नवीन लेखन...

लोथल येथील सिंधु-सरस्वती संस्कृतीची वसाहत व जगातील सर्वात जुना डॉक

Lothal

प्रास्ताविक :
पूर्वी, पाश्चिमात्यांना पुरातन भारतीय संस्कृतीबद्दलची माहिती फक्त शिकंदराच्या काळापासूनचीच होती, म्हणजे इ.स.पूर्व ३२५ पासूनची. भारतीय वेद-पुराणे इत्यादींमधे दिलेल्या माहितीवर त्यांचा विश्वास नव्हता. पण ही परिस्थिती २० व्या शतकाच्या सुरुवातीला, सिंधमधील मोहन-जो-दारो व पश्चिम पंजाबातल्या हडप्पा येथील सिंधु-संस्कृतीचा शोध लागण्यामुळे, बदलली. पुढे फाळणीमुळे ही दोन्ही स्थाने पाकिस्तानात गेली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या आर्किओलॉजिकल सर्व्हे डिपार्टमेंटने नवीन उत्खनने करून, या संस्कृतीच्या नवनव्या जागा शोधून काढल्या. वेगवेगळ्या युनिव्हर्सिट्या व कॉलेजे यांचे आर्किओलॉजी (पुरातत्व) विभाग, गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी वगैरेंनीही मोलाची भर घातली आहे. कालीबंगन, धोलावीरा, दायमाबाद, लोथल, अशी अनेक पुरातन स्थळे उत्खनन करून शोधली गेली, लुप्त सरस्वती नदीच्या पात्राचा शोध लावला गेला, द्वारकेला समुद्राच्या पाण्याखाली शोध घेऊन पुरातन संस्कृतीचे अवशेष शोधले गेले.

लोथल :
लोथल हे अशा पुरातन स्थळांपैकी एक महत्वाचे ठिकाण आहे. लोथलचा काळ आहे इ.स.पूर्व २४०० ते इ.स.पू. १९०० असा. लोथल हे आजच्या गुजरातमधील अहमदाबाद जिल्यामधे धोलका तालुक्यात आहे.
ते खंभातच्या आखातापासून जवळ आहे. भारतात आणि जगात आज अनेक मोठमोठी बंदरे आहेत.
पण लोथल येथें जगातील सर्वात जुना डॉक (गोदी) आहे, आणि तो आजपासून ४४०० वर्षांपूर्वीचा आहे !
बाप रे ! !

लोथल हे, ज्या संस्कृतीला हल्ली ‘सिंधु-संस्कृती’ किंवा ‘हरप्पन’ (हडप्पीय) संस्कृती म्हणतात, त्या संस्कृतीचा भाग आहे. खरे म्हणजे, या संस्कृतीला सिंधु-संस्कृती म्हणण्यापेक्षा ‘सरस्वती-संस्कृती’ किंवा
‘सरस्वती-सिंधु संस्कृती’ म्हणणेच अधिक योग्य ठरेल. सरस्वती ही नदी काही सहस्त्रकांपूर्वीच लुप्त झालेली आहे, म्हणजेच आटलेली आहे. ऋग्वेदात या नदीचे वर्णन आहे. हिला नद किंवा महानद म्हणत, इतके तिचे पात्र विस्तृत होते. तिचा उगम होत असे हिमालयीन भागात शिवालिक पर्वतराशींमधे, आणि ती समुद्राला मिळत असे गुजरातमधील खंभातच्या आखातात. सरस्वती नदी ही नुसती एक आख्यायिका नाही. तिचे पूर्वीचे पात्र नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सीने एरियल फोटोग्राफीच्या तंत्राच्या सहाय्याने शोधून काढलेले आहे, व प्रख्यात आर्किऑलॉजिस्ट (पुरातत्वविद्) श्री. हरिभाऊ वाकणकर यांच्या चमूने त्या लुप्त पात्राच्या मार्गावरून प्रवास करून आपली निरीक्षणे नोंदवलेली आहेत.

