मुंबईच्या राजभवनात अत्यंत सुस्थितीतला ब्रिटिशकालीन बंकर सापडल्याच्या बातम्यांनी काही दिवसांपूर्वीची वर्तमानपत्रं भरून गेली होती. केवळ राज्यपालांचं कुतूहल जागृत झाल्याने हा बंकर उजेडात आला अन्यथा इथे एवढा अनमोल खजाना दडलाय हे कोणाच्याच लक्षात आलं नसतं. या अगोदर तिथे मुक्काम केलेल्या अनेक राज्यपालांच्या तरी हे कुठे लक्षात आलं होतं.?
‘हे असं का?’ हा स्वत:ला पडलेला कुतूहलमिश्रित प्रश्न जगातील सर्वच शोधांच्या मुळाशी असतो. राज्यपालांना, ‘त्या भिंतीमागे काय लपलं असावं?’ या प्रश्नानं छळलं नसतं तर एवढी ऐतिहासिक महत्त्वाची गोष्ट कधीही उघडकीस आली नसती. आपल्यालाही असे अनेक प्रश्न पडत असतील, परंतु आपली ताकद मर्यादित असल्याने त्या प्रश्नाची समर्पक उत्तरे शोधण्यास आपण वेळ देऊ शकत नाही आणि आपल्याला तसे मार्गही उपलब्ध नसतात. या ठिकाणी खुद्द राज्यपाल महाशयांनाच प्रश्न पडल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आणि हा खजिना जगासमोर येऊ शकला.
विषय पुढे नेण्यापूर्वी मी माझ्याविषयी थोडीशी माहिती देतो. मी मुंबईच्या वैभवशाली इतिहासाचा एक हौशी अभ्यासक आहे. मी या अभ्यासाचं कोणतंही रीतसर शिक्षण घेतलेलं नाही. मला उपलब्ध असणाऱ्या मुंबईवरील जुन्या पुस्तकातून माहिती घ्यायची आणि तिचा संदर्भ वर्तमानाशी कसा जुळतोय याचं स्वयंअध्ययन करायचं हा माझा छंद. या छंदातून अनेक सुरस गोष्टी माझ्या हाती लागल्या व त्यातील काहींवर मी लिखाणही केलं. माझ्या वाचनात आलेल्या अशाच एका गोष्टीचा जवळचा संबंध राजभवनातील बंकरशी असावा अशी माझी खात्री झाल्याने हा लेख लिहिण्याचं धारिष्टय़ मी केलं. मी पुढे मांडलेल्या तर्काच्या आधारे काही संशोधन व्हावे या हेतूने मी हा लेख लिहीत आहे.
साधारण दोन-एक वर्षांपूर्वी माझ्या वाचनात मोरो विनायक शिंगणे याचं सन १८८९ साली लिहिलेलं ‘मुंबईचा वृत्तांत’ हे पुस्तक आलं. िशगणे यांनी पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या त्या कालच्या मुंबईचे वर्णन या पुस्तकात केले आहे. मुंबईच्या इतर ठिकाणांप्रमाणे मुंबईच्या राजभवनाच्या जागेचाही त्यात उल्लेख केलेला आहे. सध्या जिथे राजभवन आहे त्या टेकडीला ‘मलबार हिल’ या नावाने आपण ओळखतो ती टेकडी जुन्या पुस्तकांत ‘वालुकेश्वरा’चा डोंगर या नावाने नोंदली गेली आहे. गर्भश्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांच्या सध्याच्या वास्तव्याची ही अतिसंवेदनशील श्रीमंत टेकडी, एके काळी गुरांच्या चरण्याचा भाग होता. जंगली जनावरं, समुद्री चाच्यांचा वावर यामुळे दिवसाढवळ्याही इथे जायला त्या काळच्या लोकांना भीती वाटायची असा उल्लेख शिंगणेंच्या आणि त्याही अगोदर सन १८६२ सालात प्रसिद्ध झालेल्या गोिवद नारायण मडगावकरांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात आढळतो. त्या काळी इथे असलेल्या मलबारी चाच्यांच्या वावरामुळे या टेकडीला ‘मलबार हिल’ हे नाव मिळालं.
अशा या जंगलाने वेढलेल्या एकांत स्थानी अकराव्या शतकात शिलाहार राजांच्या कारकिर्दीत बांधलं गेलेलं वालुकेश्वराचं पुरातन मंदिर होतं. या मंदिरातील वाळूने तयार केलेलं लिंग प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्राने स्वहस्ते स्थापन केलं होतं, असा उल्लेख वालुकेश्वराच्या चरित्रात असल्याचं मोरो विनायक शिंगणे यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. मुस्लीम आणि पोर्तुगीजांनी त्यांच्या राजवटीत या मंदिराची नासधूस केली असंही शिंगणेंच्या पुस्तकात म्हटलं आहे. हे मंदिर आता जिथे राजभवन आहे त्याच परिसरात होतं. सध्या आपण जे वाळकेश्वराचं मंदिर पाहतो ते लक्ष्मणाने काशीहून आणलेल्या लिंगाचं आहे. मूळ वालुकेश्वर राजभवनाच्या जागी होता. वालुकेश्वराच्या मंदिराचा नासधूस केलेला पायाही काही काळपर्यंत राजभवनाच्या परिसरात दिसण्यात येत होता, जो नंतर इंग्रजांच्या काळात राजभवनाचा (तेव्हाचं गव्हर्नमेन्ट हाउस) परिसर बांधून काढताना काढून टाकला गेला. साक्षात छत्रपती शिवाजी राजांनी या वालुकेश्वराचं दर्शन अफजलखानाच्या वधानंतर घेतलं होतं असाही उल्लेख शिंगणे यांच्या पुस्तकात केलेला आहे.
या भागाला तेंव्हा वालुकेश्वराची दांडी असेही म्हणायचे. सर्वसाधारणपणे जमिनीच्या समुद्रात घुसलेल्या भूशीराला ‘दांडी’ म्हणण्याचा तेंव्हाच प्रघात असावा. या दांडीला ‘श्रीगुंडी’ किंवा ‘शिरगुंडी’ असेही म्हणत. पूर्वीच्या काळी या दांडीवर एक सुईच्या मेढय़ाप्रमाणे उभी चीर असलेला एक मोठा दगड होता. या चिरेतून पलीकडे गेलं की पापमुक्ती होते असा एक समज त्या काळी प्रचलित होता. परदेशी जाणं पाप मानलं जाण्याच्या काळात, श्रीमंत राघोबादादा पेशवे यांना त्या भेगेतून पलीकडे जाऊन आपल्या वकिलांना परदेशी पाठवल्याच्या पापातून मुक्ती मिळवावी लागली होती असं जुन्या पुस्तकांत नोंदलं गेलं आहे.
प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि राघोबादादा पेशवे यांच्यासारख्यांचा पदस्पर्श झालेल्या जागेवर आजचं राजभवन उभं आहे. या टेकडीवर साधारण एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दुसऱ्या दशकात इंग्रजांचा वावर सुरू झाला. सन १८१२ ते १८१९ च्या दरम्यान मुंबईचा गव्हर्नर असलेला लॉर्ड नेपिअन (‘नेपियन सी रोड’ हे नाव यांच्याच स्मृतिप्रीत्यर्थ दिलेलं आहे) या ठिकाणी कधी कधी शिकारीला यायचा आणि त्यासाठी त्याने इथे एक लहानशी लॉग हट बांधली होती. राजभवनाला (तेव्हाचं गव्हर्नमेन्ट हाउस) खरा आकार यायला सुरुवात झाली ती १८१९ ते १८२७ या काळात लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन गव्हर्नर असताना. या वेळेस मुख्य गव्हर्नमेन्ट हाउस परळ इथे, सध्या जिथे हाफकिन संस्था आहे, तिथे होतं. लॉर्ड एल्फिन्स्टनने हवापालटासाठी अधेमधे येऊन राहण्यासाठी मलबार हिलवर लहानशी बंगली बांधली होती. सध्या राजभवनाचा भाग असलेला ‘जल भूषण’ हा बंगला एल्फिन्स्टनने बांधलेल्या बंगलीच्याच पायावर उभा आहे. पुढे सन १८८५ पासून गव्हर्नरचे मलबार हिलवरील निवासस्थान अधिकृतरीत्या ‘गव्हर्नमेन्ट हाउस’ म्हणून वापरात यायला लागले. लॉर्ड रे हे गव्हर्नर म्हणून या ठिकाणी राहायला येणारे पहिले गव्हर्नर ठरले. सन १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर ‘गव्हर्नमेन्ट हाउस’चं नामकरण ‘राजभवन’ असं करण्यात आलं.
वर आपण पाहिलं की वाळकेश्वराची दांडी म्हणजेच आजच्या मलबार हिलचा दक्षिणेकडील जमिनीचा भाग समुद्रात घुसलेला आहे. या टोकावर दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहिलं की समोर थोडी दूर आपल्याला कुलाब्याची दांडी दिसते. मुंबईच्या नकाशात पाहिलं असता कुलाबा आणि वाळकेश्वर ही जमिनीची दोन टोकं खूप जवळ आलेली दिसतात. गुगल मॅपवर या दोन टोकांमधलं अंतर (एरिअल डिस्टन्स) साधारण साडेतीन कि.मी. येतं. हेच अंतर जमिनीवरून कापायचं झाल्यास चौपाटी, मरिन ड्राइव्ह माग्रे कुलाब्याच्या दांडीपर्यंत साधारण दहा ते बारा कि.मी. होतं. वाळकेश्वराची दांडी आणि कुलाब्याच्या दांडीला मधून समुद्रातून जोडणारा एक पूल जुन्या काळी होता असा एक उल्लेख मला शिंगणे यांच्या पुस्तकात सापडला आणि राजभवनात सापडलेल्या बंकरचा याच्याशी काही संबंध असू शकेल का, हा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. शिंगणे यांच्या पुस्तकात पुढे असंही म्हटलं आहे की या पुलाला ‘शिरगुंडी पूल’ असं जुन्या काळी म्हणायचे आणि या पुलाच्या माध्यमातून वाळकेश्वराच्या टेकडीवर चरायला आलेली गुरं पार कुलाब्यापर्यंत पोहोचायची. सन १८८९ साली लिहिलेल्या या पुस्तकात पुढे असं म्हटलं आहे की या पुलाचा पडलेला भाग ओहोटीच्या वेळेस नजरेस पडायचा. आता हा पूल होता की जमिनीच्या एका सखल, सलग पूलसदृश चिंचोळ्या तुकडय़ाने कुलाबा आणि वाळकेश्वर एकमेकाशी जोडलं गेलं होतं हा भाग संशोधनाचा आहे आणि मला संशोधकांसमोर मांडायचं असलेलं हेच ते रहस्य. बॅकबेच्या भरणीनंतर समुद्र मोठय़ा प्रमाणावर मागे हटवला गेला आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे ओहोटीच्या वेळेस या दोन टोकांच्या दरम्यान अधेमधे दृष्टीस पडत असलेला पूल अथवा जमिनीचा भाग कायमचा पाण्याखाली गेला का हे संशोधकांनी शोधून काढावं अशी विनंती मला या लेखाद्वारे करायची आहे.
