नवीन लेखन...

महान शास्त्रज्ञ मादाम मेरी क्युरी

महान शास्त्रज्ञ मॅडम मेरी क्युरी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ रोजी झाला.

महिला वैज्ञानिकांच्या विश्वामध्ये मेरी क्युरी यांचे नाव घेतल्याशिवाय हे विश्व संपूर्ण होणार नाही. मेरी क्युरी या पोलिश-फ्रेंच भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या. रेडिओ अॅूक्टिव्हिटीविषयी त्यांचे संशोधन क्रांतिकारी आणि मूलभूत ठरले. त्या पॅरिस विद्यापीठामध्ये पहिल्या महिला प्रोफेसर होत्या. नोबेल पारितोषिक मिळवणा-या त्या पहिल्या महिला आहेत, दोन वेगवेगळ्या विज्ञानांसाठी नोबेल पारितोषिक मिळवणा-या त्या एकमेव महिला आहेत.

रशियन पोलंडमध्ये वॉर्सा येथे त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत त्या तिथेच राहिल्या. १८९१ मध्ये बहिणीपाठोपाठ त्या पॅरिसमध्ये शिक्षणाकरिता आल्या. येथे त्यांनी उच्च शिक्षण आणि पदवी मिळवली. त्यांचे सर्वात मोठे शोध म्हणजे रेडिओ अॅआक्टिव्हिटीचा शोध, रेडिओ अॅषक्टिव्ह मूलद्रव्याला वेगळे करणे आणि पोलोनियम व रेडियम या दोन मूलद्रव्यांचा शोध.

यांच्या मार्गदर्शनाखाली जगात प्रथम शरीरावरच्या सुजेवर रेडिओ अॅयक्टिव्ह मूलद्रव्यांचा वापर करून उपचार करण्यात आले. त्या जरी फ्रेंच नागरिक होत्या तरी त्यांनी स्वत:ची मूळ पोलिश ओळख कधीही सोडली नाही. त्यांनी 1898 मध्ये शोधलेल्या पहिल्या मूलद्रव्यालाही त्यांनी स्वत:च्या देशावरून पोलोनियम हे नाव दिले होते.

पहिल्या महायुद्धाच्या वेळेस स्वतंत्र पोलंड आंदोलनातदेखील त्या सहभागी होत्या. त्या त्यांच्या कुटुंबामधील पाचवे आणि सर्वात लहान अपत्य होत्या. त्यांचे आईवडील दोघेही शिक्षक होते. त्यांचे वडील भौतिकशास्त्र आणि गणिताचे शिक्षक होते आणि यामुळे मेरी यांना भौतिकशास्त्र आणि गणित याची गोडी निर्माण झाली. पोलंडमध्ये घडत असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये वेगवेगळ्या संघर्षामधून या कुटुंबाला जावे लागले. १८९३ मध्ये त्यांना भौतिकशास्त्रामधील पदवी मिळाली. १८९४ मध्ये गणितामधील पदवी मिळाली. याच वर्षी पिअर क्युरी हे त्यांना भेटले. त्या परत पोलंडमध्ये वॉर्सा येथे गेल्या. परंतु त्यांना त्या एक महिला आहेत म्हणून नाकारले गेले. त्या परत पॅरिसला आल्या. जवळजवळ एक वर्षानंतर जुलै १८९५ मध्ये त्यांनी पिअर क्युरी यांच्याशी विवाह केला. यानंतर या दोन्ही भौतिक शास्त्रज्ञांनी क्वचितच प्रयोगशाळा सोडली असेल. दुर्मीळ माणसांमध्ये त्यांची गणती झाली. त्यांनी एकत्र केलेले काम अजरामर आणि क्रांतिकारी ठरले.

१८९६ मध्ये हेन्री बेक्वरेल यांनी युरेनियमचे क्षार शोधून काढले होते, ज्यांच्यामधून एक्स रे इतक्या भेदनशक्तीचे काही किरण बाहेर पडत होते. मेरी क्युरी यांनी त्यांच्या संशोधनासाठी युरेनियम किरणांचा अभ्यास करायचे ठरवले. त्यांनी काही नमुन्यांच्या तपासणीसाठी चातुर्याने तंत्र शोधले. त्यांनी हे सिद्ध केले कीयुरेनियमची किरणे जिथे आहेत तिथे त्याच्या अवतीभवतीच्या हवेमध्ये नमुन्यात इलेक्ट्रिक भार तयार होतो. या तंत्राचा वापर करून त्यांनी हे सिद्ध केले की युरेनियमची रेडिओ अॅ क्टिव्हिटी ही त्याच्या मात्रेवर अवलंबून असते. त्यांनी हे दाखवले कीयामध्ये होणारा किरणोत्सर्ग हा कोणत्याही अणूंच्या आंतरक्रियेमुळे होत नाही तर त्याच्या अणूमधून होत असतो. शास्त्रीय भाषेत हे त्यांचे एकटीचे आणि अत्यंत महत्त्वाचे संशोधन होते. मॅडम क्युरी यांना मात्र आधीच जाणवले होते की एका स्त्रीने इतके मूलभूत संशोधन केले आहे आणि एका स्त्रीची ही क्षमता आहे, हे काही जगाला सहजासहजी मान्य होणारे नव्हते. पिअर क्युरी यांना हे लक्षात आले होते की मॅडम क्युरीचा शोध हा बेगडी नाही. त्यांना या शोधाने इतके चक्रावून टाकले की त्यांनी त्यांचे स्फटिकावरचे संशोधन थांबवले आणि मॅडम क्युरीसोबत तेही रेडिओ अॅाक्टिव्हिटीवर काम करू लागले.

