गन्स ऑफ नॅव्हरॉन्सचे कादंबरीकार ॲकलिस्टर मॅक्लीन यांचा जन्म २८ एप्रिल १९२२ रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झाला.
ॲलिस्टर यांचे बालपण आणि तरुणपण डेव्हिऑट येथे गेले. १९४१ साली त्यांनी रॉयल नेव्हीमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या महायुद्धात भागही घेतला. १९४६ साली नौदलातून बाहेर पडल्यानंतर ते ग्लासगो विद्यापीठ येथे इंग्रजीचा अभ्यास करू लागले. १९५३ साली त्यांनी पदवी संपादन केली आणि रुदरग्लेन येथे शिक्षक म्हणून काम करू लागले. विद्यापीठात अध्ययन करताना अर्थार्जनासाठी ते लघुकथा लिहू लागले.
१९५४ साली डिलिॲनस ही कथा लिहून त्यांनी एका लेखनस्पर्धेत बक्षीस मिळवले. कॉलिन्स प्रकाशन संस्थेने त्यांच्यासमोर कादंबरी लेखनाचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव स्वीकारून त्यांनी युद्धात आलेल्या अनुभवांवर एच.एम.एस. यूलिसिस ही कादंबरी लिहिली. या कादंबरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि लवकरच मॅक्लीन यांनी पूर्ण वेळ युद्धकथा, गुप्तहेरकथा आणि साहसकथा लिहिण्यास सुरुवात केली.
मुखपृष्ठावर ॲदलिस्टर मॅक्लीन हे नाव असल्याने नाही तर साहित्यच दर्जेदार असल्याने पुस्तके लोकप्रिय आहेत, हे दाखवून देण्यासाठी मॅक्लीन यांनी इयान स्टुअर्ट या टोपणनावाने दोन कादंबऱ्या लिहिल्या. या दोन्ही कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या.
समकालीन लेखकांपेक्षा मॅक्लीन यांची लेखनशैली वेगळी होती. प्रणयाची भडक वर्णने त्यांच्या साहित्यात आढळत नाहीत. त्यांच्या मते अशी वर्णने मूळ कथेचा वेग आणि थरारकता यांना मारक ठरतात. निसर्ग; त्यातही समुद्र आणि उत्तर अंटार्टिकच्या पार्श्वभूमीचा त्यांच्या कादंबऱ्यामधून विशेष वापर केला गेला आहे.
मॅक्लीन यांच्या २८ कादंबऱ्या आणि काही कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. स्वत:च्या कादंबऱ्यावर आधारित काही पटकथाही त्यांनी लिहिल्या आहेत. १९८३ साली ग्लासगो विद्यापीठाकडून त्यांना साहित्यासाठी डॉक्टरेट देण्यात आली.
मॅक्लीन यांचे २ फेब्रुवारी १९८७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply