द चेंज.. (कथा ) – भाग-१
वेदने पुन्हा एक सिगारेट शिलगावली, इतक्यात खात्याचं दार उघडून बलराम आत आला. काळा करपल्यसारखा चेहरा अर्धी पॅन्ट व त्यावर किंचीत भोकं पडलेलं अर्ध्या बाह्याच बनियन!
“मास्तर चहा!” असं म्हणत त्याने चहाचा पेला टेबलावर ठेवला, व तो निघून गेला. वेद पुन्हा विचारात गढून गेला. थंडीच्या दिवसांत नाईट शिफ्टला चहा पिण्याची मजा काही औरच! त्यात बलरामची चहा करण्याची खासियत काही वेगळीच होती.
वेदला चहाच्या घोटाबरोबर वैदेहीचे विचार अस्वस्थ करु लागले. .
या जगात जशी पॉझिटिव्ह शक्ति आहे, तशीच निगेटिव्ह शक्तिही आहे. आणि त्याचमुळे या जगात चांगल्या गोष्टींबरोबर अनेक अमंगल अशा गोष्टी घडत असतात. पॉझिटिव्ह शक्ति म्हणजे देव, देवपण.. सुमंगल गोष्टी, तर निगेटिव्ह शक्ति म्हणजे भूत पिशाच्च,राक्षसीपणा.. अमंगल गोष्टी!
तुम्ही जर देव ही होकारात्मक शक्ति मानता तर मग भूत पिशाच्च ही नकारात्मक शक्ति का मानत नाहीत? भूत म्हंटले म्हणजे, कुठे आहे भूत दाखवा असं म्हणता, मात्र देवाला न पाहताही त्यावर विश्वास ठेवता!
तिच्या म्हणण्यानुसार देव व भूत या दोन परस्परविरोधी अशा शक्ति आहेत. त्या कधीही दिसत नाहीत पण त्या सतत कार्यरत असतात! जे जे सुमंगल घडते, ते देव या दैवी शक्तिमुळे आणि जे जे अमंगल घडते ते भूत या वाईट शक्तिमुळे. मानवाने आपल्या सोईप्रमाणे देवालाही मानवी रुप दिले आणि भूतालाही! खरंतर या दोन्ही शक्तिंना कोणतीही रुप नसतात. त्या शक्ति अदृश्य असतात, त्यांचे बरेवाईट परिणाम आपण फक्त अनुभवू शकतो.
वैदेही बोलण्यात हार मानायची नाही आणि वेदला तिचे विचार पटायचे नाहीत!
रात्रीचा एक वाजला, तसा वेद खात्यामध्ये फेरी मारण्यासाठी उठला. खात्याचं दार उघडताचं, मशिनींचा धाड धाड आवाज त्याच्या कानात शिरला! दहापैकी सात सुल्झर मशिन्स धडाधड कपडा बाहेर फेकत होत्या. तर तिन मशिन्स या ना त्या कारणाने बंद होत्या. हातातला लांबलचक स्क्रू ड्रायवर उलटा-सुलटा फिरवत वेद नऊ नंबर मशिनवर आला. झटकन त्याने मशिन बंद केली. दोन-तीन मिटर तरी ब्रोकन पिक्स गेले असावेत?
“सिताराम कुठे आहे रेऽ?” वेदचा आवाज संपूर्ण खात्यामध्ये घुमला, मशिन्सचा आवाजही जणू कमी भासावा!
पांडे दोन नंबर मशिनवरुन धावत आला.“क्या हुआ मास्तरजी?”
“क्या हुआ? इधर ब्रोकन पिक्स जा रहा है,और तुम लोग सो रहे हो क्या? कुठे आहे सिताराम?”
इतक्यात सिताराम डोक्याचा मफलर ठिक करत घाईघाईने आला, “मास्तर जरा एक नंबरला गेलो होतो!”
“जाता तेंव्हा सांगून जाता येत नाही का तुम्हांला,एक-दुसर्याला? कुणी नाही तर निदान हेल्परला तरी उभा करत जा तिथे, पण मशिन मोकळी सोडू नका! माझ्या शिफ्टमध्ये कॉलिटी व क्वांटिटी दोन्ही गोष्टी मला मेंटेन करायच्यात, पुन्हा अशी चूक होता कामा नये!”
वेद चिडला की त्याचा आवाज संपूर्ण खात्यात घुमायचा! पण तो उगाचंच कधी कामगारांना त्रास द्यायचा नाही. त्यामुळे त्याच्या तापट स्वभावाचं सुध्दा कामगारांना एक वेगळचं कौतुक वाटायचं!
(क्रमशः)
(वरील कथा ही संपूर्णतः काल्पनिक आहे.)
लेखक: श्री. सुनील देसाई
मोबाईल नंबर ९९६७९६४५४२
२५/०३/२०२२
Leave a Reply