१४ एप्रिल १८९८ रोजी त्यांनी १०० ग्रॅम पीचब्लेंड एका खलबत्त्यामध्ये वाटायला सुरुवात केली. त्यांना माहीत नव्हते की ते ज्याचा शोध घेत होते ते कित्येक टन धातू पाषाणामधून अगदी थोडेसे मिळणारे मूलद्रव्य आहे. ते जे काम करीत आहेत ते मूलद्रव्य किती अपायकारक आहे आणि त्याची काय किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. हे काम करीत असताना त्यांनी कोणतेही संरक्षणसाहित्य वापरले नव्हते. जुलै १८९८ मध्ये मादाम मेरी क्युरी आणि पिअर क्युरी यांनी शोधनिबंध प्रसिद्ध केला. यात त्यांनी ‘पोलोनियम’ नावाच्या मूलद्रव्याचे अस्तित्व मांडले.

26 डिसेंबर रोजी या दोघांनी ‘रेडियम’ या मूलद्रव्याच्या अस्तित्वाबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध केला. यावरूनच रेडिओ ऍक्टिव्ह हा शब्द नंतर तयार झाला. १९०२ मध्ये टनभर पीचब्लेंडच्या धातुपाषाणामधून एक दशांश रेडियम क्लोराइड वेगळे करण्यात त्यांना यश मिळाले. १९०३ मध्ये पिअर क्युरी, हेन्री बेक्वेरेल आणि मादाम क्युरी यांना भौतिकशास्त्रामधील कामगिरीबद्दल नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. पिअर क्युरी आणि मादाम क्युरी हा सन्मान स्वीकारण्यासाठी आर्थिक अडचणीमुळे स्टॉकहोमला जाऊ शकले नव्हते, परंतु यासाठी लागणा-या औपचारिकतेसाठी त्यांना त्यांच्या मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत केली होती. नोबेल पारितोषिक मिळाल्यामुळे क्युरी दांपत्य एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले.

१९०६ मध्ये पिअर क्युरी यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. १९१० मध्ये मादाम क्युरी यांनी शुद्ध रेडियम शोधून काढले. १९११ मध्ये नोबेल प्राप्त केल्यानंतर अवघ्या महिनाभराने त्यांना रुग्णालयामध्ये ठेवावे लागले. उदासीनता आणि मूत्राशयाचे लहान दुखणे त्यांना झाले होते. दोन क्षेत्रांमध्ये, दोघाजणांसोबत विभागून आणि दोन वेळेला नोबेल मिळवणा-या त्या एकमेव आणि महिला शास्त्रज्ञ आहेत. तरीसुद्धा १९११ मध्ये केवळ त्या महिला आहेत या कारणामुळे फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेसची निवडणूक फक्त दोन मतांमुळे जिंकू शकल्या नाहीत.

पहिल्या महायुद्धात मॅडम क्युरी यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी फिरती रेडिओग्राफीची एक मोटार तयार केली आणि अनेक जखमी सैनिकांवर उपचार केले. या मोटारीकरिता लागणारी ऊर्जा रेडियम निस्सारणातून निर्माण होणा-या रंगहीन वायूमधून मिळत असे. हा वायू म्हणजे रेडॉन हे नंतर समजले. युद्ध सुरू झाल्यावर त्यांनी स्वत:ची सोन्याची नोबेल मेडल्सदेखील देऊ केली होती. रेडियमच्या सततच्या सान्निध्यामुळे त्या प्रचंड अशक्त झाल्या होत्या. या वेळेला रेडियमचा मानवी शरीरावर काय प्रभाव पडत असतो हे माहीत नव्हते. त्यामुळे त्यांनी कधी सुरक्षेसाठी काहीच साधने वापरली नव्हती.

मेरी क्युरी यांचे ४ जुलै १९३४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..