तिचे नाव ‘राजश्री’ होते. दोन दिवस तिची ट्रीटमेंट चालू होती. पण म्हणावी तशी सुधारणा तिच्यात दिसत नव्हती. “तिला आपण सिविल हॉस्पिटलमध्ये shift करूया” असे संगीताने समरला सुचवले होते. पेशंट दुसरीकडे shift करणे हे काही नवीन नव्हते. पण समरने त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. सगळे रिपोर्ट आल्यावर ठरवू. असे शांतपणे उत्तर दिले होते. त्याच्यासामोर कोणी काही बोलू शकत नव्हते. तिच्या ट्रीटमेंट मध्ये तो जरा सुद्धा हलगर्जीपणा चालवून घेत नव्हता. हे संगीताच्या लक्षात येत होते. पण त्याचा तसा स्वभावाच आहे असा तिने त्यावेळी विचार केला आणि तो प्रकार आपल्या डोक्यातून काढून टाकला होता.
परंतु राजश्रीचे रिपोर्ट आले आणि सगळे चित्र वेगळेच झाले होते. तिचे ते रिपोर्ट बघून मात्र समरने डोक्याला हात लावून घेतला. तो तसाच खुर्चीत बसून राहिला होता. त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते. हा काही तरी विचित्रच प्रकार होता. समरचा तो अवतार बघून सगळे काही ठीक नाही, कुठे तरी काहीतरी गौडबंगाल आहे ह्याची संगीताला खात्री झाली होती. नाहीतर इतके पेशंट येत होते. कित्येकांचे असे रिपोर्ट येत होते. अगदीच वाचण्याची शक्यता नसेल तर त्या पेशंटला घरी पाठवून दिले जात होते. आणि तिथे डॉक्टर आणि पेशंटचा संबंध संपून जातो. पुन्हा नवीन पेशंट येतो. असे चक्र चालूच असते. मग ह्याच्या डोळ्यात पाणी येण्याचे कारण काय असावे? हा विचार तिच्या डोक्यात चालू होता. दवाखान्यातील सगळे दृश्य तिच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहत होते. आणि त्या आठवणींनी ती बेचैन होत होती.
तेवढ्यात मोती शेपटी हलवत हलवत संगीताजवळ आला. त्याच्या खाण्याची वेळ झाली होती. समर शिवाय जेवण्याची त्याला सवय नव्हती. तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला खावू घातले. तो तिच्या बाजूला शांतपणे उभा राहून खाली बसलेल्या समरकडे एकटक बघत होता. तिची नजर सुद्धा समोर दिसणाऱ्या समरकडेच होती. अजूनही तो तसाच बसला होता. त्याच्या मनाची तिला पूर्ण कल्पना होती.
तिला स्वतःची मात्र लाज वाटत होती. अतिशय निष्ठूर मनाने वागलेला तो स्वतःचा भयंकर अवतार ती विसरू शकत नव्हती. हॉस्पिटल मधील समरच्या रूमचा तिने जोरात बंद केलेल्या दरवाज्याचा आवाज तिच्या डोक्यात हातोडा मारल्यासारखा तिला छळत होता. “समर असे काय आहे कि तिचा रिपोर्ट वाचून तुझ्या डोळ्यात पाणी आले?” हा प्रश्न ती घरी येऊनही त्याला विचारू शकली असती पण ती स्वतःच्या मनाला आवर घालू शकली नव्हती.
तिने दहा वेळा विचारूनही त्याने ह्या प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. पण शेवटी दाराच्या त्या भयंकर आवाजाने त्याचा ही त्याच्या मनावरचा संयम सुटला होता.
“असे काय झाले कि माझ्या डोळ्यात पाणी आले, याचे तुला उत्तर ऐकायचे आहे ना, मग ऐक बस इथे.” तो जोरात ओरडला आणि तिच्या हाताला धरून तिला समोरच्या खुर्चीत त्याने धाडकन बसवले. हे त्याचे रूप संगीताने कधीच पहिले नव्हते. ती घाबरली होती. समरने समोरच्या ग्लासमधील पाणी गटागट पिवून टाकले. आणि बोलायला सुरुवात केली होती. पुढचा कितीतरी वेळ समर एकटाच बोलत होता आणि ती हताश होवून ऐकत होती.
“राजश्री माझी लहानपणची मैत्रीण आहे. ती वसंतराव देशमुखांची मुलगी आहे. त्यांचे घर आमच्या घराच्या शेजारीच होते. ते दोघेही नवरा बायको नेहमीच त्यांच्या त्यांच्या उद्योगात गुंतलेले असायचे. आणि राजश्री आमच्याकडे खेळायला म्हणून दिवसभर असायची. लहानपणापासून आम्ही एकत्र जेवत होतो, खेळत होतो, शाळेतही बरोबरच जात होतो. बालपणाची आमची ती मैत्री आम्ही जसे मोठे होत होतो तशी घट्ट होत गेली होती. आणि आमच्या वाढत्या वयांबरोबर आमची मैत्रीही वयात आली होती. कॉलेजच्या पहिल्याच वर्षी तिच्या घरातल्या लोकांच्या हे लक्षात आले होते. ते खूप पैसेवाले आणि प्रतिष्ठित लोक होते. त्यांची ही एकुलती एक मुलगी होती. आम्ही खाऊन पिऊन सुखी लोक होतो परंतु श्रीमंत नव्हतो. तिच्या वडिलांना हे पटले नसावे. मे महिन्याच्या सुट्टीत मावशीकडे म्हणून तिला नागपूरला घेऊन गेले आणि तिकडेच तिचे लग्न लावून टाकले होते. सुट्टी संपवून ती घरी नवऱ्याबरोबरच आली होती. त्यानंतर ती मला कधीही भेटली नव्हती. तिचा नवरा सुद्धा मी आत्ताच बघितला. तिच्या लग्नानंतर मी खूप खचून गेलो होतो. परंतु मी माझे सगळे लक्ष शिक्षणावर केंद्रित केले आणि हिच्या वडिलांपेक्षा जास्त पैसा मिळवायचे ध्येय ठेवले. नशिबाने मेडिकलला अॅडमिशन मिळाली, डॉक्टर झालो. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी हे सगळे विसरूनही गेलो.
Leave a Reply