मोहिनीअट्टमच्या महान कलाकार आणि नृत्यशिक्षणातील प्रणेत्या डॉ. कनक रेळे यांचा जन्म ११ जून १९३७ रोजी झाला.
मोहिनीअट्टमच्या महान कलाकार आणि नृत्यशिक्षणातील प्रणेत्या या शब्दांत भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केला होता. त्यांनी ५० हून अधिक नृत्यरचना तयार केल्या आहेत. नालंदा नृत्य कला महाविद्यालयाच्या त्या संस्थापक, प्राचार्या आहेत. भारतामध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये ‘पीएचडी’ करणाऱ्या कनक रेळे या पहिल्या आहेत. वयाच्या सहाव्या वर्षांपासून त्यांनी ‘कथकली’ या शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले. पुढे कायद्याची पदवी मिळविली. इंग्लंडमध्ये जाऊन ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयात शिक्षण घेतले. पण कायद्याच्या क्षेत्रात मन न रमल्याने त्यांनी नृत्य हेच ध्येय ठेवले. त्यांनी ‘मोहिनी अट्टम’ या नृत्य प्रकाराचेही शिक्षण घेतले आहे. भारतीय शास्त्रीय नृत्य हा एक वेगळा उपक्रम अभ्यासक्रमात यावा व विद्यार्थ्यांना त्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता यावे. शास्त्रीय नृत्याकडे जनसामान्यांनी सन्मानाने पाहावे. या विषयातसुद्धा आपण पदवी प्रदान करू शकतो याकरिता केरळमधील मोहिनी अट्टम या अभिजात नृत्याचा प्रसार करणाऱ्या डॉ. कनक रेळे यांनी मुंबई विद्यापीठाच्या सहाय्याने १९६६ मध्ये नालंदा नृत्य कला महाविद्यालय सुरू केले.
भारतामधील पहिली शास्त्रीय नृत्य कला महाविद्यालय म्हणून नालंदा नृत्य कला महाविद्यालय हा लौकिक आज भूषवत आहे. आज आदिवासी भागातील शिक्षणाचा गंध नसणाऱ्या मुली नालंदा नृत्य कला महाविद्यालयात नृत्य शिकून आपल्या गावामध्ये नृत्याची शाळा स्थापन करण्याचे स्वप्न बाळगत आहेत. नालंदा नृत्य कला महाविद्यालयामध्ये आपण शास्त्रीय नृत्यामध्ये पदवी, पदवीत्तर व पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेऊ शकतो आणि भारतामध्ये हे फक्त नालंदा नृत्य कला महाविद्यालयात आपण करू शकतो हे या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून विद्यापीठ अनुदान आयोगाची यास मान्यता आहे. `नालंदा नृत्य संशोधन केंद्र’ हे भारतातील एकमेव असे नृत्य केंद्र आहे ज्याला भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची `शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन केंद्र’ म्हणून मान्यता आहे.
नालंदा नृत्य कला महाविद्यालयाला सुरुवातीला बऱ्याच जणांनी विरोध केला होता. असं म्हणतात ना, आपण काही चांगले काम करत असू तेव्हा सर्व बाजूंनी तुमचा विरोध होतो. त्याचेच हे एक उदाहरण; पण या विरोधाला हिमालयाप्रमाणे सामोरे जाऊन डॉ. कनक रेळे यांनी नालंदा नृत्य कला महाविद्यालय सुरू केले. या प्रवासात त्यांना मोलाची साथ दिली, ती त्यांच्या सुनेने म्हणजेच डॉ. उमा यांनी. डॉ. उमा यांचा जन्म मुंबईमधला. एका प्रतिष्ठित गुजराती परिवारामध्ये त्यांच्यावर संस्कार झाले. वाणिज्य क्षेत्रातील पदवी तर त्यांनी घेतली, पण मनातून नृत्याबद्दलचे प्रेम काही केल्या जात नव्हते. त्यानंतर त्यांनी नालंदा नृत्य कला महाविद्यालयात प्रवेश घेतला व नृत्य देवतेची प्रामाणिकपणे त्या आराधना करू लागल्या. डॉ. उमा रेळे सध्या त्या नालंदा नृत्य कला महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. कनक रेळे यांची नात वैदेही रेळे या देखील नृत्यांगना असून त्या आपले योगदान महाविद्यालयमध्ये देत असतात. महाभारत सारख्या महाकाव्याचा त्यांचा व्यासंग पाहून थक्क व्हायला होतं. मराठी, हिंदी, संस्कृतसह दाक्षिणात्य भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व अचंबित करणारं आहे. पौराणिक कथेत नेहमीच दुय्यम महत्त्व दिल्या गेलेल्या व वेळप्रसंगी बंडखोरी करणाऱ्या पात्रांना सध्याच्या काळात शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून बोलते करण्याचे श्रेय डॉ. कनक रेळे यांच्याकडे जाते. महाभारतातील अंबा, द्रौपदी व गांधारी या व्यक्तिरेखांवर झालेला अन्याय लक्षात घेता शास्त्रीय नृत्यातून हे सामाजिक भान जपणे महत्त्वाचे आहे, या भावनेतून त्यांनी सुमारे २१ वर्षांपूर्वी पौराणिक पात्रांना नृत्यातून बोलके करण्याऱ्या कार्यक्रमाची निर्मिती केली. त्यांनी देशविदेशांमध्ये आपल्या नृत्याच्या माध्यमातून हा विषय लोकांपर्यंत पोहोचवला आहे.
२०१६ मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्यातर्फे विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा गोदावरी गौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. भारत सरकारने डॉ.कनक रेळे यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. वयाची ८३ ओलांडल्यानंतरही डॉ.कनक रेळे या नृत्य शिकणाऱ्या अनेक पिढया तयार करण्यात व्यग्र आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply