नवीन लेखन...

मी पाहिलेली ऊर्जा

अखंड ऊर्जेचे नैसर्गिक वरदानच त्यांना लाभलं होतं जणू! ‘तुझ्यापाशी जे जे  काही आहे ते मुक्त हस्ते समाजाला देत राहा तू,’ असा ईश्वरी संकेत त्यांना मिळाला असावा बहुधा आणि त्यांनी तो आयुष्यभर इमाने-इतबारे पाळला. गोरगरिबांना यथाशक्ती दानधर्मही केला.

‘ऊर्जा म्हणजे काय? याचं नेमकं मी पाहिलेलं, जवळून अनुभवलेलं प्रत्यक्षदर्शी रूप म्हणजे आमचे बाबा! माझ्या बालपणापासून त्या रूपाच्या नानाविध लोभस छटा मला मोहवून गेल्या आहेत! आमचं प्रवरेकाठचं छोटसं तालुक्याचं ‘अकोले’ गाव! त्या गावात, खरंतर केवळ गावातच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीत वेदशास्त्र संपन्न वासुदेवशास्त्री धर्माधिकारी हे नाव दुमदुमत होतं. मला तर नं, बाबांच्या या नावापासूनच त्यांच्याविषयी विलक्षण कुतूहल वाटाचयं. माझ्या बालबुद्धीनुसार ते किती मोठे आहेत हे फक्त कळत होतं. पण का मोठे आहे हे पुरेसं उलगडत नव्हतं, मात्र जेव्हा उलगडलं तेव्हा त्या कळत्या वयात मी त्यांची मुलगी असणं हे मला खूप अभिमानास्पद वाटायला लागलं. संस्कृत भाषेचा त्यांचा गाढा व्यासंग, त्यांची अमोघ वाणी, त्यांचं सामाजिक भान, त्यांची मेहनती वृत्ती, त्यांचा गाता गळा, आचारविचारातील त्यांचं सच्चेपण अशा साऱ्या, गुणवत्तेतून प्रचंड ऊर्जा त्यांच्यामध्ये ठासून  भरलेली होती! संगीत नाटकात त्यांनी स्त्री भूमिका केल्या होत्या.  असंही जुनीजाणती मंडळी सांगतात.

पहाटे पाच वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम सुरू होत असे.  प्रवरा नदीवर स्नानाला जाणं हा त्यांचा नित्य नेम होता. ऋतू कोणताही असू दे, त्यात खंड पडत नसे. ‘जय  गंगे, जय प्रवरे’ अशी आरोळी ते स्नानाच्या वेळी तार सप्तकात देत. त्यामुळे अख्ख अकोले गाव जागं होई. स्नान करून घरी आल्यानंतर आमच्या प्रशस्त देवघरात साग्रसंगीत देवपूजा ते करीत. पूजेसाठी मुबलक ताजी ताजी फुल मिळाली की, त्यांना कोण आनंद होई! ‘आज देवाची पूजा अगदी ‘गरगरीत’ (त्यांचा ठेवणीतला शब्द!) झाली असं ते मोठ्या समाधानाने सांगत. पूजाअर्चा करताना त्यांनी अवाजवी कर्मकांडाला कधीच महत्त्व दिलं नाही. पूजेतील मंत्रोच्चारातून घरादाराला शांती, समृद्धी, प्रसन्नता लाभते हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांच्या स्वच्छ-स्पष्ट मंत्रोच्चारात एक अद्भुत सामर्थ्य असल्याचा अनुभव अनेकांनी अनेकदा घेतला आहे. पायात लाकडी खडावा चढवून चपळतेने चालणारे वयाची साठी पार केलेले बाबा हे ऊर्जेचं मूर्तिमंत, जितंजागतं उदाहरणं होतं!’

