नवीन लेखन...

द ग्रेट डायमंड रॉबरी !

गोरेगावमधील एनसीसी मैदानावरील भारतीय आंतरराष्ट*ीय दागिने प्रदर्शनात ‘दालुमी हाँगकाँग’ कंपनीच्या स्टॉलवरून तब्बल ६.६ कोटी रूपयांचे हिरे चोरीला गेले. सीसीटीव्हीच्या फुटेजमधून चार परदेशी हिरेचोरांचा संशय आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. इंटरपोल पथक आणि दुबई पोलिसांच्या मदतीने १० तासांच्या आत मेक्सिकोच्या चारही हिरेचोरांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली.

मुंबईतील गोरेगाव हा उच्च मध्यमवर्गीयांचा भाग मानला जातो. उच्चभ्रू परिसर… नॅशनल एक्झिबिशन सेंटर (एनसीसी)च्या मैदानात भरवण्यात आलेलं दागिने-हिर्‍यांचं आंतरराष्ट*ीय प्रदर्शन… वातावरणात एक प्रकारचा दिमाख आणि गर्भश्रीमंत लोकांची ये-जा… हिर्‍यांच्या व्यापार्‍यांची स्टॉल काढण्यासाठी चाललेली लगबग आणि एकूणच हिर्‍यांचा झगमगाट… अशा धीरगंभीर वातावरणात त्या ठिकाणी पुढील तासाभरात एखादा थरार अनुभवायला मिळणार आहे अशी कल्पनाही कुणी केली नसेल. ‘भारतीय आंतरराष्ट*ीय दागिने प्रदर्शन’ म्हटलं की चोख सुरक्षा व्यवस्था आलीच. बंदुकधारी सुरक्षारक्षक तेथे तैनात करण्यात आले होते. आशिया खंडातील हे सर्वात मोठं प्रदर्शन होतं. दुपारची तीनची वेळ असली तरी प्रदर्शनातला झगमगाट कायम होता. तिथे भारतीयांबरोबरच परदेशी नागरिकांचीही ये-जा सुरू होती. या प्रदर्शनात दालुमी ग्रुप ही इस्त्राईलची कंपनीही सहभागी झाली होती.

या प्रदर्शनासाठी गुरेरो लुगो ही तरूणी तर केम्पोस मोलान, गोन्झालेझ माल्डोन्डो या मेक्सिकोच्या तरूणांनी तर व्हेनेझुएलाचा गुटिएरझ ऑर्लेन्डो यांनी आगाऊ नोंदणी केली होती. एका कंपनीचे प्रतिनिधी असल्याच्या बहाण्याने त्यांनी प्रदर्शनात शिरकाव केला. प्रदर्शन पाहत पाहत या चौघांनी पहिल्या मजल्यावरील ‘दालुमी हाँगकाँग’ या कंपनीच्या स्टॉलकडे त्यांनी मोर्चा वळवला. प्रत्यक्षात ते प्रदर्शन केवळ दागिने आणि हिर्‍यांच्या व्यापाराशी संबंधित लोकांसाठीचं खुलं होतं. प्रदर्शनातील नोंदणीसाठी शुल्कही आकारण्यात आलं होतं. मात्र, परदेशी नागरिक हे पर्यटक असल्याने त्यांना सूट देण्यात आली होती. ‘दालुमी हाँगकाँग’च्या स्टॉलजवळ आल्यानंतर या चौघांनी स्टॉल प्रतिनिधी गॉय येहस्कील यांना स्टॉलबाहेर बोलावून हिर्‍यांच्या किमतीबद्दल विचारायला सुरूवात केली. ‘ग्राहक देवो भव’ या कल्पनेने येहस्कील त्यांना माहिती देत होते. तिघांनी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवलं. चौघांपैकी एक तरूण स्टॉलच्या मागच्या बाजूला गेला. तेथील लोक आवराआवरीत मग्न असलेले पाहून त्याने हळूच हिर्‍यांचा एक बॉक्स उचलून आपल्याजवळील बॅगमध्ये टाकला. या बॉक्समध्ये तब्बल ६.६ कोटी रुपयांचे ८८७.२४ कॅरेटचे लखलखते हिरे होते. काम फत्ते झाल्यानंतर त्याने इतर तिघांना इशारा केला. लगेचच चौघांनी प्रदर्शनातून काढता पाय घातला आणि त्यांनी मेक्सिकोला रवाना होण्यासाठी थेट विमानतळ गाठले.

