‘मातुरेव पिबेत्स्तन्यं तत्परं देहवृद्धये।’ – भाग २
काल आपण भारतातील स्तन्यपान संबंधी सद्यपरिस्थितीची एक बाजू पाहिली. आता नाण्याची दुसरी बाजूही विचारात घेणे महत्वाचे आहे. ती म्हणजे सार्वजनिक ठिकाणी स्तन्यपान करवताना आमच्या माता- भगिनींना ज्या अडचणींना सामोरे जावे लागते त्या अडचणी. आपल्या तान्हुल्याची भूक भागवणाऱ्या त्या मातेला सभोवताली असलेल्या आणि बहुतेक वेळा तिरक्या नजरेने तर कित्येकदा थेट पाहणाऱ्या विकृत व्यक्तींचा. अशा प्रवृत्ती समूळ नष्ट होणे शक्य नाहीच पण किमान त्यांच्यावर ताबा मिळवण्याकरता वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे.
रेल्वे स्थानके वा बस स्थानके यांसारख्या ठिकाणी विमानतळाप्रमाणेच ‘स्तन्यपान कक्ष’ उभारणे आवश्यक आहे. जेणेकरून आमच्या मातांची गैरसोय होऊ नये. परवाच्या दिवशी याविषयी मा. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना ट्विट केले होते. दुर्दैवाने अजूनपर्यंत काही प्रतिसाद नाही. कौतुकाच्या ट्विट्सना तातडीने RT मिळते हा आपल्यापैकी कित्येकांचा अनुभव असेल. मग या महत्वाच्या प्रश्नाबाबत अनास्था का असावी हे ‘प्रभू’च जाणोत!! अर्थात इथे मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करतोय असा सोयीस्कर अन्वयार्थ कोणीही लावू नये. कदाचित त्यांच्या आयटी सेल ला या प्रश्नाचे गांभीर्य उमगले नसावे. स्वतः श्री. सुरेश प्रभू जी हे अतिशय सर्जनशील आणि हुशार व्यक्तिमत्व आहेत हे माझे त्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर झालेले मत आहे. म्हणूनच त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी माझी मनःपूर्वक इच्छा आहे. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत म्हणूनच हा खटाटोप.
याप्रसंगी विशेष उल्लेख करावासा वाटतो तो शेगावच्या गजानन महाराज मंदिराचा. दर्शनाच्या रांगेतील मातांची गैरसोय होऊ नये म्हणून तेथे स्वतंत्र ‘स्तन्यपान कक्ष’ उभारण्यात आला आहे. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. अन्य मंदिर संस्थान समितींनीदेखील हा उपक्रम राबवायला हवा. तसे करणे सहज शक्य आहे. कुठलीही समस्या न वाटता हिंदुस्थानातील मातांना आपल्या तान्ह्या मुलांची भूक भागवणे सहजशक्य होईल त्यादिवशी आपण स्तन्यपानाचे खरे महत्व ओळखले असे म्हणता येईल.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Aug 3, 2016