दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी झाला. १५ एप्रिल १९११ रोजी ख्रिस्ताचे जीवन हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यातून प्रेरणा घेऊन स्वदेशी चित्रपट व्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरविले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपट निर्मिति विषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. डोळ्यांवरील अतिताणाने त्यांना तात्पुरते अंधत्व आले; परंतु सुदैवाने मुंबईचे डॉ. प्रभाकर या नेत्रविशारदाने त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. १ फेब्रुवारी १९१२ रोजी ते इंग्लंफडला रवाना झाले. आवश्यक यंत्रसामग्री व कच्च्या् फिल्मची मागणी नोंदवून १ एप्रिल १९१२ रोजी ते भारतात परत आले. सर्व सामग्री १९१२ च्या मे अखेर हाती आल्यावर त्यांनी कुटुंबियांचे चित्रीकरण करून पाहिले व त्यानंतर जून-जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा एक मिनिटाचा लघुपट तयार केला. तो समाधानकारक वाटल्यानंतर ते मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले. भांडवलासाठी पत्नीुचे दागिनेही त्यांनी गहाण टाकले. लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार इ. सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र सहा महिन्यांत पूर्ण करून तो मुंबईच्या त्यावेळच्या सँड्हर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट एकूण २३ दिवस चालला. राजा हरिश्चंद्रानंतर फाळक्यांनी मोहिनी भस्मासूर या चित्रपटाची निर्मिती केली व तो १९१४ च्या जानेवारीत कोरोनेशन सिनेमामध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटासोबत पिठाचे पंजे हा एक विनोदी लघुपटही ते दाखवीत. पुढे सत्यवान सावित्री नावाचा आणखी एक चित्रपट तयार करून प्रदर्शित केला. आपला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट ३ एप्रिल १९१७ रोजी नव्याने पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रदर्शित केला. तसेच लंकादहन हा चित्रपटही त्याच वेळी तयार करून तोही प्रदर्शित केला. हा चित्रपट भारतभर लोकप्रिय झाला. महानंदा सारख्या दर्जेदार अशा एकूण ३८ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. १९१८ ते १९३४ या १६ वर्षांच्या काळात हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीने एकूण ९७ चित्रपट काढले. त्यांत फाळकेदिग्दर्शित ४० चित्रपट होते. तसेच गंधर्वाचा स्वप्नन विहार, खंडाळा घाट, विंचवाचा दंश, विचित्र शिल्प, खोड मोडली, वचनभंग इ. लघुपटही फाळक्यांनी दिग्दर्शित केले. दादासाहेब फाळके दिग्दर्शित सेतुबंधन हा हिंदुस्थान फिल्म कंपनीचा अखेरचा चित्रपट. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात येतो. दादासाहेब फाळके यांचे १६ फेब्रुवारी १९४४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply