नवीन लेखन...

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म १२ मार्च १९११ रोजी गोव्यातील पेडणे (पणजी) येथे झाला.

गोमंतकाचे भाग्यविधाते दयानंद बाळकृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले मुख्यमंत्री व एक उद्योगपती. भाऊसाहेब बांदोडकर हे लोकशाही प्रणालीची तत्त्वे मानणारे नेते होते. त्यामुळेच त्यांनी अजूनही गोमंतकीयांच्या हृदयात स्थान कायम ठेवले आहे. ते गोव्यातील उद्योगपती होते (मँगेनिझ खान मालक) अत्यंत दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती.

भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म गोव्यातील पेडणे (पणजी) येथे सामान्य घराण्यात झाला. त्यांच्या लहानपणीच आई-वडील वारले. प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे व माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण पणजी येथे. पोर्तुगीज व मराठी भाषांबरोबरच फ्रेंच व हिंदी या भाषाही शालेय जीवनातच त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केल्या. जुजबी शिक्षणानंतर त्यांनी आपल्या घराण्याचा व्यावसाय वाढविला व पुढे खाणमालक म्हणून नावलौकिक व विपुल धन मिळविले. त्यांचा विवाह सुशिलाबाई लक्ष्मण पेडणेकर या एका व्यापाऱ्या च्या मुलीशी झाला. त्यांचे सासरचे नाव सुनंदा. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाने बांदोडकरांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण झाले. तरुणपणी रॉयवादी विचारसरणीकडे त्यांचा ओढा होता. त्यातूनच तरूणवर्गाला एकत्र आणून गोव्यात समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनास चालना मिळाली. या आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेऊन अनेक भूमिगतांना सर्व प्रकारचे सहकार्य दिले आणि खेडोपाडी पोर्तुगीजांविरुद्ध प्रचार केला; ग्रामीण भागात मराठी शाळा चालाव्यात म्हणून मदत केली. त्यामुळे त्यांना १९५६ साली तीन महिने तुरूंगवास भोगावा लागला.

११ डिसेंबर १९६२ रोजी भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त केले. तेव्हा बांदोडकरांनी स्वतंत्र गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली. गोवा महाष्ट्रात विलीन करावा, या माताचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव करून १९६३ च्या डिसेंबरमधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३० पैकी १४ जागा मिळविल्या. तीन अपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमत सिद्ध करून मंत्रिमंडळाची मागणी केली आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्रिमंडळ स्थापन केले. बांदोडकरांनी निवडणूक लढविली नव्हती; पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, अर्थ, नियोजन व समाजकल्याण ही खाती होती. या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, हे होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी जनतेचे मत वळविण्याचे त्यांनी ठरविले. त्याकरिता त्यांच्या मंत्रिमंडळाने शेतीविषयक सुधारणा आणि समाजकल्याण हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेतले. केंद्राने गोव्याच्या बाबतीत जनमताचा कौल घेण्याचे ठरविले.

कौल निःपक्षपाती वातावरणात पार पाडावा, म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गोव्यात सहा महिने राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. या दरम्यान बांदोडकरांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा अध्यक्ष या नात्याने गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून खोड्यापाड्यांतून दौरे काढून प्रचार केला. गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवावा, की महाराष्ट्रात विलीन करावा, या प्रश्नांवर ३ जानेवारी १९६७ रोजी सार्वमत घेण्यात आले. सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवण्यात आला. गोव्याचे महाराष्ट्राशी मीलन व्हावे हे त्यांचे स्वप्न सार्वमतातील पराभवामुळे भंगले असले तरी त्यांनी हार न मानता निवडणूक जिंकून महाराष्ट्राशी गोव्याचे सांस्कृतिक संबंध वाढवून बळकट तर केलेच पण मराठी ही गोव्याची राजभाषा करणारा ठराव असेंब्लीत संमत करून घेतला.

त्यानंतरच्या एप्रिल १९६७ च्या निवडणुकीत बांदोडकर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे बहुमताने निवडून आले व गोव्याचे दुसऱ्यांभदा मुख्यमंत्री झाले. बांदोडकरांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत गोव्यात अनेक सुधारणा केल्या. गोव्याचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून त्यांनी अनेक योजना व कार्यक्रम राबविले; शेती व मच्छीमारी यांना प्रोत्साहन दिले; गोव्यातील उद्योजकांना चालना दिली; ग्रामिण शिक्षणाबरोबर त्यांनी मराठी भाषिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले; तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला; साहित्य-कला आदींना उत्तेजन देण्यासाठी गोव्यात कला अकादमीची स्थापना केली; अनेक शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक संस्थांना त्यांनी सढळ हाताने मदत केली.

गोवा प्रवाशांचे आकर्षण ठरावे म्हणून अनेक योजना त्यांनी कार्यवाहीत आणल्या. कोणत्याही विधायक सामाजिक कार्याला सढळ हाताने मदत करण्यात ते अग्रेसर होते. थोर दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. गोरगरिबांचे प्रश्न ते जातीने लक्ष घालून सोडवीत. क्रिकेट, शिकार, वाचन, सुग्रास भोजन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. रसिकतेचे राजस जीवन जगत असतानाही त्यांनी आपल्या खाणीतील मजुरांकडे किंवा मंत्रालयातील फाइलींकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.

गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांना शशिकला, उषा, क्रांती व ज्योती ह्या चार मुली असून सिद्धार्थ बांदोडकर हा मुलगा होता. सिद्धार्थचे तरुणवयात निधन झाले. लीना चंदावरकरचा पहिला नवरा सिद्धार्थ बांदोडकर होता. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी मुलगी शशिकला काकोडकर ह्या गोव्याच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या आधी बांदोडकरांच्या मंत्रिमंडळात त्या एक सदस्य होत्या.

गोव्याची कला अकादमी ही पु. ल. देशपांडे आणि दामू केंकरे यांच्या संकल्पनेतून व त्या काळातील मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुढाकारामुळे उभी राहिली. आधी ती नाट्य अकादमी होती व नंतर ती कला अकादमी झाली.

भाऊसाहेब बांदोडकर यांचे १२ ऑगस्ट १९७३ निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..