माझं पहिलंच वर्ष होतं सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. व्यावसायिक रंगभूमी फोफावलेलं माहेरघर म्हणजे मुंबई एवढच माहित होतं. पण झाडीपट्टीला गेल्यावर कळलं आपलं विश्व खूप छोटं आहे. आजपर्यंत झाडीपट्टी बद्दल फारसं बोललं जात नाही किंवा त्याबद्दलची फारच त्रोटक माहिती उपलब्ध होती आणि एवढं व्यावसायिक स्वरुप असून सुद्धा तिथल्या लोकांमध्ये ही जागरुकता नव्हती. आणि ही माहिती जगासमोर यावी म्हणून झाडीपट्टी वर वेबसाईट काढण्याचं मनात आलं.
झाडीपट्टी म्हणजे आजुबाजूला गर्द झाडी (जंगल) आणि त्याजंगलातून जाणारी एक निमुळती वाट आणि अचानक एक छोटसं गाव येतं आणि त्या गावात नाटक होते. त्यालाच झाडीट्टी असे म्हणतात. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यात मिळून हा महोत्सव सर्व शेतकरी वर्ग दिवाळी ते होळी या चार महिन्यात उत्सवासारखा साजरा केला जातो. अगदीच याला आपण नाट्यपंढरी म्हणाले तर काहीच हरकत नाही.
मुंबई पुण्याकडच्या नाटकाचा कालावधी हा २ ते २:३० तासाचा असतो मात्र झाडीपट्टीच्या नाटकाचा कालावधी हा रात्रभर असले त्या दिवशी गावातल्या प्रत्येक घरात आसपासच्या गावखेड्यातून पाहुणे त्या घरात येतात. आणि अक्षरश: सण साजरा केल्यासारखे गावातील काही मंडळी, नाटक घेऊन येतात आणि ते नाटक पाहून तो शेतकरी वर्ग आपलं व आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांच मनोरंजन करुन घेतो व दुसर्या दिवशी घरचं जेवण करुन मंडळ आपल्या घरी परततात.
अतिशय उत्कृष्ट साचेबंद सादरीकरण, लाईव्ह म्युझिक, कमी गोष्टीमधे उत्तमोत्तम कला सादर करताना आणि ती कलाकृती पाहताना असे वाटते की आपण एखादा सिनेमा पाहात आहोत की काय? या सर्व गोष्टी पाहिल्या नंतर असे वाटते की, या कलाकारांना बाहेरचा Platform उपलब्ध करुन दिला पाहिजे. आणि या कलाकारांचे कौतुक जगातल्या प्रत्येक संवेदनशील माणसाने करावयास हवे.
मुंबईसारख्या व्यावसायिक रंगभूमीवर नाटकाला प्रेक्षक नाही अशी ओरड होत असते, त्यातल्या त्यात तरीही निर्माता नाटक लावतो, त्यातही बुकींगची बोंब, तरीही त्या नाटकातला मुख्य नट बाहेर छाती फुगवून अभिमानाने सांगत असतो की फक्त आमच्याच नाटकाला २०,००० ते ४०,००० बुकींग आहे पण झाडीपट्टीत मात्र प्रत्येक नाटक हे हाऊसफुल्लच असतं आणि कलावंतही मातीतले, म्हणजे ग्लॅमर नसलेले पण त्यांना मात्र बुकींग ८० ते १.३० लाखापर्यंत असते. एकदा तरी झाडीपट्टीला भेट द्यावी. असे वाटते. त्या झाडीपट्टी रंगभूमीला शतश: नमन.
— सुनिल अष्टेकर
Leave a Reply