नवीन लेखन...

नियतीचा खेळ

गेल्या आठ्वड्याभराच्या पूर्ण तणावानंतर डॉ. समर तिन्हीसांजेच्या वेळेस एकटेच घरासमोरच्या लॉनवर शांतपणे वरच्या आकाशाकडे बघत बसले होते. त्यांचा बंगला पण सोसायटीत अगदी एका बाजूला होता. ह्या बाजूला फारशी वर्दळ नसल्यामुळे तसे वातावरण ही अगदी शांतच होते. मधून मधून त्यांच्या ‘rocking-chair’ चा ‘कर-कर’ आवाज त्या शांततेचा भंग करीत होता. एका मोठ्या जागेवर त्यांनी आपला बंगला मागच्या बाजूला बांधला होता. आणि पुढील बाजूस ही प्रशस्त लॉन केली होती. ती लॉन त्यांची अगदी विरंगुळ्याची लाडकी जागा होती. रात्रीच्या वेळेस जेवणानंतर किमान अर्धा तास तरी ते आणि डॉ. संगीता म्हणजे त्यांची पत्नी इथे बरोबर बसतातच. त्यांचा कुत्रा ‘मोती’ त्यांच्या आजूबाजूला इकडून तिकडून दुडकत असतो. शनिवारी मात्र इथे मेहफिल असते. ह्या एका दिवशी त्या दोघांचेही ठराविक मित्र-मैत्रिणी इथे एकत्र जमा होत असतात. आणि रात्री बऱ्याच उशिरापर्यंत खाण्यापिण्याची रंगत जमलेली असते. तशी डॉ. समरना पिण्याची सवय नाही. संपूर्ण आठवडाभर चहा पिण्यासाठी पण उसंत नसते तर बाकी काही पिण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र शनिवारी रात्री न चुकता “दोन पेग” मित्रांसोबत घेणे ही त्यांची वर्षांपासूनची सवय होती. आजपर्यंत लॉनवर ते कधीही एकटे बसले नव्हते. त्यांना अश्या ह्या अवस्थेत बसलेले बघून ती लॉन ही आज संभ्रमात पडली असेल.

वरच्या बेडरूमच्या बाल्कनीतून डॉ. संगिता त्यांना शांतपणे एकटक बघत बसली होती. कित्येक वर्षात असे कधीच घडले नव्हते, की दोघे दोन बाजूला बसले होते. कुठलाही problem असो, मग तो घरचा असो किंवा दवाखान्यातला त्या दोघांनीही एकमेकाला कधीच एकटे सोडले नव्हते. परंतु आज मात्र तिने त्यांना अगदी एकटे बसून दिले होते. घरातील नोकरचाकर लोकांसाठी पण हा जरा विचित्रच प्रसंग होता. घरातील शिस्त त्यांच्या अंगवळणी पडलेली होती त्यामुळे त्यांना बोलविल्याशिवाय ते समर किंवा संगीताच्या जवळ जात नसत. ते दोघेही दवाखान्यातून घरी आल्याबरोबर त्यांना पाणी देणे, दिवसभर बांधून ठेवलेल्या त्यांच्या लाडक्या मोतीला सोडून देणे, आणि त्यानेही त्या दोघांच्या अंगावर उड्या मारून त्यांचे स्वागत करणे हा त्यांच्या दैनंदिन नियमातील एक भागच होता. आज वासू म्हणजे त्यांचा नोकर मोतीला सोडायला निघाल्याबरोबर संगीताने त्याला डोळ्यानेच ‘आत्ता नको’ असे खुणावले होते. पिण्यासाठी पाणी पण तिने स्वतःच आणून डॉ. समरला दिले होते. हे बघून दोघे नोकर सुद्धा गुपचूप आपल्या कामासाठी आतमध्ये निघून गेले होते.

डॉ. समर देखील शांतपणे आपल्या खोलीत निघून गेले होते. आणि थोडेसे फ्रेश होऊन लॉनवर जाऊन बसले होते. डॉ. संगीताला काय करावे काही उमजत नव्हते. त्यांच्याजवळ बसून त्यांना कंपनी द्यावी असे तिचे मन तिला सांगत होते. पण तिचा नाईलाज होता. नुसती घालमेल चालू होती तिच्या मनाची. बराच वेळ ती नुसती इकडून तिकडे येरझाऱ्या घालत होती. आयुष्यात आज प्रथमच तिला मूल नसल्याची प्रकर्षाने जाणीव झाली होती. आज तिला तिच्या आईची खूप आठवण आली होती. तिच्या आईने तिला कित्येक वेळेला सांगण्याचा प्रयत्न केला होता कि, “असेच मूल नाही म्हणून राहण्यापेक्षा एखादे मूल दत्तक घ्या. त्याला जीव लावा. माणसाला उतारवयात मुलाची खूप जरुरी असते. कधी तरी तुमच्या दोघात वाद झाला तरी त्या मुलाकडे बघून विसरून जाल. मुलाला मोठे करताना आपल्या सुखदुःखाचा विचार करण्यासाठी आपल्याकडे फुरसदच नसते”. वगैरे वगैरे.
परंतु तिने ह्या सगळ्या गोष्टींचा कधी विचारच केला नव्हता. ती आणि डॉ. समर आपआपल्या कामात इतके मशगुल होते कि त्यांना त्याची कधी उणीव भासली नसावी किंवा सगळे उमजत असूनही दोघांनीही एकमेकांची मने दुखावली तर जाणार नाहीत ना असा विचार करून परिस्थितीला किंवा वास्ताविकतेला स्वीकारले असावे.

लग्नानंतरच्या चोवीस वर्षांनंतर हा विचित्र प्रसंग समोर येऊन ठेपला होता. संगीता समोर शांतपणे आकाशाकडे बघत बसलेल्या समरला बघून बेचैन होत होती. त्याच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होती, की हा कसला विचार करत असेल? त्यालाही आज माझ्यासारखीच मुलाची उणीव भासत असेल का? का तो घडलेल्या प्रसंगाचा विचार करत असेल? तिचे मन विचार करून करून थकून गेले होते. पण विचारांचे हे भरधाव वेगाने धावणारे चक्र कुठेही थांबायला तयारच नव्हते. निसर्गातल्या सुंदर सुंदर गोष्टी टिपणारे तिचे काळेभोर टपोरे डोळे आज आसवांनी भरून गेलेले होते. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसुन टाकण्यासाठी तिच्याजवळ कोणीही नव्हते. त्या क्षणी ती एकटीच आहे असे तिला जाणवत होते. तिचा समर तिच्या समोर असूनही तिच्या पासून खूप दूर होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..