सरस्वती नदीच्या आणि सिंधु नदीच्या तीरावर व आजूबाजूला तत्कालीन संस्कृतीच्या लोकांच्या वसाहती होत्या. या संस्कृतीचा व्यापार आफ्रिकेशी व मेसापोटेमियाश, ज्याला आपण आज ‘मध्य-पूर्व आशिया’ म्हणतो त्या भूभागाशी, होता. तत्कालीन मेसापोटेमियन लोक सिंधु-सरस्वती संस्कृतीला ‘मेलुहा’ म्हणत असत. सिंधु संस्कृतीच्या स्थळांमधील उत्खननात कांही ठिकाणी रोमन नाणीही सापडलेली आहेत, यावरून हे सिद्ध होते की, या लोकांचे रोमशी, किंवा अनोतोलियामधील (आजच्या टर्कीमधील एक भाग ) रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध होते. अर्थात, रोमची संस्कृती त्यामानानें कमी-जुनी आहे. त्याअर्थी ,
रोमन-हरप्पन संबंध ही नंतरच्या काळातली, (बहुधा ‘लेट-हरप्पन पीरियड’ मधील) गोष्ट आहे.

साहजिकच, परदेशीय व देशांतर्गत व्यापारासाठी सिंधु-सरस्वती संस्कृतीला बंदरांची आवश्कता होती, व ती बंदरें त्या लोकांनी विकसितही केली. सरस्वती नदीचा या संस्कृतीच्या वसाहतींशी संबंध असल्यामुळे, खंभातच्या आखाताजवळ एखादे बंदर असणार हे उघडच आहे. आणि ते बंदर होते लोथल.

लोथल या नावाचा अर्थ : थोडा शोध :
लोथल या नावाचा अर्थ काय ? अर्थात, अति पुरातन काळी, जेव्हा लोथल हे एक फळफळलेले बंदर होते त्या काळी, त्याचे नाव अन्य काहीतरी असले पाहिजे. पण, अजूनही सिंधु-संस्कृतीची भाषा उलगडलेली नाही, त्यामुळे लोथलचे जुने मूळ नाव कळणे शक्य नाही. तेव्हा, लोथल हे नामकरण नंतरच्या काळात झालेले आहे, हे निश्चित. साधारणपणे लोथल नावाची उपपत्ती अशा प्रकारे दिली जाते – ‘थल’ शब्दाचा अर्थ आहे स्थळ. असे सांगतात की, गुजरातीमधे लोथलचा अर्थ आहे ‘लोथ+थल’, म्हणजे ‘प्रेतांचे स्थळ, मृतांची टेकडी’. सिंधीमधे ‘मोहन-जो-दारो’ या शब्दाचा ‘मृतांची टेकडी’ असाच अर्थ आहे. पहा, स्थानिक भाषेतील शब्दांवरून किती अर्थबोध होतो ते ! हा अर्थ आधीच समजून घेतला असता, तर कदाचित मोहन-जो-दारो, लोथल वगैरे स्थळे खूप आधीच उजेडात आली असती.

