भारत आणि अमेरिका दोन्हीही खंडप्राय देश. शेती हा दोघांच्याही सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा महत्वाचा घटक. फार खोलात न जाता, किंवा रुक्ष आणि किचकट आकडेवारी सादर न करता, या दोन देशांतल्या शेतीची ढोबळ तुलना आणि त्यानंतर थोडा अमेरिकन शेतीचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
अमेरिकेचं क्षेत्रफळ (२२,६४० लाख एकर), भारताच्या क्षेत्रफळाच्या (८,२०० लाख एकर) साधारणपणे तिप्पट आहे. त्यातील शेतीच्या वापरासाठी असणारी जमीन, अमेरिकेत ९,३८० लाख एकर तर भारतात ४,०५० लाख एकर एवढी आहे. म्हणजे अमेरिकेच्या एकूण जमिनीपैकी साधारण ४१% जमीन शेतीसाठी, तर भारतात सुमारे ५१% जमीन शेतीसाठी वापरली जाते. २००० सालच्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत सुमारे २२ लाख फार्मस आहेत तर भारतात हीच संख्या १२०० लाख आहे. भारतात एवढया प्रचंड मोठया प्रमाणावर फार्मस असण्याचे कारण म्हणजे आपल्या फार्मसचे छोटे आकार. सर्वसाधारण अमेरिकन फार्मचे क्षेत्रफळ आहे ४१८ एकर्स तर भारतात हाच आकार घटून होतो ३.३ एकर्स. त्यात पुन्हा वंशपरंपरेने वडिलोपार्जित जमीन मुलांमधे विभागली जात असल्यामुळे, दर पिढीमागे फार्मसचा आकार अधिकच लहान होत चालला आहे. शिवाय भारतात अनेक राज्यांमधे जमिनीसंदर्भाच्या कायद्यांनुसार, जमिनीच्या मालकी हक्कांवर बंधने टाकली आहेत. त्यामुळे अशा राज्यांमधे, जलसिंचित जमिनीवर १० ते २० एकर आणि कोरडवाहू जमिनीवर १५ ते ६० एकर, अशी मालकी हक्काची बंधनं आहेत.
आजमितीला भारतातले साधारण ६०% लोक शेती किंवा पशुपालनाच्या जोडधंद्यावर अवलंबून आहेत. अमेरिकेत हेच प्रमाण केवळ २% आहे. शिवाय भारतीय शेती ही एकरी उत्पादनाच्या दृष्टीने, जगातील सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा देखील निकृष्ट दर्जाची आहे. भले दूध, तांदुळ, ऊस, गहू, शेंगदाणे, भाजीपाला, ह्या गोष्टींच्या उत्पादनात आपला जगात पहिला, दुसरा नंबर असेल, पण त्यात एकेका गायीच्या किंवा प्रत्येक एकरी उत्पादकतेपेक्षा, आपलं एकूण संख्याबळ (गायींची संख्या किंवा त्या धान्याच्या लागवडीखाली असलेले एकर्स) प्रचंड आहे, हीच खरी गोम आहे.
या पार्श्वभूमीवर, भारताच्या आणि अमेरिकेच्या शेतीचा तौलनिक अभ्यास करणं योग्य ठरणार नाही. अमेरिकन शेतांच्या प्रचंड मोठ्या आकारामुळे आणि तुटपुंज्या मनुष्यबळामुळे, शेतीचं अधिकाधिक यांत्रिकीकरण ही गरज होती आणि आहे. या उलट भारताच्या टिचभर आकाराच्या फार्मसवर मोठी यंत्र सामग्री वापरणे हास्यास्पद होईल. शिवाय शेतीच्या आधारे उदरनिर्वाह करणार्या लाखो करोडो गरीब कष्टकरी जनतेच्या पोटावर पाय दिल्या सारखं ते होईल.
अमेरिकन फार्मस एवढे मोठे कसे झाले आणि त्यांच्यात काळानुसार कसे बदल घडत गेले ते बघणं थोडं मनोरंजक ठरेल. तसंच कष्टांना आणि उद्योजकतेला जोड देऊन, पुढच्या पिढयांच्या हातात शेतीची सूत्र सोपविण्यासाठी अमेरिकेत काय केलं जातं, ते पाहणं देखील योग्य ठरेल.
Leave a Reply