एक उत्तम कीर्तनकार म्हणून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात ते ख्यातकीर्त होते. खणखणीत आवाज, ओघवतं वक्तृत्व, कीर्तनाचा विषय खुलवून सांगण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे विषयाचा सखोल अभ्यास यामुळे त्यांची कीर्तनं अतिशय रंगतदार होतं, लहान-थोर सारेच दंगून जात त्या कीर्तनात! त्यांची कीर्तनं ऐकायला अलोट गर्दी का होते? या गोष्टीचा विचार करता एक गोष्ट प्रामुख्याने माझ्या लक्षात आली की केवळ धार्मिक विषयांच्या चौकटीत ते कधीच अडकून पडले नाहीत. तर त्याबरोबर सामाजिक, ऐतिहासिक विषयांवरची आख्यानंही कीर्तनातून त्यांनी आवर्जून ऐकवली. परिणामी वेगवेगळ्या स्तरातील, वयोगटातील मंडळी त्याकडे आकृष्ट झाली. संत गाडगे महाराजांच्या स्वच्छता अभियानाचा विषय तर अनेक वस्तुनिष्ठ दाखले देत लोकांपर्यंत पोहोचवला. त्यातून रंजन, उद्बोधन आणि उत्तम विचार मंथन असा तिहेरी हेतू सहज साध्य होत असे. त्यांचे ठिकाणी असलेल्या सामाजिक भानाला तिने प्रकर्षाने प्रत्यय येई. त्याचे सकारात्मक पडसाद आपसुकच सभोवतालच्या परिसरात उमटत असत.

त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संगीत सत्यनारायण पूजा! सत्यनारायण कथेच्या अनुषंगाने त्यांनी स्वतः वेगवेगळी कवने रचली. ती सुमधुर कवने ऐकताना मूळ सत्यनारायण कथेतील चमत्कृतीपेक्षा ती अर्थपूर्ण कवनंच श्रोत्यांना भारावून टाकीत असत. (माझ्यामध्ये जी कविता झिरपली ती बाबांच्या कवित्वातूनच असं मला ठामपणे वाटतं.) बाबांच्या उत्साहाला वयाच्या मर्यादेचा अडसर कधीच आला नाही. साठीनंतर, सत्तरीनंतरही अव्याहत त्यांची कामं सुरू होती. अखंड ऊर्जेचे नैसर्गिक वरदानच त्यांना लाभलं होतं जणू! ‘तुझ्यापाशी जे जे  काही आहे ते मुक्त हस्ते समाजाला देत राहा तू,’ असा ईश्वरी संकेत त्यांना मिळाला असावा बहुधा आणि त्यांनी तो आयुष्यभर इमाने-इतबारे पाळला. गोरगरिबांना यथाशक्ती दानधर्मही केला.

बाबांच्या आणखी एका कामगिरीची नोंद घ्यायलाच हवी. त्यांनी थोरांसाठी आणि मुलांसाठी गीता पाठशाळा सुरू केली. त्यांना स्वतःला भगवद्गीता मुखोद्गत होती. आम्हा भावंडांमध्ये  संस्कृत भाषेची बीजं पेरली गेली ती या पाठशाळेतूनच! संस्कृत  उच्चारण, पाठांतर, धीटपणे गीतेतील श्लोक सादर करण्याचा आत्मविश्वास या सार्या गोष्टींचा लाभ समस्त अकोलकर मंडळींना गीता पाठशाळेतूनच झाला. त्यामुळे आज या घडीलाही बाबा अनेकांच्या स्मरणात आहेत. ‘वासुदेव गुरू’ या नावानेच अकोल्यातील रहिवाशांनी त्यांना एक ज्ञानी पुरुष म्हणून भरभरून मानसन्मान दिला. परिसरातील मोठमोठे यज्ञयाग बाबांच्या मार्गदर्शनानुसार  संपन्न होत असत. त्यांच्या वाणीमध्ये एक अगाध शक्ती होती हे मान्य करायलाच हवं!

‘ऊर्जेला नाही सीमा’ अशी अपरिमित ऊर्जा ज्यांच्या कणाकणात सामावलेली असते, ऊर्जेचा चिरस्थायी स्रोत ज्याचे ठायी असतो ती माणसं भाग्यवंतच म्हणायची, आमचे बाबा तथा पंडित वासुदेवशास्त्री धर्माधिकारी हे त्यापैकी एक! त्यांची ऊर्जा जवळून पाहिलेली. त्यांची लेक म्हणून मीही भाग्यवानच! बाबांच्या अक्षय ऊर्जेला आणि त्याद्वारे त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाला मनोभावे सलाम!

-गौरी कुलकर्णी

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..