डॉ ऱ्हेन आधुनिक काळातील हृदय-शस्त्रक्रियांचे जनक मानले जातात. १८९६मध्ये एका २२ वर्षीय रुग्णावर यशस्वी हृदय-शस्त्रक्रिया करून डॉ ऱ्हेन यांनी हृदयावरील शल्यचिकित्सेद्वारे करावयाच्या उपचार पद्धतीला खूपच वरच्या पायरीवर नेवून ठेवले. ‘हृदय हे शल्यचिकित्सेच्या परिघाबाहेर आहे’ असे त्या काळात मानले जात होते. परंतु ऱ्हेन यांनी तो परीघ विस्तारला व हृदय-शल्यचिकित्सा शक्यतेच्या मर्यादेत आणून ठेवली.
वास्तविक प्राचीन काळातील सापडलेल्या मानवी अवशेषांवर शस्त्रक्रियेच्या खुणा आढळून आल्या आहेत. निओलिथिक काळातील काही मानवी अवशेष संशोधकांना सापडले. त्यातील मानवी कवट्यांवर शस्त्रक्रियेच्या खुणा आढळून आल्या आहेत. तसेच प्राचीन इजिप्तमधील एडवर्ड स्मिथ पॅपिरस मध्येही शल्यचिकित्सेचा उल्लेख सापडतो. शल्यचिकित्सेचा इतिहास जरी पुरातन असला तरीही हृदय-शल्यचिकित्सा मात्र एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस उदयास आली असे मानले जाते. त्यापूर्वी हृदयाला झालेल्या जखमा प्राणघातक समजल्या जात होत्या. वास्तविक आंद्रे व्हेसेलीयस व विल्यम हार्वे यांनी काम करून हृदयाच्या जखमा बऱ्या होण्याची आशा निर्माण केली होती. तरीदेखील अशा जखमांची वर्गवारी ‘प्राणघातक’ गटातच मोडत होती त्यामुळे साहजिकच हृदयाच्या जखमांवर शस्त्रक्रिया करणे अतिशय जोखमीचे व दुरापास्त समजले जात होते. एकोणीसाव्या शतकात सुद्धा या संदर्भात काही विशेष उल्लेखनीय प्रगती झाली नव्हती. हृदयाला झालेल्या जखमांसाठी सांगितली जाणारी उपचार पद्धती म्हणजे रुग्णाला अगदी शांततेत पूर्ण विश्रांती देणे, हृदयाच्या सभोवतीच्या आवरणात साचलेले पाणी काढून टाकणे इ. एवढेच होते.
१८६८ मध्ये हृदयाच्या जखमांचे नैसर्गिक बरे होते यावर एक शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये अशा रुग्णांची बरे होण्याची शक्यता फक्त १०% एवढीच धरण्यात आली होती. हृदयाच्या बाह्य आवरणावर शस्त्रक्रिया करून, त्यावर टाके घालता येतात हे देखील १८८२ मध्ये सिद्ध झाले होते. तरी देखील मानवी रुग्णांवर अशी शस्त्रक्रिया करण्यास शल्यचिकित्सक फारसे उत्सुक नव्हते. १८९५ मध्ये कॅपेलन यांनी अशा प्रकारच्या शल्यचिकित्सेबद्दल शोधनिबंधही प्रसिद्ध केला होता. परंतु शल्यचिकित्सकांमध्ये यासंदर्भात अजिबात आशावादी दृष्टीकोन नव्हता. ‘हृदयाच्या शल्यचिकित्सेच्या सर्व नैसर्गिक मर्यादा आपण गाठल्या आहेत व यापुढे कोणताही शोध अशा जखमा बऱ्या करण्यास असमर्थ ठरेल’ असा अतिशय निराशाजनक सूरच जिकडे तिकडे होता.
इतक्या निरुत्साही वातावरणात ९ सप्टेंबर १८९६ रोजी डॉ लुडविग ऱ्हेन यांनी यशस्वी हृद्य-शस्त्रक्रिया केली. याबद्दल डॉ ऱ्हेन यांनी स्वतःच जो वृत्तांत कथन केला आहे तो पुढीलप्रमाणे, “रुग्णाच्या उजव्या व्हेंट्रीकलला भोसकले गेल्यामुळे जखम झाली होती. प्रचंड रक्तस्त्राव होत होता. मृत्यूच्या दारात पोहोचलेला रुग्ण माझ्यासमोर असताना, माझ्याकडे विचार करावयास अवधीच नव्हता. बारकाईने विचार करावा असे जरी वाटत असले तरी रुग्णाचे प्राण वाचविणे अधिक महत्वाचे होते, जरासा जरी उशीर झाला असता तरी रुग्णाच्या जीवावर बेतणार होते. ही परिस्थिती लक्षात घेता, दुसऱ्या कोणत्याही शल्यचिकित्सकानी मी जो निर्णय घेतला तोच घेतला असता.” डॉ ऱ्हेन यांनी पुढे लिहिले आहे की, “२२ वर्षे वयाचा हा रुग्ण हृदयाच्या अनियमित पडणाऱ्या ठोक्यांमुळे लष्करातून ३१ ऑगस्ट १८९६ ला बाहेर पडला होता. ७ सप्टेंबरच्या संध्याकाळी बागेत फिरत असताना अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी होऊन बेशुद्ध पडला. बऱ्याच तासांनंतर एका पादचाऱ्याला हा जखमी तरुण दिसला व तो त्याला रुग्णालयात घेऊन आला तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. रुग्णालयात दाखल झाला तेव्हा त्या जखमी माणसाचे कपडे रक्ताने माखले होते. तो पांढराफटक पडला होता. हृदयाचे ठोके अनियमित पडत होते व नाडी लागत नव्हती. त्याला झालेली जखम १.५ सें.मी. इतकी मोठी होती. सकृतदर्शनी त्याची फुफ्फ्से चांगल्या अवस्थेत दिसली. दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती थोडी सुधारल्यासारखी वाटली. जखमेवर बर्फाची पिशवी ठेवणे, पूर्ण विश्रांती, कँफरचे इंजेक्शन देणे असे उपचार चालू होते. त्याच्या शरीराचे तापमान ३८.२ अंश सेल्शियस इतके तर श्वासोच्छवासाचा वेग एका मिनिटास ६८ श्वास इतका होता. परंतु ९ सप्टेंबरला त्याची प्रकृती एकदम खालावली.” डॉ ऱ्हेन काही कारणाने बाहेरगावी गेले होते. ते परत आले तेव्हा रुग्णाची अवस्था बिकट झाली होती. डॉ ऱ्हेन यांनी जेव्हा त्या जखमी तरुणास प्रथम तपासले तेव्हा वर वर्णन केलेल्या अवस्थेत तो रुग्ण होता. डॉ ऱ्हेन यांनी सर्वप्रथम रक्तस्त्राव थांबविण्याचा निर्णय घेतला. रुग्णाच्या जखमेची अधिक परीक्षा केल्यानंतर त्यांनी ‘कार्डीओरॅफी’ (suturing the heart-in this case the right ventricle, and simultaneously relieving the cardiac tamponade) करण्याचा निर्णय घेतला.
या शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी डॉ ऱ्हेन जर्मन सोसायटी ऑफ सर्जरीने आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते. तेव्हा त्यांनी केलेल्या हृद्य-शस्त्रक्रियेची साद्यंत हकीगत कथन केली. आपल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले, “हा रुग्ण आता खडखडीत बरा झाला असून तो त्याचे रोजचे सारे व्यवहार सुरळीतपणे पार पाडतो. अजून मी त्याला खूप कष्टाची कामे करण्याचे परवानगी दिलेली नाही परंतु तो अतिशय आरोग्यदायी आयुष्य जगेल हे नक्कीच……..”
डॉ ऱ्हेन यांनी केलेल्या पहिल्या यशस्वी हृद्य शस्त्रक्रियेनंतर अशा प्रकारच्या बऱ्याच शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ ऱ्हेन यांनी अशा १२४ शस्त्रक्रियांचा करून असे निदर्शनास आणून दिले की शस्त्रक्रिया करण्यापूर्वी अशा प्रकारच्या जखमांमुळे रुग्ण दगावण्याची शक्यता ९०% होती ती शस्त्रक्रियेमुळे ६०% पर्यंत खाली आली. १९४३ साली ही शक्यता ५०% होती. तोही आकडा १९७९ सालापर्यंत १९% पर्यंत खाली आला. आज आधुनिक हृद्य-शल्यचिकित्सा अधिक प्रगत व सुरक्षित झाल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दगावण्याची शक्यता अत्यल्प एवढीच आहे.
शल्यचिकित्सा व विशेषतः हृद्य-शल्यचिकित्सेच्या प्रांतात डॉ लुडविग ऱ्हेन या नावाला एक वेगळेच वलय आहे. अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी शक्य करून दाखविली. ते खरेतर हृद्य-शल्यचिकित्सक नव्हते. परंतु प्रतिभेच्या बळावर त्यांनी शल्यचिकित्सेतील तंत्राचा सुयोग्य वापर करून हृद्य-शल्यचिकित्सेचे दालन खुले करून दिले.
१३ एप्रिल १८४९ ला जर्मनीतील आलेन्स्टाइन प्रांतात डॉ लुडविग ऱ्हेन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. वयाच्या २८साव्या वर्षी फ्रांकफुर्ट येथे त्यांनी स्वतःचा दवाखाना काढला. १८८६ मध्ये फ्रांकफुर्ट स्टेट हॉस्पीटलचे ते सर्जिकल डायरेक्टर झाले. त्यानंतर फ्रांकफुर्ट विद्यापीठात सर्जरीचे (शल्यचिकित्सेचे) प्रध्यापक झाले. त्यांचे शल्यचिकित्सेतील कौशल्य त्यांनी स्वतः अनुभवातून व स्व-शिक्षणातून संपादित केले होते. पहिल्या महायुद्धादरम्यान त्यांनी सर्जन जनरल म्हणून काम पाहिले. पहिली यशस्वी हृद्य-शस्त्रक्रिया करण्याचे श्रेय डॉ ऱ्हेन यांना जातेच, पण त्याशिवायदेखील वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. १८८० मध्ये डॉ ऱ्हेन यांनी पहिली थायरोडेक्टोमीची शस्त्रक्रिया केली. रासायनिक रंगांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांमध्ये ब्लॅडरच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे हे डॉ ऱ्हेन यांनी निदर्शनास आणून दिले इतकेच नव्हे तर त्याहीपुढे जाऊन १८९५ मध्ये त्यामागील रासायनिक कारणांचे विवेचन केले.
१९३०मध्ये डॉ ऱ्हेन यांचे निधन झाले. फ्रांकफुर्टच्या चेम्बर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीजतर्फे १९७४ सालापासून शल्यचिकित्सेतील उत्कृष्ट वैज्ञानिक कामगिरीसाठी ‘द लुडविग ऱ्हेन प्राईज देण्यात येत आहे. तसेच फ्रांकफुर्ट शहरातील एका रस्त्याचे ‘लुडविग ऱ्हेन ष्ट्रास’ असे नामकरण करण्यात आले आहे.
— डॉ हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे
Leave a Reply