द अदर साईड ऑफ सोल ! अर्थात , न लिहिलेल्या आत्मचरित्रांतून उडालेले आत्मे !!!
शीर्षक वेगळंच वाटतंय ना ?
आहे वेगळंच , पण ते सहज नाही स्फुरलेलं .
काहीतरी सांगायचंय , सुचवायचंय .
काहीतरी लक्षात आणून द्यायचंय .
कुणाच्यातरी मनातलं, शब्दात उतरवायचंय .
तुम्ही कधी आत्मचरित्रं वाचली आहेत ?
प्रसिद्ध व्यक्ती , कलाकार , खेळाडू , उद्योगपती , अभिनेते , अभिनेत्री , साहित्यिक किंवा अशाच वर्गवारीतील कुणाची आत्मचरित्रं , मनोगतं किंवा दुसऱ्यांनी केलेली आत्मकथनाची शब्दांकनं ?
वाचली असाल कदाचित .
आपण कसे घडलो , वाढलो आणि जगावेगळं काय काय केलं , ते सांगणारी .
आत्माविष्कारी प्रेरणा असणारी .
समाजाला दीपस्तंभ असू शकणारी .
प्रेरणादायक . लाभदायक .
दुःखाचे उमाळे आणि सुखाबद्दल आसक्ती नसणारी वगैरे , वगैरे…
पण आपल्या शीर्षकाशी त्याचं काय नातं , असा प्रश्न मनात उद्भवेल .
आपण जी आत्मचरित्र वाचतो , त्यापेक्षा अनेकांच्या मनात वेगळी आत्मचरित्रं लिहिली जात असतात . ती प्रत्यक्ष कागदावर कधीच येत नाहीत . किंवा तशी ती कागदावर येऊ नयेत म्हणून अनेकजण आटोकाट प्रयत्न करीत असतात .
अशी न लिहिली गेलेली आत्मचरित्रं , खूपच वेगळी असतात . अनवट वाटेनं जाणारी असतात . प्रचंड धक्कादायक असतात . खूप गुपितं लपवून ठेवणारी असतात . समाजात गदारोळ करणारी असतात . अनेकांचे बुरखे टराटरा फाडणारी असतात . नातेसंबंध ओरबाडून टाकणारी असतात . अशी आत्मचरित्रं सप्तरंगी नसतातच तर कृष्णधवल रंग त्यात मजबूत असतो .
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ,अशा आत्मचरित्रांचे नायक हे सर्वसामान्य असतात . त्यामुळे त्यांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातील त्यांचा आत्मा हा केव्हाच उडून गेलेला असतो .
अशा न लिहिलेल्या आत्मचरित्रातील काही पाने माझ्या हाती लागली .
हे वाक्य शब्दशः घेऊ नका , आलंकारिक अर्थानं घ्या . कारण आत्मचरित्रं काल्पनिक आहेत . पण वास्तवदर्शी आहेत .
आपल्या नायकांच्या आत्म्याची दुसरी बाजू , जी कधी मनाबाहेर येतच नाही , ती त्या नायकांना उलगडून दाखवायची आहे .अर्थात त्या आत्मचरित्रातून आत्मा उडून गेलेलाच आहे , मी फक्त निमित्तमात्र .
आता त्या आत्मचरित्रातील पानं केव्हा वाचायला मिळणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल .
तर मंडळी , कदाचित आज संध्याकाळपासून आत्मचरित्रातील मला सापडलेली काही पानं मी तुमच्यासाठी सादर करीन .
अट एकच .
लेखन वाचायचं , विचार करायचा आणि नावासह सर्वाना पाठवायचं , शेअर करायचं .
चला तर ,
प्रतीक्षा करू या …
द अदर साईड ऑफ सोल !
अर्थात , न लिहिलेल्या आत्मचरित्रातून उडालेले आत्मे !!!
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
Leave a Reply