‘वारा फोफावला’, ‘गगनी उगवला सायंतारा’ आणि ‘यमुनाकाठी ताजमहाल’ या गाण्यांचे गायक गजाननराव वाटवे यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज एकविसाव्या शतकात करता येणं अशक्य.
गजाननराव वाटवे यांचा जन्म ८ जून १९१७ रोजी झाला. मराठीत भावगीताचा जन्म गजानन वाटवेंच्या काव्यगायनाने झाला, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. गजाननराव वाटवे यांनी मराठीतील अनेक कवितांना सुंदर चाली लावून प्रथम भावगीताचा प्रकार लोकांपर्यंत नेला. आणि त्यांच्या या प्रयत्नाला लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला की, पुढे बराच काळ वाटवे म्हणजे भावगीत हे समीकरण झाले.
गजाननराव वाटवे यांचं खास वैशिष्टय़ म्हणजे कवितांना सुंदर चाली लावून त्या रेकॉर्ड व पुस्तकांतून त्यांनी घराघरांत व गल्लोगली लोकप्रिय केल्या. गजाननराव वाटवे यांच्या भावगीतांना कवितांतून जन्म मिळाला. प्रथमच कवितांना चाल लावली जाते व ती गोड गळ्याने म्हटली जाते हे रसिकांच्या ध्यानात आले. वाटवे यांचा हा प्रयत्न सुरुवातीलाच एवढा गाजला व त्याला एवढी प्रचंड लोकप्रियता मिळाली.
त्याकाळी गजाननराव वाटवेंचे भावगीत गायनाचे स्वतंत्र कार्यक्रम होऊ लागले. गजाननराव वाटवेंची भावगीतातील कारकीर्द म्हणजे भावगीतांचा सुवर्णकाळ होता. आपल्या कार्यक्रमात ते स्वत: लावलेल्या चालीच बहुधा ते म्हणत. त्यामुळे प्रत्यक्ष गाताना हवे ते बदल ते करून घेत. त्यामुळे त्यात ठराविकपणा येत नसे. प्रत्येक वेळी ते काव्य नवीनच वाटे. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी कधी लावण्या, नाटय़संगीत, सिनेसंगीत इतर काही प्रकार त्यांच्या कार्यक्रमात आणले नाहीत. द्वंद्वगीते नाहीत. साधेसुधे शब्द, साध्यासुलभ चाली यांचं जणू मनोमीलन त्यावेळच्या भावगीतात झालं आहे. दुधात साखर पडावी अशी भावगीतं पानफुटीसारखी जमून गेली आहेत की या भावगीतातील शब्दासाठी चाल जन्माला आली की चालीसाठी शब्द जन्माला आले, अशा गोड संभ्रमात भावगीतांचे रसिक पडतात, मनात घर करणारी व ओठावर रेंगाळणारी ही गोड गोड भावगीते महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैशिष्टय़ झाले. हा सांस्कृतिक ठेवा अवीट आहे. खरं तर या साध्या कविता होत्या, त्यांना गजानन वाटवेंनी सहज सुलभ चाली लावल्या. आश्चर्य म्हणजे गजाननराव वाटवे यांनी कवितेतील एकाही शब्दाचा बदल न करता त्यांना सुंदर चाली लावलेल्या आहेत.
मात्र एक काळ गजाननराव वाटवे यांनी गाजवला होता, हे मात्र नक्की. कवी मनमोहन यांच्या ‘राधे तुझा सैल अंबाडा’ आणि राजा बडे लिखित ‘नका मारू खडा शिरी भरला घडा’ या गीतांनी पुण्या-मुंबईत खळबळ उडवून दिली. दोन्ही गीतं अश्लील असल्याचं शिक्कामोर्तब संस्कृतीरक्षकांनी केले होते. रेडिओने दोन्ही गाण्यांवर बॅन टाकला. त्याकाळच्या लोकप्रिय सिनेमातल्या गाण्यांच्या रेकॉर्डस्पेक्षाही अधिक विक्री या दोन प्रायव्हेट गाण्यांच्या रेकॉर्ड्सने केली. गजाननराव वाटवे यांच्या स्वरातलं भावदर्शन ही त्याकाळच्या तरुण पिढीची गरज होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून थेट साठच्या दशकातील सुरुवातीपर्यंत गजाननरावांच्या भावगीतांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं. गांधी हत्येनंतर महंमद रफीचं ‘सुनो सुनो ए दुनियावालों बापू की अमर कहानी’ ऐकून गजाननरावांनी कवी मनमोहन यांना गांधीजींच्या जीवनावर कविता लिहिण्याची विनंती केली.
तुफान लोकप्रियता हे ‘गजाननराव वाटवे’ या नावासरशी जणू घट्ट चिकटलं होतं. गजाननराव वाटवे यांचे २ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गजाननराव वाटवे यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=8EJxW0rNF7k
Leave a Reply