महान गायक नट स्वरराज पं. उदयराज गोडबोले यांचा जन्म १७ जून १९२५ रोजी झाला सांगली येथे झाला.
गायकीला अभिनयाची साथ देत रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविणारे उदयराज गोडबोले यांची गायनासह अभिनय करणारा हाडाचा कलाकार म्हणून ख्याती होती. त्यांचे वडील दिनकर गोडबोले हे सांगली संस्थानात गायक होते. गायनाचे शिक्षण त्यांनी सर्वप्रथम आपले वडील दिनकर गोडबोले यांच्याकडून घेतले. तेच त्यांचे पहिले गुरू ठरले. त्यानंतर छोटा गंधर्व आणि पं. भीमसेन जोशी यांच्याकडूनही त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. छोटा गंधर्व यांना ते गुरूस्थानी मानत. त्यांच्यासारखीच गायनाची शैली उदयराज गोडबोले यांनी आत्मसात केली होती. तसेच पंडित भीमसेन जोशी यांचे ते गंडाबंध शिष्य होते.
‘देवमाणूस’, ‘बैजू’, ‘अशी बायको हवी’, ‘वऱ्हाडी माणसे’, ‘संगीत सौभद्र’, ‘मानापमान’, ‘एकच प्याला’, ‘ब्रह्मचारी’, ‘लग्नाची बेडी’, ‘संशयकल्लोळ’, ‘सुवर्णतुला’, ‘मैलाचा दगड’ ‘भावबंध’सारख्या संगीत नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ हा ‘प्रीतिसंगम’ नाटकातील त्यांनी गायलेला अभंग अजरामर ठरला. ‘प्रिती संगम’मध्ये त्यांची गोविंदबुवा ही भूमिकाही विशेष गाजली होती. सौभद नाटकात त्यांनी रंगवलेला नारद हुबेहुब वठला होता. त्यानंतर ‘उडूनी जा पाखरा’, ‘मी ही सुंदर, तुही सुंदर’ या सारखी त्यांच्या आवाजातील विविध गाणी लोकप्रिय ठरली.
गोडबोले यांच्या अभिजात गायकीचा सन्मान म्हणून पुणे महापालिकेने त्यांना ‘बालगंधर्व’ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्या समारंभाला ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे आणि वसंतराव देशपांडे आदींची उपस्थिती होती.
उदयराज गोडबोले यांचे १९ फेब्रुवारी २०१० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply