कलांची पालखी आपण आपल्या सगळ्या मनोव्यापारांबरोबर नकळत वाहात असतो. त्या निसर्गातील दैनंदिन घटितांतील असोत वा मानवी कल्पनेतून सर्जन झालेल्या असोत.
कला या “जनरिक” शब्दात व्यक्तीच्या हातून जन्माला येणाऱ्या – चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण अशा मानवी स्पर्शनिर्मित गृहीत असतात तर चित्रपट, नाटक, बॅले या “स्पेशलाइज्ड” आणि सामूहिक कला मानल्या जातात आणि त्यांत मानवेतर घटकांचे (वाद्य, रंगभूषा, प्रकाशयोजना इ) मोठे योगदान असावे लागते.
अलीकडे “पिंजर ” पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवले- अमृता प्रीतम, गुलज़ार, उत्तम सिंग, चंद्रप्रकाश द्विवेदी, वडाली बंधू, मनोज तिवारी, उर्मिला मातोंडकर अशा सर्व बिनीच्या लोकांनी स्वतःचे सर्वोत्तम येथे सादर केलेले आहे. फाळणीची पार्श्वभूमी या साऱ्यांच्या वेदनांना पुरून उरते. म्हणून असे चित्रपट कायम लक्षात राहतात.
तेच नाटकांचे, तेच संगीत मैफिलीचे (त्यांत दिवाळी पहाट आलीच- कोरोनापूर्वी २०१६ साली यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भावगंधर्व हृदयनाथजींच्या मार्गदर्शनाखाली- सलील कुलकर्णी, मधुरा दातार आणि विभावरी आपटे-जोशी यांची पहाट अजूनही रुतून बसलीय.)
कलेच्या निर्मितीमधून (पडद्यामागच्या कलावंतांना) मिळणारा आणि अशा रंगमंचावरून सादरीकरण करण्यातून मिळणारा यापैकी कोणता आनंद थोर ,या प्रश्नाचे मला आजही उत्तर मिळत नाही.
म्हणजे परवा १२,५०० वा प्रयोग सादर करण्यापूर्वी सर्वदूर प्रसिद्धी झाली, नोंद घेतली गेली म्हणून झालेला आनंद हा प्रशांत दामलेंसाठी महत्वाचा की प्रयोग सुव्यवस्थित पार पडल्यावर झालेल्या कौतुकवर्षावाचा कृतार्थ पण शोषून घेणारा झालेला आनंद त्यांच्यासाठी मोठा?
यश,कीर्ती,धनप्राप्ती,प्रसिद्धी, आणि आनंदानुभवाचे वाटप (स्वतःला आणि श्रोते/वाचक/प्रेक्षक) ही सारी प्रयोजने मान्य पण आमचे एक सर त्याला एका शब्दात बांधायचे-
कलानिर्मिती “स्वान्तसुखाय ” असायला हवी. म्हणजे वरील सर्व प्रयोजने आपोआप “बाय प्रॉडक्ट्स ” ठरतात.
आता हा “स्वान्तसुखाय” प्रकार दीर्घजीवी कसा करायचा कारण सुख स्वतःच अल्पजीवी असते. आत्मानुभवाचे प्रकटीकरण हा कलेच्या उन्नयनाचा सर्वमान्य मार्ग, पण तो अन्य हृदयांना भिडला तरच रोज “त्रिपुरी” पौर्णिमा. मग असे दिवे विझल्याचे दुःख मंदिरातील मूर्तीला होणार नाही.
प्रतिभेशिवाय कला संभवत नाही आणि तिला स्वतःचे असे “शील” असल्याशिवाय ती टिकत नाही.
मात्र कलेला कोणाच्याही पदरी “बटीक ” करून ठेवले तर ती आपण होऊन झाकोळते. कलेची निर्मिती स्वतःच्या अटी -शर्तींवरच व्हायला हवी.
पण आजच्या “बाजार” व्यवस्थेने तिला जखडून ठेवले आहे. नाटकाचा प्रयोग आजकाल फक्त शनिवार-रविवार संभवतो. दृश्यकला कलादालनांमध्ये बंदिस्त झालेल्या आहेत. चित्रपट ” शुक्रवार ते रविवार ” या तीन दिवसांमध्ये स्वतःचे भविष्य ठरवितो. व्याख्याने ऐकली जात नाहीत. वक्तृत्व/वादविवाद/कथाकथन स्पर्धा कशाबशा पार पडतात, त्यांचे प्रतिसाद क्षीण झाले आहेत. दिवाळी अंकांची संख्या भलेही वाढली असेल, त्यांत दर्जेदार तीन किंवा चार !
कलेची गरज संपत आली असेल किंवा तिला आता लोकानुनय करून स्वतःचे फॉर्म्स बदलावे लागतील.
कलेलाही “कालाय —— ” म्हणायची पाळी आलीय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply