पं. मदनमोहन मालवीय म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. जनजागृती करण्यासाठी त्यांच्या विचाराचा प्रसार होण्यासाठी त्यांना ठिकठिकाणांहून सभेची आमंत्रणे येत असत व पं. मदनमोहन मालवीय हेदेखील आनंदाने अशा सभेत लोकांना मार्गदर्शन करून त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करीत असत. एकदा अशाच एका सभेत त्यांनी राग म्हणजे क्रोध हा माणसाचा कसा नंबर एकचा शत्रू आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. अविचाराने राग व्यक्त केल्यास त्याचे किती दुष्परिणाम होतात, तसेच क्रोध न आवरल्यामुळे प्रसंगी माणसाचा जीवही कसा धोक्यात येऊ शकतो हे त्यानी सोदाहरण पटवून दिले व रागावर माणसाने नियंत्रण ठेवल्यास सर्वांचाच कसा फायदा होतो, हेही सांगितले.
त्या सभेला एक गृहस्थ उपस्थित होते. शीघ्रकोपी असा त्यांचा लौकिक होता. त्यामुळे जेव्हा पंडितजींचे भाषण त्यांनी ऐकले तेव्हा त्यांना आपल्या शीघकोपी स्वभावाची आठवण झाली व त्याच क्षणी आपला स्वभाव बदलण्याचा, म्हणजे रागावर नियंत्रण मिळविण्याचा त्यांनी निश्चय केला. काही दिवसांतच ते रागावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाले. पुढे चालून त्यांची व पं. मदनमोहन मालवीय यांची एका कार्यक्रमात भेट झाली. त्यावेळी ते गृहस्थ म्हणाले, तुमचे त्यावेळचे मौलिक विचार ऐकून मी रागावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झालो आहे. तुम्ही मला कितीही शिव्या द्या, माझी कठोर भाषेत निंदानालस्ती करा किंवा सर्वांसमोर माझा कितीही अपमान करा, मला मुळीच राग येणार नाही.
पं. मदनमोहन मालवीय यांनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व रागावर नियंत्रण मिळविल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले. मात्र ते म्हणाले, तुमची परीक्षा घेण्यासाठी मी माझी जीभ कशाला विटाळू? कारण दुसऱ्याच्या चांगुलपणाची परीक्षा घेण्यासाठी स्वत: चांगुलपणा सोडून देणे हे केव्हाही हिताचे नसते.
पंडितजींचे हे नम्र भाषेतील उत्तर त्या गृहस्थालाही पटले व तो आनंदाने तेथून निघून गेला.
Leave a Reply