परंतु, माझ्या मते लोथल या शब्दाचा ‘मृतांची टेकडी’ हा अर्थ बर्‍याच नंतरच्या काळात (म्हणजे, कदाचित आजपासून हजार-दीड हजार वर्षांपूर्वी ) तयार झालेला असावा. मला वाटते की, लोथल या नावाचा मूळ अर्थ समजून घ्यायला आपल्याला संस्कृत भाषेचा आधार घ्यावा लागेल. संस्कृत भाषा वैदिक काळापासून, किंबहुना त्याही पूर्वीपासून, चालत आलेली भाषा आहे. संस्कृतमध्ये एक धातु (क्रियापद) आहे ‘लख्’ किंवा ‘लंख्’. (लोथलचा काळ हा वैयाकरणी पणिनीच्याही फार आधीचा काळ आहे. त्या काळात, म्हणजे वैदिक-संस्कृतमधे किंवा प्राग्-वैदिक संस्कृतमधे धातु कसे ‘चालत’ किंवा त्यांची काय धातुसाधिते होत, या गोष्टी आजच्या संस्कृतपेक्षा भिन्न होत्या. म्हणून आपण मुख्यत: मूळ धातुकडे पाहू या.) या धातुचा अर्थ व्ही.एस्. आपटे यांची संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी देते तो असा : ‘To Go, To Move’ ; अर्थात, ‘निघून जाणे, स्थलांतरित होणे’. साधारणपणे इ.स.पूर्व १९०० च्या सुमारास तत्कालीन लोकांना लोथल येथील वसाहतीचा त्याग करून स्थलांतरित व्हावे लागले, इतरत्र जावे लागले. लोथलला सोडून निघून जाणे हे नैसर्गिक आपत्तींशी संबंधित होते. आधीच्या काळात पुरांनी नुकसान केले. नंतरच्या काळात नदीचे पाणी कमी झाले, व नंतर नदीच्या पात्राने आपला मार्गच बदलला. त्यामुळे त्यानंतर या ओसाड पडलेल्या शहराला इतर लोक ‘लखस्थल’ / ‘लंखस्थल’ (अथवा लख्यस्थल / लंख्यस्थल, किंवा लखितस्थल / लंखितस्थल) , म्हणजे ‘The place from where the inhabitants have moved away’ ( अर्थात, ‘ज्या स्थळाला तेथील रहिवाशी सोडून निघून गेलेले आहेत, अशी वसाहत’ ) अशा कांहींशा नावाने ओळखू लागले असावे.

नंतरच्या काळात, म्हणजे आजपासून दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी, पाली, अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, पैशाची, अशा प्राकृत भाषा पुढे आल्या, व त्यांच्यापासून बदल होत होत, गेल्या १००० वर्षांमधे सध्याच्या आधुनिक भाषा निर्माण झाल्या. संस्कृत शब्दांचे सोपे रूप बनविण्याची या पाकृत भाषांची प्रवृत्ती होती. याची काही उदाहरणे पाहू या. संस्कृतमधे ज्यांना ‘प्राकृत’ भाषा असे म्हणतात, त्या भाषांमधेच स्वत:चे नाव ‘पाउअ’, ‘पाउद’, ‘पाअड’, ‘पाअड’, याप्रमाणे अपभ्रंशात्मक आहे. गौतम बुद्धाच्या ‘मध्यम मार्ग’ याला पालीमधे ‘मझ्झिम मग्ग’ असे म्हणतात. पुत्र चे पुत्त, मातृ चे मात, महाराष्ट्रचे महरट्ट, धर्म चें धम्म, अशी अनेक उदाहरणे देता येतील. अगदी आजही गुजरातीमधे ‘उत्तरायण’ला ‘उतराण’ व बडोद्याजवळील ‘कायावरोहण’ या स्थळाला ‘खारवण’ असे अपभ्रंशात्मक शब्द सर्रास वापरले जातात.

वरील उदाहरणांवरून हे लक्षात आले असेल की, लोथलच्या जुन्या स्थलनामाचे आजच्या २०००-२५०० वर्षांपूर्वी प्राकृतात अपभ्रंशात्मक रूप झाले असणार. स्थानीय प्राकृतात हे नाव कदाचित ‘लउथल’, ‘लंथल’, ‘लथ्थल’ असे काहीसे झाले असावे. (त्या भागातील भाषेवर शौरसेनी व पैशाची यांचा परिणाम झालेला असणार, किंवा तेथे कदाचित पैशाचीच बोलली जात असेल. परंतु पैशाचीचे जवळजवळ काहींच वाङ्मय उपलब्ध नसल्यामुळे, हे बदल आपल्याला तर्कानेच कल्पावे लागतात). आणि, त्याही काळाच्या नंतर काही शतकांनी , म्हणजे, आजच्या हजार-दीड हजार वर्षांपूर्वी , ते नाव ‘लोथल’ असे बनले असावे. आता या संदर्भात आपण गुजरातीतील अर्थाकडे फेरनजर टाकू या. वर दिलेलेच आहे की, लोथलचा जो सर्वमान्य गुजरातीतील अर्थ मानला जातो तो असा आहे : ‘प्रेतांचे स्थळ, मृतांची टेकडी’. या अर्थाचा संबंध
मृतांशी-प्रेतांशी आहे, म्हणजेच मरणाशी संबंध आहे. जर इंग्लिश-गुजराती डिक्शनरी पाहिली तर, आपल्याला दिसून येते की ‘die away’ याचा अर्थ असा दिलेला आहे : ‘ओछुं थतां थतां लुप्त थयुं’, म्हणजेच ‘कमी होत होत लुप्त झाले’. यावरूनही लोथलचा अर्थ स्पष्ट होतो की, ‘असे स्थळ जेथील रहिवासी कमी होत होत लुप्त झाले, तिथे उरलेच नाहीत (म्हणजे अन्यत्र निघून गेले, विखुरले)’.

लोथलची वसाहत :
आपण लोथल या नावाबद्दल पाहिले. आता लोथल या वसाहतीबद्दल जाणून घेऊ या. लोथल हे स्थळ आखातापासून थोडेसे आत आहे. नदीच्या तत्कालीन पात्राच्या ते जवळ आहे. त्याकाळी साबरमती
(की, सरस्वती?) नदी तिथून वहात होती, असे म्हणतात. आज तेथे लागून नदी तर नाहींच, पण जलविहीन शुष्क प्रदेश आहे. लोथलचे विभाग असे आहेत : जहाजांसाठी डॉक (गोदी), गोदामे, वस्तीसाठी ३ ते ६-६।। फूट उंच चबुतरे, त्यांवर वसाहत, व बाजार. नदीच्या पुरामुळे वस्तीला नुकसान पोचू नये, म्हणून चबुतरे बांधलेले होते. वस्तीची अगदी व्यवस्थित चौकोनी आखणी केलेली होती. सरळ रेषेत रस्ते होते. घरातील मांडणी व्यवस्थित असे. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी होत्या. सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाले (ड्रेनेज) होते. नाल्यांमधे कचरा साठू नये म्हणून सोय केलेली असे. वा !

आजच्या ‘विज्ञान युगा’तील, इसवी सनाच्या २१ व्या शतकातील, विस्कळित अव्यवस्थित वाढलेली शहरे, वाकड्यातिकड्या पसरलेल्या झोपडपट्ट्या, दाटीवाटीने चिकटून उभ्या झोपड्या, उघडी गटारे, जमिनीवरून वाहणारे सांडपाणी, या सर्व पार्श्वभूमीवर ; सरस्वती-सिंधु-संस्कृतीतील व्यवस्थित आखलेली व स्वच्छ ठेवली जाणारी शहरे व त्यांतील घरे, व्यापारासाठी डॉक व गोदामे, हे सर्व पाहिले की, त्या पुरातनकालीन लोकांचे कौतुक करावेसे वाटते, आणि आजच्या आपल्या तथाकथित ‘सुधारलेल्या’ आधुनिक समाजाची कीव करावीशी वाटते.

लोथलची गोदी (डॉक) , व तत्कालीन तंत्रज्ञान :
लोथलला भेट देणार्‍या लोकांना खास करून हे सांगण्यात येते की हा लोथलचा डॉक (गोदी) सध्याच्या विशाखापट्टम येथील ‘हिंदुस्थान शिपयार्ड’च्या डॉक एवढा आहे !! असा डॉक ४४०० वर्षांपूर्वी बांधला जाणे ही आश्चर्यकारकच गोष्ट आहे. म्हणून आपण थोडेसे या डॉकबद्दल जाणून घेऊ या.

हा डॉक नदीच्या पात्राला मानवनिर्मित नाल्यांनी (कॅनॉलस्.नें) जोडलेला होता ; एक कॅनॉल पाणी आत घेण्यासाठी (इनलेट) व दुसरा, पाणी बाहेर सोडण्यासाठी (आऊटलेट). नदीच्या पात्राशी हा डॉक थेट (डायरेक्ट) जोडलेला न ठेवण्याचा फायदा असा होता की नदीतील गाळापासून त्याचे रक्षण होत असे. डॉकचा आकार ट्रॅपिझॉइडल होता, (म्हणजेच चौकोनी ज्याची एक बाजू दुसरीपेक्षा मोठी होती). त्यामुळे जहाजांना आतमधे येणे अधिक सोपे होत असावे. डॉकची उत्तर-दक्षिण लांबी होती साधारणपणे ७१.५ फूट तर पूर्व-पश्चिम लांबी होती साधारणपणे १२१ फूट. भरतीच्या वेळी जहाजे थेट या डॉकमधे प्रवेश करू शकत असत. डॉकला एक लाकडी द्वार होते, जे वर-खाली करता येत असे. त्यामुळे ओहोटीच्या वेळीही डॉकमधे पाणी थांबून राहू शकत असे. याचा अर्थ असा की तत्कालीन लोकांना भरती-ओहोटीचे चांगले ज्ञान होते. या डॉकमधे आतल्या बाजूने भट्टीत भाजलेल्या विटांचा थर होता. बांधकामाला पक्केपणाही यावा व पाणी बाहेर झिरपूनही जाऊ नये, अशी ही व्यवस्था होती. भाजलेल्या विटा बनविण्याचे ज्ञान सिंधु संस्कृतीच्या लोकांना होतेच. घरातही व ड्रेनेजसाठीही विटांचा वापर त्यांनी केलेला आहे.

डॉकचा हा आकार, बांधकामाची पद्धत, पाणी आत-बाहेर येण्या-जाण्याची पद्धत, पाणी आतच थांबवून ठेवण्यासाठी वर-खाली करता येणारे दार, या सर्व गोष्टी ४४०० वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेतां, कौतुकास्पद आहेत. तत्कालीन संस्कृतीजवळ भरती-ओहोटी इत्यादी ‘मरीटाइम’ गोष्टीचे ज्ञान तर होतेच, पण अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) तंत्रज्ञानही होते, ही गोष्ट नक्कीच महत्वाची आहे.

मुद्रिका :
लोथल येथे आता, उत्खननाजवळच एक अप्रतिम वस्तुसंग्रहालय आहे, जिथे तत्कालीन वस्तूंचे प्रदर्शन मांडलेले आहे. यातील एका वस्तूने माझे खास लक्ष वेधून घेतले, आणि ती होती एक मुद्रिका (अंगठी). आपल्याला माहीतच आहे की, रामायणात, रामाने हनुमानाला सीतेला दाखविण्यासाठी स्वत:ची मुद्रिका दिली होती, असा उल्लेख येतो. यावर कांहींनी अशी टीका केलेली मी वाचलेली आहे की, ‘पुरातन भारतीय संस्कृतीला मुद्रिका बनवण्याच्या कलेचे ज्ञान उपलब्ध नव्हते’. परंतु, लोथलमधील मुद्रिकेने आपल्याला हे स्पष्ट दाखवून दिले आहे की, वास्तवात ४०००-४४०० वर्षांपूर्वी ही कला आपल्याकडे नक्कीच होती. वस्तुत: ही पुरातन सिंधु-सरस्वती संस्कृतीच अतिशय प्रगत अशी संस्कृती होती.

समारोप व शिकण्यासारखा धडा :
मुंबई ३५०-४०० वर्षांहून अधिक जुनी नाही. एक मोठे बंदर म्हणून तर मुंबई त्याहूनही अर्वाचीन आहे. त्या संदर्भात पाहिले तर , इ.स. पूर्व २४०० ते १९०० या कालावधीत लोथल फळफळले होते, या
गोष्टीचे महत्व अधिक जाणवते. ४०००-४४०० हजार वर्षांपूर्वी, म्हणजेच आपल्या २००-२२५ पिढ्यांपूर्वी ,
( हो, २०० हून अधिक पिढ्यांपूर्वी ! ) भारतात एक प्रगत संस्कृती होती, एवढेच नव्हे तर, जगातील
सर्वात जुना डॉक भारताच्या पश्चिम किनार्‍यावरच लोथल येथे होता, ही अभिमानाची गोष्ट आहे.

लोथलपासून आपण काही धडा घेऊ शकतो काय ? :
होय, नक्कीच. अर्थातच, आपल्या शहराचा ले-आऊट, नियोजन या गोष्टीचा आपण अधिक विचार करायला हवा, हा तर शिकण्यासारखा महत्वाचा मुद्दा आहेच. पण , त्याहूनही अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे, त्या काळातही ‘वर्ल्ड-क्लास’ डॉक बांधण्याइतके प्रगत असलेले व ५०० वर्षे वसलेले लोथल ओस का पडले, याचाही आपण अभ्यास करायला हवा. पुरांचा विचार करूनच वस्ती ६ फूट उंचीच्या चबुतर्‍यांवर वसवली गेलेली होती. ज्या संस्कृतीचा भरती-ओहोटीचा अभ्यास होता, तिला पूर किती उंचीपर्यंत जातो हे नक्कीच माहीत असले पाहिजे, व त्या हिशेबानेच त्या लोकांनी चबुतरे बांधले असले पाहिजेत. तरीही पुरांनी नुकसान झाले ; याचाच अर्थ असा की पूर त्यांच्या अभ्यासापेक्षा व आधीच्या अनुभवापेक्षा अधिक उंच-उंच उठू लागले असणार. याचे एक महत्वाचे कारण असणार पर्यावरणीय बदलांमुळे झालेले परिणाम. अर्थातच, अशा प्रकारच्या परिणामांची सिंधु-संस्कृतीतील लोकांना कल्पना नसणार ; ते बदल त्यांच्यासाठी अकल्पित होते. पर्यावरणीय बदलांचा दुसरा मोठा परिणाम नद्यांवर झाला. सरस्वती नदी लुप्त झाली, इतर नद्यांवरही संकट आले ; काही आटल्या, कांहींनी पात्रे बदलली. त्यामुळे, लोथलच काय, सगळी सिंधु-सरस्वती संस्कृतीच नष्ट झाली किंवा संपूर्णपणे विखुरली गेली ; ती इतकी की, जर विविध उत्खनने झाली नसती तर, अशी एखादी प्रगत संस्कृती भारतात पुरातन काळी होती हेही कदाचित आपल्याला ठाऊक झाले नसते.

आज आपल्याला पर्यावरणाचे परिणाम-दुष्परिणाम माहीत आहेत. ग्लेशियर (हिमनद्या) लहान-लहान होत चालले आहेत ; गंगा नदीही काही शतकांनी आटू शकेल (पूर्वी सरस्वती लुप्त झाली, तशी).
पर्यावरणतज्ञ विज्ञानाधारित-भाकित करत आहेत की, कांहीं दशकांनी किंवा एखाद्या शतकात समुद्राची पातळी बरीच वाढेल, आणि त्यामुळे समुद्रकाठावरील मुंबईसारखी जगातील अनेक शहरे धोक्यात येऊ शकतात, बुडू शकतात. जगांतल्या अनेक संस्कृतींमध्ये प्राचीन काळातील पुराच्या कथा आहेत. जशी, नोहा(नोआह्)ची कथा. भारतातही, आपल्याला मनू आणि महापुराची गोष्ट चांगली परिचयाची आहे. श्रीकृष्णाच्या काळात द्वारिका नगरी पाण्यात बुडाली, हा महाभारतातील उल्लेखही आपल्याला माहीत आहे. समुद्राची पातळी पूर्वी वाढली. तशीच ती भविष्यातही वाढणार आहे. पूर्वी शहरें व भूभाग पाण्याखाली बुडाले, तसेंच भविष्यातही होणार आहे. आणि, याची कल्पना आतां आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानामुळे आधीच आलेली आहे. मग, आपण सावधान असायला नको कां ? जुन्या संस्कृतींकडून व लोथलसारख्या वसाहतींकडून धडा घेऊन आपण पर्यावरणाविषयी अधिक सजग असायला हवे; नाहीतर एक दिवस आपलीही लोथलसारखीच स्थिती होईल. तेव्हा, सावधान !!

– सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..