मानवाच्या वाढत्या गरजा, चैन, भोगवाद, चंगळवाद आणि जगण्याच्या नाना तऱ्हा तसेच वाढलेल्या सत्ता स्पर्धा त्यातून निर्माण झालेले कलह, लढाया आणि त्याला तोंड देता देता पर्यावरणाचा झालेला ऱ्हास भविष्यात आरोग्याच्या चिंता निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत.
मानवाला आपल्या दैनदिन जीवनात रोज कुठल्या ना कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागतं. त्यातून वाढलेली महागाई, रोज नव्याने भेडसावणारे विजेचे आणि पावसाचे संकट. अपुरा पाऊस, पाण्याची वानवा. जमिनीतील कोरडे होत जाणारे पाण्याचे साठे अश्या अनेक संकटांनी शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.
आपल्या जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. उर्जा वापराच्या प्रमाणावर उत्पादन, क्षेत्रीय विकास व पर्यायाने जीवनमान अवलंबून आहे. उर्जेच्या पारंपारिक आणि अपारंपरिक साधनांचा समन्वयीत, यथोचित व काळजीपूर्वक वापर केल्यास आजच्या उर्जा संकटावर बऱ्यापैकी मात केली जाऊ शकते. उर्जेचे योग्य व्यवस्थापन, संयोजन, संवर्धन व नियमन केल्यास शेतकऱ्यांचे राहणीमान सुद्धा वाढेल. आजकाल अपारंपरिक सौर उर्जेवर चालणारी उपकरणे व योजना जसे सुर्यचुल, छोटे/मोठे सौर गिझर, रात्यावरील सौर दिवे, सौर फवारणी संच, सौर सिंचन व्यवस्था, सौर गृह प्रकाश प्रणाली, विजेरी प्रभारण, पवन चक्की, जैववायू संयत्र, कृषी अवशेषापासून विद्दुत निर्मिती प्रकल्प इत्यादी वापरत आहेत.
सौर घट हा सौर फोटोव्होलटिक यंत्रणांसाठी एक प्राथमिक उपकरण आहे, कारण ते सौर किरणांना वीजेत रुपांतरित करते. सौर घट हे अतितरल सिलिकॉनपासून बनविलेले पत्रे असतात, त्यांचा आकार आवश्यकतेनुसार कापलेला असतो. अशा अनेक एसपीव्ही घटांना जोडून आवश्यक क्षमतेचे एक एसपीव्ही मोड्यूल बनवले जातात. अशी मोड्यूल्स पुढे एकमेकांना जोडून एसपीव्ही पत्रे तयार केले जातात जेणेकरुन पंपांसारख्या विद्युत उपकरणांना चालविण्यासाठी आवश्यक ऊर्जेचे उत्पादन होऊ शकते.
सौर उर्जेचा प्रार्थमिक खर्च बराच असतो पण ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. दिवसातील बरेच तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. रात्री आपण सौर ऊर्जेची विजेर्यात साठवण करून ती आपल्या पाहिजे तेव्हा उपयोगात आणू शकतो यासाठी खर्च सुद्धा जास्त होत नाही. सुर्यापासून मिळणारी सौरऊर्जा आपला दिवस व वेळ बदलत नाही. म्हणून बदलत्या काळानुसार आपण जास्तीत जास्त प्रमाणत सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास शिकले पाहिजे.
सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर नाहीत. किमती नियंत्रणात ठेवतानाच पेट्रोलियम इंधनांच्या बरोबरीने अन्य पर्यायांचा विचार होणे, सध्याच्या परिस्थितीत खूप आवश्यक आहे. बायोडिझेलचा पर्याय हा त्यापैकी एक आहे. उस गाळपा नंतर तयार होणारे बायप्रॉडक्ट इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून वापरण्याबाबत तेल कंपन्यांनी सुरुवात केली होती. मात्र इथेनॉलचा वापर ऐच्छिक असल्याने या कल्पनेला फार प्रोत्साहन मिळू शकले नाही. दरवर्षी सुमारे काही कोटी लिटर इथेनॉल तयार होते. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतल्यास पेट्रोलचे दर कमी होऊ शकतील.
देशातील निम्म्याहून अधिक वीज कोळशाद्वारेच तयार होते. कोळसा खाणींतील भ्रष्टाचार, उपलब्धतेकडील दुर्लक्ष आणि पर्यायी स्रोतांचा अभाव देशातील वीज निर्मिती प्रक्रियेवर विपरीत परिणाम करतात आणि विजेची मागणी आणि पुरवठा यांतील तफावत गुणोत्तर गतीने वाढते. विजेची मागणी आणि पुरवठा यांतील तफावतीमुळेच ग्रिडमधून वीज चोरीचे प्रकार बऱ्याच वर्षांपूर्वी काही राज्यांनी केले आणि त्याचा विपरीत परिणाम काही राज्यांना अंधाराचा सामना करण्यात झाला. याचा राज्यांवर आर्थिक आणि सामाजिक परिणाम झाला तो वेगळाच.
