व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात विवेक मेहेत्रे यांनी लिहिलेला लेख.
भारतामध्ये व्यंगचित्र कलेची फार मोठी परंपरा आहे. १०० वर्षांहून अधिक काळ आपल्या देशात वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये व्यंगचित्रे, हास्यचित्रे प्रकाशित होत आहेत. पारतंत्र्याच्या काळात राजकीय विषय व समाज प्रबोधन यासाठी ह्या माध्यमाचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे. मात्र त्या काळात छपाईचे तंत्र फारसे प्रगत नव्हते. प्रत्येक चित्राचा वेगळा ठसा (ब्लॉक) बनवून छपाई केली जात असे. एकदा व्यंगचित्र प्रकाशित झाल्यावर त्या ब्लॉक/ ठोकळ्याचा काहीही उपयोग होत नसे म्हणून छोट्या दैनिकांना/ छोट्या मासिकांना व्यंगचित्र छपाईचा खर्च करणे परवडत नसे. त्यामुळे देशात व महाराष्ट्रात फारच कमी व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्र रेखाटणे हा पूर्ण वेळेचा, पोटापाण्याचा व्यवसाय नसल्याने व्यावसायिक चित्रकारच कधीतरी गरजेप्रमाणे व्यंगचित्रे रेखाटून देत असत. फारच मोठ्या दैनिकांकडे/ प्रकाशन संस्थांकडे निवडक व्यंगचित्रकार नेमण्याची ऐपत असे.
पण हळूहळू मराठी वाचकांची आवड, विषयांचं वैविध्य व छापिल मासिकांची वाढती संख्या यामुळे मराठी व्यंगचित्रकारांची संख्या वाढू लागली. काही अन्य व्यवसायातील व्यक्तीसुद्धा छंद म्हणून आपले विचार व कल्पना व्यंगचित्रांतून सादर करू लागले.
मराठी व्यंगचित्रकला कोणत्याही कला महाविद्यालयामुळे प्रगत झाली नाही. आतापर्यंतच्या सर्वच ख्यातनाम मराठी व्यंगचित्रकारांना एकलव्याप्रमाणे ( गुरुकडे न शिकता) स्वतःचा मार्ग शोधून प्रस्थापित व्हावे लागले.
एकूणच देशाच्या तुलनेने मराठी व्यंगचित्रकारांची प्रतिभा, विनोदबुद्धी, कल्पकता वाखाणण्यासारखी आहे. आम्ही व्यंगचित्रकार खरंतर अल्पसंख्याकच १३२ कोटींच्या देशात जेमतेम १४० पूर्णवेळ किंवा व्यावसायिक व्यंगचित्रकार आहेत. महाराष्ट्रात वैचारिक बैठक, संस्कार, वाचन बऱ्यापैकी असल्याने मराठी व्यंगचित्रकारांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेने थोडी जास्त आहे. पण आजच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या दबावामुळे व अन्य माध्यमांच्या दूषित वातावरणामुळे मराठी व्यंगचित्रकला लुप्तच होईल की काय? अशी भीती वाटते.
दैनिकांच्या वाचकांना राजकीय, ताज्या विषयावरची व्यंगचित्रे हवी असतात. म्हणूनच एखाद्या नेत्याच्या विरोधातील/त्याच्या गैरवर्तणूकीचा समाचार घेणारी, जनतेच्या मनातील विचार स्पष्ट मांडणारी व्यंगचित्रे जेव्हा दैनिकात पाहायला मिळतात, तेव्हा दर्दीवाचक सुखावून जातात.
पूर्वी राजकीय, मराठी व्यंगचित्रे वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर, तीन कॉलम रुंदीत छापली जात असत. हळूहळू ती व्यंगचित्रे आतल्या पानांवर गेली आणि आता तर महाराष्ट्रातल्या आघाडीच्या, महत्त्वाच्या दैनिकांनी राजकीय व्यंगचित्रेच छापणे थांबवले आहे.
खरं तर सुजाण, सुविद्य राजकीय नेत्यांचा राजकीय व्यंगचित्रांना विरोध नसतो. उलट वर्तमानपत्रांतून मिळणाऱ्या ह्या फुकटच्या प्रसिद्धीचा ते आनंद लुटतात…
पण राजकीय नेत्यांचे सो कोल्ड फॉलोअर्स, कार्यकर्ते (?) यांची टोळकी सवंग प्रसिध्दीसाठी दंगे, दगडफेक, संपादकांना काळे फासणे असे उद्योग करू लागले. सध्या तर कोणत्याही क्षुल्लक गोष्टींमुळे भावना दुखावतात म्हणे!
टी-शर्टवर आपल्या नेत्यांचे फोटो व घोषणा रंगवून फिरणारे गल्ली बोळातले दादा, नेते, विभाग प्रमुख इत्यादींची टोळकी… ह्यांना घाबरून अशी प्रगल्भ व्यंगचित्रे प्रकाशितच होणार नसतील तर ती गोष्ट लोकशाहीला मारक आहे… कारण नेमकेपणाने व्यंगावर बोट ठेवत खिल्ली उडवण्याची जबरदस्त ताकद फक्त व्यंगचित्रातच आहे.
मराठीच नव्हे तर सर्वच भाषातील व्यंगचित्रकारांना असुरक्षित वाटेल अशी परिस्थिती सध्या आपल्या देशात आहे. हे मी ठाणे येथे झालेल्या अ.भा. व्यंगचित्रकार संमेलनात ठासून सांगितले होते. नव्या पिढीतील मराठी व्यंगचित्रकारांची शैली स्वतंत्र आहे. त्यांच्याकडे बौद्धिक क्षमता तर आहेच पण त्यांच्या रेखाटनाला तंत्रज्ञानाची सोबतही मिळत आहे. प्रयोगशीलताही वाढत आहे.
मराठी व्यंगचित्रकारांना साहित्यिकांचा दर्जा द्यावा असे १०० वर्षांनंतरही कोणाला वाटत नाही. मराठीमधल्या उत्तम खपाच्या दिवाळी अंकांमध्ये विनोदी विशेषांकाचे स्थान फार वरचे आहे. मात्र तरीही साहित्य संमेलनात व्यंगचित्र विषयावर परिसंवाद नसतात व त्यांना मानही नसतो.
मराठी व्यंगचित्रकलेला १९७० ते २००० ह्या काळात खरा सुवर्णकाळ प्राप्त झाला होता. आता छापील मिडियात संधी नाही म्हणून काही व्यंगचित्रकार सोशल मिडियावर व्यक्त होतात. व्हॉटस् अॅप, फेसबुक, ट्विटरच्या लोकप्रियतेमुळे अशी व्यंगचित्रे क्षणार्धात सर्वदूर पसरतात. पण हा हौशीचा मामला असतो.
मराठी व्यंगचित्रकला टिकून रहावी, वाढावी, जगभर पसरावी यासाठी खूप प्रयत्न व्हायला हवेत असे मला वाटते. ह्या क्षेत्रातील सकारात्मक बाबींची संपूर्ण माहिती पालकांनाच नसल्याने पालक आपल्या पाल्यांना हा मार्ग सुचवत नाहीत. मात्र जागतिक पातळीवर व्यंगचित्रकार मान व धन ह्या दोन्ही बाबतीत प्रगतीपथावर असलेले आढळतात. आपल्याकडेही तसे घडावे.
व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात विवेक मेहेत्रे यांनी लिहिलेला लेख.
— विवेक मेहेत्रे
ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि प्रकाशक
Leave a Reply