राजभवनात सापडलेल्या बंकरमध्ये एकूण बारा-तेरा मोठय़ा खोल्या आहेत आणि त्यांचा उपयोग दारूगोळा साठवण्यासाठी होत असावा असा अंदाज वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये आहे. इंग्रजांच्या काळात राणीच्या वतीने या देशाचा कारभार पाहणारा मुख्य या ठिकाणी राहत असल्यामुळे त्याच्या बंदोबस्तासाठी इथे सैन्यही असले पाहिजे आणि या सैन्याच्या वापरासाठी हा बंकर असावा असा अंदाज आपल्याला बांधता येतो. परंतु इथे सैन्य असल्याचा उल्लेख मला कुठे सापडला नाही. तसे काही सैनिक असतीलही, परंतु मोठी पलटण इथे नसावी. मग या दारूगोळ्याचा उपयोग कशासाठी होत असावा? की या बंकरला जमिनीवरून जोडणारे एखादे भुयार असावे असाही प्रश्न निर्माण होतो. मग ती जमीन म्हणजे नजीकच्या कुलाब्याची तर नसेल हा पुढचा प्रश्न लगेच तयार होतो. राजभवनात बंकर सापडण्याआधी तिथे एखादे भुयार असावे अशीही चर्चा तिथल्या कर्मचाऱ्यामध्ये होती असेही बातम्यांमध्ये म्हटले आहे. मग या भुयाराचा, आणि कुलाब्याच्या दांडीचा काही संबंध असावा का असा संशय निर्माण होतो आणि त्याचं उत्तर बऱ्याच अंशी होकारार्थी मिळतं.
त्याचं कारण असं की ब्रिटिश राजवटीत सैन्य ठेवण्याच्या दोन मुख्य जागा होत्या. ‘फोर्ट’चं संरक्षण करण्यासाठी सध्याच्या आझाद मदानात मोठी पलटण असायची. या पलटणी मदान म्हणून या मदानाला काम्पाचे (camp) मदान असेही म्हणायचे. या मैदानात असलेलं सैन्य देशी म्हणजे काळ्या सैनिकांचं असायचं तर सैन्याचं दुसरं ठाणं कुलाब्याच्या दांडीवर असायचं. या दुसऱ्या सैन्यात सर्वच सैनिक आणि अधिकारी गोरे म्हणजे युरोपियन असायचे. आजही नेव्हीचं ठाणं या ठिकाणी आहे. वर म्हटल्याप्रमाणे जर कुलाब्याची दांडी आणि वाळकेश्वरला जोडणारा पूल त्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे खरोखर असेल किंवा या दोन टोकांना जोडणारा जमिनीचा सखल चिंचोळा भाग असेल तर कुलाब्याच्या दांडीवर असलेल गोरं सन्य अवघ्या काही मिनिटांत वाळकेश्वराच्या टेकडीवरील गव्हर्नमेन्ट हाउसमध्ये पोचणं सहज शक्य होतं आणि या सैन्याच्या वापरासाठी बंकरमधला शास्त्रसाठा असणं शक्य आहे. गोऱ्या गव्हर्नरच्या रक्षणासाठी इंग्रजांचा काळ्या सैनिकावर फार विश्वास नसावा म्हणून कुलाब्यावरून थेट समुद्रातून गोरं सैन्य आणण्याची अशी व्यवस्था केली गेली असावी असं म्हटलं तर योग्य होईल. आपल्याला असंही म्हणता येईल की पुलासारख्या दिसणाऱ्या या जमिनीच्या पट्टय़ाखालून कुलाब्यावरून ते थेट गव्हर्नमेन्ट हाउसवर उघडणारं एखादं अरुंद भुयार असावं आणि असं म्हटलं म्हणजे राजभवनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये असलेली भुयाराची चर्चा खरी असू शकते हे सिद्ध होईल. बंकर आहे या गोष्टीवर तरी कोणी विश्वास ठेवला होता, परंतु त्या दिशेने शोध घेतल्यावर तो खरोखर तिथे होता हे सिद्ध झाले. तसेच हेही होऊ शकते असे मला वाटते. माझ्या वाचनात आलेल्या तपशिलांचा तर्काने संबंध लावण्याचा एक प्रयत्न मी केला आहे. त्याच्या योग्यायोग्यतेची शहानिशा जाणत्यांनी करावी ही अपेक्षा.
— गणेश साळुंखे
(संदर्भ – ‘मुंबईचे वर्णन’ – गोविंद मडगावकर, इ. सन १८६२ ‘मुंबईचा वृत्तांत’ – मोरो विनायक शिंगणे, इ. सन १८८९)
हा लेख दि. २६ ऑगस्ट २०१६ च्या लोकप्रभामध्ये प्रसिद्ध झाला होता.
Leave a Reply