आर्यभट्ट मोहिमेचे प्रमुख डॉ. उडुपी रामचंद्रराव जन्म १० मार्च १९३२ रोजी कर्नाटकातील उडुपी येथील अदामारू गावी झाला.
डॉ.उडुपी रामचंद्र राव उर्फ यू. आर. राव यांनी मद्रास विद्यापीठाची बी.एस्सी. (१९५१) आणि बनारस हिंदू विद्यापीठाची एम्.एस्सी. (१९५३) या पदव्या संपादन केल्यावर त्यांनी विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये विश्वकिरणांसंबंधी संशोधन करून १९६० मध्ये गुजरात विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविली. १९६१ मध्ये ते अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत डॉक्टरेट पदव्युत्तर संशोधन अधिछात्र म्हणून गेले आणि तेथे त्यांनी विश्वकिरणांचे विरूपण व सौरवाताचे गुणधर्म यांसंबंधी संशोधन केले. त्यानंतर १९६३ मध्ये ते डॅलस येथील साऊथ वेस्ट सेंटर फॉर अँडव्हान्सड स्टडी या संस्थेत साहाय्यक प्राध्यापक झाले व तेथे विश्वकिरणांसंबंधीचे संशोधन त्यांनी पुढे चालू ठेवले. पायोनियर–६,–७,–८ व–९ या दूरावकाशीय अन्वेषक यानांनी आणि एक्स्प्लोअरर –३४ व–४१ या उपग्रहांनी यशस्वीपणे वाहून नेलेल्या विश्वकिरण प्रयोगांत राव यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी आयोजित केलेल्या या प्रयोगांमुळे आंतरग्रहीय भौतिकीसंबंधी शास्त्रज्ञांना पूर्णतः नवीन अंतर्दृष्टी मिळालेली आहे. १९८४ ते १९९४ या दहा वर्षाच्या काळात ते इस्रोचे प्रमुख म्हणू कार्य पाहत होते.
यू. आर. राव यांनी एम.जे. के. मेनन, सतीश धवन, आणि विक्रम साराभाईंसारख्या महान शास्त्रज्ञांसोबत काम केलं होतं. भौतिक संशोधन प्रयोगशाळेच्या गव्हर्निंग कॉन्सिलचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते. तिरूवनंतपूरममध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे ते कुलगुरू होते. परदेशातील विद्यापीठांमधील कामांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. आर्यभट्ट हा भारताच्या पहिला उपग्रह राव यांच्या कार्यकाळातच अवकाशात पाठवण्यात आला होता. आर्यभट्ट मोहीम यशस्वी होण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार होता. त्यामुळे भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात राव यांना अनन्य साधारण महत्त्व दिले जाते.
अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स ॲड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनचा गट कामगिरी पुरस्कार (१९७३), रशियाच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय पदक (१९७५), हरि ओम आश्रम प्रेरित विक्रम साराभाई संशोधन पुरस्कार (१९७५), शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (१९७५), इन्स्टिट्यूशन ऑफ एंजिनियर्सचा राष्ट्रीय अभिकल्प पुरस्कार (१९८७), भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार (१९७८), कर्नाटक राज्याचा राज्योत्सव पुरस्कार (१९७५ व १९८३) वगैरे सन्मान त्यांना मिळाले आहेत. यांखेरीज म्हैसूर, राहुरी (कृषी विद्यापीठ), कलकत्ता व मंगलोर येथील विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिलेल्या आहेत. त्यांचे विविध वैज्ञानिक आणि तांत्रिक विषयांवरील सु. १५० संशोधन निबंध निरनिराळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लौकिकाच्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले आहेत.
आज यू. आर. राव यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलने डूडल बनवले आहे.
यू. आर. राव यांचे २४ जुलै २०१७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply