नवीन लेखन...

ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन

१६ जून १९७७  या दिवशी आय.बी.एम., मायक्रोसॉफ्ट अशा तगड्या कंपन्यांना धडकी भरवणारी ओरॅकल ह्या कंपनीची स्थापना लॅरी एलिसनने केली.

संगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे?” यावर उत्तर,”देवाला आपण लॅरी एलिसन आहोत असं वाटत नाही.” यातूनच लॅरी एलिसन हा किती महत्वाकांक्षी माणूस होता याची कल्पना येईल. ओरॅकल नावाच्या त्याच्या कंपनीने मायक्रोसॉफ़्ट, आयबीएम अशा तगड्या कंपन्यांना धडकी भरेल अशी जबरदस्त मुसंडी मारली. विशेष करुन माहिती साठवायच्या म्हणजेच डेटाबेसेसच्या तंत्रज्ञानात तर अशी मुसंडी मारली की त्याच्यापुढे भल्याभल्यांनी हार मानली. सुमारे २७०० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती असलेला हा माणूस २००० सालच्या “फ़ोर्ब्स” मासिकात बिल गेट्सच्या खालोखाल जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत माणूस म्हणून जागा मिळवून गेला.

१७ ऑगस्ट १९४४ रोजी जरी लॅरीचा जन्म झाला असला तरी २००२ सालापर्यंत म्हणजे वयाच्या तब्बल ५८ व्या वर्षापर्यंत त्याला आपली आई कोण हे माहीत नव्हतं. त्याचे वडील कोण हेही अजूनही गूढच आहे. फ्लॉरेन्स स्पेलमन ही त्याची १९ वर्षे वयाची ज्यू आई अविवाहित होती. आपल्याला आपल्या मुलाचा नीट सांभाळ करायला जमणार नाही असं वाटल्यामुळे तिनं एलिसनला शिकागोमधल्या आपल्या लिलियन नावाच्या आत्याकडे सांभाळायला द्यायचं ठरवलं. लिलियन स्पेलमन एलिसन आणि लुईस एलिसन या नवरा-बायकोनं मग एलिसन नऊ महिन्यांचा असताना त्याला दत्तक घेतलं. त्याच्या नव्या आईने (अर्थात लहानपणी सांभाळ केलेल्या) चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. पण तो जरी हुषार असला तरी अभ्यासू मुळीच नव्हता. प्रत्येक बाबतीत तो त्याचं मतप्रदर्शन करी आणि मताशी ठाम राही. कॉलेजात असताना दुसऱ्या वर्षांची परीक्षा अगदी तोंडावर आलेली असताना एलिसनची नवी आई अचानकच वारली, आणि एलिसननं त्या कॉलेजला रामरामच ठोकला. आईप्रमाणे वडिलांकडून मात्र त्याला प्रेमाची वागणूक मिळाली नव्हती. नेहमी हिडीसफ़िडीस करत राहिल्याने आणि त्यातच मुळातला त्याचा जिद्दी स्वभाव यामुळे काहीतरी करून दाखवण्याचा चंग त्याने लहानपणीच बांधून ठेवला होता. आपल्याला दत्तक घेतलेल्या वडिलांना काही करुन खोटं ठरवायचं हे त्यानं ठरवून टाकलं.

१९६० च्या दशकांमध्ये संगणकांविषयी सगळीकडे बोलबाला होता. तसंच अनेक कंपन्यांना त्यांची कामं सोपी करुन देणारे प्रोग्रॅमर्स हवे होते. शाळेत प्रोग्रॅमिंगचे प्राथमिक धडे घेतलेल्या एलिसननं आपलं वय २० वर्षांचं असताना कॅलिफोर्निया राज्यातल्या सॅनफ्रान्सिस्को शहरात एका बँकेत नोकरी धरली. या काळात सॅनफ्रान्सिस्कोमध्ये संगणक क्षेत्राशी संबंधित अनेक कंपन्या स्थापन होत असल्यामुळे त्या भागाला ‘सिलिकॉन व्हॅली’ असं नाव पडलं होतं. एलिसननं खूप परिश्रम घेऊन छान प्रगती केली, आणि १९६० चं दशक संपायच्या सुमाराला त्यानं आपलं स्वत:चं घर, स्पोर्ट्सकार, आणि खासगी बोट घेण्याइतकी कमाई केली होती.

१९७० च्या दशकात एलिसनला डेटाबेसच्या तंत्रज्ञानावर काम करायची संधी मिळाली. अमेरिकेच्या “सीआयए” या गुप्तचर यंत्रणेसाठी क्लिष्ट माहिती साठवण्यासाठीचे डेटाबेस बनवायच्या कामात तो सहभागी होता. अर्थात गुप्तचर यंत्रणेसाठी काम असल्याने सर्व गोष्टी गुप्त राखल्या जात होत्या. म्हणूनच क्सल्यातरी गूढ कोडभाषेतील नाव देणे गरजेचे होते. यावर कोणीतरी म्हणाले “ओरॅकल”. यातूनच १९७७ साली बॉब मायनर नावाच्या माणसाच्या साथीत स्वतःची कंपनी सुरू करताना लॅरी एलीसनने हेच नाव त्याच्या कंपनीला दिले आणि “ओरॅकल कॉर्पोरेशन”चा जन्म झाला. तिथेही आपलं पहिलं काम एलिसननं ‘सीआयए’साठीच केलं. पण हे काम करता करता एलिसन आणि मायनर यांच्याकडचे पैसेच संपत आले, आणि सरकार तर त्यांचं बिल लवकर काही चुकतं करेना! अशा रीतीनं खूप मोठय़ा आर्थिक पेचात ओरॅकल सापडायची चिन्हं असतानाच सरकारनं सुदैवानं थोडे पैसे चुकते केले आणि शिवाय अमेरिकन हवाईदलासाठी सॉफ्टवेअर लिहायचं एक नवं कंत्राटही ओरॅकलला दिलं.