चौघांनी आधीच तिकिटे काढून ठेवली होती. मेक्सिकोला जाण्यासाठी थेट विमान नसल्याने मुंबई ते दुबई, दुबईतून हॅम्बर्ग आणि तेथून मेक्सिकोला जाण्याचा त्यांचा बेत होता. आपली चोरी पकडली न गेल्याच्या आनंदात विमानात बसून ते दुबईला रवाना झाले. साधारणपणे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास हिरे चोरीला गेले. ५.३० वाजता ही बाब दालुमी हाँगकाँगच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आली. प्रदर्शनामध्ये हिरे चोरीला गेल्याचा संशय आल्याने खळबळ उडाली. प्रदर्शनाच्या हॉलची सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. उपस्थित असलेल्या सर्वांची कसून तपासणी करण्यात आली. पण खरे ‘हिरेचोर’ आधीच पसार झाले होते. त्यानंतर प्रदर्शनाचे आयोजक वसंत मेहता यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले. फुटेज तपासल्यानंतर एकाने हिर्‍यांचा बॉक्स उचलून बॅगेत ठेवल्याचे आणि नंतर चौघांनी पळ काढल्याचे निदर्शनास आले. तातडीने पावले उचलण्याच्या उद्देशाने मुंबई पोलिस क्राईम ब्रांचच्या युनिट क्रमांक १२ च्या अधिकार्‍यांनी देवेन भारती आणि मिलिद खेटले यांच्या मार्गदर्शनाखाली लगेचच सुत्रे फिरवली.एव्हाना तपास वेगात सुरू झाला. पोलिसांनाही प्रकरणाचे गांभीर्य उमगले होते. चोरांना पकडण्यासाठी चारही दिशांनी लगबग सुरू झाली. या तपासाबाबत गुन्हे शाखेचे अधिकारी विशेष काळजी घेत होते. त्यांनी सांगितले, ‘सीसीटीव्हीवरील फुटेज तपासल्यानंतर चित्र स्पष्ट दिसत नव्हते. फुटेज पुन्हा बारकाईने तपासण्यात आले तेव्हा परदेशी नागरिकांच्या पेहरावांचा रंग आणि संशयास्पद हालचाल लक्षात आली.’ परिस्थितीचा नेमका अंदाज आल्यामुळे पोलिसांनी थेट विमानतळ अधिकार्‍यांशी संफ साधला. तोपर्यंत रात्रीचे १२.३० वाजून गेले होते. परदेशी नागरिक प्रदर्शनात येण्याआधी त्यांच्या पासपोर्टची आणि ओळखपत्राची प्रत घेण्यात आली ह
ती. ती संबंधित अधिकार्‍यांकडे सुपूर्त करण्यात आली.

एव्हाना घडला प्रकार पोलिसांच्या नीट लक्षात आला होता. विमानतळावरील अधिकार्‍यांनी छानबीन केल्यानंतर ते चौघे १०.३० च्या विमानाने दुबईकडे रवाना झाले होते. हिरेचोर हातून निसटल्याने मुंबई पोलिसांना मोठ्या हुशारीने पुढील योजना आखावी लागणार होती. पोलिसांनी हिरेचोरांना पकडण्यासाठी इंटरपोलशी संफ साधला. इंटरपोलने संबंधित चार परदेशी नागरिक दुबईला पोहोचले असल्याच्या शक्यतेला दुजोरा दिला. पोलिसांनी दुबईतील पोलिसांशी संफ साधला. त्यांनी कसून चौकशी केल्यावर दुबईतून हॅम्बर्गला जाणारे विमान काही वेळातच सुटणार असल्याची माहिती मिळाली. परदेशी नागरिकांची ओळखपत्रे, फोटो यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर ही माहिती लगेचच दुबई विमानतळाला कळवण्यात आली. इंटरपोलच्या पथकाने चौघांना रात्री दीड वाजता दुबई विमानतळावर अटक करण्यात यश मिळवले. मात्र, दुबई पोलिसांना त्या चौघांकडील सामानामध्ये हिरे सापडले नाहीत. त्यांनी हिरे गिळले असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळेच ते विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना चकवा देऊन सहीसलामत बाहेर पडले असावेत असाही अंदाज बांधण्यात आला. दुबई पोलिसांनी त्या चौघांचे एक्सरे काढून घेतले. एक्सरे रिपोर्टवरून चौघांनी हिर्‍यांची ७५ पाकिटे गिळल्याचे निदर्शनास आले. हिरे बाहेर काढण्यासाठी औषधे देण्यात आली तेव्हा त्यांच्या शरीरातून ८८७ कॅरेटचे हिरे बाहेर पडले. चोरीचा माल पचत नाही हेच खरे !

क्राईम ब्रांचच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार मुंबई पोलिस सतत दुबई पोलिसांच्या संपर्कात राहिले. या चौघांना पुन्हा मुंबईला आणण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आणि त्यांच्याविरूद्ध अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. हिरे चोरण्याचा बेत अत्यंत हुशारीने आखला आल्याने हे चौघे आंतरराष्ट*ीय गँगचे सदस्य असावेत असाही पोलिसांना संशय आहे. कारण, हे चार परदेशी नागरिक एक आठवड्यापूर्वीच केप वॉचमेकर या मेक्सिकोतील हिर्‍यांच्या कंपनीचे बनावट प्रतिनिधी बनून मुंबईत आले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय आंतरराष्ट*ीय दागिने प्रदर्शनासाठी आगाऊ नोंदणीही केली. त्यांचा हा बेत पाहता या चौघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर बर्‍याच मोठ्या गँगचा ठावठिकाणा लागू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे पोलिसांच्या कामगिरीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना परदेशी नागरिकांना १० तासांच्या आत पकडण्यात यश आल्याने पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे. अर्थात या सर्व थरारात सीसीटीव्ही कॅमेर्‍याने महत्त्वाची भूमिका बजावली याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

— विजय जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..