भारतीय रेल्वेची तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेची सुरुवात ब्रिटीशांनी भारतात आणि आशिया खंडात १८५३ साली केली. बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली स्टीम इंजिन असलेली ट्रेन धावल्यानंतर या ट्रेनचा विकास होण्यास बराच कालावधी लागला आणि त्यानंतर पहिली ईएमयु (वीजेवर चालणारी )लोकल धावण्यास १९२५ साल उजाडले. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी चार डब्यांची असलेल्या ईएमयु लोकलला तेव्हाचे मुंबईचे गर्व्हनर सर लेस्ली विल्सन यांनी हिरवा कंदील दाखविला होता. ही लोकल व्हीटी ते कुर्ला अशी हार्बर मार्गावर धावली. त्याला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आणि १९२५ सालात दररोज १५० फेऱ्या होऊ लागल्या. फेऱ्यांमधून रोज २ लाख २० हजार प्रवासी प्रवास करत होते. मिळणारा प्रतिसाद पाहता त्यानंतर या लोकल फेऱ्या टप्प्याटप्याने वाढविल्या. १९२५ मध्ये चार डबे, १९२७ मध्ये आठ डबे, १९६३ मध्ये नऊ डबे आणि थेट २०१६ मध्ये बारा डब्यांची लोकल हार्बर मार्गावर धावू लागली आहे.
रे रोड हे नाव मुंबईचे गवर्नर (१८८५-१८९०) असलेले लॉर्ड रे यांच्या स्मरणार्थ देण्यात आले होते.पुढे १९२५ मधे हार्बर लाइन बोरीबन्दर स्टेशनला जोडली गेली, यासाठी सैंड्हर्स्ट रोड आणि डॉकयार्ड रोड यांदरम्यान एलिवेटेड स्टेशन उभारण्यात आले. तोपर्यंत प्रवाशांना रे रोड पासून बोरीबंदर अर्थात व्हिटीपर्यन्त अंतर कापण्यास ट्राम वापराव्या लागत. डॉकयार्ड रेल्वे स्थानक माझगाव डॉकमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी सोयीचे आहे. हे रेल्वे स्थानक माझगावचाच एक भाग आहे. शिवाय भाऊच्या धक्क्यावर जाणाऱ्या लोकांसाठीही हे स्थानक महत्वाचे आहे. हार्बर लाईन फक्त दुहेरी लोहमार्गाची असल्याने यावर जलद लोकल चालवता येत नाहीत. मेन लाईन आणि हार्बर लाईन सीएसटीपासून सॅन्डहर्स्ट स्थानकापर्यंत एकमेकांना समांतर जातात आणि पुढे एलव्हेटेड स्थानकांच्या साहाय्याने हार्बर लाईन पुढे जाते.
सैंडहर्स्ट रोड स्टेशनचे बांधकाम १९२१ मधे झाले.सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नामकरण हे मुंबईचे १८९५ ते १९०० दरम्यान मुंबईचे गव्हर्नर राहिलेले लॉर्ड सॅन्डहर्स्ट यांच्या नावावरून करण्यात आले आहे. हे स्थानक मेन लाईनसाठी १९१० साली बांधण्यात आले होते. जेव्हा हार्बर लाईनचा विस्तार करून व्हिटी स्थानकाला जोडण्याच्या विचार झाला तेव्हा १९२१ मध्ये दुसरे एलेव्हेटेड स्थानक बांधले गेले. यासाठी लागणारे लोखंडी साहित्य इंग्लंडहून मागवण्यात आले होते.
मस्जिद बंदर स्टेशन :- याचे बांधकाम १८७७ मधे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुले केले. याचा अर्थ १८५३ मधे पहिली ट्रेन धावली तेव्हा हे नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याला “मस्जिद” हे नाव कोण्या मशिदीमुळे नाही तर ज्यु लोकांच्या सिनेगॉग वरुन मिळाले आहे. स्थानिक लोक या सिनेगॉगला “जुनी मशीद” म्हणून ओळखत,तेच नाव स्टेशनला मिळाले. मस्जिद बंदर रेल्वे स्थानक हे कायम घाऊक व्यापाऱ्यांमुळे गजबजलेले असते. कारण क्रॉफर्ड मार्केट याच स्थानकाला लागून असल्याने घाऊक व्यापाऱ्यांची इथे ये-जा करण्यासाठी नेहमीच वर्दळ असते, त्यांच्यासाठीच हे स्थानक सर्वात जास्त महत्वाचे आहे.
’कॉटन ग्रीन’ रेल्वे स्थानक – १९व्या शतकाच्या प्रारंभापासून पूर्वेला चीनकडे आणि पश्चिमेला इंग्लंड आणि युरोपकडे कपाशीची निर्यात हा मुंबईतील एक प्रमुख व्यवसाय झाला होता. दक्षिण हिंदुस्तानात उत्पादन झालेली कपास (कॉटन) निर्यातीसाठी मुंबईत जमा होई आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत तिला टाउन हॉलसमोरच्या मोकळ्या जागेत साठवत असत. हे पहिले ’कॉटन ग्रीन’. कॉजवेमुळे कुलाबा मुंबईस जोडला गेल्यानंतर आणि १८६७ साली बीबीसीआय रेल्वेने कुलाबा स्टेशन बांधल्यावर मुंबईत येणारी कपास साठवणीची नवे ’कॉटन ग्रीन’ ह्या स्टेशनाजवळ आणण्यात आले. तेथे ते साधारण १९३० सालाच्या पुढेमागेपर्यंत होते. रेल्वेने कुलाबा स्टेशन १९३० सालात बंद केले. तदनंतर कापसाचा व्यापार तेथून हलून उत्तरेस हार्बर लाईनवरील ’कॉटन ग्रीन’ नावाच्या नव्या स्टेशनाच्या परिसरात आणि ’कॉटन ए़क्स्चेंज’ ह्या नव्या इमारतीजवळ गेला. हेच आजचे कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक. आता काळ अजून पुढे सरकला आहे आणि ह्या अलीकडच्या ’कॉटन ग्रीन’मध्ये आयातनिर्यात मुख्यत्वेकरून लोखंड आणि पोलादाची होत असते.
चुनाभट्टी रेल्वे स्थानक -: चुनाभट्टीच्या इतिहासाची नोंद एका वेगळ्याच अर्थाने आहे. सर्वाधिक जलद बांधले गेलेले हे रेल्वे स्थानक आहे. याला एक ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमीही आहे. साधारण ५०-६०च्या दशकाच्या सुमारास काँग्रेसतर्फे कृष्ण मेनन हे या भागातून लढत होते. तेव्हा प्रचारासाठी आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी इथल्या मतदारांना या भागात रेल्वे स्थानक बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीत कृष्ण मेनन जिंकले आणि संरक्षण मंत्री झाले, तेव्हा दिलेल्या आश्वासनानुसार या भागात रेल्वे स्थानकाचे काम जोमाने सुरु झाले आणि अवघ्या ६ महिन्यात पूर्ण होऊन चर्चगेट रेल्वे स्थानकाचा रेकॉर्ड मोडला. या स्थानकाचे उदघाटन १९५९-६०च्या सुमारास झाले आणि हार्बर मार्गावरील एक महत्वाचे स्थानक बनले. त्यावेळचे इथल्या भागाचे नाव चुनाभट्टी नव्हते. इथल्या बहुतांश चुना, विटांच्या भट्टयांपासून या नव्या रेल्वे स्थानकाला नाव दिले गेले “चुनाभट्टी”.
१८७९ मधे कुर्ला स्टेशनला उपनगरीय टर्मिनस स्थापन झाले होते. या भागात प्रामुख्याने सापडत असलेल्या “कुर्ली” या खेकड्यांच्या प्रकारामुळे या भागाला नाव “कुर्ला” मिळाले, असे सांगितले जाते. १९०६ मध्ये कुर्ला ते चेंबूर दरम्यान आणखी एक सिंगल रेल्वेलाइन टाकली गेली पण ती मुख्यत्वे कचरा वाहून नेण्यासाठी वापरात होती. पण प्रवाशांसाठी या मार्गावर ट्रेन चालु व्ह्यायला १९२४ साल उजाडले. आधी सर्व इंजीने वाफ़ेची/कोळशाची होती, नंतर कुर्ला-मानखुर्द लोहमार्गाचे १९५० मध्ये विद्युतीकरण झाले.
पुढे १९५१ मध्ये हार्बर लाईनचा विस्तार मानखुर्दपर्यंत झाला. ९०च्या दशकात मुंबईतील जागा कमी पडू लागल्याने “नवी मुंबई” आकारास येत होती. म्हणून मुंबई आणि नवी मुंबई जोडण्यासाठी हार्बर मार्गावर मानखुर्दच्या पुढे रेल्वे ट्रॅक टाकले गेले. नवी मुंबईतील रेल्वे स्थानके ही सिडकोने बांधली आहेत आणि ती अत्यंत सुंदर पद्धतीने बांधली असल्याने या मार्गावरील काही स्थानकांचा सुंदर स्थानकांमध्ये उल्लेखही करण्यात आला होता.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ विनोद गोरे
पुणे.
Leave a Reply