काऊंटी फेअर्स
सन १८०० च्या सुमारास शेतकी जत्रांमधून खेडयापाडयातील लोकांना नवीन शेतकी तंत्रज्ञान, साधनं, पिकांच्या आणि जनावरांच्या जाती – उपजाती बघण्याची संधी मिळायची. १९ व्या शतकात, या जत्रांमधे इतर शैक्षणिक, स्पर्धात्मक, सामाजिक तसंच करमणुकीच्या गोष्टींचा समावेश होत गेला. त्या नंतर केवळ काही पिढयांमध्ये, जिल्हा आणि राज्य स्तरावरच्या शेतकी जत्रा, ही पूर्णांशाने एक अमेरिकन पध्दत / रीतिरिवाज (tradition) बनून गेली.
सुरवातीला या जत्रा केवळ काही सधन लोक भरवायचे. १८०७ साली मॅसेच्युसेट्स राज्यातल्या वॅटसन नावाच्या एका गृहस्थाने याची सुरुवात केली. त्याने सुरुवात केली ती मेंढयांची लोकर भादरायचे प्रदर्शन भरवून. १८१० साला पर्यंत हे प्रदर्शन म्हणजे फक्त मेंढया भादरायचे प्रदर्शन न राहता, त्याला एका छोटया जत्रेचे रूप आले होते. त्यात तीन, चार हजार जनावरांच्या प्रदर्शनाबरोबरच स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम, इतर ग्रामीण उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन, वगैरे गोष्टींचा समावेश झाला होता. वॅटसनने मोठ्या हुषारीने, स्त्रियांना देखील प्रदर्शनात गोडी निर्माण व्हावी म्हणून घरगुती कलाकुसरीच्या वस्तु, खाद्य पदार्थ वगैरे गोष्टींचा समावेश केला होता. आणि या सर्वांवर कळस म्हणजे या जत्रेचाच एक भाग म्हणून वार्षिक नाचगाण्याचा कार्यक्रम देखील ठेवला होता.
जसजशी वॅटसनच्या या जत्रेची बातमी पसरू लागली तसतशा जागोजागच्या शेतकरी सोसायटया देखील अशाच स्वरूपाच्या जत्रा आयोजित करण्यासाठी पुढे सरसावल्या. साधारण १८३० सालापर्यंत या ठिकठिकाणच्या जत्रांना तेथील स्थानिक धनिकांच्या पैशाशिवाय आर्थिक पाठबळ फारसे नव्हते. त्यामुळे बर्याचदा त्यांना आर्थिक चणचण जाणवायची. परंतु १८४० च्या सुमारास विविध राज्यांच्या विधानसभांनी शेतकी boards ची स्थापना केली आणि शेती संस्थांना पैसे पुरवायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून शेती जत्रा अधिक मोठया, वैविध्यपूर्ण आणि सुनियोजित होऊ लागल्या. १८४१ साली न्यूयॉर्क राज्यातील अशी पहिली जत्रा सिरॅक्युस या गावी भरली आणि तिला जवळजवळ १५००० लोकांचा प्रतिसाद लाभला.
लवकरच या जत्रा म्हणजे सार्या देशभर एक मोठंच आकर्षण ठरल्या. लोक या जत्रांची मोठया आतुरतेने वाट बघू लागले. अनेक शेतकरी कुटुंबं, जवळजवळ महिनाभर आधीपासून आपल्या कामाचे आयोजन करून, जत्रेसाठी काही दिवस मोकळे राहतील अशी तजवीज करू लागली. या जत्रा म्हणजे त्यांच्या दृष्टीने रोजच्या धबडग्यातून मोकळं होण्याचं आणि करमणुकीचं एकमेव साधन होतं. अनेक ग्रामीण लोकांसाठी या जत्रा म्हणजे विजेचे दिवे, कपडे धुण्याचं मशिन वगैरे आधुनिक गोष्टी प्रथमच बघण्याची संधी असायची.
यादवी युद्धाच्या वेळी, मीडवेस्ट मध्ये, लष्कराने या जत्रेच्या मैदानांचा उपयोग, लष्करी कवायती करण्यासाठी करायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक ठिकाणच्या जत्रा बंद पडल्या किंवा त्यांना इतरत्र जागा शोधायला लागल्या. यादवी युद्ध संपल्यानंतर पुनश्च जत्रांची लोकप्रियता उसळून आली. बहुतेक सार्या राज्यांनी भरपूर पैशाची मदत केल्यामुळे, अनेक ठिकाणी या जत्रांना कायम स्वरूपाचे बांधकाम करता आले. १८७० नंतर, राजकीय भाषणे, विविध खेळ, करमणुकीचे प्रयोग आणि खाद्यपदार्थांची चंगळ हे या जत्रांचे एक कायम अंग होऊन गेले.
Leave a Reply