शरीरातील आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठी दिवसभरात चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करून जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर देणे, शरीरासाठी केव्हाही उपयुक्त ठरते. दिवसभरात कुठलेही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पाणी पिण्यावर आपण भर देणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होईल.
कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा नारळपाणी किंवा लिंबूपाणी पिणे आरोग्यासाठी केव्हाही चांगले. नारळ पाण्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा प्राप्त होऊन शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. सकाळी नारळपाणी पिणे हे जास्त फायद्याचे ठरते. जर आपण सकाळी नारळपाणी घेतले तर दिवसभर आपल्यामध्ये उत्साह कायम राहतो. नारळपाणी नियमित पिण्यामुळे आपली त्वचा कोरडी न पडता तिच्यामध्ये ओलावा कायम राहतो.
लिंबामध्ये सी जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. योग्य प्रमाणात लिंबू पाण्याच्या सेवनाने सर्दी-खोकल्याची समस्या कमी व्हायला मदत होते. तोंडातून दुर्गंधी येत असल्यास लिंबू पाणी पिण्याने तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत होते. त्याचबरोबर तोंडही कोरडे पडत नाही. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याने घसा कोरडा होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
लिंबू पाणी पिण्याने चयापचय क्रिया सुधारते. लिंबू पाण्याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. नैसर्गिक पाणी किंवा पाण्याचे स्रोत म्हणजे फळे, नारळपाणी अथवा लिंबूपाणी ह्यांच्या सेवनाने आपण आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा करू शकतो. योग्य प्रमाणात पाणी पिण्याने शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते. अशाप्रकारे योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
— संकेत प्रसादे
Leave a Reply