काळाचा असा एक पैलू आहे जो तुम्ही शोधाल आणि जर प्रामाणिक असाल तर अनेक रत्ने तो तुम्हाला काढून देतो, तो पैलू म्हणजे ” इतिहास ” ! घडून गेलेले सत्य म्हणजे इतिहास ! न उलगडलेली अनेक सत्य, या इतिहासाच्या पानांमध्ये आजही सापडतात. इतिहासाचे फारसे न उलगडलेले असेच हे एक सत्य —
पूर्वापार शास्त्र धारण करणाऱ्या ब्राम्हण समाजाने वेळोवेळी शस्त्र धारण करून अतुल क्षात्रतेज दाखविल्याचे हजारो दाखले पुराणकाळापासून आढळतात. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तेव्हा ब्राह्मण – क्षत्रिय अशा जाती नव्हत्याच. एकेका प्रकारचे व्यवसाय, कर्मे, कार्य, जीवन पद्धती जोपासणारे अनेक समूह होते. आज आपण ज्याना जाती म्हणतो अशा कुठल्याही जातीतील कुणीही व्यक्ती, तप ( ज्ञान मिळवून ) करून अत्यंत विद्वान ऋषी – मुनी होत असत. हिंदू धर्मातील हजारो ग्रंथ अशाच ऋषी – मुनींनी लिहिलेले आहेत. यालाच नेमका सुरुंग लावला तो ब्रिटिशांनी ” जातीच्या वाती ” कुशलपणे पेटवून !
कॅप्टन टी.नेलोर याने अवधच्या नबाबाच्या तैनाती फौजेसाठी ब्राह्मणांची पहिली ” पायदळ रेजिमेंट ” सन १७७६ मध्ये उभारली. या रेजिमेंटमध्ये ब्राह्मण सैनिकांची भरती केली जात असे. या सैनिकांचा गणवेश खाकी फेटा, लाल कोट, गडद निळी पॅन्ट आणि पांढरे लेगिंग्ज असा होता. छातीवरील बिल्ला ( बॅज ) हा जहाजाच्या नांगराच्या आकाराचा होता आणि त्यावर सर्वात वर राजमुकुट आणि खाली ” BRAHMANS ” अशी अक्षरे होती. या रेजिमेंटने अँग्लो-नेपाळी १८१४-१६, दुसऱ्या अँग्लो- बर्मीज १८२४-२६, भरतपूर १८२६ या युद्धांमध्ये खूप पराक्रम गाजवल्यावर या रेजिमेंटला अनेक सन्मान प्राप्त झाले.
पहिल्या महायुद्धात ही रेजिमेंट आधी भारतामध्ये आणि नंतर एडनमध्ये लढली. नंतर ऑटोमन साम्राज्यविरोधात आणि पर्शियन गल्फमध्ये ही रेजिमेंट लढली. १९१४ मध्ये पहिल्या ब्राम्हण रेजिमेंटचे मुख्य केंद्र अलाहाबादला होते आणि तिसऱ्या ब्राम्हण रेजिमेंटला जोडलेले होते. १९२२ मध्ये ही रेजिमेंट, पंजाब रेजिमेंटची चौथी बटालियन म्हणून नियुक्त झाली. परंतु याच काळात भारतात ठिकठिकाणी ब्रिटिशांना आव्हान देणाऱ्या चळवळींना सुरुवात झाली. अनेक ठिकाणी त्याचे नेतृत्व ब्राह्मण करीत आहेत हे लक्षात आल्यावर, ब्रिटीश सरकारने १९३१ मध्ये या रेजिमेंटचे नावही रद्द केले. या पहिल्या ब्राह्मण ” पायदळ रेजिमेंट ” चा ध्वज पुण्यातील ” राष्ट्रीय संरक्षण अकादमी” ( NDA ) च्या संग्रहालयात, सर्व्हिसेस गॅलरीमध्ये आजही जतन करून ठेवण्यात आला आहे.
बिटिशांना ब्राह्मण सैनिकांबद्दल आदर होता. पण १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचे नेतृत्व ब्राह्मण योद्ध्यांनी केले आणि अत्यंत कडवी झुंज दिल्यापासून, इंग्रज कमालीचे सावध झाले. ही मंडळी आपल्या विरोधात कधीही उठतील आणि आपल्यालाच पराभूत करतील याची त्यांना भीती होती. विविध ब्रिटिश अधिकारी आपल्या देशाला तसे अहवाल पाठवीत होते. ही भीती पुढेपुढे खरीही ठरू लागली. एकट्या महाराष्ट्रातच वासुदेव बळवंत फडके,चाफेकर बंधू अशा अनेकांनी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्रे उचलली होतीच.पुढे तर विदेशातून शस्त्रे मिळविणे, ती चालवायला शिकणे, त्याचा ब्रिटिशांविरुद्ध वापर करणे यात ब्राह्मण मोठ्या संख्येने उतरले.
मग भारतात असलेल्या वर्ण ( जात ) व्यवस्थेला खतपाणी घालायचे ठरवले. वेगवेगळ्या जातीच्या रेजिमेंट्स स्थापल्या गेल्या. उद्देश असा की वेळ आलीच तर या “जातींच्या” रेजिमेंटसना आपापसात लढवता येईल. ते आपापसात लढतील याबद्दल खात्री असल्याने ब्रिटिश कांहीसे निश्चिन्त झाले.
ब्रिटिश गेले … पण त्यांनी तयार केलेल्या ” जातीच्या ” रेजिमेंट्स अजून आम्ही तशाच सांभाळल्या आहेत. आणि तरीही म्हणे आम्ही जातीयवादाच्या विरोधात लढतो आहोत !
जयहिंद !!
— मकरंद करंदीकर.
छायाचित्रे सौजन्य- britishempire.co.uk आणि विकिपीडिया
Leave a Reply