या काळात एडगर कॉडच्या संकल्पनांवर आधारित असलेल्या ‘रिलेशनल डेटाबेस’ नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन माहिती साठवण्यावर आणि ती अतिशय सहजपणे हवी तेव्हा पुन्हा मिळवण्यावर किंवा त्या माहितीत बदल करण्यावर लोकांचा भर वाढत चालला होता. आयबीएमनंसुद्धा त्या दृष्टीनं पावलं उचलून या प्रकारच्या डेटाबेसमध्ये माहिती साठवता येईल यासाठीचं एक प्रॉडक्ट बनवायला घेतलं होतं. पण नेहमीप्रमाणेच आयबीएमचा अवाढव्य आकार त्यांच्या आड आला. प्रत्येक गोष्टीचा शहानिशा करुन, बारीकसारीक तपशीलसुद्धा वारंवार तपासून पुढचं पाऊल टाकायचं धोरण आखणाऱ्या आयबीएमनं आपलं माहिती साठवायचं प्रॉडक्ट बाजारात आणायच्या दोन र्वष आधी एलिसन आणि मायनर यांनी आपल्या कंपनीचंच नाव असलेलं ‘ओरॅकल’ हे प्रॉडक्ट तयार केलंसुद्धा! तसंच ते विकण्यासाठी एलिसननं अतिशय धडाडीचे विव्रेच्ते नेमले. साहजिकच ओरॅकलसारख्या छोटय़ा कंपनीनं ‘रिलेशनल डेटाबेस’ च्या तंत्रज्ञानात आयबीएमसकट इतर स्पर्धकांना एकदम मागे टाकलं. या यशावर समाधान न मानता एलिसननं मग एकापाठोपाठ एक कंपन्या विकत घ्यायचा सपाटाच लावला. ओरॅकल एकदम भन्नाट वेगानं प्रगती करायला लागली.

१९८६ साली एलिसनने ओरॅकल पब्लिक करण्याचा निर्णय घेतला आणि शेयर्स विकायला काढले. त्यातून ओरॅकलला ३.१ कोटी डॉलर्स मिळाले. पण पुढे १९९० मध्ये ओरॅकलवर मोठे आर्थिक संकट आले. शेअरबाजारातल्या गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरुन त्यांनी घाईघाईनं ओरॅकलचे शेअर्स विकायला काढले. याचा परिणाम होऊन ओरॅकलच्या शेअरच्या किंमतीत ८० टक्के एवढी प्रचंड घट झाली. पण एलीसनने तात्काळ मॅनेजमेंट टीम बदलली आणि नव्या टीमकडून नव्याने सुरुवात केली. तुटल्या गेलेल्या ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून तक्रारी समजून घेण्यात त्याने यश मिळवले आणि १९९६ साली ओरॅकलने ६ कोटी डॉलर्सची कमाई केली.

१९९० च्या दशकात एलिसननं ‘नेटवर्क कम्प्युटर’ नावाचा संगणक बनवायचं ठरवलं. नेहमीच्या संगणकात असते तशी या संगणकात माहिती साठवण्यासाठी हार्डडिस्क असणार नव्हती. तसंच नेहमीच्या संगणकाच्या तुलनेत आणखी बदल करुन हा संगणक शाळा-कॉलेजला जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीलासुद्धा विकत घेता आला पाहिजे इतका स्वस्त करायचा असा त्याचा प्रयत्न होता. त्यासाठी अॅापल कंपनी विकत घेऊन त्यांच्या तंत्रज्ञानामध्ये योग्य ते बदल करुन हा संगणक बनवायचं त्याच्या मनात होतं. पण नंतर नेहमीच्याच संगणकांच्या किंमती इतक्या घसरल्या की एलिसननं असा वेगळा संगणक बनवायचे बेत रद्द केले. अलीकडच्या काळात ओरॅकलने सिबेल, रिटेक, सन मायक्रोसिस्टीम अशा कंपन्या गिळंकृत करुन सध्याच्या मायक्रोसॉफ़्ट, आयबीएम अशा तगड्या कंपन्यांसमोर मोठं आव्हान उभं केलें आहे.

आपल्या व्यावसायिक आयुष्यातच एलिसननं चढउतार बघितले आहेत असं नाही. वेगवेगळे धाडसी खेळ खेळायचा शौकीन असलेल्या एलिसननं १९९० साली हवाईमध्ये समुद्रसफर करताना आपल्या मानेला जबर दुखापत करुन घेतली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी वेगानं सायकल चालवताना त्याच्या हाताच्या कोपराला मोठी इजा झाली. त्याची आजवर ४ लग्नं झाली आहेत. एलिसनच्या सनसनाटी खासगी आयुष्याविषयी नेहमीच बऱ्याच कहाण्या प्रसिद्ध होत असतात. अनेक सुंदर तरुणींबरोबर त्याचं नाव जोडलं गेलं आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३

संदर्भ – अच्युत गोडबोले यांचा लेख

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..