिसतात.
अभिनयाव्यतिरिक्त सुद्धा प्रियाजींचे इतर व्यवसायातील अनुभव; उदाहरणार्थ- हवाई सुंदरी, फॅशन-ड्रेस डिझायनिंग, आणि लेखिका म्हणून अगदी समर्पकरित्या कथन करण्यात आलेले आहेत.
प्रिया तेंडुलकरांचं खासगी व व्यावसायिक आयुष्याची सरमिसळ कुठेही चारित्र्यातून झालेली दिसत नाही, उलट त्याची मोट पक्की बांधली गेल्यामुळेच हे चरित्र अधिक औत्सुक्य वाढवत ठेवतं; उल्लेख करावा ते म्हणजे लेखिकेनं प्रियाच्या निकटवर्तीयांचा तसंच तीला घडवणार्या व्यक्तींचा संदर्भ दिलेला आहे, व त्यांचे आभार मानायला त्या विसरल्या नाहीत; पुस्तकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अधून मधून प्रियाजींचे विविध प्रसंगातील, मुड्स मधील छायाचित्र, आणि त्याला दिलेली कॅप्शन वाचनीय आहेत.
एकूणच प्रिया तेंडुलकर यांनी स्वत:ची रुपेरी दुनियेत, आणि साहित्यिक म्हणून निर्माण केलेली स्वतंत्र ओळख लेखिकेनं “तें….. ची मधून कथन केलं आहे. कुठेही आपले वडिल विजय तेंडुलकर यांची ओळख न दाखवता आयुष्यातलं स्वत:चं स्थान ज्या पद्धतीनं प्रियाजींनी खासगी व व्यावसायिक आयुष्यात साकारलेलं आहे हेच या पुस्तकातून देखील प्रतिबिंबित झालय.
पुस्तकात बर्याचदा “रजनी” या भूमिकेचा उल्लेख झालाय पण तो आवश्यक ही होताच; जेव्हा जेव्हा प्रिया तेंडुलकरांच्या नकारात्मक बाबींचा उल्लेख झालाय मग तो त्यांच्या खासगी वा व्यावसायिक जीवनातला असो, त्यावेळी लेखिकेने शब्दांची सकारात्मक रचना करुन, प्रियाजींचं रसिकांच्या मनात असलेलं स्थान घट्ट केल्याचा प्रयत्न दिसून येतो, त्यामुळे मधेच काहिसं एकांगी चरित्र वाटू लागतं, पण या गोष्टी सारख्या न झाल्यामुळे पुस्तक कंटाळवणा नक्कीच वाटत नाही उलट प्रिया तेंडुलकरांच्या व्यक्तिमत्वाविषयी उत्कंठा वाढवणारं ठरतं.
एकंदरीत सहज, सोप्या आणि ओघावती भाषा यामुळे लेखिका प्रिया तेंडुलकरांचं आयुष्य आपल्या समोर कथन करतेय असं वाटत रहातं, आणि आपण ही या आत्मचरित्र्यात गुंग होऊन कधी पुस्तक वाचून संपवतो हे देखील कळत नाही; प्रिया तेंडुलकरांचं व्यक्तित्त्व आणि कलाकार म्हणून तीचं जीवन जाणून घ्यायचं असल्यास हे पुस्तक आवर्जुन विकत घ्यावं, विशेषत: आजच्या तरुण पिढींना ह्या पुस्तक किंवा चरित्राच्या माध्यमातून खूप शिकण्यासारखं आहे.
— सागर मालाडकर
Leave a Reply