देशात वीजनिर्मितीच्या क्षमतेत सतत वाढ होऊनही विजेचा तुटवडा कायम आहे. देशाची ऊर्जेची गरज तीन ते साडेतीन टक्क्यांनी वाढत असून विजेची मागणी ग्राहकांकडून आठ टक्क्यांनी दरवर्षी वाढते अशी सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीच्या वार्षिक अहवालातील आकडेवारी सांगते. आजही भारतातील काही गावे, घरे आणि काही कोटीच्या घरातील माणसे विजेपासून वंचित आहेत.
कोळसा व खनिज इंधनांपासूनची वीजनिर्मिती ७०%, जलविद्युत २०%, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर आधारित वीजनिर्मिती १० ते १२% आणि अणु-वीजनिर्मिती जेमतेम २ ते ३% असे वीजनिर्मितीच्या स्रोतांचे प्रमाण आहे. देशातील एकूण वीजनिर्मितीपैकी अर्ध्याहून अधिक वाटा एकटया कोळशाचाच आहे. कोळशाला पर्याय औष्णिक वीजनिर्मिती आणि दुसरा स्रोत म्हणजे नैसर्गिक वायू. मात्र, या स्रोतातून सध्या उपलब्ध होणारी वीज कमी आहे आणि वायुसाठे सापडत असले तरी ते वीजनिर्मितीच्याच कामी येतील याची शाश्वती नाही.
देशातील इंधनाचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी अणु-वीजनिर्मितीचा पर्याय आहे. पण तो वादग्रस्त आहे. पर्यावरणात निमार्ण होणाऱ्या असतोलामुळे स्थानिकांचा विरोध, पुनर्वसन, भूसंपादनाच्या भरपाईचे न सुटलेले प्रश्न, अणुइंधनाच्या पुरवठय़ातील आणि तंत्रज्ञान मिळण्यातील अडथळे, अणु-वीजनिर्मितीचा खर्च व सुरक्षिततेचे प्रश्न, या जंजाळात अणु-वीजनिर्मितीचा पर्याय अडकलेला आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा हे दोन अन्य पर्याय पर्यावरणनिष्ठ मानले जातात. वीजगळती पूर्णतः थांबणे. या सगळ्या पर्यायी स्रोतांचा पुरेपुर वापर केला तर इंधनाचे प्रश्न सोडविण्यात काही अंशी सफलता मिळेल.
दिवसेंदिवस भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढतच आहे. रत्यांची दुर्दशा, सार्वजनिक वाहतुकीतील अनियमितता, खालावलेला दर्जा आणि अयोग्य व्यवस्थापनामुळे नागरिकांचा कल स्वत:चे वाहन ठेवण्याकडे वळला आहे त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ रत्यावर जास्त दिसते. कमी म्हणून की काय पावसाळ्यात रात्यांवर पाणी तुंबून वाहतूक कोंडीत वाढ होते. दुसऱ्या बाजूला इंधन तेलांचा वापरात बेजबाबदारपणा वाढला आहे. देशातील खनिज तेलांचा साठा मर्यादित आहे. अशा वेळी सर्वसामान्य माणसाची उर्जेची बचत खूप महत्त्वाची आहे. या परिस्थितीचे गांभीर्य देशातील नागरिकांना असल्याचे त्यांचा कृतीतून जाणवत नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे की ही ऊर्जा जाणिवेची पहाट आपल्या देशात कधी उगवणार आहे की नाही? अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात उर्जेचा प्रश्न नक्की बिकट रूप धारण करेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. तर वेळीच सरकार आणि देशातील जनतेने आपल्या समोरील इंधनाचा यक्ष प्रश्न विचारात घेऊन सौर उर्जेचा विचार करणे काळाची गरज ठरणार आहे.
— जगदीश पटवर्धन
नमस्कार.
लेख आवडला.
– सोलर फोटोव्होल्टाइक सेस्स् ची इफिशियन्सी ५-६ टक्कयापासून आतां १२-१५ पर्यंत वाढली असली तरी, तीअजूनही खूप कमी आहे.त्यामुळे ते इस्टॉलेशन महाग पडते,. म्हणूच सरकार त्यावर सब्सिडी देते.
– आपण सोलर थर्मलचा उल्लेख केलेला दिसला नाहीं. ( की मी तो miss केला ?). पण, तीही महत्वाची आहे.
– विंड पॉवरचा उल्लेख आपण केलेला आहे. मुख्य म्हणजे, तेथे वार्याची गती फार महत्वाची आहे, व त्यामुळे सर्वत्र तशी इस्टॉलेशन्स उभारता येत नाहींत. अन्नामनी यांच्या अभ्यासपूर्ण पुस्तकात, भारतातील अनेक ठिकाणांतील वार्याच्या गतीची उपयुक्त माहिती दिलेली आहे.
– समुद्राच्या लाटांद्वारेही अपारंपारिक ऊर्जा निर्माण करता येईल. अर्थात्, इथे सरकारनेंच पुढाकार घ्यायला हवा.
– न्यूक्लियर पॉवरचे फायदे-तोटे आहेतच, आणि त्यावर चर्चाही खप चालूच आहे. ( पण असा प्रकारच्या ऊर्जेला पर्याय दिसत नाही). कदाचित, न्यूक्लियर फिशन पेक्षा न्यूक्लियर फ्यूजन अधिक safe असेल.
स्नेहादरपूर्वक
सुभाष स. नाईक