पुन्हा एकदा समरने तिच्याकडे बघितले होते परंतु काही न बोलता ती घरी निघून आली होती. त्या वेळेस तिच्या डोक्यावर जसे भूत सवार झाले होते. राजश्री त्याच्या आयुंष्यात होती हे त्याने तिच्यापासून लपवून ठेवले होते ह्याचे तिला दुःख झाले होते. खरे तर तिचे समरवर जीवापाड प्रेम होते. आणि समरचे सुद्धा तिच्यावर तितकेच प्रेम आहे ह्याची तिला पूर्ण खात्री होती. पण शेवटी ती एक स्त्री होती. तिच्या मधील स्त्री समरच्या आयुष्यात तिच्याशिवाय दुसरी मुलगी होती ही कल्पना पण सहन करून घ्यायला तयार नव्हती. त्या रात्री ती रात्रभर विचारांनी तळमळत होती.
समर मात्र त्या रात्री देखील दवाखान्यातच राहिला होता. राजश्रीची तब्येत आणखीनच खालावली होती. त्याला शक्य होईल ते सगळे तो करण्याचा प्रयत्न करीत होता.
रात्रभर तळमळत पडलेल्या संगीताच्या डोक्यातील विचारांची दिशा पहाटेच्या थंड वाऱ्याच्या झुळुकेने बदलली होती. एका क्षणी तिला ती पण एक डॉक्टर असल्याची जाणीव झाली होती. आणि ती ताडकन उठून बसली होती. तिने तिच्या समरला कोणत्याही इमरजन्सी मध्ये एकटा सोडला नव्हता. आणि आज तिने हे काय केले ह्या विचाराने तिने स्वतःला सावरले. तिच्या लक्षात आले कि राजश्री एक गरजू पेशंट आहे. आणि ह्या विचित्र प्रसंगी समरला एकटा न सोडता त्याची पूर्ण मदत करण्याचे तिने ठरवले. तिने माणुसकी आणि डॉक्टरकी अशा दोन्ही भूमिका आनंदाने करण्याचा ठाम निश्चय केला होता.
सकाळी नेहमीपेक्षा ती लवकरच तयार झाली होती. समरसाठी कॉफी घेऊन ती दवाखान्यात पोहचली होती. समरच्या कॉफीबरोबर तिने राजश्रीच्या नवऱ्याची कॉफी देखील आणली होती. तिने समरला आपल्या हाताने कॉफी दिली आणि त्याच्या बरोबर आनंदाने कामाला लागली होती.
संगीताचे ते रूप बघून समरला खूप धीर आला होता. आणि दोघे मिळून राजश्रीच्या सेवेत उभे राहिले होते. दोन रात्रीच्या जागरणानी समर थकून गेला होता. दिवसभर जवळ जवळ सगळे पेशंट संगीताने पहिले होते. समरला जराही त्रास होणार नाही ह्याची तिने पूर्ण काळजी घेतली होती. दुपारी त्या दोघांच्या जेवणाच्या डब्याबरोबर राजश्रीच्या नवऱ्याचा सुद्धा डबा तिने मागावून घेतला होता. दर अर्ध्या एक तासाने ती राजश्रीच्या बेडपाशी जावून तिच्या ट्रीटमेंट वर स्वतः जातीने लक्ष घालत होती. सिस्टरला तिने तसे सांगितले होते. “सरांची बालमैत्रीण आहे. तिच्याकडे पूर्ण लक्ष द्या.” हे कळल्यावर सगळा स्टाफ देखील राजश्रीकडे जरा जास्तच लक्ष देत होता. दोन दिवसाच्या थकव्याने समरला बाजूच्या रुममध्ये थोडी डुलकी लागली होती. तेवढ्यात सिस्टरने इमरजन्सी बेल वाजवली. संगीता आणि समर धावत धावत राजश्री पाशी पोहोचले होते. ती पाणी मागत होती. नर्सने पटकन पाणी दिले. लेडी डॉक्टर इमरजन्सी इंजेक्शन देत होती. ही सगळी धावपळ बघून तिचा नवराही दाराशी येऊन उभा राहिला होता. समर “राजश्री, राजश्री हे पाणी घे” असे म्हणत तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न करत होता. पण काळाने घाव घातलाच. राजश्रीने समरच्या हातावरच तिच्या नवऱ्याकडे एकटक बघत प्राण सोडला. समर केविलवाण्या नजरेने हातावरच्या राजश्रीकडे बघत होता. संगीता एखाद्या भिंतीसारखी त्याच्या मागे उभी राहिली होती.
तिचा नवरा तर वेडाच झाला होता. “आता मी काय करु? मी कुठे जाऊ? हिला घरी कसा घेऊन जाऊ? मला कोणी नाही डॉक्टर,” असे रडत रडत म्हणत होता. राजश्रीचे आईवडीलही तिला सोडून गेले होते. शेवटी समरच्या दवाखान्यातील लोकांनीच माणुसकी समजून तिचा अंत्यविधी करायचे ठरविले होते. संगीताने एक छानशी साडी आणून समरच्या हातात दिली होती. समरने संगीताकडे एकदम बघितले, “तुझे हे उपकार माझ्या कडून कसे फिटतील?” असा आशय त्याच्या नजरेत संगीता स्पष्टपणे वाचू शकत होती. समर दुसऱ्या दोघा डॉक्टरांना बरोबर घेऊन तिच्या अंत्यविधीला निघाला होता. संगीताने इथेही त्याची साथ सोडली नव्हती.
अंत्यविधीच्या नंतर मात्र तिथे समर स्वतःवर ताबा ठेवू शकला नव्हता. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूंची धार लागली होती. राजश्रीच्या नवऱ्याची परिस्थती तर स्वतःला सावरण्याच्या पलीकडची होती. तरीही तो समरजवळ येऊन त्याच्या पायाच पडला आणि म्हणाला, “डॉक्टर तुम्ही एवढे वाईट वाटून नका घेऊ. तुम्ही खूप केलेत. मी तर काहीच करू शकलो नाही. तुमच्यामुळे तिला शेवटी चांगले औषधपाणी झाले. मी तर तिला शेवटी एक साडीही घेऊ शकलो नाही. तुमचे किती उपकार मानू?” असे म्हणत त्याने खिशात हात घातला आणि खिशातून किल्ल्या काढून त्या समरच्या हातात घट्ट धरून ठेवल्या, म्हणाला “डॉक्टर मी तुम्हाला आणखी काही देऊ शकत नाही, तुम्ही हे घर ठेवा; तुमचे सगळे पैसे घ्या म्हणजे माझी बायको खूप खुश होईल तिला कुणाकडूनही काहीही घेतलेले आवडायचे नाही. तिने भरपूर कष्ट केले पण कोणासमोर आपले हात पसरले नाही. तुम्ही ते तुमच्याजवळ ठेवा. मी कसाही रस्त्यावर राहून माझे आयुष्य जगीन. तिला तुमच्या उपकाराच्या ओझ्यात नाही ठेवायची मला. माझ्या डोक्यावर मात्र सदैव तुमचे उपकार राहतील.”
Leave a Reply